रोटोरुआमधील आडवाटा 

उदय ठाकूरदेसाई
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

आडवळणावर
 

क्विन्सटाऊनवरून विमानतळाच्या दिशेने बस जात असताना बसमधील सहप्रवाशांना न्यूझीलंडच्या दक्षिण बेटावर घालवलेले आनंदाचे दिवस संपले असे (उगाच) वाटत होते. सारेजण पुटपुटत होते, ‘आता दोन तासात ऑकलंडला तर जाऊ; परंतु तिथे काय वाढून ठेवले आहे कुणास ठाऊक? उतरल्या उतरल्याच रोटोरुआमधील आडवाटेवरचे कार्यक्रम बघायचे आहेत म्हणे! काय मज्जा येणार कप्पाळ!’ 

मला अशी मोठ्या आवाजात केलेली बोलणी ऐकायला फार मजा येते. एकतर बहुतेकवेळा मंडळी भविष्याबद्दल तर्क लावीत असतात आणि त्याहूनही मुख्य गोष्ट म्हणजे माहीत नसलेल्या गोष्टींबद्दल विनाकारण निराशेचा सूर लावीत असतात. अर्थात त्यावेळेच्या न्यूझीलंड दौऱ्यातल्या सहप्रवाशांचेदेखील काहीसे खरे होते म्हणा! ख्राईस्टचर्चमध्ये झालेल्या भूकंपामुळे न्यूझीलंडला पोचण्याचे आमचे वेळापत्रक अचानक एका आठवड्याने पुढे ढकलले गेले होते. त्यामुळे नेहमीची ख्राईस्टचर्च, कैकुरा आदी ठिकाणे न पाहता ट्‌वायझेल, ओमारू, ओमारामा, ड्यूनेडीन, क्रॉमवेल अशी वेगळी ठिकाणे न्यूझीलंडच्या दक्षिण बेटावर पाहायला मिळाली. एवढेच काय, रोटोरुआतदेखील पहिल्या दिवशीचा कार्यक्रम बदललेलाच होता. तोच नेमका साऱ्या सहप्रवाशांचा त्रासाचा मुद्दा होता. आम्ही मात्र खूप  वेगळे न्यूझीलंड पाहायला मिळणार म्हणून खुशीत होतो. शेवटी संमिश्र भावनेनेच आम्ही सारे ऑकलंड विमानतळावर उतरलो. 

ऑकलंड विमानतळाबाहेर डॉन नावाचा चक्रधर कम गाइड आमची वाट पाहात उभा होता. करारी डॉन, दक्षिण बेटावरच्या हसतमुख बॉबपेक्षा फार वेगळा आणि कडक शिस्तीचा वाटत होता. बस सुरू झाल्यावर माफक बोलणे आणि जुजबी माहिती ऐकून बसमधील सहप्रवासी आपसात बोलू लागले, ‘पाणी वेगळे दिसतेय.’ तेवढ्यात एकाने डॉनला प्रश्‍न विचारला, ‘तुमचे वय किती?’ डॉनने तुटकपणे विचारले, ‘का?’ यावर तो प्रवासी म्हणाला, ‘आमच्याकडे भारतात ६० हे निवृत्तीचे वय आहे.’ त्या प्रवाशाचे पुढील बोलणे तोडून डॉन म्हणाला, ‘हे न्यूझीलंड आहे. इथे तुमचे डोळे चांगले असतील, शरीर उत्तम असेल आणि चालकाची कठीण अशी परीक्षा तुम्ही पास झालात की तुम्हाला बस, गाडी, ट्रक चालवायचा परवाना मिळतो. परंतु वर्षासाठीच. पुन्हा पुढल्या वर्षी साऱ्या कठीण तपासण्यांतून तुम्हाला जावे लागते.’ डॉन बोलत असताना मी पाहिले, तर बसमधील साऱ्यांच्याच नजरा भोवतालचा निसर्ग पाहण्यात गुंतल्या होत्या.

छोट्या रस्त्याच्या दुतर्फा हिरवळीवर कुंपण घातले होते. कुंपणाच्या आत गुबगुबीत मेंढरे निवांत चरत होती. तेवढ्यात तिरकस बोलणारा डॉन म्हणाला, ‘न्यूझीलंडमधे दोन कोटी मेंढ्या आहेत. त्यातील ४८ लाख मेंढ्यांना वाटते आपण माणूस आहोत.’ डॉनच्या बोलण्यातून न्यूझीलंडवासी आणि मेंढ्या यांच्यातील नाते ओळखू आले. न्यूझीलंडमधील निसर्ग हा दक्षिण आल्प्स पर्वतराजींमधील निसर्ग असल्याने स्विस, फ्रान्स, जर्मनीच्या उत्तर आल्प्स पर्वतराजींपेक्षा तो थोडा वेगळा आहे. सभोवतालचा परिसर न्याहाळत, डॉनचे बोलणे ऐकत ऐकत आम्ही ‘ॲग्रोडोम’ हा कार्यक्रम बघण्यासाठी देखण्या गोंगोटा व्हॅलीत येऊन पोचलो. 

