फियोर्ड्‌सची राजधानी - बर्गेन 

उदय ठाकूरदेसाई
मंगळवार, 29 जानेवारी 2019

आडवळणावर
 

ऑस्ट्रियातले हिरवेकंच साल्झबर्ग पाठी सोडले होते. इन्सब्रुकच्या दिशेने बस वेगाने धावत असता, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या हिरवाईने साऱ्या प्रवाशांना मोहित करून सोडले होते. तेवढ्यात बाहेर पावसाची रिमझिम सुरू झाली. हलकीच सर येऊन सगळ्यांची मने भिजवून गेली. त्यानंतर ढग आकाशातून अक्षरशः खाली उतरू लागले. बसमधील पर्यटक बेभान झाले. नेमक्‍या अशा धुंद वातावरणात आमच्या लीडरबरोबर बसलेल्या मुलीने लीडरला प्रश्‍न केला, ‘सृष्टीसौंदर्याच्या दृष्टीने तुमच्यामते जगातील सर्वांत सुंदर देश कोणता?’ लीडर म्हणाला, ‘एकाच देशाचे नाव नाही सांगता येणार!’ मला राहवले नाही. मी लीडरच्या बाजूलाच बसलो होतो. मी लीडरला विचारले, ‘तरीसुद्धा त्यातल्या त्यात एकाच देशाचे नाव सांगायचे म्हटले तर?’ ‘नॉर्वे’ चटदिशी लीडर म्हणाला. त्यावर मी विचारले, ‘इतका छान आहे नॉर्वे? कॅनडा, न्यूझीलंड, स्वित्झर्लंडपेक्षादेखील छान?’ या माझ्या प्रश्‍नावर लीडर म्हणाला, ‘नॉर्वेचे सौंदर्य काही वेगळेच आहे. नॉर्वेतील फियोर्ड्‌सचे सौंदर्य काही वेगळेच आहे. त्या सौंदर्याची तुलना कुणाशी करता येणार नाही. ते सौंदर्य वारंवार मनापासून पाहता यावे म्हणून तर मी वर्षानुवर्षे याच (स्कॅंडेनेव्हिया) पट्ट्यात वावरायचा प्रयत्न करतोय.’ 

आनंदाची आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे वर उल्लेख केलेला लीडर गेल्या वर्षी (सहा महिन्यांपूर्वी) आमच्याबरोबर स्कॅंडेनेव्हिया सफारीवर होता. स्टॉकहोम एअरपोर्टवरून बर्गेनला निघताना मला तो म्हणाला, ‘मी ऑस्ट्रियात काय म्हणालो होतो ते आता तुला  कळेल!’ मी त्याचे विधान हसण्यावारी नेले खरे, परंतु विमान स्टॉकहोमवरून सुटल्यासुटल्याच त्याच्या वाक्‍याची प्रचिती यायला लागली. विमानात सुदैवाने विंडो सीट मिळाली होती. खाली दिसणाऱ्या दृश्‍यांवरून नजर हटत नव्हती. पहिले स्टॉकहोममधील हिरवळीची दृश्‍ये, नंतर बर्फिल्या वेलबुट्टीची शाल पांघरलेल्या नॉर्वेच्या पर्वतशिखरांची दृश्‍ये आणि त्यानंतर अत्यानंदाने जिवाचे पाणी करणाऱ्या महाअप्रतिम फियॉर्ड्‌सची दृश्‍ये.. हे सारे मंत्रमुग्ध होऊन पाहात असताना, जलाशयाकाठी इमारतींची गर्दी दिसायला लागल्यावर बर्गेन आल्याची सूचना मिळाली आणि अवघ्या दोन तासांत आम्ही स्टॉकहोमवरून बर्गेनला पोचलोसुद्धा! 

‘आपण आलो पण बर्गेनला?’ असे आईला विचारणाऱ्या चिमुकल्याचा स्वर कानी पडत असताना विमानतळाच्या बाहेर ‘बर्गेन’ नावाची पाटी दिसली. त्या मुलाच्या आणि माझ्या मनात आलेल्या भावनेला अनुसरून असणारी ‘बर्गेन’ ही पाटी कोणी कोणत्या अंदाजाने लावली कुणास ठाऊक! परंतु ती पाटी आमची मनोवस्था यथार्थ ओळखणारी ठरली. विमानतळावरून हॉटेल आणि हॉटेलला पोचल्यावर हॉटेलरुमवर सामान टाकून आम्ही बर्गेन शहराच्या मुख्य चौकात आलो. 

