औरंगाबादमधील आडवळणं 

उदय ठाकूरदेसाई
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

आडवळणावर
औरंगाबादमध्ये आपल्याला विशेष आणि वेगळं असं काय पाहता येईल, या प्रश्‍नाचं उत्तर शोधताना अनेक पर्यटनस्थळांचे तपशील हाती लागले. या पर्यटन स्थळांची सफर...

अजिंठा-वेरूळ ही जागतिक वारसास्थळं बघायला जाण्यापूर्वी फारशा प्रसिद्ध नसलेल्या औरंगाबाद लेण्यांविषयीची माहिती वाचनात आली. त्यानंतर पितळखोऱ्याबद्दलची माहिती वाचनात आली. पितळखोऱ्यात अजिंठा-वेरूळच्याही अगोदर कोरीवकाम सुरू झाल्याचा उल्लेख वाचून आमची पहिली भेट पितळखोऱ्यालाच असणार हे तोपर्यंत नक्की झालं होतं. त्यानंतर वेरुळजवळचं घृष्णेश्‍वर मंदिर, त्याजवळ असलेलं थंड हवेचं ठिकाण म्हैसमाळ, नाथांचं पैठण, सिंदखेडराजा, लोणार सरोवर, शनिशिंगणापूर... अशी प्रेक्षणीय स्थळांची यादी वाढतच गेली आणि आमचा औरंगाबाद पर्यटनाचा कार्यक्रम भरगच्च होत गेला. यावेळी तपोवन एक्‍सप्रेसनं जाणं-येणं करून औरंगाबादमधेच गाडी करून स्थानिक चक्रधराच्या (ड्रायव्हरच्या) मदतीनं संपूर्ण परिसर फिरायचं ठरलं. 

डिसेंबर महिन्याच्या एका सुंदर सकाळी मुंबईहून तपोवन एक्‍सप्रेसनं निघून दुपारी औरंगाबादला जाऊन पोचलो. गेल्या गेल्या गाडी बुक करून संध्याकाळी फारशी प्रसिद्ध नसलेली औरंगाबाद लेणी बघायला निघालो. इ.स. पहिल्या आणि इ.स. सहाव्या शतकादरम्यान केलेल्या येथील कोरीवकामात वज्रयान शैलीची झलक पाहायला मिळते असे म्हणतात. येथील लेणी ही बुद्ध विहार आहेत त्यामुळं बुद्धाच्या प्रतिमा, बुद्धाच्या आयुष्यातील प्रसंगविशेष येथे पाहावयास मिळतात. औरंगाबादमध्ये पाऊल टाकल्याटाकल्याच अनामिक कारागिरांचं अजोड शैलीतील कोरीव काम पाहून मन शांत झालं. 

दुसऱ्या दिवशी आमचा चक्रधर म्हणाला, ‘मला अजिंठा-वेरूळ माहिती आहे पितळखोरे माहीत नाही.’ म्हटलं, ‘वेरूळ-म्हैसमाळ-कन्नड वरून पुढं जाऊया.’ कन्नड गावाच्या पुढं एका सुनसान वाटेवर उतरलो. बरं तिकडं बोर्ड वगैरे काही नव्हता. अंदाजानंच उतरलो. तिकडून थोडं खाली उतरायला वाट आहे. बरंच खाली उतरलो, की उजव्या हाताला पितळखोरे लेणी  दिसतात आणि लेण्यांच्या पहिल्याच दर्शनानं आपण थक्क होतो. आमच्या सुदैवानं लेण्यांचे निरीक्षक साळुंखे त्यावेळी उपस्थित असल्यानं आम्हाला लेणी, कोरीव कामं आणि विहार बघता बघता बरीच माहितीदेखील मिळाली. पितळखोऱ्यातील ही लेणी सातमाळा पर्वतराजीतील दरीत वसलेली आहेत. येथील एकूण ९ लेणी ही इ.स.पू. दुसऱ्या आणि इ.स. पहिल्या शतकाच्या दरम्यान कोरण्यात आली आहेत. यातील दालनांमध्ये उत्कृष्ट शिल्प आणि अजूनही रंग लेवून असलेली अफलातून चित्रं आपल्याला बघायला मिळतात आणि खरं तर आपण स्तंभितच होऊन जातो. 

