तारांकित क्रूझसफारी 

उदय ठाकूरदेसाई
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

आडवळणावर...
 

व्हॅन्कुव्हर (कॅनडा) येथे क्रूझसफारीला जाण्यासाठी म्हणून आम्ही बसमधे बसलो तोच घाईघाईने आमचा लीडर आम्हाला म्हणाला, ‘अवघ्या १५ मिनिटांत आपण क्रूझजवळ पोचू. तेव्हा अखेरच्या सूचना ऐका.. तुमच्या बॅगा क्रूझमधे गेल्यागेल्या केबिनमधे टाका. सरळ अप्पर डेकवर जा. व्हॅन्कुव्हरचा निरोप घ्या आणि पुढच्या ८ दिवसांच्या वास्तव्यात माझी ओळख विसरा. दिसलो तरी नाही दिसलो असे करा किंवा तसे समजा. बाय द वे, तुमच्यापैकी कितीजण याअगोदर क्रूझवर जाऊन आले आहेत?’ लीडरच्या या प्रश्‍नावर एकही हात वर झाला नाही. लीडर म्हणाला, ‘गुड गुड. चला उतरा. समोर क्रूझ दिसतेय त्यात जायचेय. चला.’ 

हल्लीच्या भाषेत सांगायचे म्हणजे लीडरने आमची अशी शाळा घेतल्याने क्रूझमध्ये जायची आमची लगबग वाढली. 

कॅनडा - अलास्का सफरीवर जाताना, चांगला ३ आठवड्यांचा दौरा आहे आणि ८ दिवस चक्क क्रूझसफारी आहे एवढेच आम्ही जाणून होतो. आमच्या आकर्षणाचे विषय ब्रिटिश कोलंबिया - बांफ - जास्पर - अल्बार्टा - लेक लुईस इत्यादी असल्यामुळे त्यानंतर करावयाच्या क्रूझपर्यटनाकडे पुरेशा गांभीर्याने पाहिले गेले नाही हे मान्य करावे लागेल. त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा क्रूझमध्ये जाण्यासाठी मार्गस्थ झाल्यावर मात्र अलास्कन क्रूझ आणि एकुणातच अलास्काने मोहिनी घालायला सुरुवात केली. अलास्का दौऱ्याच्या शेवटी कॅनडातल्या एकापेक्षा एक उत्कृष्ट निसर्गदृश्‍यांपुढेही अलास्काच्या अप्रतिम सौंदर्याचे गारुड मनावर राज्य करते झाले. क्रूझमधील तारांकित मुशाफिरीने तर आम्हाला पहिल्याच दर्शनांत ‘व्हायब्रंट’ करून टाकले. 

विमानतळावर करतो तसे चेक-इन केल्यावर वेलकम ड्रिंक म्हणून शॅम्पेन मिळाले. आलिशान क्रूझमधल्या स्वागतकक्षात रुळणारी पर्यटकांची स्वारी हळूहळू रंगात येऊ लागली. तिथून एका निवेदनाद्वारे सारेजण आपापल्या केबिनमधे स्थिरावू लागले. परंतु सगळ्यांनाच सगळ्यात वरच्या डेकला, अप्पर डेकला जायचे असल्यामुळे साऱ्यांनीच आपापल्या बॅगा केबिनमधे ढकलून सरळ अप्पर डेकचा रस्ता धरला. 

व्हॅन्कुव्हरमधून क्रूझ निघणे, दीर्घकाळ व्हॅन्कुव्हरचे किनारे निरखित काठावरच्या प्रेक्षकांना अभिवादन करणे, उत्सुकतेने क्रूझ एक्‍सप्लोर करणे यात सारे पर्यटक गढून गेले होते. पहिले प्रशांत महासागर आणि नंतर अलास्काच्या आखातात सतत दीड दिवस क्रूझ अंतर कापणार होती. त्यानंतर हुना, जुनौ, केटचिकन इथेच केवळ थांबणार होती. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींचे पॅकेजेस आणि आनंदाची चरमसीमा शोधण्यात जो तो व्यग्र होऊ लागला. सुरुवातीचे अधीर मन शांत होऊ लागले तशी पर्यटकांची नजर निसर्गात वेगवेगळ्या गोष्टी शोधू लागली. क्रूझबरोबर उडणारे पक्ष्यांचे थवे, शांत पाण्यात क्रूझने पाठी सोडलेल्या रेखीव खुणा, पाण्याच्या थोड्याशाच वर अंतरावर तरंगणारे ढग, ही सारी निसर्गचित्रे आणि क्रूझच्या डेकवरचे गप्पांचे, कुजबुजाटाचे, मिस्कील खोड्यांचे, मनाच्या पुढे झेपावणाऱ्या, बहकणाऱ्या कृतीचे वातावरण यांची अशी काही सरमिसळ झाली की बस्स! जणू सगळ्यांची शाम रंगीन हो गयी। समूहात राहून सगळे एकटे झाले. तेव्हा लीडरने ‘मला (त्याला) विसरा’ हे का सांगितलं ते साऱ्यांनाच पटले असा कबुलीजबाब सारे दुसऱ्या दिवशी देऊ लागले. 

