सदाबहार व्हॅन्कुव्हर 

उदय ठाकूरदेसाई
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

आडवळणावर...
 

वडाळ्यातील घुमटाकार असलेल्या आयमॅक्‍स चित्रपटगृहातल्या अतिभव्य पडद्यावर, सुरुवातीच्या काळात, नॅशनल जिऑग्राफीक वाहिनीच्या छोट्या छोट्या चित्रपटांची साखळी (दोन-तीन छोटे चित्रपट) बघताना फार मजा येत असे. एक महाकाय देवमासा हवेत गिरकी घेऊन धस्सकन पाण्यात पडताना पाहून, थरारून जायला व्हायचे. त्या दृश्‍याच्या शेवटी त्या देवमाशाने हळूच समुद्रात बुडी मारताना आयमॅक्‍स चित्रपटगृहातला अतिभव्य पडदा व्यापून राहिलेले त्या देवमाशाचे कल्ले, स्लो मोशनमध्ये हळूहळू समुद्रात बुडत जाताना पाहून, हरखून जायला व्हायचे. किमान दोन वेळा तरी मी हा अनुभव घेतला. 

व्हिक्‍टोरियावरून व्हॅन्कुव्हरला जाताना मी वर वर्णन केलेले दृश्‍य ‘याचि देही याची डोळा’ पाहिले.. प्रवासाला निघताना भविष्यात काय वाढून ठेवलेय याची आपल्याला कल्पना थोडीच असते! 

ज्यांना बोचरी थंडी सहन होत नाही आणि थोडी कमी जोखमीची मोहीम या अर्थाने बरीचशी मंडळी मोठ्या बोटीतून देवमासे बघण्याच्या मोहिमेवर निघाली. आम्ही काहीजण जेटबोटिंगने खोलवर समुद्रात जाणार होतो. स्पीडबोटने जायचे म्हटल्यावर मी मुद्दाम कॅमेरा आणि मोबाईल बरोबर घेतला नाही. शक्तिशाली दुर्बीण मात्र जरूर घेतली. आमच्या स्पीडबोटीतल्या सगळ्यांनी लाईफजॅकेट्‌स अंगावर चढवल्यावर आम्ही व्हिक्‍टोरियाच्या खोलवर समुद्रात सुसाट वेगाने जाण्यासाठी निघालो. बोचरी थंडी, सतत गचके मारणारी स्पीडबोट, सुरुवातीला जरी आम्हाला खुश करून गेली असली तरी ज्या ‘व्हेल वॉचिंग’साठी आम्ही खास निघालो होतो ते देवमाशाचे दर्शन काही होत नव्हते. स्पीडबोट चालवणारा म्हणाला, ‘आता मी विशिष्ट शिटी मारतो. समोर पाहात राहा. देवमाशाचे दर्शन तुम्हाला होऊ शकेल..’ त्यानंतर मोठी बोट आणि आमची छोटीशी स्पीडबोट या अंतर राखून गोल गोल फिरू लागल्या. 

.. आणि समोर पाहतो तर खरोखरच देवमासे दिसू लागले. त्यानंतर स्पीडबोटीत उडालेला गोंधळ अवर्णनीय होता. ‘तो बघ एक दिसतोय. तो बघ दुसरा.. ते पहा जोडीने जाताहेत...’ असे संभाषण वाढले. हा खेळ थोडावेळ चालू असेपर्यंत एका देवमाशाने हवेत उंच गिरकी घेऊन धस्सकन पाण्यात पडल्यावर जे पाणी उडाले ते पाणी पाहून सारे बेभान झाले. स्वातीने शक्तिशाली दुर्बिणीतून हे सारे दृश्‍य पाहिल्यामुळे ‘देवमासे किती जवळ आणि स्पष्ट दिसतात!’ या तिच्या बोलण्यावर साऱ्या प्रवाशांनी तिच्याकडून दुर्बीण घेऊन एक-एक करून साऱ्यांनी पाहिले आणि ते अनोखे बेभान करून टाकणारे दृश्‍य दुर्बिणीतून मनसोक्त पाहिल्यावर साऱ्यांनी हुश्‍श केले. देवमाशाचे व्यवस्थित दर्शन झाल्यावर कॅप्टनने जवळच्या बेटाजवळ सीलमाशांचे दर्शन घडवले. परतीचा प्रवास करताना डॉल्फिन माशांनी साथ दिली आणि परतीच्या प्रवासात आलेली मरगळ सोडून सारेजण पुन्हा एकदा उल्हसित होऊन डॉल्फिनची साथसंगत अनुभवत राहिले. दूरवर किनारा दिसल्यावर डॉल्फिन्सची साथ कशी सुटली ते कळलेच नाही.. आणि आम्ही व्हिक्‍टोरियावरून व्हॅन्कुव्हरला क्रूझने जाण्यासाठी म्हणून क्रूझ टर्मिनलजवळ आलो. थोड्यावेळाने आम्हाला आमच्या सामानासह, बससह क्रूझने आपल्या पोटात घेतले. क्रूझच्या आत, क्रूझच्या पोटात बस थांबल्यावर बसमधून उतरताना जवळच असलेल्या जिन्याने वर चढून मुख्य क्रूझच्या आलिशान आसनांवर आसनस्थ झालो. क्रूझ सुरू झालेले खरेच कळले नाही. आम्हा प्रवाशांच्या गप्पा रंगेपर्यंत ॲक्‍टिव्ह पास आणि गल्फ आयलंड या पट्ट्यातून पार होऊन आम्ही व्हॅन्कुव्हरला पोचलो. न्यूझीलंडमध्ये मिलफोर्डसाउंड येथे अनुभवलेला छोटा परंतु जलद क्रूझप्रवास सोडला, तर मोठ्या आरामदायी क्रूझमधे बसण्याची ही पहिलीच वेळ होती. 

