विलक्षण  जंगलसफारी  

उदय ठाकूरदेसाई
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

आडवळणावर
 

आडवळणावरचा रस्ता निवडताना, तुमच्या कार्यक्रमपत्रिकेत आडवाटेवरचे वेगळेपण दिसायला हवे. नेहमीपेक्षा वेगळी वाट चोखाळताना वाट्याला येणारे वेगळेपण आवडीने स्वीकारून, किरकोळ दोषांकडे डोळेझाक करून पुढे गेल्यास आपण खूप आनंदाचे धनी होऊ शकतो. एक दिवस गोव्यात, दुसरा दिवस कर्नाटकात... असे दर दिवसाआड करीत गोवा-कर्नाटक जंगल ट्रेक केल्याच्या आठवणी अजूनही चांगल्याच स्मरणात राहिल्या आहेत. 

रेल्वेने, गाडीने, कॅटॅमरॉनने, विमानाने गोव्याला जाऊन आल्यावर बरेचसे गोवा बघून झाले असे वाटत होते. पुण्याच्या ‘झेप’ संस्थेने ऐन दिवाळीनंतर आयोजित केलेल्या सह्यगिरी साहस सफारीला अर्थात गोवा कर्नाटक जंगल ट्रेकला जाण्याचे निश्‍चित केले तेव्हा मनात खरे तर धाकधूकच होती. आमच्या गोवा-कर्नाटक जंगल ट्रेकची सुरुवात मिरजपासून झाली. खरे तर तेथूनच गंमत यायला सुरुवात झाली. जायचे होते गोव्याला; मग मिरजेला जायचे काय काम? असा विचार मनात आल्याआल्याच कळले की कार्यक्रम उलटा आहे. मिरजेहून पॅसेंजर पकडून थेट कॅसलरॉक आणि कॅसलरॉकला मुक्काम करून दुसऱ्या दिवसापासून ट्रेक सुरू असा प्रवास होता. त्यामुळे सर्वप्रथम मिरज गाठणे महत्त्वाचे होते. दुपारपर्यंत मिरज शहरात फेरफटका मारून संध्याकाळी ५.२५ च्या मिरज - कॅसलरॉक शटलमधे बसलो. 

मिरज, कॅसलरॉक या नवीन नावांमध्ये रुळण्याअगोदर गाडीने मिरज स्थानक सोडल्यासोडल्याच आकाशात काळे ढग जमू लागले. विजा कडकडू लागल्या. तेवढ्यात एक हलकीशी सर आली आणि सर्वांच्या मनाला चिंब भिजवून गेली. चिंचा,बोरे आणि पेरू खाण्यात रममाण झालेली मंडळी आंबट-गोड चवीने, डोळा बारीक करून शहारून जात असतानाच, पावसाच्या सरीने ट्रेकर्समंडळींचा हुरूप वाढवला. खिडकीबाहेर बघतात तो काय! अनोख्या ढगांच्या महिरपीआडून अर्ध आकाशभर पसरलेले भले मोठे इंद्रधनुष्य! नुकतीच एकमेकांशी ओळख झालेली मंडळी, दुसऱ्याला इंद्रधनुष्य दाखवण्याच्या निमित्ताने ओळख वाढवू लागली. चिंचा, बोरे, पेरू विकणाऱ्या बायाबापड्यांची विक्री वाढत गेली. वाटेत चिंचली, शेडबाल, विजयनगर अशी छोटी छोटी छान छान स्टेशन्स लागली. एव्हाना रात्र होत गेली. रात्रीच्या दहाच्या सुमारास जसे कॅसलरॉक स्टेशन जवळ येऊ लागले, तसे आमच्या लक्षात आले की डब्यात आता आम्ही ट्रेकर्समंडळीच तेवढीच उरलो आहोत. कॅसलरॉक स्टेशनवर पोचताच डब्यातून उड्या टाकून, दुसऱ्या डब्याखालून वाकून जाण्याच्या प्रयत्नात, आमच्यातला एक स्पाँडिलायटिसवाला ‘मोडक’ झाला. म्हणजे पाठीच्या दुखापतीमुळे ट्रेकमधून बाद झाला.  रात्री कॅसलरॉक स्टेशनवरच पथाऱ्या पसरून, दुसऱ्या दिवशी सकाळी कॅसलरॉक ते दूधसागर ट्रेक करायला तयार झालो. कॅसलरॉक ते दूधसागर हा पहिल्याच दिवशीचा ट्रेक यादगार ठरला. कारण छानशी उतरती, निमुळती वाट तुम्हाला कर्नाटक सीमेवरच्या गावातून गोव्याच्या सीमेवरील दूधसागर धबधब्याजवळ आणून सोडते. ‘नारायण’ हा स्थानिक वाटाड्या नेमक्‍या वळणावळणावरून उतरवत थेट जगप्रसिद्ध धबधब्याच्या डोक्‍यावरून असा काही थेट खाली घेऊन आला, की ‘आपण इथूनच खाली आलो का?’ असा ‘आ’ वासणारा प्रश्‍न खाली उतरल्यानंतर, आलेल्या वाटेकडे बघणाऱ्या ट्रेकर्समंडळींच्या मनात आला. बरे,उतरताना सारखे ब्रेक्‍स लावून बहुतेकांच्या पायांचे गुडघे कुरकुरू लागले. त्यामधे आणखीन दोन जण बाद झाले. त्यानंतर मात्र उरलेल्या ५० जणांनी जंगलट्रेकचा आनंद लुटला. 