बसमधून उतरल्या उतरल्याच फार छान वाटले. खूप छान हवा, देखणी हिरवळ, ऐसपैस जागा सोडून बनवलेले वळणदार रस्ते आणि पाळीव जनावरांचा वावर असूनसुद्धा त्यांच्या मलमूत्राची दुर्गंधी न येता स्वच्छ ठेवलेला परिसर, स्वच्छ वातावरणात बाकडे असलेले साधे प्रेक्षागृह पाहून, कार्यक्रम बघण्याचा आमचा उत्साह वाढला. 

मुख्य सभागृहात एक धट्टाकट्टा सूत्रसंचालक येऊन त्याने शांत वातावरणात अक्षरशः जान फुंकायला सुरुवात केली. समोरच्या प्रेक्षकांना चिमटे काढीत, बोलण्याला विनोदाची फोडणी देत त्याने एका एका मेंढा-मेंढीला नावानिशी बोलावण्यास सुरुवात केली. ती ‘मंडळी’ आपापले नाव पुकारल्यावर आलीसुद्धा! त्यानंतर ‘मी मेंढीची लोकर काढणार आहे, त्यामुळे कुणाला वाईट तर वाटत नाही ना?’ असे म्हणत त्याने सगळीकडून ‘नाही’ ऐकल्यावर मेंढीची लोकर काढायला सुरुवात केली. ते काम करीत असताना लोकर सहा महिन्यांत पूर्ववत कशी येते? मेंढ्या कशा निवडतात? वगैरे भरपूर माहिती द्यायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने आमच्यातल्या ४-५ जणांना मंचावर बोलावले. प्रत्येकाच्या हातात दुधाची बाटली दिली. त्यातील एकजण अनाहूतपणे बाटलीतले दूध पिणार एवढ्यात सूत्रसंचालक म्हणाला, ‘अरे बाबा, तू पिऊ नकोस. आता मेंढ्यांची कोकरे येतील, त्यांना ते दूध पाज..’ त्याने असे म्हणेपर्यंत गोरी गुबगुबीत छान छान बछडी आली आणि वरील ४-५ जणांनी त्या गुबगुबीत बछड्यांना बाटलीतून दूध पाजले. त्यानंतर मेंढ्या चरायला जातात तेव्हा २ कुत्री त्यांची कशी पाठराखण करतात, असे आणखी बरेच कार्यक्रम झाले आणि आम्ही ‘ॲग्रोडोम’ बघून बाहेर आलो. दहा - पंधरा मिनिटांच्या अंतरावरील वाटेवरची पॅरेडाईज व्हॅली बघायला निघालो. 

वाटेत डॉनने सांगायला सुरुवात केली, ‘पॅरेडाईज व्हॅली स्प्रिंग्ज’ ही १९३९ पर्यंत सरकारी मालकीची बाग होती. १९७५ मध्ये एका कुटुंबाने ती बाग विकत घेतली. स्वतःच्या आवडीनुसार वाढवली. त्यात पाळीव प्राणी, पक्षी असे एकेक करून वाढवता वाढवता चक्क सिंहसुद्धा ठेवले. जर तुम्ही दुपारी अडीच वाजता आलात तर तुम्हाला सिंहाला भोजन देतात तो कार्यक्रम बघायला मिळेल,’ असे सांगून डॉन पुढे म्हणाला, ‘गोंगोटा व्हॅली’तल्या ‘पॅरेडाईज व्हॅली स्प्रिंग्ज’मध्ये तुम्ही आलात बरे का..’ आणि त्याने आम्हाला त्या वास्तूच्या दारात सोडले. 

