अनोखी नाईट सफारी 

उदय ठाकूरदेसाई
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

आडवळणावर...
 

परदेश दौऱ्यात कधी-कधी तुमचा कार्यक्रम इतका भरगच्च असतो, की तुम्ही नवखे असाल तर तुमची एकच तारांबळ उडू शकते. रुळलेले सराईत असाल, तर कुठे आराम करून शरीरातील ऊर्जा टिकवायची, ती कसरत तुम्हाला करता येऊ शकेल किंवा जमू शकेल. रशिया-स्कॅन्डेनेव्हिया दौऱ्यात पहिल्याच दिवशी मुंबई-दुबई-मॉस्को करीत मॉस्कोला पोचल्यावर सामान हॉटेलात टाकून ‘रशियन सर्कस’ बघायला जायचे म्हटल्यावर, आमच्यातील आठ जणांच्या दोन कुटुंबीयांनी, ‘एवढ्या रात्री कुठे सर्कस बघायला जायचे?’ म्हणत ‘कंटाळा आला’चा बहाणा केला होता. 

वरील गोष्ट विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे मॉस्को-पीटर्सबर्ग बघतानाच त्या कुटुंबीयांचे एवढे हाल झाले, की पुढे काहीच बघायला नको असे त्यांना होऊन गेले. खरे सांगायचे तर त्यांची अवस्था आम्हाला बघवत नव्हती. परंतु आमची तरी अवस्था कुठे ‘धड’ होती? सेंट पीटर्सबर्ग बघताना रशियन गाइड व्हॅलेंटिनाने - जी वयस्कर होती, नाजूक होती; तिने सेंट पीटर्सबर्गमधील आमच्या पहिल्याच दिवशी बसमधे पुकारा केला, ‘उद्या आपण हर्मिताज, कॅथरिन पॅलेस, पुश्‍किन गार्डन आणि इतर ठिकाणे बघून नाइट लाइफ किंवा नाईट सफारी करण्यासाठी, प्रसिद्ध नेवा नदीत बोटसफर करण्यासाठी जात आहोत. इच्छुकांनी माझ्याकडे १०० डॉलर्स द्यावेत.’ व्हॅलेंटिनाच्या बोलण्यानंतर बसमधे जी चर्चा झाली ती कानावर पडून तर बसमधे झोपलेलेसुद्धा जागे झाले. पर्यटक आपापसांत कुजबुजू लागले, ‘या दौऱ्यात आराम म्हणून नाही. किती बघणार? आणि आता व्हॅलेंटिना म्हणतेय रात्रीपण चला. मग झोपणार कधी? थंडीत बोटीवरचा बोचरा वारा घेत सेंट पीटर्सबर्ग बघायचे रात्रीचे? नको रे बाबा.’ असे करत करत ५० पैकी केवळ १२ जणच रात्रीचे सेंट पीटर्सबर्ग बघायला तयार झाले. अर्थातच त्या १२ जणांत स्वाती आणि मी होतोच. 

दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता निघायचे असे बोलायला ठीक आहे. प्रत्यक्षात सर्वांनी पहाटेच्या थंडीत उठून ८ वाजेपर्यंत तयार होणे हीच धमाल होती. त्यात बारीक शिंतडल्यासारखा पाऊस सुरू झाल्यामुळे सर्द, गारठलेल्या वातावरणात सर्वांच्याच हालचाली संथ, मंद होत गेल्या. त्यामुळे व्हायचा तो उशीर झालाच! आम्ही सर्वजण बसमधे बसून हर्मिताज बघण्यासाठी रांगेत उभे राहिलो. मोठी लांबलचक रांग आणि वरून शिंतडणारा पाऊस पडत असताना रांगेतील सर्वांचे कपड्यावर कपडे (जाकिटावर जाकिटे, मफलर स्वेटर) चढू लागले. कधी एकदा उघड्या वातावरणातल्या रांगेतून आच्छादित विभागाकडे अर्थात हर्मिताजच्या प्रवेशद्वारापाशी जातो असे झाले आणि हळूहळू रशियातील त्या थंड हवामानाशी जुळते घेत हर्मिताज, कॅथरिन पॅलेस, पुश्‍किन गार्डन आणि इतर वास्तू पाहात, संध्याकाळपर्यंत ठरलेला कार्यक्रम करून, परस्पर बाहेर जेवून आम्ही हॉटेलवर परतलो. एव्हाना रात्रीचे ९ वाजले होते. बहुतेकजण आपापल्या हॉटेलरुमवर गेले. आम्हा १२ जणांना मात्र रात्रीचा दिवस करायची इच्छा होती. आम्ही आणखी गरम कपडे घेऊन सेंट पीटर्सबर्गमध्ये नाईट सफारी करायला सज्ज झालो. 