जंगलट्रेक म्हणजे काय ते सर्वांना पहिल्या दोन दिवसात चांगलेच कळले. वरून दाट दिसणारे जंगल, पण गच्च भरलेल्या झाडाच्याखाली मात्र ओलसर असणारी जमीन, दुपारी बारा वाजतासुद्धा किरणे थोपवून धरणारी गच्च झाडी, सोबतीला भर दुपारी येणारा रातकिड्यांचा आवाज, कुणालातरी हमखास चिकटणाऱ्या जळवा, शांत झाडावर दिसणारा हरणटोळ... अशी दृश्‍ये पुढे सर्वांच्या परिचयाची झाली.  त्याहीपेक्षा वेगळी गोष्ट म्हणजे या ट्रेकमधे आजवरच्या आयुष्यात कधी नव्हे इतक्‍या असंख्य वेळा नदी, नाले, ओढे ओलांडायची वेळ आली. सुरुवातीला बूट भिजतील म्हणून बूट काढून अनवाणी पायाने जाणारी मंडळी पुढे पुढे बूट तसेच पायात ठेवून चपक, चपाक आवाज करीत नैसर्गिकरीत्या बूट वळवायला शिकली. ओढ्याचे पाणी खाली वाकून आवडीने प्यायला शिकली. दगडाला टेकून सॅकचा आधार घेऊन डोक्‍यावर टोपी ओढून झोपायला शिकली. दिवसभराच्या अथक चालीनंतर देवळांत, तंबूत कुठेही झोपायला सरावली. मिळेल ते खायला शिकली. थोडक्‍यात सारीच मंडळी निसर्गाची लेकरे झाली. अखेरच्या दिवशी बस आणि माणसे दिसल्यावर मात्र सगळ्यांचा विरस झाला. इतकी सगळी मंडळी निसर्गाशी तादात्म्य पावली होती. ट्रेकच्या काही आठवणी आवर्जून सांगण्यासारख्या आहेत... 

दूधसागर सराईमध्ये आमचा मुक्काम होणार होता. परंतु धबधब्याला पाणी जास्त असल्यामुळे दूधसागर स्टेशन म्हणून पोर्तुगिजांनी बांधलेल्या छोट्याशा खोपटात आम्ही सारी मंडळी एक रात्र काढण्यासाठी राहायला, झोपायला होतो. आम्ही सारेच दमलेला असल्यामुळे, पाठ टेकायचा अवकाश; सारे तत्काळ झोपी गेले. त्यानंतर गंमत अशी झाली की आम्ही झोपलो ती जागा रेल्वेरुळापासून अगदी लगतच होती. रात्रभर मालगाड्या जातयेत होत्या. दरवेळी आपली मान चाकाखाली जातेय हा भास प्रत्येकाला होत होता. परंतु झोपेचा अंमल इतका होता की आम्ही झोपेतच निपचित पडून होतो. सकाळी उठल्यावर सर्वांनी स्वप्नात रेल्वे कशी मानेवरून गेली त्याचे किस्सेवजा अनुभव सांगून सकाळच्या मैफलीत रंग भरले. 

दूधसागरच्या वाटेवरून कोलेम येथे जाताना डेविल्स कॅनयन्स हा निसर्गाचा चमत्कार आपल्याला पाहायला मिळतो. दूधसागर धबधब्याच्या पाण्याच्या जोरामुळे दगडातून वाट काढत जाणारे अवखळ पाणी महाकाय दगडांना सुरेख आकार देऊन जाते ते बघणे हा एक वेगळाच आनंद आहे. दोन घटका इथे बसल्याशिवाय, निसर्ग अनुभूती घेतल्याशिवाय आपल्याला पुढे पाय टाकावासा वाटणारच नाही इतकी जादू या परिसरात आहे. 

कोलेम येथे गावाबाहेरच्या दत्त मंदिरात आमचा मुक्काम होता. मंदिरात डोंगळेच डोंगळे होते. भिंतीला सॅक लावून कितीही झाडले तरी परत काही क्षणात सारे डोंगळे परत अंथरुणाभोवती जमत. असे असूनदेखील पुरी रात्र कोणी डोंगळे चावल्यामुळे उठला, असे झाले नाही. आम्हा साऱ्यांनाच या गोष्टीचे नवल वाटले. धारगे गावाच्या अगोदर एका ओसाड ठिकाणी एका छोट्याशा नदीकाठी तंबू ठोकून आम्ही सारे अंघोळ करायला गेलो तर तिथे अगोदरपासूनच परदेशी पाहून मुक्त जलविहार करीत होते. त्यांना लांबूनच पाहून आमच्यातल्या बऱ्याच जणांनी कावळा-चिमणीची अंघोळ करून तंबूचा रस्ता पकडला. त्यानंतर एका जीपमधे अनेक जण कोंबून आम्ही तांबडी सुरला येथील तेराव्या शतकातील अप्रतिम मंदिर बघायला गेलो तेव्हा मुक्त जलविहार करणारे परदेशी पाहुणे दोन धष्टपुष्ट बैलांनी सजवलेल्या बैलगाडीवर नटून थटून तांबडी सुरला येथील मंदिर पाहायला चालले होते. आमचे आवरते घेणे आणि त्यांचे प्रसंगात रंगून जाणे हा विरोधाभास बऱ्याच गोष्टी अधोरेखित करून गेला. 