एव्हाना संध्याकाळ सरत असताना ज्यांना भूक लागली ते सारे प्रवासी आपापल्या वेळेनुसार, आपापल्या आवडत्या खाद्याची लज्जत चाखायला तयार झाले. तोपर्यंत बऱ्याच पर्यटकांना डेकवरचे खुले, थंड, बोचरे वातावरण नकोसे वाटून गरम, उबदार, आरामदायी वातावरणात आपल्या आवडत्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यावासा वाटणे स्वाभाविकच होते. 

दुसऱ्या दिवशी सकाळी फार लवकर नको म्हणून स्वाती आणि मी थोड्या उशिराने डेकवर गेलो तो काय, सर्व डेक भरलेला दिसला. कुणी चालताहेत, कुणी धावताहेत, कुणी व्यायाम करताहेत, कुणी रंगून जाऊन नृत्य करताहेत, कुणी बास्केटबॉल खेळताहेत असे ऊर्जादायक दृश्‍य दिसत होते. सहज बाजूला खालच्या डेकवर नजर टाकली तो वृद्ध मंडळी भल्या सकाळी ‘जाकुझी’चा आनंद लुटत होती. हास्यविनोदात रममाण होत होती. हळूहळू सगळे नाश्‍ता करण्यासाठी जगभरातल्या वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतींचा आस्वाद घ्यायला वेगवेगळ्या रेस्टॉरंट्‌सकडे वळले. स्वाती, मी आणि आमची मित्रमंडळी मात्र वेगवेगळ्या टूर्सचे बुकिंग करण्यासाठी काउंटर उघडायच्या सुमारास, बुकिंग काउंटरसमोर उभे राहिलो. 

क्रूझसफारीमधे हाच कळीचा मुद्दा आहे. अक्षरशः असंख्य राईड्‌स, सफारी खास तुमच्यासाठी उपलब्ध असतात. त्यामध्ये सर्वांत धाडसी आणि स्वप्नवत राइड्‌स सर्वांत प्रथम बुक होतात. म्हणून तुम्ही सर्वप्रथम त्या बुक करणे महत्त्वाचे होऊन जाते. दुसरी गोष्ट म्हणजे त्यासाठी भरपूर डॉलर्स किंवा क्रेडिट कार्डस तुम्हाला सोबत बाळगावी लागतात. आमच्या क्रूझवर जे पर्यटक खूप श्रीमंत होते परंतु ज्यांच्याजवळचे पैसे कॅनडा सफरीत संपले होते ते ८ दिवस उपास असल्यासारखे डेकवर नुसते बसून होते आणि फिरणारे मात्र आपल्या स्वप्नील राईड्‌सचे रसभरीत वर्णन करीत होते. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही क्रूझपर्यटन कराल तेव्हा भरपूर डॉलर्सव्यतिरिक्त क्रेडिटकार्डससुद्धा जवळ बाळगा. 

एकदा का तुम्ही बुकिंग करून मोकळे झालात की मग उरलेली जबाबदारी त्यांची! व्यावसायिक दृष्टिकोन असलेली त्यांची मंडळी सर्व राईड्‌स आणि सफारी या उत्कृष्ट नियोजन करून, अलास्का फिरण्याचा तुमचा आनंद वाढवतात. स्वाती आणि मी हुना येथे जगातील सर्वात लांब अशी ‘झिपराईड’ केली, जुनौ येथे १४ हजार फुटांवरच्या बर्फाच्या साम्राज्यात जाऊन कुत्र्यांच्या गाडीतून (डॉगस्लेड) स्वप्नील सफर केली; तर केटचिकन येथे टोंगा रेनफॉरेस्ट येथे हायकिंग करण्याच्या मोहिमेत सहभागी झालो. 

परंतु हे झाले पाण्याबाहेर जमिनीवर उतरून करायचे खर्चिक भाग. तुम्ही वेगळी आवड जोपासणारे असाल आणि तुम्हाला काही केल्या क्रूझ सोडायची नसेल तर तुम्ही प्रचंड शॉपिंग करू शकता. तुमच्यासाठी क्रूझमधे मोफत मनोरंजनाचे कार्यक्रम असतात. जसे की जादूचे खेळ, नृत्याचे खेळ, गाण्यांचे खेळ वगैरे. क्रूझवर तुम्हाला जेवणदेखील फुकट असल्याने तुम्ही स्वतःला फिट ठेवून हवे तेवढे खाऊ शकता किंवा अक्षरशः ‘चरू’ शकता. जगातल्या कुठल्याही खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. त्यातूनही तुमचे पोट भरले नाही अथवा खिशात जरा जास्तच डॉलर्स खुळखुळू लागले तर ‘ब्लू लाउंज’सारख्या अतिमहागड्या रेस्टॉरंटमधे जाऊन जिभेचे चोचले पुरवू शकता. 