पितळखोऱ्यातील लेणी पाहून झाल्यावर आम्ही वेरूळ येथील लेणी पाहायला निघालो. वेरूळ येथील लेणी पाहताना भान हरपून जायला होतं. एक तर ही सारी ३४ लेणी एका सरळ रेषेत आहेत. सहाशे वर्षं कोरीव काम चाललेल्या वेरूळच्या लेण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे डोंगर पोखरून ही कारागिरी केलेली आहे. कैलास लेणे (लेणे क्रमांक १६) ही तर जगातील सर्वांत मोठी एकसंध वास्तू म्हणून प्रसिद्ध आहे. खरं सांगायचं तर हे सारं शाब्दिक झालं. प्रत्यक्ष कैलास लेणे बघताना किंवा सर्वांत प्राचीन समजलं जाणारं घुमर लेणे (लेणे क्रमांक २९) बघताना चकित व्हायला होतं. गाइड जेव्हा सांगतो की वेरूळ लेण्यांचा शोध अजिंठा लेण्यांसारखा अपघाती नाही लागला, तर वेरूळ हे पवित्र तीर्थस्थान म्हणून खूप काळापासून प्रसिद्ध आहे हे ऐकल्यावर स्तिमित व्हायला होतं. प्रामाणिकपणं सांगायचं तर आपण नीट न्याय नाही देऊ शकत ही सारी कोरीव लेणी बघायला! कारण तोपर्यंत आपण चैत्य दालनं, विहार, हिंदू मंदिरं, जैन मंदिरं असं बघण्यात, मनात त्याची जुळवाजुळव करण्यात, इतिहासकाळ जोडण्यात गढून गेलेलो असतो. त्यामुळं वेरूळचं अप्रतिम असं कोरीव काम बघून त्याचा ठसा मनात असतानाच आम्ही घृष्णेश्‍वर मंदिर बघायला गेलो. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्‍वर मंदिराच्या भिंतींवरचं कोरीव काम बघण्यासारखं आहे. मंदिर परिसरातली टाकी ही अहिल्याबाई होळकरांच्या काळात बांधली गेली आहेत. एव्हाना दुपार टळायला लागली होती. आम्ही म्हैसमाळकडं निघालो. 

आम्हाला म्हैसमाळसारखी अडनिडी गावं बघायला आवडतात. कारण ती खूप प्रसिद्ध नसल्यानं तिथं फारसं कुणी जात-येत नसतं. त्यामुळं गर्दीही कमी असते. म्हैसमाळला ऐकलं, इकडं म्हणे कावळेच नाहीत. अगदीच एखाद-दुसरा कुणाला दिसला तर! म्हैसमाळची ओळख म्हणजे ते टेकडीवर आहे. टेकडीवर टीव्ही टॉवर आहे. टेकडीवरून सूर्यास्त पाहताना खाली दिसणारी गावं, भातशेती पाहताना फार मजा येते. म्हैसमाळ थंड हवेचं ठिकाण असल्यानं सूर्यास्तानंतरची बोचरी थंडी अनुभवून मग निघण्यात मजा आहे. 

मुळात अजिंठा-वेरूळ लेणी म्हटली की आपल्याला उगाचच ती जवळ जवळ आहेत असं वाटतं परंतु प्रत्यक्षात ते तसं नाहीये. अजिंठा आहे औरंगाबादच्या ईशान्येला १०७ किमी.वर, तर वेरूळ आहे औरंगाबादच्या उत्तरेला २६ किमी.वर आणि वेरूळच्याही पुढं ५० किमी.वर पितळखोरा आहे. असं म्हणतात, की पहिले पितळखोऱ्यात कोरीव काम सुरू झालं. परंतु कुशल कसबी कारागिरांना तो दगड भरवशाचा वाटला नाही म्हणून पुढं अजिंठा आणि वेरूळ इथं उत्कृष्ट कोरीव काम साकारलं गेलं. 

अजिंठा लेण्यांबद्दल सर्वांना माहीत असलेली गोष्ट म्हणजे जवळपास हजार वर्षं ही लेणी अज्ञातात होती. जॉन स्मिथ हा ब्रिटिश लष्करी 

अधिकारी १८१९ मध्ये शिकारीसाठी येथे आला असता ही अर्धवर्तुळाकार आकारातली लेणी त्याच्या दृष्टीस पडली. ज्या ठिकाणाहून त्याला ही लेणी दिसली ते ठिकाण ‘अजिंठा व्ह्यू पॉइंट’ म्हणून प्रसिद्ध आहे. आपण या पॉइंटवरून लेणी न्याहाळत असताना आपल्याला दुसऱ्या इंग्रज अधिकाऱ्याची - रॉबर्ट गिल या इंग्रज अधिकाऱ्याची कहाणी ऐकायला मिळते. चित्रकार असलेल्या रॉबर्ट गिलची ओळख पारो या स्थानिक युवतीशी झाली आणि ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. याच रॉबर्ट गिलच्या उत्कृष्ट पेंटिंग्जमुळंसुद्धा अजिंठ्याचं नाव जगभर पोचलं म्हणतात! त्यानंतर प्रत्यक्ष अजिंठा लेणी पाहताना उत्कृष्ट भित्तिचित्रं, बौद्ध प्रतिमा, चित्रांचे रंग, कोरीव कामं यामुळं स्तंभित व्हायला झालं. वाघोरा नदीच्या काठी नालाकार घळीमध्ये हा अनमोल वारसा बघताना रोमांचित व्हायला होतं. एवढ्या अंधाऱ्या लेण्यांत चित्र रंगवण्यासाठी चित्रकारांनी कोणकोणत्या क्‍लृप्त्या वापरल्या असतील त्या साऱ्या दंतकथादेखील समोरील चित्रं पाहत असताना ऐकायला मिळतात. 