कुमठळ येथील अनुभव तर खास म्हणावा असा आहे. भातशेती कापलेल्या खाचरात, तंबू ठोकून आम्ही तंबूत शिरणार तोच सर्वांना सूचना मिळाली, की इथे खूप साप आहेत. त्यामुळे डोक्‍यात कानटोपी, माकडटोपी घालून, पायात बूट-मोजे घालून झोपावे. त्या रात्री अवघडलेल्या अवस्थेत कुणालाच धड झोप लागली नाही. 

कुमठळ ते सांत्रेम या प्रवासादरम्यान कमरेइतक्‍या पाण्यातून महानदी पार करायचा, तसेच कापलेल्या भातशेतीच्या खाचरांमधून अगदी निमुळत्या वाटेवरून करायचा प्रवास सगळ्यांना थरारक अनुभव देऊन गेला. सांत्रेम गावात हॉटेल पाहिल्यावर बहुतेक साऱ्यांचा मोर्चा अर्थातच हॉटेलकडे वळला. परंतु गंमत अशी की त्या हॉटेलमधे खायला प्यायला सोडा, साधा चहादेखील मिळत नव्हता. अखेरच्या दिवशी आम्ही भगवान महावीर अभयारण्यातून वर कर्नाटकातल्या पारवाड नावाच्या सीमेलगतच्या गावी आलो तेव्हा तेथील मराठी माणसांना काय आनंद झाला. गावाची माणसे म्हणाली, ‘आम्हाला मराठी बोलू देत नाहीत. कानडी भाषेची सक्ती आहे. सरकारी नोकऱ्या नाहीत. आर्थिक हलाखीची स्थिती आहे.’ वगैरे वगैरे. त्यांची परिस्थिती पाहून आम्हा साऱ्यांनाच वाईट वाटले. 

अखेर जेव्हा पारवाड-कनककुंबी या घाटमाथ्यावरील गावातून गोव्यात जाण्यासाठी बसमध्ये बसलो आणि बरीच माणसे बऱ्याच दिवसांनी पाहिली तेव्हा साऱ्यांनाच चुकल्याचुकल्यासारखे झाले. सह्यगिरी साहस सफारी पूर्णपणे यशस्वी झाल्याची याहून वेगळी पोचपावती ती कोणती? 

‘सह्यगिरी साहस सफारी’ या नावाने भाऊबीजेनंतर बहुधा निघणारा हा ट्रेक आडवळणावरचा प्रवास आवडणाऱ्या साऱ्यांनाच खुश करून टाकेल. मात्र आडवळणावरची गैरसोय आनंदाने मान्य करायला हवी, तर आनंदात भर पडेल. पुण्यातील झेप संस्था या उत्कृष्ट ट्रेकचे आयोजन करते. पत्ता - झेप, २०६०, विजयानगर कॉलनी, सदाशिव पेठ, पुणे - ४११०३०. 

प्रवास 
मुंबई/पुणे - मिरज (रेल्वे) 
मिरज - कॅसलरॉक (रेल्वे) 
त्यानंतर दिवसभराचा रोजच कार्यक्रम. 
कॅसलरॉक - दूधसागर = १३ किमी. 
दूधसागर - कोलेम = १८ किमी. 
कोलेम - धारगे = २२ किमी. 
धारगे - कुमठळ = २० किमी. 
कुमठळ - सांत्रेम = २१ किमी. 
सांत्रेम - सुरला = १६ किमी. 

काय पाहाल? 
भगवान महावीर अभयारण्य, 
तेराव्या शतकातील अप्रतिम वास्तुशिल्पाचा नमुना असलेले 
तांबडी सुरला मंदिर, जगप्रसिद्ध दूधसागर धबधबा, डेव्हिल्स कॅनयन्स, रानबांबूची गर्द झाडी, अनेक छोट्या नद्या-नाले-ओढे, गोवा-कर्नाटक सीमेवरची गावे. 

काय अनुभवाल? 
या ट्रेकमधे तुम्ही इतक्‍या वेळा नदी ओलांडाल, इतके ओढे, नाले पार कराल की केवळ तीच एक गोष्ट ठाशीवपणे तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील. याशिवाय, निसर्गाशी एकरूप होण्याची संधी हा ट्रेक देतो. बाह्य जगताशी बिलकूल संपर्क न येता आपले आपण सात दिवस वाटचाल करतो ती अनुभवाची शिदोरी जन्मभर पुरेल इतकी अनमोल ठरावी.

फोटो फीचर

संबंधित बातम्या