निसर्गरम्य, अतिशांत उदवाडा 

उदय ठाकूरदेसाई
मंगळवार, 17 जुलै 2018

आडवळणावर
 

पावसाळ्यात पुण्या-मुंबईजवळची ठिकाणं वारंवार बघून झाली होती. एका पावसाळ्यात शेजारच्या गुजरात राज्यातल्या, परंतु आपल्या फारच जवळ, तरीही अपरिचित अति शांत अशा उदवाडा इथं जायचं ठरवलं. तोपर्यंत उदवाडाबद्दल एकदाच ओझरतं ऐकलं होतं. चक्रधर (ड्रायव्हर) ज्योतिबाच्या गाडीत बसणारी सात समानधर्मी मित्रमंडळी जमल्यावर, उदवाडाच्या वाटेने जायला आम्ही तयार झालो. समजा, एखाद्याला उदवाडा आवडलं नाही तर? तर हिरमोड होऊ नये म्हणून उदवाड्याला जाताना निसर्गरम्य जव्हारला वळसा घालून जायचं ठरलं.. आणि एका रविवारी सुरेख पाऊस लागला असताना आम्ही जव्हारच्या वाटेनं जायला तयार झालो. 

जव्हारच्या वाटेनं का जायचं? कारण जव्हारच्या वाटेवर अद्‌भुत निसर्ग आहे. नित्यनेमानं तो अस्सल पर्यटकाला खुणावतो. दरवेळी नवनवीन कोडी उकलून सांगतो. खरं सांगायचं, तर जव्हारला जायच्या आणि जव्हारवरून पुढं जायच्या वाटेवर निसर्गाची इतकी विविध रूपं न्याहाळता येतात की बस्स! म्हणून सरळसोट हायवेवरून तडक उदवाडा गाठण्याऐवजी आडवळणाच्या जव्हारवरूनच पुढं जाते झालो. 

हायवेवरच्या चारोटी नाक्‍यावरून उजव्या हाताच्या वळणावरून आत शिरलं, की लगेच कासा गावात भिसे विद्यालय लागतं. त्या शाळेच्या शिवारात नाश्‍ता करायचा. डाव्या हाताला वाहणाऱ्या नदीनं पावसाळ्यात संपूर्ण परिसर सुशोभित करण्याची जबाबदारी स्वतःकडं घेतलेली असते जणू! त्या निसर्गरम्य वातावरणात नाश्‍ता झाला, की त्यापुढं वाटेतली असंख्य निसर्गदृश्‍यं बघून, जव्हारचा राजवाडा, हनुमान पॉइंट, सनसेट पॉइंट बघून देखणा दाभोसा धबधबा बघायला दाभोसे गावात थांबायचं. तेथील निसर्गसौंदर्य अक्षरशः दोन्ही डोळ्यांनी पिऊन घेतल्यावर मग पुढं जायला सिद्ध व्हायचं! 

अगदी खरं सांगायचं, तर खरा प्रवास इथून सुरू होतो. शहरी माणूस फार फार तर जव्हार किंवा दाभोश्‍यापर्यंतच पोचतो. परंतु, पुढं दाभोसा ते खानवेल आणि तिथून पुढं सेल्वासापर्यंत आतल्या रस्त्यानं निसर्गाचं वेगळेपण पाहायला फारच मजा येते. दाभोसा गाव, दाभोसा धबधबा बघून झाल्यावर आपल्याला तडक उदवाड्याचे वेध लागतात. परंतु आपण खानवेलच्या रस्त्यानं जाऊ लागलो, की निसर्गाची आणखी वेगळी रूपं दिसू लागतात. मधुबन धरणाचा देखावा पाहावा, की दुधनी धबधब्याजवळ थोडं आणखी थांबावं, खानवेलचं जुनं चर्च पाहावं की वीस किमीवरच्या पुढच्या सेल्वास गावातल्या वनगंगा बगिच्यात बोटिंग करावं, तिकडची जपलेली वृक्षसंपदा पाहावी असं आपल्याला होऊन जातं. खरं तर इतके पर्याय ‘आतून फिरताना’ उपलब्ध आहेत हेच मुळी हायवेवरून सरळसोट थेट प्रवास करणाऱ्यांना माहीत नसतं. आम्ही भर पावसात गेल्यानं नद्या, नाले, धरणं, धबधबे ओसंडून वाहात होते. साऱ्यांचेच डोळे या निसर्गचमत्कारानं विस्फारले गेले. काय बघू आणि काय नको अशी सगळ्यांची अवस्था झाली. प्रवासातलं वेगळेपण म्हणाल तर ते हे की जव्हार सोडलं की मराठी भाषा कानावर येणं हळूहळू कमी होतं. आदिवासी दिसणं कमी होतं. अर्धनागरी संमिश्र वस्ती दिसू लागते. हळूहळू गुजराथी भाषा कानावर येऊ लागते.. आणि त्या हळुवारपणातच गुजराथी भाषेकडून पारशी भाषेकडं, पारशी वातावरणाकडं आपला प्रवास आपल्या नकळत कसा होतो ते कळण्याच्या आत आपण उदवाड्याला येऊन पोचतो. 

