निसर्गरम्य परिसरातील फेरफटका 

उदय ठाकूरदेसाई
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

आडवळणावर
 

संजय काळे आणि मी हर्णैवरून चालत येऊन मुरुडात शिरताना, शेजारच्या घरातून ‘सीनेमें जलन’ या ‘गमन’ चित्रपटातल्या गाण्याचे सूर कानी येत होते. संध्याकाळ होत होती. दिवेलागणीच्या वेळेला मंदिराशेजारच्या घरातल्या झोपाळ्यावर शांत कुजबूज चालू होती... 

अशा हुरहूर लावणाऱ्या कातरवेळी आम्ही मुख्य चौकातून गल्लीत शिरत संजयच्या घरी परतलो. मुरुड म्हटले की वरील मनातल्या चित्राची हटकून आठवण होते. याशिवाय मुरुडची आठवण येण्याचे कारण म्हणजे मुरुड हे माझे ‘लाइफटाइम हिरो’ असलेल्या र. धों. कर्वे यांचे जन्मस्थान आहे. शिवाय एकांतात जीवन व्यतीत करणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर चित्रकार रामकृष्ण बाक्रे यांचेदेखील अखेरच्या काळात मुरुड हेच वास्तव्याचे ठिकाण होते. त्यांना भेटावे, एकांतप्रिय चित्रकाराला पाहावे, असे खूप वाटत होते. त्यांना भेटणे शक्‍यही होते; परंतु उगीच त्यांना त्रास नको या भावनेने भेटलो नाही. परंतु बऱ्याचवेळा मुरुडला जाणे झाले, की त्यांचे नित्य स्मरण असायचे. मुरुड म्हटले की अनेक आठवणींचा भुंगा मनाभोवती असा फेर धरू लागतो. 

मुरुड, केळशी परिसर म्हटले, की मायेच्या लोकांचा प्रेमळपणादेखील लक्षात राहतो. खवय्यांसाठी तर हा परिसर इतका महत्त्वाचा आहे, की काही विचारता सोय नाही. पानगी, काजू उसळ, आंब्याचे किंवा फणसाचे सांजण, कडवेवालाच्या घुगऱ्या, फणसाची भाजी, फणसाचे घारगे, करवंदाचे गोड लोणचे, आंबेडाळ.. एक ना दोन... हे फक्त शाकाहारी लोकांसाठीचे झाले. मत्स्यप्रेमींनी तर केवळ खाद्यपर्यटनासाठी या परिसरात फेरी मारावी इतके वैविध्य या परिसरात आहे. नैसर्गिक सौंदर्याबद्दल तर बोलूच नका!.. लाडघर, केळशी, मुरुड, हर्णै, कर्दे, आंजर्ले येथील समुद्रकिनारे, मुरुडमधील केशवराज मंदिर परिसर, आंजर्ल्यातील कड्यावरील गणपती, मुरुडातीलच प्रसिद्ध गारंबी, केळशीजवळच्या आढ गावात, दापोलीजवळच्या जालगावात किंवा त्याजवळच्या गिमवण्याला मारलेला फेरफटका तुमचा दिवस आनंदाचा करून टाकतो. थोडक्‍यात अनेक अंगांनी, अनेक कारणांनी दापोली परिसरातील ही सफर रम्य होऊन जाते. अनेकवेळा या परिसरातील गावांत ३-५-७ दिवसांचा मुक्काम झाल्यामुळे, या परिसरातल्या अनेक गावांचे पाणी प्यायल्यामुळे या परिसराच्या आठवणी खास होऊन गेल्या आहेत. 

तुम्ही म्हणाल अशी काय जादू आहे या परिसराची? एक एक करून सांगायच्या तर खूप गोष्टी आहेत. मुरुडात घराबाहेर असलेल्या मोठ्याशा दगडी द्रोणीतील पाणी चेहऱ्यावर हबकायचा अवकाश; गारेगार शिरशिरीनंतर तुम्ही ताजेतवाने झालात म्हणून समजा! संजय आणि मी भल्या पहाटे, वाडी पार करून समुद्रावर जात असू. यथेच्छ धावून, वाडीतल्या माडाचीच नीरा पिऊन, त्यावेळी गावात असलेल्या एकमेव गानुंशेटच्या टपरीवजा हॉटेलात भजी खाऊन गारंबी चढून उन्हे आल्यावर घरी परतत असू. तेव्हाच्या ८ दिवसांच्या मुक्कामात अशोक काळे या संजयच्या काकाने आम्हाला व्याघ्रेश्‍वर मंदिर, साकवावरून निसर्गाचा आस्वाद घेत, केशवराज मंदिर असे परिसर दाखवलेले आठवतात. मुरुडवरून पायी चालत आंजर्ल्याच्या ऐल तटावरून ‘तरीने’ म्हणजे छोट्या होडीने पैलतीर गाठून आंजर्ल्याच्या सुधीर साठे यांच्याकडे केलेला मुक्कामदेखील आठवतो. आंजर्ल्याला साठ्यांकडे आंब्याची बाग बघताना किंवा मुबलक दूध, दही, तूप, ताकामुळे वेगवेगळे चविष्ट पदार्थ, निसर्गाच्या सान्निध्यात खाताना खरे सांगायचे तर आनंदून जायला व्हायचे. नुसते पोहे म्हटले तरी, ताकातले पोहे, दडपे पोहे, चिंचगुळाचे काळे पोहे, तांदुळाच्या पिठाची उकड; नुसते गरे म्हटले तरी कापा आणि बरका फणसाचे गरे, तळलेले गरे, वाळवलेले गरे... इथली एखादी साधी गोष्ट घेतली तरी आपण हैराण होतो. इतके वैविध्य! नेहमीपेक्षा वेगळ्या खाद्ययात्रेतल्या नुसत्या नामावलीनेच आंजर्ल्याच्या आठवणींत रमायला झाले. 

