फियोर्डसकाठचा स्वप्नील प्रवास

उदय ठाकूरदेसाई
गुरुवार, 28 जून 2018

आडवळणावर
 

हिनाभरापूर्वी जर कुणी मला प्रश्‍न विचारला असता, की आजवरच्या प्रवासातला सर्वाधिक आनंद देणारा प्रवास कुठला? तर ‘बांफ ते जास्पर’ असं उत्तर मी दिलं असतं! परंतु ८ दिवसांपूर्वीच स्कॅंडेनेव्हियावरून परतल्याने, आज कुणी परत विचारलं तर मात्र माझं उत्तर बर्गेन ते गिलो, असं असेल. नॉर्वेच्या अक्षरशः स्वप्नील, मोहमयी प्रांतातला हा प्रवास माझ्या आजवरच्या प्रवासातला सर्वाधिक आनंद देणारा असा प्रवास आहे. 

बर्गेनवरून वॉस हा एक तासाचा बसप्रवास. वॉसवरून मिरडल हा ५० मिनिटांचा छोटासा ट्रेन प्रवास. मिरडल ते फ्लॅम हा पुन्हा रेल्वेप्रवास. फ्लॅम ते गुडवांगेन हा दोन तासांचा क्रुझप्रवास, गुडवांगेनवरून साडेअकरा आणि २५ किमीचे अनुक्रमे दोन बोगदे पार केल्यावर येणारं अतिशय सुरेख असं लीर्डल हे गाव आणि त्यानंतर ‘स्टेनक्‍लेप’ इथं बसमधून उतरून पाहिलेलं बर्फाचं साम्राज्य आणि त्याहीनंतर एका तासानं गाठलेलं गिलो! इतक्‍या विविध साधनांनी निसर्गाचा पसारा, निसर्गानं अनंतहस्ते केलेली मुक्त उधळण पाहण्याचा हा पहिलाच अविस्मरणीय, स्वप्नील आणि मोहमयी प्रवास होता! मोजक्‍या शब्दांत सांगायचं, तर चढत्या भाजणीनं रंगत जाणारा तो प्रवास होता. 

बर्गेन इथं रात्री लीडरनं साऱ्यांना सांगितलं, ‘उद्या सकाळी वॉस इथं १०.०१ ची रेल्वे पकडायची आहे. पुढची जगतविख्यात 

मिरडल ते फ्लॅम रेल्वे ही त्या पहिल्या रेल्वेला जोडून असल्यानं कुठल्याही परिस्थितीत आपल्याला सकाळी पावणे दहाला वॉसला पोचावंच लागेल. त्यामुळं सकाळी ८ वाजता बर्गेनहून निघू या.’ 

दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता अल्पोपाहारासाठी सारेजण जमल्यावर, ‘लीडरच्या सांगण्यानंच झोप लागली नाही’ ‘आधीच झोप नाही.. त्यात पांढरा रंग सोडून, कडक, खरखरीत, वाकडे-तिकडे पाव खाऊन आपण कसं वेळेवर निघणार?’ अशा मजेशीर प्रतिक्रिया आल्या. एक काका तर चक्क म्हणाले, ‘या थंड हवामानातल्या लोकांना मऊसूत खाणं आवडतंच नसावं की काय कोण जाणे! पाव कापायला करवतीसारख्या मोठ्या सुऱ्या! त्या थंड कडक वाटोळ्या पावात गारगुट्ट ‘बटर’ चिकटवायचं, त्याला ‘जाम’ फासायचं आणि मग तोंडाचं बोळकं शाबूत असलेल्यांनी ते खायचं असा अवघड प्रसंग रोज समोर असल्यानं (!) त्यातून सुटका करून घेऊन वेळेवर नाश्‍ता करून वेळापत्रक पाळायची रोज कसरत करावी लागतेय हो आमच्यासारख्यांना!’ घराबाहेरपडूनसुद्धा घरच्यासारखंच खाणं हवं असणाऱ्यांची मला कीव येते. 