सरळसोट जलद येणाऱ्यानं अहमदाबाद हायवेवर पार्डी गाव गाठायचं. डावीकडच्या फाट्यावरून उदवाडा रेल्वे स्थानकाजवळून आपण हळूहळू आत गावात उदवाड्याच्या दिशेनं जाऊ लागलो, की सर्वांत प्रथम वस्ती विरळ होत जाते. सुनसान गल्ल्याबोळ आणि सुनसान रस्ते जणू आपली वाट पाहत असतात, असा अनुभव घेता येतो. 

सकाळी सहाला निघून उदवाड्याला दुपारी अडीचला पोचेपर्यंत भुकेने व्याकूळ व्हायला झालं होतं. उदवाड्याच्या प्रसिद्ध ग्लोब हॉटेलमध्ये खायचं म्हणून (सकाळचा भरपेट नाश्‍ता सोडून) काही खाल्लंदेखील नव्हतं. गाडी सरळ ग्लोब हॉटेलमध्ये नेल्यावर हॉटेल मालकांनी स्वागत तर केलं; परंतु हॉटेलातील जेवण संपलं म्हणून सांगितलं. त्यांना पटवून सांगायला लागलं, की तुमच्या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या खास पारशी जेवणासाठी तर आम्ही मुद्दाम इथवर आलो; खास पोटात भुकेची आग ठेवून! हे ऐकल्यावर त्यांनी आमच्यासाठी खास पारशी पद्धतीने बनवलेलं धनसाक, बोई मासा, चिकन, मटण, खिमा आणि डाळभात असा खाशा स्वयंपाक केला. त्या स्वयंपाक करण्याच्या काळात आम्ही पारशांचं आतष बेहेराम इराणशाह हे अग्निमंदिर बघून आलो. रिकाम्या घरांचा बाज बघून आलो. ग्लोब हॉटेल रिकामं असल्यामुळं त्या हॉटेलचा परिसरही निवांतपणे बघता आला. 

जेवल्यावर ग्लोब हॉटेलच्या मालक दांपत्याचे आभार मानून उदवाड्याचा समुद्र बघायला निघालो. ग्लोब हॉटेलच्या पाठीच समुद्र असल्यानं पूर्ण गाव पायी फिरून सावकाश समुद्रावर जाऊन पोचलो. जेवणाअगोदर दुपारी गाव फिरताना आम्हाला वाटलं, दुपार असल्यामुळं लोक झोपले असतील, आराम करीत असतील. पण वस्तुस्थिती तशी नव्हती. संध्याकाळीही तीच स्थिती होती. दोन पडव्यांच्या आत असलेलं घर आणि त्या घरात काम करणारी वृद्ध मंडळी असं चित्र शांत उदवाडात दिसत होतं. 

