वऱ्हाडातील सौंदर्यस्थळे 

उदय ठाकूरदेसाई
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

आडवळणावर...
 

औरंगाबाद सफरीला गेल्यावर मराठवाड्याजवळचा विदर्भही बघता येईल किंवा शाळेतल्या भूगोलाच्या तासाला केवळ नकाशात पाहिलेल्या विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्याला सहज भेट देता येईल हे आता लिहितोय एवढे सोपे तेव्हा वाटत नव्हते. खरे सांगायचे तर सिंदखेडराजा आणि लोणार सरोवर याबद्दल काही माहितीही नव्हती. त्यामुळेच औरंगाबादहून सिंदखेडराजा-लोणार सरोवर येथे फिरायला निघताना काय पाहायला मिळेल याचा अंदाज बांधता येत नव्हता. नाही म्हणायला विजय देशमुख यांची ‘सिंदखेडराजा’ ही छोटीशी पुस्तिका नजरेखालून घातली होती आणि त्यातील मोती तलाव, सजना बारव, पुतळा बारव, लखुजी महाराजांची समाधी असे उल्लेख वाचून विदर्भातल्या सिंदखेडराजाचे चित्र डोळ्यासमोर तर येत होते; परंतु ते प्रत्यक्षात कसे असेल याविषयी मनात कुतूहलदेखील होते. 

औरंगाबादहून निघून सिंदखेडराजा गाठेपर्यंत सकाळची सोनेरी किरणे संपून उन्हे वर आली होती. गावात रखरखाट होता. एक गाइड बरोबर घेऊन सिंदखेडराजा गाव बघायला निघालो. लखुजी जाधव यांच्या राजवाड्याला भेट देऊन जिजामाता स्मारकात ओळीने मांडून ठेवलेल्या मूर्ती पाहिल्या आणि बघतच बसलो. आपला हा अनमोल ठेवा आपण जपायला हवा असेदेखील मनापासून वाटू लागले...

आणि वाटेल तशा मूर्ती ठेवल्याच्या पार्श्‍वभूमीवर मला अवघ्या सहा महिन्यांपूर्वी केलेल्या रशिया आणि स्कॅंडिनेव्हिया या दौऱ्याची आठवण आली. किती नजाकतीने ते (परदेशी) तुम्हाला चित्रसंग्रहालयातील चित्रसाठा बघू देतात किंवा एक-एक शिल्पाकृती किती सुंदररित्या तुमच्यापुढे मांडतात! त्यावेळेच्या सहप्रवाशांच्या भाषेत सांगायचे तर ‘त्यांची (परदेशी लोकांची) इवलीशी गोष्ट केवढी मोठ्ठी करून सांगतात!’ त्यावर दुसरा सहप्रवासी सहज बोलून गेला, ‘आपल्याकडे गोष्ट मोठी असते परंतु तिचे मोठेपण न कळल्याने आपल्याकडच्या गोष्टी म्हणाव्या तितक्‍या गाजत नाहीत.’ थोडक्‍यात आपले असे उघड्यावर टाकणे आणि परकीयांचे छोटे छोटे असले तरी सगळे जमवून, जपून ठेवणे या दोन एकदम भिन्न कृती लक्षात आल्या. खरे सांगायचे तर विषाद वाटला. 

सिंदखेडराजाला भेट देताना तुम्हाला कितीतरी उत्कृष्ट शिल्पाकृती सहज जाता-येता बघायला मिळतात. सजना बारव, पुतळा बारव, हरिहर शिल्प पाहून आपण आश्‍चर्यचकित होतो. लखुजी महाराजांची समाधी आजदेखील दृष्ट लागावी इतकी देखणी आहे. बाराव्या, तेराव्या शतकात बांधलेल्या बारव म्हणजे विहिरी; गोल नव्हे-अष्टकोनी... आणि पंधराव्या सोळाव्या शतकातील इतर वस्तू पाहिल्या म्हणजे वैभवशाली इतिहास म्हणजे काय याचा प्रत्यय येतो. 

सिंदखेडराजाच्या इतिहासाबद्दल बोलायला लागले तर पूर्ण लेख त्यावरच म्हणजे इतिहासावरच लिहावा लागेल इतका तो रोचक आहे. त्यामुळे सिंदखेडराज पुस्तिकेतील तपशील, गाइडची बडबड, ऐतिहासिक पुस्तकातले संदर्भ या साऱ्याची मनात गुंफण करता करता वेळ कसा निघून गेला ते कळलेच नाही. आता लोणारला निघणे भागच होते. सिंदखेडमधून आम्ही लोणारच्या दिशेने निघालो. 

सिंदखेडहून किनगाव - राहोरी - बिबी - पिंप्री - शिंद्री करीत लोणारला जाऊन पोचलो. लोणार गावात सोमवारचा बाजार भरला होता. गावचा बाजार पाहण्यात एक वेगळीच मजा असते. तडक सरोवराकडे जाण्याअगोदर छोटासा बाजार फिरून मग आम्ही सरोवराकडे जायला निघालो. 