आठ वाजता बस सुरू झाल्यापासून काही मिनिटांतच आमची बस इ-१६ या महामार्गाला लागली. ओरलॅंडफियोर्ड आणि सोगनेफियोर्ड या दोन फियोर्डसकाठचा देखणा निसर्ग डावीकडं ठेवीत मलईदार महामार्गावरची सुंदर लयबद्ध वळणं घेऊन बस अशी काही लगबगीनं वॉसला पोचली, की काही विचारता सोय नाही. सलग तासाभराच्या प्रवासानं (१ तास १० मिनिटं) वॉस स्थानकाबाहेर लवकर पोचल्यावर, वॉस स्थानकाबाहेरच्या अतिरम्य वातावरणात सारेजण आपापली वयं विसरून उत्कृष्ट निसर्गाला कॅमेराबंद करायला लागले. आपापल्या आवडत्या व्यक्तीला पोझेस घ्यायला सांगू लागले. काही व्हिडिओ घेऊ लागले. काही चटकन या कोलाहलापासून दूर जाऊन तेवढाच एकांत घेऊ लागले. 

वॉसच्या दोन ओळखी आवर्जून सांगण्यासारख्या आहेत. पहिली ओळख म्हणजे वॉस इतकं रमणीय आहे, की तुम्ही नुसती कूस जरी बदललीत तरीदेखील दरवेळी, निसर्गाच्या सौंदर्याचा एक वेगळाच तुकडा पुढं उभा ठाकतो. दुसरी गोष्ट म्हणजे वॉस ही नॉर्वेमधील साहसी खेळांची राजधानी आहे. त्यामुळं नेमक्‍या वॉसच्या तळ्याकाठीच आम्ही आकर्षक टेंट पाहिला. मजा करून रेल्वे स्थानकावर परतताना, दोन मजेच्या गोष्टी भारतीय प्रवासी म्हणून सांगितल्या पाहिजेत. एक आजोबा जवळ येऊन मला म्हणाले, ‘गाव आणि स्टेशन छान आहे. पण प्रसाधनगृह बंद. फायदा काय?’ कोणीतरी मागून बोललं, ‘क्रेडिट कार्ड वापरावं लागेल आजोबा..’ मी लगेच आजोबांसाठी क्रेडिट कार्ड वापरून प्रसाधन गृहाचा दरवाजा उघडायचा अवकाश... तमाम मंडळी आत - प्रसाधनगृहात घुसली... (खरं तर एका माणसाला प्रसाधनगृह वापरण्याचा भारतीय चलनात ८४ रुपये आकार). 

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या दौऱ्यात दोन वेळा बुलेट ट्रेननं - सुपरफास्ट ट्रेननं जाण्याची संधी मिळाली. त्यावेळी कुठल्याही फलाटावर चिटपाखरूदेखील नाही हे अनुभवता आलं होतं. यावेळी वॉस स्थानकावरसुद्धा आमच्याव्यतिरिक्त अगदी कुणीही नव्हतं. १०.०१ वाजता गाडी सुटण्याअगोदर खरोखर एक मिनीट वगैरे अगोदर रेल्वेची दोन माणसं येऊन कामं निपटून गेली. ट्रेनमध्ये गर्दी, कलकलाट काही नसल्यानं सारेजण पुन्हा एकदा निसर्ग बघण्यात रंगून गेले. सुरुवातीला एक धबधबा पाहिल्यावर खुश होणारी मंडळी पुढं पुढं दूरवरच्या अति उंच डोंगरावरून जोरदार हवेमुळं खालपर्यंत पोचू न शकणाऱ्या धबधब्याच्या पाण्याच्या धारेकडंच बघू लागले. व्हिडिओ काढणारे दमले. ५० मिनिटांच्या मंत्रमुग्ध अवस्थेत मिरडल या गावी पोचलो. परंतु तिथं फ्लॅम्सबाना ही जगद्विख्यात रेल्वेगाडी पकडायची असल्यानं धावाधाव करून, चटकन डब्यात शिरून, योग्य जागा पकडेपर्यंत ही रेल्वेगाडी सुरू झालीसुद्धा! पश्‍चिम नॉर्वेच्या एकापेक्षा एक अतिसुंदर चित्रमय जगत सादर करणाऱ्या या फ्लॅम रेल्वेची निवड ‘नॅशनल जिओग्राफी ट्रॅव्हलर मासिका’नं ‘युरोपमधील सर्वोत्तम सुंदर रेल्वे प्रवास’ यात केलीय, तर ‘लोनली प्लॅनेट’ या मासिकानं या फ्लॅम रेल्वेची गणना ‘जगातील सर्वोत्तम रेल्वेप्रवास’ यात केली आहे. ही एवढीच माहिती खरी तर पुरेशी आहे. परंतु त्यामुळं आम्ही किती मजा केली आणि किती मजा अनुभवली हे सारं शब्दात मांडण्याच्याही पलीकडचं आहे. एक अपूर्व समाधान उरी घेऊनच आम्ही सारे फ्लॅम इथं उतरलो. 