आंजर्ल्याच्या पुढे केळशीला गेलात तरी तीच गत. माझ्या जोशी नावाच्या नातेवाइकांकडे राहायला गेलो होतो. तिन्हीसांजेचे घरात पोचताना, घराभोवती लावलेल्या विविध फुलांच्या दरवळीतूनच घरात प्रवेश करते झालो. गप्पाटप्पांचा अनौपचारिक कार्यक्रम झाल्यावर, ‘कोकणात आल्यावर संगीताची बैठक सजलीच पाहिजे’ म्हणत, पेटी-तबला, दोन चांगले गाणारे गावातलेच गायक आणि चांगल्या आवाजाच्या घराच्या मंडळींबरोबर गाण्याचा रंगारंग कार्यक्रम करताना, जेवणाचा विसर पडला. जेवणाची वेळ ढकलत ढकलत मध्यरात्रीपर्यंत न्यावी लागली. 

सकाळी उठून जोश्‍यांनी आम्हाला स्वतः मशागत केलेली, पंचक्रोशीत पहिला क्रमांक पटकावलेली, देखणी बाग दाखवली. विविध फुले, बागेसाठी करावी लागणारी मशागत अशा कितीतरी गोष्टींबद्दल बोलून आम्ही उजव्या हाताला, जवळच असणाऱ्या महालक्ष्मी मंदिराकडे जायला निघालो. वाटेत समोरचे दृश्‍य बघून थक्क झालो. जोश्‍यांच्या घरासमोर थोडे पलीकडे, पावट्याची शेती चालली होती. 

बाजूला तळे होते. (आता नाहीये!) त्यात कमळे फुलली होती. तळ्यातून वाफा निघत होत्या. खूपच लोभसवाणे दृश्‍य होते ते! इतके सुंदर निसर्गदर्शन झाल्यावर मग आम्ही महालक्ष्मी मंदिराकडे जायला निघालो. 

दुपारी जेवून झाल्यावर प्रकाश जोशी मला म्हणाले, ‘तुला पाय मोकळे करायचे असतील तर चल ‘आढ्याला’ जाऊन येऊ.’ (आढे नावाचे एक गाव केळशीजवळ आहे. तिथे एकाच आडनावाची बरीच कुटुंबे राहतात.) मी तयारच होतो. नारळीपोफळीच्या बागांतून, वाहत्या पाण्याचा नाद ऐकत, घाटी चढत, निवांत अशा गावात भटकण्याची, थांबण्याची, मौजच वेगळी! 

केळशीप्रमाणे जालगाव हेदेखील एक रम्य गाव आहे. माझ्या बहिणीने तिथे बंगलावजा घर घेतले होते. त्या घराच्या वास्तुशांतीला जाण्यासाठी म्हणून दोन दिवस जालगावात राहण्याचा योग्य आला. जवळच दापोली असल्याने संपूर्ण परिसरातली सारी वैशिष्ट्ये थोड्या वेगळ्या अंगांनी जालगावात बघायला मिळाली. वानगीदाखल एक खराखुरा किस्सा सांगायचा मोह होतो. आम्ही गावातून सहज फिरत असताना आमच्यापैकी कुणाच्यातरी ओळखीच्या बाई दिसल्या. ‘घरी या’ असे त्या जालगावच्या बाईंनी सांगितल्यावर आमच्यातल्या बाई म्हणाल्या, ‘चला, हे २५-३० लोकांचे लटांबर घेऊनच येते.’ त्यावर जालगावच्या बाई म्हणाल्या, ‘जरूर चला. आमच्या घरात २०-२५ माणसे असतातच. आणखीन २० आली तर मी नाही हो घाबराची.’ हल्लीच्या भाषेत ‘पॉझिटिव्ह एनर्जी’ने दिलेले ते उत्तर आजही स्मरणात आहे. 