बर्गेन शहराच्या मध्यवर्ती चौकात टापटीपपणा, इमारतींचा ठाशीव बाज आणि अफाट स्वच्छता हे जरी नजरेस पडले असले तरी विशेष काही वेगळेपण जाणवत नव्हते. ते जाणवले बाजूच्या फिशमार्केटमध्ये - कोळीवाड्यात. समोर दिसणाऱ्या रॉबर्टने ‘नमस्ते. बर्गेनमें आपका हार्दिक स्वागत है।’ म्हणत आमची विकेट काढली. गोव्यात काही वर्षे राहिल्यामुळे तो छान हिंदी बोलत होता. त्याच्यामुळे त्याची मैत्रीणदेखील आमच्याशी हिंदीत बोलू पाहात होती. परंतु तिला हिंदी काय, इंग्रजीसुद्धा नीट येत नव्हते. त्यामुळे आम्ही त्यांनी ठेवलेल्या माशांच्या वाट्याचे, शोकेसच्या दर्शनीभागात दिसत असणाऱ्या माशांच्या वैविध्यांचे फोटो काढले. काहींनी मासे चाखलेसुद्धा. 

बर्गेन बंदर बघणे हासुद्धा एक छानसा अनुभव आहे. मोठ्या बोटींजवळ अल्लड लाटांवर स्वार होत खिदळत राहणाऱ्या छोट्या बोटी, अतिस्वच्छ किनाऱ्यावरील प्रवाशांची लगबग, रस्त्याच्या पलीकडे आपली छोटीशी ॲकॉर्डियन सराईतपणे हाताळणारा छोटा कलाकार, नीटस इमारतींपुढे कलात्मकरित्या लावून ठेवलेल्या स्पोर्टसबाईक्‍स अशा विविध गोष्टी बघताना बर्गेनच्या धक्‍क्‍यावर आपला वेळ कसा गेला हे आपल्याला कळतदेखील नाही इतका सुंदर कमालीचा अनुभव आहे हा. 