एव्हाना भूक लागली होती. सर्वांजवळ दीडएक तास तरी हाताशी होता. आपापल्या आवडीनुसार सारेजण शाकाहारी/मांसाहारी गटात पांगले. 

आम्ही अर्थातच कुठं छान मासे मिळतात का ते पाहायला गेलो. रेल्वे संकुलातच एका कोपऱ्यात माशाचा स्टॉल होता. सुंदर माशाचं सूप, सामन मासा, अप्रतिम फिशकरी आणि त्यांच्याकडील गुरगुट्या भात.. असा सुंदर बेत जमला. त्या सुंदर जेवणानंतर २-२ आइस्क्रीम्स खाऊन सुंदर फ्लॅम बघू लागलो. तेवढ्यात क्रूझवर जाण्याची वेळ झाली. 

आम्हाला फोटो-व्हिडीओज घ्यायचे असल्यानं आम्ही सुरुवातीला एकदम वरच्या डेकवर आणि वरच्या डेकवर गर्दी झाल्यावर, क्रुझवरच्या सगळ्या बाजूंनी गावं, घरं, निसर्ग टिपत गुडवांगेन हे अखेरचं ठिकाण येईपर्यंत ‘एक्‍सप्लोर’ करत राहिलो. क्रूझच्या एकदम उंचावरच्या टोकाजवळ केवळ मी आणि स्वाती उभे असताना सीगल्सनी जवळून घातलेली साद, शांत, अतिथंड वारा, कुणाच्याही मनाचा हमखास ठाव घेणारी फियोर्डस, बर्फाच्छादित हिमशिखरं, त्याच्या पायथ्याखालील गावं, हिरव्या रंगानं त्या संपूर्ण परिसरावर पांघरलेली माया, या साऱ्या गोष्टी भान हरपवणाऱ्याच होत्या! अखेर हा सुंदर प्रवास संपून आम्ही गुडवांगेनला उतरलो. 

आम्ही उतरलो त्यासमोरच आमची बस उभी केलेली होती. त्यात बसून पहिले साडेअकरा आणि नंतर २५ किमीचे २ बोगदे पार करून 

आम्ही लीर्डल या गावी पोचलो. सोगनेफियोर्डच्या दक्षिण भागानंतर निरोयफियोर्डच्या अप्रतिम प्रवासानंतर लीर्डल.. इथं तर तुम्ही पाहाल ती फ्रेम स्वप्नील अशी या भागाची महती आहे. केवळ २२०० लोकांची वस्ती असलेल्या लीर्डलमधील बोरगुंद येथे बाराव्या शतकातलं जुनं चर्च अजूनही अस्तित्वात आहे. 