जालगावजवळ गिमवणे हे छोटेसे गाव आहे. तेदेखील सुरेख आहे. या पंचक्रोशीत निसर्गाचे थोडे थोडे बदल होत जातात. माणसांचे बोलणे किंचित बदलत जाते. खाण्यापिण्याच्या सवयी हलक्‍याशा वेगळ्या झालेल्या दिसतात. परंतु दापोली पट्ट्याचा एक ठाशीव बाज मात्र सर्वत्र उमटलेला दिसतो. 

मधल्या दीर्घकाळात दापोली विषय बंद होण्याअगोदरच लाडघरचे गोडवे ऐकू येऊ लागले. त्यामुळे लाडघरला जाणे होणारच होते. एक-दोनदा नाही, तर खूप वेळा लाडघरला जाणे झाले. एव्हाना मी मासे खायला लागल्यामुळे दापोली परिसरात अनेक ठिकाणी आणि विशेषतः लाडघरमध्ये खूप वेळा राहून मासे खाणे झाले. 

खरे तर वर उल्लेखलेल्या कोणत्याही गावात राहून या परिसराची मजा अनुभवण्याजोगी आहे. आता सागरी पर्यटनामुळे हर्णै, कर्दे, लाडघर हे भाग खूप विकसित झाले आहेत. बहुतेक ठिकाणी स्पीडबोट, पॅरासेलिंगदेखील सुरू झालेले आहे. परंतु, त्याचबरोबर काँक्रिटीकरण झाल्यामुळे लेखाच्या सुरुवातीला रंगवलेले काही वर्षांपूर्वीचे चित्र आता मोहक रूप सोडून, नव्या अंगाने, नव्या दिशेने फुलू पाहात आहे. त्या प्रयत्नांत चार पैसे मिळवण्याच्या जोडीला नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवण्याचे जमले तर दापोली परिसर हा महाराष्ट्राच्या भटकंतीतला महत्त्वाचा देखणा परिसर ठरेल. 

कसे जाल? 
मुंबई - दापोली : २२८ किमी - ५ तास. 
पुणे - दापोली : १८५ किमी - साडेचार तास. 
दापोली - लाडघर : ९ किमी - २० मिनिटे. 
लाडघर - मुरुड : ९ किमी - २२ मिनिटे. 
लाडघर - आंजर्ले : ३२ किमी - पाऊण तास. 
लाडघर - केळशी : ४२ किमी - सव्वा तास. 
महामार्गावरून खेडमार्गे दापोली गाठल्यास प्रवास जलद होईल. 

काय खाल? 
खाद्यप्रेमींसाठी या परिसरासारखा दुसरा परिसर शोधूनदेखील सापडणार नाही. शाकाहारी आणि मांसाहारी दोघांनाही सारख्या पद्धतीने आवडेल इतके चमचमीत पदार्थ या परिसरात तुम्हाला खाता येतील. 
केशवराज मंदिराच्या वाटेवर असलेल्या सुरुवातीच्या काही घरात पोह्याचे पापड, चिकवड्या, कुरडया, सांडग्या मिरच्या, लोणची, सरबते, आंब्याची-फणसाची साटं, मेतकूट, डांगर, फणसाचे पापड असे उत्कृष्ट घरगुती पदार्थ घरीदेखील आणता येतील. 

कुठे राहाल? 
या परिसरात राहण्यासाठी अक्षरशः शेकडो पर्याय उपलब्ध आहेत. कुठेही मुक्काम करून हा दापोली परिसर फिरता येण्यासारखा आहे. 

काय पाहाल? 
हजारो समुद्रपक्ष्यांचा थवा, पानाच्या टोकावर बसलेला चतुर, झाडांना लटकलेल्या चिंचा, आवळे, जाम, घराच्या वरच्या माळ्यावर उघड्यावर वाळत टाकलेली सुपारी किंवा सुपारी फोडायचा महाकाय अडकित्ता, भर दुपारी रानातून वाटेवरून फिरताना येणारे पक्ष्यांचे, किड्यांचे आवाज, अंधाऱ्या रात्री मिट्ट काळोखात झाडांच्या पानांची सळसळ अथवा झाडाकडे एकटक पाहत राहिल्यास होणारे नजरेचे विभ्रम, अशा अनेक गोष्टी अनुभवता येतील. परंतु, त्यासाठी शहरीकरणातून बाहेर पडून काही दिवस तरी निसर्गाचे लेकरू व्हावे लागेल. गारंबी आणि केशवराज मंदिर एकाच फटक्‍यात बघताना (एकाच फेरीत) निसर्ग अवलोकानाबरोबरच आपले शरीर किती फिट आहे याचाही अंदाज बांधता येईल.

फोटो फीचर

संबंधित बातम्या