नाईट सफारीची वेगळीच मजा असते. सकाळी सगळ्यांची बडबड असते. रात्री सारे प्रवासी शांत असतात. बाहेरचे वातावरणदेखील शांत असते. नाही म्हटले, तरी दर तासाने चढणारा झोपेचा अंमल झटकून मुख्य प्रसंग घडण्याची सारेजण वाट पाहात असतात. या सफारीतदेखील तसेच झाले. रशियन गाइड व्हॅलेंटिनाने वेगळी माहिती पुरवायला सुरुवात केली. ज्या नदीतून सफर करायची होती ती ‘नेवा’ असली तरी तिचा उच्चार ‘नेईवा’ असा करायचा असतो असे ती म्हणाली. आम्ही केवळ १२ जणच असल्यामुळे प्रत्येकाशी तिचे बोलणे झाले. व्हॅलेंटिना म्हणाली, ‘तुम्ही राहता ते कोर्टयार्ड मॅरियट’ हे हॉटेल खूप छान आहे. तुम्हा सर्वांना नेवा नदीचा परिसर हॉटेलरुममधून सतत दिसतो हेदेखील छानच आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, ‘नेवा’ ही युरोपातली चौथी मोठी नदी आहे?’ असे विचारीत तिने जे अद्याप झोपले नव्हते त्यांचे लक्ष आपल्या बोलण्याकडे वेधून घेतले. तेवढ्यात तिने ‘आपण बसमधून उतरूया’ असे म्हणताच बस थांबल्यावर आम्ही बसमधून खाली उतरलो आणि सकाळी पाहिलेल्या प्रसिद्ध इमारती रंगीत प्रकाशयोजनेत पुन्हा पाहू लागलो. व्हॅलेंटिना समोरच्या नेवा नदीकडे पाहून म्हणाली, ‘पीटर-द-ग्रेट’ला सेंट पीटर्सबर्ग हे शहर ॲमस्टरडॅम किंवा व्हेनिससारखे बनवायचे होते. त्यात तो किती यशस्वी झाला हे तुम्हाला आपण दिवसभर फिरलो, त्यावरून कळलेच असेल.’ खरे तर दिवसभर ऐकून सगळे कंटाळले होते. परंतु केवळ १२ लोकांना कंटाळा येऊ नये म्हणून व्हॅलेंटिना तिच्या परीने रंग भरायचा प्रयत्न करीत होती. 

सेंट पीटर्सबर्ग रात्रीचे गजबजलेले असेल, असे वाटले होते. परंतु तसे काही फारसे जाणवले नाही. रात्रीचे कझान कॅथेड्रल, रशियन स्टेट म्युझियम, समर गार्डन, सेंट इझाक कॅथेड्रल, ब्रेझन हॉर्समन, पीटर अँड पॉल फोर्ट्रेस, मिखाईलोव्हस्की, चर्च ऑफ द सॅवियर ऑन ब्लड या इमारती रात्रीच्या निवांत बघून त्यानिमित्ताने पुन्हा खूप पायी फिरून, आम्ही आमची बोट सुटणार होती त्या ठिकाणी आलो. आम्हा १२ जणांसाठी खास बोट होती. सर्वांना इमारती आणि इतर रंगीत दृश्‍य, नेवा नदीच्या दोन्ही काठावर दिसणारी सेंट पीटर्सबर्गमधील चकाकणारी स्कायलाईन बघायची असल्याने थंडी असूनही कोणी बोटीच्या उबदार तळघरात बसायला तयार नव्हते. व्हॅलेंटिना बिचारी तळघरात शांत बसून होती. 

बोट सुरू झाली तशी बसल्या बसल्या माईकवरून ती बोलू लागली. म्हणाली, ‘आपण जरी नेवा नदीत नाईटसफारी करणार असलो तरी सध्या आपण आहोत मोयका नदीच्या तीरावर! ही जेमतेम ५ किमी लांबीची नदी समर गार्डनला वळसा मारून नेवा नदीला जाऊन मिळते. म्हणजे आणखी काही वेळातच आपण नेवा नदीच्या तीरावर जाऊ... बरोबर एक वाजून दहा मिनिटांनी पॅलेस पूल मधून उकलला, उघडला जाऊन मोठ्या जहाजांसाठी वाहतुकीसाठी खुला होईल...’ आम्ही नेवा नदीच्या दोन्ही तटावरचे रंगीबेरंगी वातावरण डोळ्यात साठवू लागलो. कानावर येत होते, ‘नेवा नदीवर एकूण १२ पूल आहेत. त्यातील ९ नेहमी उघडतात. तीन पूल वाहतुकीसाठी क्वचितच उघडतात...’ 

एव्हाना डेकवर असणाऱ्या आम्हा १२ जणांची अवस्था डेकवर थांबूया की आच्छादित उबदार तळघराचा आसरा घेऊया, अशी झाली होती. तरीसुद्धा आम्ही सर्वांनी डेकवरच थांबायचे ठरवले. 