आमच्या पाठोपाठ एका लाल गाडीतून ‘पॅरेडाईज व्हॅली स्प्रिंग्ज’ची तरुण मालकीणबाई उतरली. खास आमच्यासाठीच तिने वेळ राखून ठेवला होता. अगदी वैयक्तिक लक्ष देत संपूर्ण परिसराबद्दल ती आम्हा साऱ्यांना माहिती देऊ लागली. ‘पॅरेडाईज व्हॅली स्प्रिंग्ज’चा संपूर्ण परिसर हा उत्तम वनराईने नटलेला आहे. तो बघण्यासाठी येथे खास लाकडी पूल, लाकडी पायवाट केलेली आहे. या लाकडी पायवाटेवरून अपंगदेखील आपल्या गाड्या घेऊन स्वतंत्रपणे आरामात फिरून संपूर्ण परिसर बघू शकतात अशी सुविधा येथे केलेली आहे. कॅफे, रेस्टॉरंट, उत्कृष्ट प्रसाधनगृह या व्यतिरिक्त निवांत बसण्यासाठीसुद्धा सुंदर आसने येथे ठेवलेली आहेत; तेथून दूरवरचा अप्रतिम नजारा दिसतो. येथे तुम्हाला किया हा पोपट वर्गातला विशेषत्वाने न्यूझीलंडमध्ये आढळणारा पक्षी पाहायला मिळतो. एमू, सिंह, हरणे, बदके, हंस असे अनेक पशुपक्षी पाहायला मिळतात. परंतु सर्वांत महत्त्वाचे म्हणजे खूप वेगवेगळी वृक्षसंपदा येथे पाहायला मिळते. वृक्षसंपदा दाखवता दाखवता मालकीणबाई फर्न या वृक्षापाशी थांबल्या. त्यांच्या टी-शर्टवरच्या पानाच्या चिन्हाकडे बोट दाखवून म्हणाल्या, ‘फर्नचे वृक्ष जगभरात केवळ न्यूझीलंडमधेच आढळत असल्याने फर्नच्या पानाचे चिन्ह हे मानाचे चिन्ह म्हणून सर्वत्र सन्मानाने मिरवले जाते.’ तेवढ्यात कोसळणारा धबधबा, धबधब्याच्या पाण्यात निवांत पोहणारे मासे आणि संध्याकाळच्या चमचमत्या उन्हात फोटोग्राफेर्सना हात साफ करण्याची संधी देणारे समोरील चित्र यांचा असा काही मिलाफ जुळून आला की बस्स! अखेर त्या परिसराचा स्नेहपूर्ण निरोप घेऊन हळूहळू बसपर्यंत पोचलो; पाहतो तर काय! आम्हाला सर्व परिसर दाखवून झाल्यावर मालकीणबाई तरतरीतपणे आमच्यापुढे जाऊन गाडीत बसून निघून गेलीसुद्धा! न्यूझीलंडमधे अशी व्यावसायिकता तुम्हाला हरघडी दिसून येते. 

त्यानंतर आम्ही रोटोरुआ येथील प्रसिद्ध तळे पाहावयास गेलो. आम्ही तळ्याजवळ गेलो तेव्हा तलावात फेरी मारणारी एक क्रूझ थांब्याजवळ येत होती. त्यामुळे निर्जन थांब्यावर प्रवाशांची थोडी लगबग बघता आली. पायाने पॅडल मारीत चालवायच्या बोटीदेखील धक्‍क्‍याला लागत होत्या. हवेतला सर्दपणा वाढत होता. सर्वांनाच तळ्याजवळच्या खुल्या वातावरणात थोडे पायी फिरावेसे वाटले. नव्हे, बदकांचे, हंसांचे पाण्यात विहार करणे पाहून आमचे अनायासे चालणे झाले. त्यानंतर वाढत्या थंडीत थंडगार आइस्क्रीम खाऊन आम्ही आमच्या मिलेनियम हॉटेलकडे निघालो. बसमधे लीडर म्हणाला, ‘भूकंपामुळे बदललेल्या कार्यक्रमानुसार असलेले आपले फिरणे आज संपले. उद्यापासून आपण मूळ कार्यक्रमाप्रमाणे रोटोरुआ हे वेगळेपण जपणारे छानसे शहर फिरणार आहोत. आपण माओरींच्या प्रदेशात जाऊन त्यांचे वेगळे जग बघू आणि मग पुढच्या प्रवासाला लागू.’ लीडरचे बोलणे संपताच आम्ही वेगवेगळ्या दिशेला पांगलो आणि आपापल्या हॉटेलरुम्सवर जाऊन विसावलो. 

कधी जाल? 
फेब्रुवारी महिन्याचा उत्तरार्ध आणि मार्च महिन्याचा पूर्वार्ध न्यूझीलंडला भेट देण्यासाठी उत्तम कालावधी आहे. 

कसे जाल? 
न्यूझीलंडच्या उत्तर बेटावरील रोटोरुआ हे साऱ्या ठिकाणांहून उत्तमरीतीने जोडले गेलेले आहे. रोटोरुआवरून टी पुईआ, पॅरेडाईज व्हॅली स्प्रिंग्ज, ॲग्रोडोम ही ठिकाणे अगदी १०-१५ मिनिटांच्या अंतरावर आहेत. ऑकलंड - रोटोरुआ = २३० किमी - ३ तास.

कुठे राहाल? 
मिलेनियम हॉटेल

कुठे खाल? 
मांसाहारी लोकांसाठी इथे खाद्याची पर्वणी आहे. 
भारतीय खाण्यासाठी - इंडियन स्टार रेस्टॉरंट.

काय पाहाल? काय कराल? 
रोटोरुआ तळे, रोटोरुआ म्युझियम, जेट बोटिंग, स्काय डायविंग, गंधकमिश्रित पाण्यात अंघोळ, मसाज, आराम इत्यादी..
 

संबंधित बातम्या