मित्रांच्या कृत्यांची साक्ष देऊन तारांकित क्रूझबद्दल इतकेच म्हणता येईल की तुमच्या कल्पनेपलीकडील भव्य आणि सुंदर जग तुम्हाला तुमच्या ८ दिवसांच्या क्रूझसफरीच्या वास्तव्यात अनुभवता येईल. वानगीदाखल उदाहरणे द्यायची, तर कलिंगड खाणाऱ्याचे उदाहरण देता येईल. एकदा एका काउंटरवर सुंदर कलिंगडे मिळतात म्हटल्यावर, त्या काउंटरसमोर मोठी रांग लागली. रांगेतील सगळ्यांनी प्रचंड प्रमाणात कलिंगडे खाऊनसुद्धा कुणालाही काही कमी म्हणून पडले नाही. तुम्हाला पिझ्झा आवडला तर दिवसभर पिझ्झा खात बसा. तोसुद्धा एक प्रकारचा नाही तर वेगवेगळ्या स्वादांचा. शिवाय तुम्हाला विशिष्ट चवीचा हवा असल्यास तशा प्रकारचा पिझ्झाही अमर्याद प्रमाणात मिळत होता. ‘जाकुझी’मध्ये अगोदर बदलायला, मग वापरायला, मग ओला झाला म्हणून, मग खास काठावर बसायला असे  टॉवेल्स जरी तुम्ही वापरलेत तरी परत नव्या कोऱ्या टॉवेलची चळत तुम्हाला परत वापरण्यासाठी म्हणून सज्ज असते. ही उदाहरणे सांगायचा उद्देश इतकाच, की कुठे काही कमतरता म्हणून नाही! शिवाय क्रूझवरच्या सुरुवातीच्या दिवसांनंतर वातावरण इतके अनौपचारिक होत जाते की तुम्हाला कोणी सांगत नाही की नृत्य करा. एक नृत्यशिक्षिका साऱ्यांना शिकवीत असते. तुम्हाला हवे तर तुम्ही तत्काळ त्यांच्यात सामील व्हायचे. हेच पोहण्याच्या, खेळण्यात पाहायला मिळाले. अगदी खरे सांगायचे तर नाचता न येणारे नाचायला शिकले. ‘वॉटरपोलो’ खेळणाऱ्यांनी तरण तलावाला चक्क क्रीडांगणाचे स्वरूप आणले. बर्फाचे अस्वल करणे. दुसऱ्या दिवशी तो अस्वलाचा पुतळा फोडून पोहण्याच्या तलावात टाकणे, युवक-युवतींनी त्या बर्फिल्या पाण्यात कल्ला करणे अशा कितीतरी धमाल गोष्टी पाहायला मिळाल्या. कैक किलोमीटर पसरलेले हुब्बार्ड ग्लेशियर पाहताना पर्यटक ज्या श्रद्धेने निसर्गातील अमूर्त कलाविष्कार बघण्यात गर्क झाले ते दृश्‍य लाजवाब होते. 

जेव्हा चहूबाजूंनी पाणी असते तेव्हा माणूससुद्धा अंतर्मुख होत असावा. सकाळी आणि विशेषतः संध्याकाळी निसर्गाचे विभ्रम पाहण्यात रंगून गेलेली मंडळी, डॉल्फिननी क्रूझला दूरवर केलेली साथ, महाकाय देवमाशाने हवेत मारलेली गिरकी, एका चिमुकल्या 
पक्ष्याची क्रूझबरोबरची शेकडो किलोमीटरची साथ, हब्बर्ड ग्लेशिअरचा बर्फाचा कडा कोसळताना तो पाहून झालेला आनंद... या अवर्णनीय प्रसंगांचे वर्णन करताना शब्दसुद्धा थिटे पाडावेत अशी अवस्था. थोडक्‍यात सांगायचे तर वरील सर्व चित्तरकथांमुळे क्रूझप्रवास लाजवाब झाला.

तारांकित क्रूझसफारी 
कसे जाल? 