तेथून आम्ही गिलोच्या वाटेवर बर्फाळ प्रदेशातून जात असता, वाटेत सर्वजण ‘बस थांबवा, बस थांबवा’ करू लागले. अखेर ‘स्टेनक्‍लेप’ नावाच्या गावकुसाबाहेर बर्फाच्छादित हिमशिखरांच्या आणि बर्फाळ तळ्याच्या पार्श्‍वभूमीवर अतिस्वच्छ नैसर्गिक वातावरणात, रस्त्याच्या कडेला साठलेल्या मुबलक बर्फामध्ये बसमधील सारी मंडळी लहान होऊन मनमुराद खेळली.. दमली... आणि मग आम्ही अखेरच्या टप्प्यावर गिलो इथं जाऊन पोचलो. सकाळी ८ ते रात्री ८ असा बारा तासांचा प्रवास आम्ही केला होता, पण अनेक साधनांचा, अनेक फियोर्डसचा वेगवेगळ्या निसर्गसौंदर्याचा आनंद लुटताना वेळ कसा गेला हे कळलंच नाही. 

नॉर्वेतल्या केवळ ५-६ फियोर्डसच्या दर्शनानं तेथील निसर्ग सौंदर्यानंच आम्ही पुरते घायाळ झालो. परंतु जेव्हा नॉर्वेमधे १९९० फियोर्डस आहेत हे समजलं तेव्हा अचंबित व्हायला झालं! नॉर्वेतल्या निसर्गसौंदर्याची भूल पर्यटकाला अशी बेभान करणारी आहे.. 

नॉर्वेच्या फियोर्डसची जादू 
समुद्राच्या खाडीच्या भागाला फियोर्डस म्हणतात. फियोर्डस या साधारण इंग्रजी ‘यू’ आकाराच्या दऱ्या असतात. भौगोलिकदृष्ट्या प्रचंड हिमनगाच्या दाबानं निर्माण झालेल्या या दऱ्या हमखास अरुंद आणि लांब असतात. फियोर्डस ही चांगली नैसर्गिक बंदरं असू शकतात. समुद्राच्या अवखळ पाण्याला दोन दऱ्यांमध्ये चेपून जणू शांत निश्‍चल बनवतात. 

कसे जाल? 
 बर्गेन ते वॉस : बसप्रवास १ तास ५ मिनिटं. 
 वॉस ते मिरडल : ट्रेनप्रवास ५० मिनिटं. 
 मिरडल ते फ्लॅम : ट्रेनप्रवास ५७ मिनिटं. 
 फ्लॅम ते गुडवांगेन : क्रूझप्रवास २ तास. 
 गुडवांगेन ते गिलो : बसप्रवास ३ तास. 

काय पाहाल? 
फियोर्डस, धबधबे,तळी, हिमशिखरं, समुद्रीजीवन, शिखरांच्या पायथ्याखालील घरं, बर्फाच्छादित तळी आणि हिमशिखरं... 
 

कुठे राहाल?
सुरुवातीचं बर्गेन आणि अखेरचा थांबा असलेलं गिलो इथं आपल्या बजेटप्रमाणं राहण्यासाठी अनेक हॉटेल्स उपलब्ध आहेत. 

काय खाल? 
फ्लॅम रेल्वे स्थानकाबाहेरच्या संकुलात शाकाहारी/मांसाहारी खाण्याची उत्तम सोय आहे. मासे खाणाऱ्यांसाठीतर आनंदाची पर्वणीच आहे. 
‘सामन’ माशाचं कालवण, गुरगुट्या भात, अप्रतिम फिश करी आणि जवळच्याच आईस्क्रीमपार्लरमध्ये मिळणारी वेगवेगळी आइस्क्रीम्स, तुमच्या प्रवासाच्या आनंदात भर घालतील! 

सर्वांत महत्त्वाचं! 
फक्त फिनलंडमध्ये युरो चलन चालतं. 
नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क इथं फिरताना दुकानदार युरो तर घेतात; परंतु सुटे मात्र त्यांच्या त्यांच्या ‘क्रोनर’मध्ये देतात. जे तापदायक होऊन 
बसतं! म्हणून जवळ अवश्‍य क्रेडिट कार्ड बाळगा. आपली सगळी क्रेडिट कार्डस परदेशात चालतात.

फोटो फीचर

संबंधित बातम्या