व्हॅन्कुव्हरला पोचल्या पोचल्याच त्या शहराच्या देखणेपणाची छाप मनावर पडली. सारे सहप्रवासी म्हणू लागले, ‘इथे तर सारेच सुंदर दिसतेय!’ व्हॅन्कुव्हरला ब्रिटिश कोलंबियाचे प्रवेशद्वार का म्हणतात, याचाही उलगडा हळूहळू होत होता. आमचा लीडर म्हणाला, ‘आता पाच मिनिटांत आपले एम्पायर लॅंडमार्क हॉटेल येईल. या ४२ मजली हॉटेलचा सर्वांत वरचा बेचाळिसावा मजला हा ‘फिरता’ आहे. त्या मजल्यावर रेस्टॉरंट असून खाता-खाता तुम्हाला संपूर्ण व्हॅन्कुव्हरनगरीची सफर घडेल..’ लीडरचे बोलणे संपेपर्यंत आम्ही आमच्या हॉटेलमध्ये आलो. किल्ल्या घेऊन आमच्या ३३ व्या मजल्यावरील रूममधून समोर नजर टाकतो तो काय; समोर व्हॅन्कुव्हरची स्कायलाईन दिसत होती. 

वळणदार, रेखीव इमारतींच्या बाजूनेच किंचित दुरावा ठेवून असलेले बंदर, बंदरात उभी असलेली मोठी तारांकित क्रूझ, त्यापलीकडे घनगंभीर तटस्थपणे या शहराचा सांभाळ करणारे बर्फाळ डोंगर... अतिशय विलोभनीय चित्र होते ते! आम्ही तीन दिवस या हॉटेलात राहून मग समोरच उभ्या असणाऱ्या सतत दिसणाऱ्या ‘सेलिब्रिटी सेंच्युरी’ या तारांकित क्रूझने अलास्कासाठी प्रयाण करून पुन्हा याच व्हॅन्कुव्हरनगरीत परतणार होतो. 

अशावेळी इतरांपेक्षा जी वेगळी गोष्ट स्वाती आणि मी करतो, ती आम्ही केली. आम्ही सामान टाकून बेचाळिसाव्या मजल्यावर संपूर्ण फिरता असलेल्या रेस्टॉरंटमधे खायला गेलो. ‘क्‍लाऊड ९’ असे नाव असलेल्या त्या रेस्टॉरंटमध्ये पटकन मिळणारी डिश म्हणून ‘व्हेज स्प्रिंग रोल’ आणि ‘उकडलेली कोळंबी’ मागवली. खाण्याबद्दल फार अपेक्षा नव्हती. परंतु ‘व्हेज स्प्रिंग रोल’चा तुकडा तोंडात गेल्यावर, त्याची सुंदर चव चाखून आम्ही चकित झालो. त्यामुळे ग्लासाच्या काठावर खोवून ठेवलेली ‘उकडलेली कोळंबी’देखील चाखून पाहिली. दोन्हीही फार अप्रतिम डिशेस होत्या. चवीने त्या खाता खाता व्हॅन्कुव्हर शहराचे सौंदर्य दिसायला लागले. आपण बसल्या बसल्या हळूहळू फिरतो आहोत हे विसरायला झाले. खाऊन झाल्यावर नेमके कसे बाहेर पडलो? हा भुलभुलैय्या मजेशीर वाटला आणि मग साऱ्या फिरत्या रंगमंचाचे कौतुक वाटायला लागले. त्यानंतर हॉटेल परिसरात फेरफटका मारून, रात्रीचे जेवण करून, चमचमते व्हॅन्कुव्हर पाहून झोपी गेलो. 