बहुतेक प्रवासी कंपन्या कॅनडाची सहल घडवून मग त्या प्रवासाला जोडून अलास्का क्रूझचा प्रवास योजतात. तुम्हाला नुसते अलास्का पाहायचे असेल तर काही प्रवासी कंपन्या तसाही कार्यक्रम आखतात. आपले आपण ठरवून जायचे असेल तर स्वतः नेटवरून क्रूझचे बुकिंग करता येते. ते चांगलेच स्वस्तही पडेल. (परंतु मग व्हिसा आणि हॉटेलबुकिंगदेखील आपले आपण करावे लागेल.) आम्ही ज्या ‘सेलिब्रिटी सेंचुरी’ या क्रूझने गेलो ती क्रूझ व्हॅन्कुव्हरमधून (कॅनडा) निघून अलास्का फिरून पुन्हा 
व्हॅन्कुव्हरलाच परत आली. सध्या बऱ्याच क्रूझ सिएटल ते सिएटल (अमेरिका) अशा आहेत. 

कुठे राहाल? 
अनेक प्रकारच्या, अनेक सोयीच्या, अनेक केबिन्स असल्यामुळे अक्षरशः तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तुमची केबिन निवडू शकता. साध्यातली साधी केबिनसुद्धा स्वयंपूर्ण, अतिशय स्वच्छ असते. प्रत्येक केबिनमधे दर दिवशी क्रूझच्या दर दिवशीच्या कार्यक्रमाचे ताजे वार्तापत्र टाकले जाते. 

काय खाल? 
जवळपास पूर्ण जगातल्या प्रमुख खाद्यसंस्कृतींच्या पाककृती अनुभवता येणार असल्याने तुम्ही नाश्‍ता करण्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत खूप वैविध्य चाखू, अनुभवू शकता. 

क्रूझविशेष 
सर्वांत प्रथम बरेचसे डॉलर्स आणि क्रेडिट कार्डस जवळ ठेवणे आवश्‍यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे केबिनमध्ये गेल्यागेल्या कुठल्या राइड्‌स अथवा सफारी घ्यायच्या आहेत, करायच्या आहेत हे ठरवायला हवे. हेलिकॉप्टर्सच्या राइड्‌स पहिले संपतात हे लक्षात घेऊन त्या पहिल्या ‘बुक’ करण्याकडे लक्ष द्यायला हवे. मोघम सांगायचे, तर क्रूझवर उपलब्ध असलेल्या विविध पॅकेजेसमधून खूप फायदा करून घेता येऊ शकतो. सफारीला गेल्यावर क्रूझमध्ये परतायची वेळ पाळली जायलाच हवी. क्रूझ बाहेरून दिसते त्यापेक्षा आतून एक्‍सप्लोर करायला जास्त मजा येते. ‘सेलिब्रिटी सेंचुरी क्रूझ’मधे १२ डेक (मजले) होते. दरवेळी कुठल्या डेकवरून बाहेर पडायचे याची घोषणा होते. तेव्हा त्या डेकवर हजर राहायचे. भरपूर लिफ्ट्‌स, उत्कृष्ट खाणे-पिणे-स्वच्छता-केबिन्स, अप्रतिम निसर्ग, सुविधांची चंगळ यामुळे स्वप्नील दिवस कसे गेले ते कळतही नाही. 

पर्यटकांच्या लाडक्‍या राइड्‌स किंवा सफारी (खर्च दर माणशी). 

  • जगातील मोठी झिपराइड - हुना - डॉलर्स १३९ - रुपये ९७३० - दीड तास. 
  • हेलिकॉप्टरने मेंडेनहॉल ग्लेशियर गाठून त्यावरील डॉगस्लेड - जुनो - डॉलर्स ५९० - रुपये ४१३०० - ३ तास. 
  • टोंगा रेनफॉरेस्ट हायकिंग - केटचिकन - डॉलर्स ९९ - रुपये ६९३० - ३ तास. 
  • कयाकिंग - हुना - डॉलर्स १७५ - रुपये १२२५० - ४ तास. 
  • मासेमारी-मासे खाणे - हुना - डॉलर्स २६८ - रुपये १८७६० - साडेतीन तास. 
  • ग्लेशियर वॉक - जुनो - डॉलर्स ३९५ - रुपये २७६५० - सव्वातीन तास. 
  • हेलिकॉप्टरने ग्लेशिअरवर जाऊन तिथे ट्रेक - जुनो - डॉलर्स ५२९ - रुपये ३७०३० - सव्वापाच तास. 
  • व्हेलवोचिंग - जुनो - डॉलर्स २०९ - रुपये १४६३० - ६ तास. 
  • धुक्‍यातील फियॉर्डवरून सीप्लेन सफारी - केटचिकन - डॉलर्स ३७० - रुपये २५९०० - ४ तास. 
  • कोस्टल क्रूझ सफारी - केटचिकन - डॉलर्स १७८ - रुपये १२४६० - साडेतीन तास. 

(टीप : लेखकाने प्रवास केला त्यावेळेच्या या किमती आहेत. यात बदल होऊ शकतो.)

फोटो फीचर

संबंधित बातम्या