व्हॅलेंटिनाने सौम्यपणे सांगितल्यामुळे ९ पूल मधोमध उघडून मोठ्या बोटीचे, क्रूझचे दळणवळण सुरू होणार हे समजले आणि आमच्या सर्वांच्या वागण्या-बोलण्यात थोडा उत्साह संचारला. गेल्या वर्षी आम्ही बुडापेस्ट (हंगेरी) येथेदेखील नाईटसफारी केली होती. तिथेदेखील डॅन्यूब नदीच्या काठावरच्या रंगीबेरंगी प्रेक्षणीय इमारती बघताना विलक्षण आनंद झाला होता. परंतु नेवा नदीच्या काठावरचा बाज बघताना ९ पूल उघडत जातानाचे नाट्य बघणे हे वेगळेच आकर्षण होते. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या, सेंट पीटर्सबर्गमधील अप्रतिम इमारती, त्यात उत्कृष्ट रंगसंगतीत नटलेल्या इमारती दुरून पाहताना थंड बोचरा वारा सोसणे आणि व्हॅलेंटिनाचे निवेदन ऐकणे क्षणभर कानाआड झाले. प्रत्येक पूल उघडताना एवढ्या रात्री आरोळ्या मारणारी उत्साही मंडळी, प्रत्येक पूल उघडतानाची दृश्‍ये आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी चाललेली प्रवासी मंडळींची लगबग, आपल्या ग्राहकाला नियमित वेळेच्या आधी योग्य ठिकाणी घेऊन जाण्याची जबाबदारी शिरोधार्य मानणारी बोटीतली मालक-चालक मंडळी आणि आमच्या बरोबर विरुद्ध दिशेला असलेली आणि सर्व पूल उघडल्याने सेंट पीटर्सबर्गमधे निसटत्या वेळेत घुसू पाहणाऱ्या मोठ्या बोटी, मोठी क्रूझ यांची सुरू होणारी नियमबद्ध वाहतूक या साऱ्या गोष्टी मोठ्या मजेत पाहता आल्या. एका वाक्‍यात सांगायचे, तर वरील सर्व वैशिष्ट्ये सेंट पीटर्सबर्गची नाईट सफारी बुडापेस्टच्या नाईट सफारीपेक्षा फार वेगळी ठरून गेली. 

गावरान बोलीभाषेत शरीराची लाकडे होण्याच्या बेतास आम्ही परतीच्या प्रवासास लागलो. एवढ्यारात्री म्हणजे रात्रीचे अडीच वाजले असताना सगळे मलूल पडत जाऊन पेंगण्याच्या बेतास आले होते. अखेर आम्ही बोटीतून उतरून, थोडे अंतर चालून, बस थांबवली होती त्या ठिकाणी आलो. नंतरच्या २५ मिनिटांच्या बसच्या प्रवासात सर्वजण झोपलेसुद्धा! हॉटेलच्या लॉबीत एकमेकांचा निरोप घेताना सगळे एकमेकांना म्हणाले, ‘गुड नाईट. चला. लवकर झोपायला जाऊ. उद्या पुन्हा ८ वाजता निघायचेय ना?’ मी पाहिले तर घड्याळात तेव्हा पहाटेचे सव्वातीन वाजले होते!! 

कसे जाल? 
सेंट पीटर्सबर्गमध्ये गेल्यावर शहर पाहण्याव्यतिरिक्त करायची मुख्य गोष्ट म्हणून या नाईट सफारीकडे बघता येईल. तुम्ही ज्या हॉटेलात थांबता तिथली मंडळी अथवा तुमचा गाइड तुम्हाला ही नाईटसफारी आखून देण्यास मदत करतील. स्वतंत्र गाडी, स्वतंत्र बोट, स्वतंत्र गाइड आणि हॉटेलपासूनचे अंतर या गोष्टींवर नाईटसफारीचे दर ठरतात. सामान्यपणे शहराच्या मध्यवर्ती भागातल्या हॉटेलातून १२ - १२ जणांच्या चमूला स्वतंत्रपणे जायचे असल्यास १०० डॉलर्स इतका खर्च येऊ शकतो. काळ-वेळ-सोयीनुसार त्यात फरक पडत जातो. 

काय पाहाल? 
रात्रीची दुनिया फार वेगळी असते. सकाळी पाहिलेले शहर रात्री फार वेगळे भासते. छोट्या मोयका नदीचे नेवा नदीत मिसळणे, सेंट पीटर्सबर्गमधील रंगीन स्कायलाईन, प्रकाशझोतात उजळणाऱ्या इमारती या दृश्‍यांबरोबरच नेवा नदीत पूल उघडतानाची दृश्‍ये पाहताना फार मजा येते. साधारणपणे ज्या पुलावरून आपण नाईटसफारी करायला जातो, तोच पूल मधोमध उकलला - उघडला गेलेला पाहायला मिळतो... आणि दीर्घ बोटसफारी करून परतताना जेव्हा तो पूल पूर्ववत होतो, आपण जेव्हा त्याच पुलावरून शहराच्या दुसऱ्या भागात जातो तो प्रसंग विलक्षण असतो.

फोटो फीचर

संबंधित बातम्या