असं म्हणतात, की उदवाडातील आतष बेहेराम इराणशाह हे अग्निमंदिर भारतातल्या आठ प्रमुख अग्निमंदिरांपैकी एक आहे. गावात कर्मठपणे रीतिरिवाज पाळले जातात. बाहेरच्या जगाशी आपला सहसा संबंध येऊ न देण्यावर त्यांचा कटाक्ष असतो. परंतु एक मात्र मान्य करायला पाहिजे, की त्यांनी जपलेलं वेगळेपण नजरेत भरणारं आहे. सगळीकडं सतत माणसंच माणसं बघायची आपल्याला सवय झाल्यानं आडवळणावरचं हे अतिशांत गाव एकदम आवडून गेलं. सहज चालत समुद्रकिनाऱ्यापाशी आलो. मनात कल्पना केली होती, की उदवाड्याचा समुद्र किती सुंदर असेल! कारण अगदी केळवा, बोर्डी, नरपड असे सगळेच लगतचे किनारे हे सुंदरच पाहिले होते. परंतु प्रथमदर्शनी उदवाड्याचा समुद्र पाहून मन हरखून गेलं नाही. समुद्र गावात घुसतोय की काय असं वाटून गेलं. नंतर असं कळलं, की खरोखरच समुद्र गावाच्या लगत येतोय हा खराखुरा धोका आता उदवाडावासीयांना वाटतो आहे. 

गुजरातच्या दक्षिणेला आणि महाराष्ट्राच्या उत्तरेला असलेल्या उदवाडाला जायला पुण्या-मुंबईवरून भरपूर रेल्वेगाड्या असल्या तरी गाडीनं उदवाड्याला जाणं सोपं आणि चांगलं ठरावं. पुण्या-मुंबईवरून पश्‍चिम द्रुतगती महामार्गावरून सरळ पार्डी गाठायचं. तेथून डावीकडच्या फाट्याला ८ किमीवर वसलेल्या या शांत आणि वेगळ्या गावाला भेट देऊन यायची. परंतु जर तुम्ही मुंबई-चारोटी नाका-कासा-जव्हार-दाभोसा-खानवेल-पार्डी-उदवाडा या मार्गानं गेलात तर एक बहारदार सफर केल्याचा आनंद मिळेल. 

काय पाहाल? 
छोटंसं उदवाडा वेगात चालणाऱ्याला तासाभरात फिरून होण्याइतकं छोटंसं आहे. परंतु जर तुम्हाला उदवाडाची नस पकडायची असेल, तर तुम्हाला गावातल्या गल्लीबोळातून निवांत फिरावं लागेल. आतष बेहेराम इराणशाह हे अग्निमंदिर, पंडोल अग्यारी, समुद्रकिनारा, तेथील २ पडव्यांची घरं असं सारं बघता येईल. तुमचं दोन दिवसांचं नियोजन असेल, तर जव्हार-दाभोसा-खानवेल-सिल्व्हासा बघून उदवाडा इथं थांबू शकता किंवा खानवेलला थांबून दुसऱ्या दिवशी उदवाडा फिरू शकता. एवढंच काय,जवळचं दीव-दमणही जरूर भेट देण्याजोगं आहे.

अंतर 
पुणे-उदवाडा = ३२२ किमी - ६ तास. 
मुंबई-उदवाडा = २०६ किमी - ४ तास. 
मुंबई-जव्हार = १६६ किमी - साडेतीन तास. 
मुंबई-दाभोसा = २०० किमी - ४ तास. 
दाभोसा-खानवेल = ३२ किमी - पाऊण तास. 
खानवेल-सिल्व्हासा = २० किमी - अर्धा तास. 
सिल्व्हासा-उदवाडा = ३३ किमी - पाऊण तास. 

कुठे राहाल? 
ग्लोब हॉटेल : उदवाडा रोड, पंडोल अग्यारीजवळ, उदवाडा. 
- इतरही अनेक हॉटेले आपल्या बजेटनुसार राहण्यासाठी उपलब्ध आहेत. 

काय खाल? 
धनसाक, खिमा, चिकन, मटण, बोई मासा, अलेटी - पलेटी, बेकरीतील स्थानिक स्वादाची ओळख टिकवणारे बेकरी पदार्थ. 

कधी जाल? 
जुलै-ऑगस्ट आणि डिसेंबर-जानेवारी.

फोटो फीचर

संबंधित बातम्या