दुसऱ्या दिवशी सकाळी बसमधील सारे प्रवासी अतिशय ताजेतवाने आणि उत्साहित दिसत होते. आम्ही व्हिसलरला निघालो होतो. व्हॅन्कुव्हरपासून व्हिसलर १२१ किमी अंतरावर म्हणजे अवघ्या दीड तासावर होते. लीडर म्हणाला, ‘संपूर्ण कॅनडात व्हॅन्कुव्हरचे तापमान दृष्ट लागण्याइतके सुरेख असते. बंदराभोवती असलेल्या बर्फाळ पर्वतांमुळे सगळ्या नैसर्गिक आपत्ती थोपवल्या जातात. त्यामुळे कॅनडातल्या तिसऱ्या क्रमांकाच्या या शहरामध्ये स्थलांतरितांनी मोठ्या संख्येने येऊन व्हॅन्कुव्हरमध्ये स्थिरावायला सुरुवात केली आहे.’ कॅनडामध्ये सारे काही भव्य-दिव्य आहे. जागेची अडचण नसल्यामुळे एकंदरीत सर्वत्र प्रशस्तपणा आहे. व्हिसलर जवळ येऊ लागले तसे लीडर म्हणाला, ‘व्हॅन्कुव्हर समुद्रसपाटीला तर व्हिसलर ६७० मीटर उंचावर आहे. व्हिसलरमधील काही शिखरे ७१०० फुटांपर्यंत उंच आहेत. मजा म्हणजे व्हिसलरला ‘लंडन माऊंटन’ म्हणायचे. परंतु इथे मार्मोट हा खारीचा मोठा भाऊ म्हणावा असा शीळ घालणारा प्राणी आढळतो. त्या व्हिसल घालणाऱ्या - शीळ घालणाऱ्या प्राण्याच्या नावावरून या गावाला व्हिसलर हे नाव पडले. व्हिसलर गाव छोटेच आहे. अवघी १२ हजार लोकसंख्या असलेल्या या गावात २०१० चे हिवाळी ऑलिंपिक भरल्याने हे गाव प्रकाशझोतात आले. येथील ४.४ किमीचा ‘पिक-टू-पिक’ गोंडोला तुम्हाला एकदम आवडून जाईल,’ लीडरचे बोलणे संपल्या संपल्या सगळ्यांना बसमधून उतरून गोंडोलात बसायची घाई झाली आणि आम्ही बसमधून उतरून व्हिसलर-ब्लॅकोम्ब अशी २० मिनिटांची आणि पुढे ४.४ किमीच्या ‘पिक-टू-पिक’ गोंडोलाची ११ मिनिटांची सफर करून शिखरावर पोचलो. शिखरावर साऱ्यांना अफाट मोकळेपणा अनुभवता आला. सर्वांत मुख्य म्हणजे ट्रेकिंग, माऊंटन बायकिंग आणि चेअर गोंडोला मधूनदेखील इथपर्यंत येऊ शकतो हे समजले. साऱ्यांचे बर्फात खेळणे झाले.. बाजूला हा जल्लोष सुरू असताना मला मार्मोट या प्राण्याचा फोटो काढायची संधी मिळाली. नंतर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. परतताना ‘पारदर्शी तळ’ असलेल्या गोंडोलात बसून सभोवतालच्या डोंगरांच्या सौंदर्याप्रमाणेच दरीतल्या सौंदर्याचेही दर्शन घेत व्हिसलर गावापर्यंत आलो. त्यानंतर बसमधून व्हॅन्कुव्हरला आमच्या हॉटेलवर पोचलो. तडक रूमवर गेलो. परतलो तेव्हा संध्याकाळ संपत चालली होती. दिवेलागणीच्या वेळेला व्हॅन्कुव्हर दिव्यांच्या आराशीत उजळून निघत होते. ३३ व्या मजल्यावरून हॉटेलरुमच्या बाल्कनीत बसून समोरील रंगीबेरंगी व्हॅन्कुव्हर बघताना कितीतरी वेळ निःशब्द माहोलमध्येच सारा नजारा दोन डोळ्यांनी पिऊन घ्यावासा वाटला. 