त्यानंतर आम्ही चालत चालत ‘फ्लोईबानेन फ्युनिक्‍युलर राईड’ घ्यायला म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भागातून आवाज न करता केवळ सहा मिनिटांत वर माऊंट फ्लोयेनला नेणाऱ्या केबलकार स्थानकाजवळ आलो. स्थानक इतके स्वच्छ होते, की तिथे त्या दिवसाची पहिली फेरी जाण्याची वेळ आमचीच होती की काय, असे वाटावे! एका डब्यात शंभर आणि दुसऱ्या डब्यात शंभर अशी एकावेळी दोनशे पर्यटकांना लीलया वर घेऊन जाणारी केबलकार वर्षाला लाख पर्यटकांना खालून वर घेऊन जाते हे ऐकल्यावर अचंबित व्हायला झाले. शिस्तबद्ध रीतीने, टापटिपीत राहून, वर्षानुवर्षे चालू राहणारा केबलकारचा हा प्रवास खरोखरच कौतुकास्पद आहे, असे म्हटले पाहिजे. १९१८ मध्ये ही केबलकार सुरू झाली हे कळल्यावर ज्या कुणाच्या डोक्‍यातून, शहराच्या मध्यभागातून बिलकूल आवाज न करता ३२० मीटरची उंची अवघ्या सहा मिनिटांत पार करण्याची शक्कल, निघाली त्या डोक्‍याचे कौतुकच करायला हवे. ‘वर’ माऊंट फ्लोयेन येथे आल्यावर माणसांचे फोटो काढणारे, मोक्‍याची जागा पकडायला घाई करतात. माणसांचे फोटो काढणाऱ्यांना त्यांच्यात रमू दिले, की आपण निसर्गाचे आणि एकुणातच इतर फोटो काढायला मोकळे होतो. माऊंट फ्लोयेनवरून बर्गेनचा नजारा अगदी व्यवस्थित टिपता येतो. सात टेकड्यांनी वेढलेले आणि फियोर्डसमुळे अतिदिमाखदार दिसणारे बर्गेन किती सुंदर दिसते ते तुम्हाला दीर्घकाळ पाहता येते. अनेक राजवटी पाहिलेले हे शहर इ. स. १०७० मध्ये नावारूपाला आले. या शहराने अनेक रक्तरंजित क्रांत्या पाहिल्या. अनेक देश-विदेशी दर्यावर्दींचे बर्गेन हे शहर ‘घर’ राहिले आहे. सोळाव्या शतकात चक्क राजधानीचे शहर असलेल्या बर्गेनने तेराव्या शतकात ‘नॉर्वेमधील मानाचे शहर’ हा किताबदेखील मिळवला होता. परंतु याच शहराला अनेकदा आगी लागण्याचादेखील सामना करावा लागला होता. या शहराने आगीची झळ खूप सोसली. जगभरातील दर्यावर्दी येण्यामुळे सतत जगभरातील लोक पाहण्याची बर्गेनवासियांची सवय तशी जुनीच म्हटली पाहिजे. अगदी आजदेखील निर्वासितांचा लोंढा बर्गेनच्या धक्‍क्‍यावर थडकतोच आहे. काय मजा पाहा! आजदेखील राजधानी ओस्लो वगळता लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचे शहर बर्गेन हेच आहे. माऊंट फ्लोयेनवर उभे राहिल्यावर भोवतालचा परिसर बघत, सगळ्या घटनांचा क्रम डोक्‍यात ताजा होतो आणि आपण दूरवर पसरलेले जुन्या-नव्याचा संगम साधणारे बर्गेन पाहात उभे राहतो. माऊंट फ्लोयेनवरून आपण ज्या बंदरावर फिरलो ते बंदर दिसते. डावीकडे बर्गेनच्या आधुनिकीकरणाच्या खुणा दिसतात. नकळत आपणसुद्धा इथले फोटो घ्यावे म्हणतो आणि फोटोंव्यतिरिक्त माऊंट फ्लोयेनवरील हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे न्याहाळत पुन्हा केबलकारने परतीच्या रस्त्याला लागतो. तेथून आम्ही आमच्या, शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या ‘ग्रॅंड टर्मिनस हॉटेल’मध्ये परतलो. 

या ठिकाणी हॉटेलच्या संदर्भातील गंमत सांगण्यासारखी आहे. आम्ही महाराजा हॉटेलमधे जेवायला गेलो तो कार्यक्रम मोठा रंगीत झाला. कार्यक्रम म्हणण्याचे कारण असे, की भारतीय पद्धतीच्या हॉटेलात अतिशय मग्रुरीने सेवा मिळाल्याचे, सर्व पदार्थ काटकसरी पद्धतीने देण्याचे आणि एकुणातच मोठ्या करड्या शिस्तीचे ते हॉटेल होते असे बऱ्याच जणांचे मत पडले. जी गोष्ट खाण्याच्या हॉटेलची तीच गोष्ट राहण्याच्या ‘ग्रॅंड टर्मिनस हॉटेल’ची. या हॉटेलवर बोलणाऱ्यांच्यात दोन गट-तट पडले. एका गटाच्या मते ‘ग्रॅंड टर्मिनस हॉटेल हे काही खास नव्हते. जुनाट असे होते.’ तर दुसऱ्या गटाच्या मते, ‘ग्रॅंड टर्मिनस हॉटेल हे दुर्मिळ गटातील मौल्यवान असे हॉटेल होते.’ दोन तास विश्रांती घेऊन खाली आल्यावर बघतो ते काय; परत ते दोन गट आपापल्या मतांबद्दल आग्रही राहून उगाच वाद-प्रतिवाद करीत होते. लीडर आला आणि त्याने अनेक दिग्गज या हॉटेलात राहून गेल्याच्या खाणाखुणा सांगितल्या. त्यानंतर आम्ही ब्रिगेन या विभागाची सैर करायला निघालो. 