लेणी बघायचा प्रदीर्घ कार्यक्रम आटोपल्यावर आम्ही दौलताबाद किल्ला बघायला गेलो. एकेकाळी देवगिरी म्हणून ओळखला गेलेला हा किल्ला महम्मद बिन तुघलक याच्या काळात दौलताबाद (भाग्याचे शहर) म्हणून ओळखला जाऊ लागला. अजिंक्‍य किल्ला अशी ओळख असलेला हा किल्ला कायम फितुरीनंच जिंकता आला, हा या किल्ल्याचा इतिहास कथा, दंतकथा त्यांना कटकारस्थानाची खमंग फोडणी देऊन गाइड आपल्यासमोर जिवंत करायचा त्यांच्यापरीनं प्रयत्न करतात. चांदबीबी मिनार, शहर उद्‌ध्वस्त करू शकणारी मेंढा तोफ इत्यादी पाहून, पूर्ण किल्ला पाहून आम्ही बीबी का मकबरा पाहायला गेलो. औरंगजेबाच्या मुलानं आपली आई बेगम रबिया दुराणी (ही इराणी होती) हिच्या स्मरणार्थ १६७८ मध्ये हा मकबरा बांधला. ताजमहालची प्रतिकृती असलेली ही वास्तू दख्खनमधील मोगल स्थापत्यकलेचा सर्वोत्तम नमुना असल्याचं मानलं जातं. त्यानंतर १६७८ मध्येच बांधलेली पाणचक्की बघायला गेलो. पाणचक्कीचा उपयोग यात्रेकरूंसाठी धान्य दळण्यासाठी करीत असत असं म्हणतात. त्यानंतर खुलताबाद इथं मुघल सम्राट औरंगजेब याची कबर बघायला गेलो. 

भारताकडं किती अनमोल ठेवा आहे त्याची उजळणी करीतच आम्ही आमच्या औरंगाबादमधील हॉटेलमध्ये परतलो.

कसे जाल? 
गाडीनं, रेल्वेनं, विमानानं औरंगाबाद जोडलं गेलेलं आहे. त्यामुळं तुमच्या आवडीनुसार, सोईनुसार तुम्ही औरंगाबादला पोचू शकता. 

काय पाहाल? 
अजिंठा-वेरूळ ही लेणी सोडल्यास बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला, खुलताबाद, पाणचक्की, औरंगाबाद लेणी, पितळखोरा येथील लेणी, घृष्णेश्‍वर मंदिर, थंड हवेचं ठिकाण म्हैसमाळ, हिमायत बाग आदी पर्यटनस्थळं आवर्जून भेट देण्याजोगी आहेत. 

कुठे राहाल? 
तुमच्या बजेटप्रमाणं राहण्याची पूर्ण व्यवस्था औरंगाबादमधे होऊ शकते. 

औरंगाबादपासून पर्यटनस्थळांदरम्यानची अंतरं  
अजिंठा    १०४ किमी. 
वेरूळ     २६ किमी. 
घृष्णेश्‍वर    ३० किमी. 
म्हैसमाळ    ५० किमी. 
पितळखोरे      ७५ किमी. 

अजिंठा-वेरूळ येथे काय पाहाल? 
अजिंठा 
लेणी क्रमांक १६ 
    लेणी क्रमांक १८ मध्ये अजिंठ्याची सर्वोत्कृष्ट चित्रं आहेत. 
    लेणी क्रमांक १७ मध्ये गौतमबुद्ध कपिलवस्तुला परततानाचं चित्र आहे. 
    अजिंठा लेण्यांमध्ये दोन टप्प्यांत काम झाल्याचं सांगण्यात येतं. 
    पहिला कालखंड ः इ.स.पू. दुसरं शतक ते इ.स.पू. पहिलं शतक. 
    दुसरा कालखंड ः पाचवं आणि सहावं शतक. 
वेरूळ 
    लेणी क्रमांक ५ ही बौद्ध धर्माची मोठी गुंफा आहे. 
    लेणी क्रमांक ६ मध्ये सरस्वतीची मूर्ती आहे. 
    लेणी क्रमांक १० मध्ये बुद्धाची विशाल मूर्ती आहे. 
    लेणी क्रमांक १५ मध्ये शंकराचं मंदिर आहे. 
    लेणी क्रमांक १६ मध्ये जगप्रसिद्ध कैलास मंदिर आहे. (कैलासलेणे) 
    लेणी क्रमांक २१ मध्ये शंकर पार्वतीच्या लग्नाचं दृश्‍य आहे. 
    लेणी क्रमांक २९ मध्ये शंकराच्या तांडव मूर्ती आहेत. (घुमर लेणे)

फोटो फीचर

संबंधित बातम्या