लोणारच्याबाबतीत असे म्हणतात, की तीस हजार वर्षांपूर्वी इथे एका प्रचंड उल्केच्या आघातामुळे बेसॉल्ट खडकातील जगातले सर्वांत मोठे असे विवर तयार झाले. वनस्पतीशास्त्रज्ञांना या विवराच्या पायथ्याशी असणाऱ्या सरोवरात शेवाळाच्या दुर्मिळ जातीचा शोध लागला आहे. या सरोवराचा विशेष हा, की येथील तळ्यात पावसाचे पाणी पडत असले किंवा सतत झरणाऱ्या झऱ्यांमुळे इथे पाणी जरी साचत असले तरी आश्‍चर्यकारकरीत्या ते पाणी खारट आहे. या तळ्याचा व्यास १.८ किमी इतका असून ४४९ फूट खोलवर विवर आहे. या तळ्याभोवती प्राणी आणि पक्षीदेखील खूप आहेत. लिम्बी बारव ही वास्तू अजूनही शाबूत आहे. विष्णू मंदिर (लोणार-धार) आणि शिवमंदिर ही प्राचीन मंदिरे सरोवर परिसरात पाहता येतात. विष्णू मंदिरात असलेल्या गोमुखातून निघालेल्या धारेचा उगम कोठून झाला हे कळत नाही. त्याचप्रमाणे ही धार कधी आटत नाही असेही म्हणतात. लोणारच्या या प्रमुख विवरापासून १ किमी अंतरावर दुसरे एक छोटे विवर आहे. 

ज्याप्रमाणे मोठी उल्का पडून मुख्य विवर तयार झाले, त्याप्रमाणे दुसरी एक छोटी उल्का पडून हे दुसरे छोटे विवर तयार झाले. त्यालाच ‘अंबर तलाव’ म्हणतात. लोणार सरोवराला प्रदक्षिणाही घालता येते. विवराभोवती प्रदक्षिणा मारताना येथील गूढ गोष्टींची जाणीव होते. म्हणूनच या अतिसुंदर परिसराभोवती मंदिरे पाहायला मिळतात तसेच अनेक आख्यायिकादेखील ऐकायला मिळतात. 

वाईट या गोष्टीचे वाटते, की इथे कुठल्याही तऱ्हेची सुरक्षा किंवा संरक्षक उपाययोजना नाही. सर्वांना सहजप्राप्य असल्यामुळे या सरोवराची अनेक अंगांनी होणारी हेळसांड, अनेक अंगांनी होणारी अस्वच्छता आणि बेकायदा प्रकार सरोवराकाठचा परिसर अनेक वर्ष सहन करतो आहे. जगात एकमेव असलेल्या या तळ्याचे विशेषरूप कुठल्याही प्रकारे शिल्लक न ठेवल्याने लोणार सरोवर हे काहीतरी खास आहे, जगात एकमेव आहे असे कुठेच जाणवत नाही. 

हा दुर्मिळ म्हणावा असा परिसर पाहताना येथील हनुमान मंदिर, विष्णू मंदिर, प्राचीन शिवमंदिर, शिल्पकलेच्या दृष्टीने महाप्रतीम असे दैत्यसुदन मंदिर यांचा जीर्णोद्धार झाला तर जागतिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने आपण काही प्रमाणात तरी कार्य केले असे होऊन वैभवशाली गतइतिहासाचा योग्य तो मान राखला जाईल आणि उत्कृष्ट शिल्पाकृती करणाऱ्या परंतु आज त्यांची नावेही माहिती नसणाऱ्या अतिकुशल कारागिरांच्या अप्रतिम कामगिरीचा वारसा पुढील पिढ्यांनादेखील देता येईल, असे वाटते. परंतु आज तरी आपण या उचित गोष्टीपासून शेकडो योजने लांब आहोत. 

निराश भावनेने आम्ही औरंगाबादला परतलो. मात्र परतीच्या प्रवासात आपल्या वैभवशाली इतिहासाच्या खुणा मनात कायमच्या घर करून राहिल्या. म्हटले तर हीच सिंदखेड-लोणार सफरीची इतिपूर्ती. 

विदर्भातील सौंदर्यस्थळे  
सिंदखेडचे मूळ नाव आलापूर असल्याचे म्हणतात. गवळी राजा सिंदुराज याच्या वास्तव्यामुळे आलापूरचे सिंदखेडराजा झाले, असेही म्हणतात. तुम्ही औरंगाबादला गेलात तर सिंदखेडराजा आणि लोणार सरोवर या दोन पर्यटनस्थळांना अवश्‍य भेट द्यावी. वैभवशाली रोचक इतिहासाखेरीज उत्कृष्ट शिल्पाकृती असलेले सिंदखेडराजा आणि बेसॉल्ट खडकातील जगातील सर्वांत मोठे विवर असणारे लोणार सरोवर अशा नेहमीपेक्षा फारच वेगळ्या गोष्टी पर्यटनाच्या निमित्ताने तुम्हाला पाहता येतील आणि त्यानिमित्ताने भारताचा जागतिक वारसादेखील पाहता येईल. 

कसे जाल? 

  • औरंगाबाद-सिंदखेड = ९० किमी. 
  • औरंगाबाद-लोणार = १४५ किमी. 
  • एकाच वाटेवर असल्याने औरंगाबाद - चिखलठाणा - कर्नाड - बंदापूर - जालना - कदिराबाद  - सिंदखेड - किनगाव - राहुरी - बिबी - पिंप्री - शिंद्री - लोणार या वाटेने जाऊन परतता येईल. 

कुठे राहाल? 
     सिंदखेडराजा आणि लोणार इथे राहण्याची आणि जेवणाखाण्याची उत्तम सोय नसल्याने औरंगाबाद येथे मुक्काम करून औरंगाबादवरून निघून दोन्ही ठिकाणे पाहून एकाच दिवसात परतता येईल. 

काय पाहाल? 
सिंदखेडराजा येथे लखुजीराजांचा राजवाडा, जिजामाता जन्मस्थान, सजना बारव, पुतळा बारव, मोती तलाव, निळकंठेश्‍वर मंदिर, लखुजी महाराजांची समाधी, चांदणी तलाव इत्यादी. 
लोणार येथे लोणार सरोवर, अंबर तलाव, लिम्बी बारव, विष्णू मंदिर, प्राचीन शिवमंदिर, दैत्यसुदन मंदिर इत्यादी.

फोटो फीचर

संबंधित बातम्या