कालचक्र मागे फिरवणाऱ्या, तत्काळ जुन्या जमान्यात घेऊन जाणाऱ्या हॅन्सियॅटिक म्युझियम्स आणि ब्रिगेन या परिसराची रम्य सफर आवर्जून करण्याजोगी आहे. १९७९ मध्ये जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केल्यानंतर या विभागाचे रुपडे विशेष खुलून दिसायला लागले. लाकडी इमारतींची वेगळी पुनर्बांधणी, जपलेल्या जुन्या गोष्टी, जगभरातल्या दर्यावर्दींनी त्यात घातलेली मोलाची भर, प्रचंड कोरीवकाम केलेला मोठा लाकडी मासा, जुन्यातले जुने जपलेले म्युझियम, निष्पर्ण वृक्षांनी, रंगसफेदी उडालेल्या घरांनी त्या वातावरणात आणलेला जिवंतपणा.. अक्षरशः जुन्या काळाची झलक दाखवतात. त्यानंतर सेंट मेरी चर्चला भेट देऊन केवळ दहा मिनिटांवर असलेल्या हॉटेलात आम्ही परतलो. 

दोन दिवस बर्गेनमध्ये राहून दिवस कसे गेले ते कळलेच नाही म्हणेपर्यंत आमचा बर्गेनहून वॉसला जायचा दिवस उजाडला आणि ओरलॅंडफियोर्ड आणि सोगनेफियोर्ड या दोन महाप्रतिम फियोर्ड्‌सकाठाचे अद्‌भुत, अफाट असे सौंदर्य टिपत आम्ही वॉस या ठिकाणी जायला निघालो. बर्गेनमध्ये येताना आणि बर्गेन बाहेर जाताना सृष्टीसौंदर्याचा जितका नजारा दोन डोळ्यांना दिसला तसा नजारा त्याअगोदर कधीच दिसला नव्हता. 

अखेर अगदी खरे सांगायचे तर केवळ ५-६ फियोर्डसकाठाचे निसर्गसौंदर्य पाहून आमची ही अशी घायाळ अवस्था झाली होती. नॉर्वेमध्ये ११९० फियोर्ड्‌स आहेत असे आम्हाला समजले तेव्हा तर आमची बोलतीच बंद झाली. 

कसे जाल? 
लेखात मी उल्लेख केलेला स्टॉकहोम ते बर्गेन हा हवाई मार्ग फारच उत्तम आहे. परंतु माझ्या परिचितांनी केलेला ओस्लो ते बर्गेन हा रेल्वे प्रवास त्यांच्यामते अतिउत्तम होता. फियोर्ड्‌सच्या काठाकाठाने बर्गेनला पोचलात तर सोन्याहून पिवळे! यावरून तुम्हाला कळलेच असेल, की कसेही आणि कुठूनही बर्गेनला पोचलात तरी तो प्रवास अद्‌भुतच असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही की बर्गेन पाहिलेल्या साऱ्यांची ठाशीव मते असतात. नव्हे ती बर्गेन मुक्कामी तयार होतात. 

कुठे राहाल? 

  • ग्रॅंड टर्मिनस हॉटेल, झादर काइसगेट, बर्गेन. स्वस्त आणि मस्त असलेले हे हॉटेल शहराच्या मध्यवर्ती भागात रेल्वे स्टेशन समोर आणि ब्रिगेनपासून केवळ दहा मिनिटांच्या अंतरावर आहे. 
  • याशिवाय, आपल्या बजेटनुसार आणि आवडीनुसार बरेच पर्याय उपलब्ध आहेत. 

काय पाहाल? 

  • फियोर्ड्‌स, सात टेकड्यांनी वेढलेले बर्गेन, फ्लोईबानेन फुनिक्‍युलर अर्थात केबलकारची राईड, माऊंट फ्लोयेन, ब्रिगेन, हॅन्सियाटिक 
  • म्युझियम, शहरातील मध्यवर्ती चौक, कोळीवाडा-फिश मार्केट, सेंट मेरी चर्च, बर्गेन कॅथेड्रल. 

कुठे आणि काय खाल? 
कोळीवाड्यात म्हणजे बर्गेनच्या फिश मार्केटमध्ये माश्‍याचे उत्तम चविष्ट पदार्थ तुम्हाला खाता येतील. महाराजा रेस्टॉरंट आणि ताज महाल तंदुरी रेस्टॉरंट ही भारतीय पद्धतीचे खाणे खायचे असल्यास उत्तम पर्याय सांगता येतील.

फोटो फीचर

संबंधित बातम्या