निसर्गरम्य व्हॅन्कुव्हरमधे बघण्यासारखे बरेच आहे. साधे बागेचेच उदाहरण घ्या. आपल्याकडे छोटीशी बाग असते. त्यामुळे फिरून मज्जा आली असे तरी म्हणू शकतो. स्टॅन्ले पार्क फिरून तुम्ही तसे काही बोलूच शकत नाही. असे म्हणतात पहिले स्टॅन्ले पार्क हे जंगल होते. पुढे ते विकसित करून त्याचे बागेत रूपांतर करण्यात आले. काही तर म्हणतात, की चक्क जंगलच विकसित केले. थोडक्‍यात सांगायचे, तर इतके प्रचंड आहे स्टॅन्ले पार्क! स्टॅन्ले पार्कमधील ब्रॉकटन पॉइंट इथे तुम्ही व्हॅन्कुव्हरची खासियत असलेले ‘टोटेम’ बघू शकता. टोटेम म्हणजे विशाल झाडांच्या खोडांपासून बनवलेले रंगीत लाकडी कोरीव खांब. कॅनडातील आदिम जमातींमधे आपल्या पूर्वजांची आठवण, त्यांचे स्मारक आणि त्यांच्या प्राचीन दंतकथेचा वारसा जपण्याच्या दृष्टीने, कोरीवकाम केलेले हे लाकडी खांब आपल्याला पाहायला मिळतात. पशू, पक्षी, प्राण्यांच्या आकारात कोरल्या गेलेल्या या खांबांपाठच्या अनेक दंतकथा ऐकायला मिळतात. स्थानिक गाइडबरोबर चालत राहिलात, तर चालण्याने दमणार नाही इतके तुम्ही टोटेमच्या कथा ऐकून दमाल! स्टॅन्ले पार्कमधून लायन ब्रिजचा रमणीय देखावा पाहता येतो. 

एलिझाबेथ पार्कदेखील बघण्यासारखे आहे. अवाढव्य. परंतु स्टॅन्ले पार्कच्या तुलनेत छोटे! स्टॅन्ले पार्क समुद्रसपाटीला तर एलिझाबेथ पार्क ५०० फूट उंचावर. आम्ही एलिझाबेथ पार्क फिरत असताना मजा झाली. पार्कात पदवीधर मुलामुलींची दीक्षान्त समारंभानंतरची गर्दी होती. त्याशिवाय लग्नाळू आणि लग्नाअगोदरचे फोटोशूट करण्यासाठी आलेली खास मंडळी होती आणि पार्कच्या मधोमध कारंज्याच्या पाण्यात खेळणारी लहान मुले होती. साऱ्यांच्या गडबडीमुळे वातावरणात एक प्रकारचा मिश्‍कीलपणा होता. फोटोशूटसाठी विशेष पोझ देणाऱ्या लग्नाळू जोडप्याचे आम्हीसुद्धा फोटो काढले. अर्थात त्यांची परवानगी घेऊन! आणि त्यानंतर पायाचे तुकडे पडेपर्यंत फिरून दमून भागून हॉटेलरूमवर परतलो. 

दुसऱ्या दिवशी अलास्काला जाण्याची तयारी करायची होती. त्यामुळे साहजिकच सामानाची आवराआवर करून पुढील स्वप्नील प्रवासाची चित्रे मनात रंगवीत झोपी गेलो.

कसे जाल? 
अनेक मार्गांनी, तुमच्या सोयीनुसार तुम्ही व्हॅन्कुव्हरला पोचू शकता. बस अथवा गाडीने व्हिक्‍टोरियावरून व्हॅन्कुव्हरला येण्यासाठी निघालात तर वाटेतील क्रूझप्रवास उत्तम आहे. 

कुठे राहाल? 
तुमच्या बजेटनुसार राहण्याची उत्तम सोय आहे. 

काय पाहाल?
स्टॅन्ले पार्क, एलिझाबेथ पार्क, व्हॅन्कुव्हरची खासियत असलेले ‘टोटेम’, लायन ब्रिज, गॅस टाऊन, चायना टाऊन, कॅपिलानो झुलता पूल इत्यादी... 

काय खाल? 
खवय्यांसाठी अक्षरशः हजारो पर्याय आहेत. 

फार फार महत्त्वाचे - 

  • कॅनडा - अलास्काच्या दौऱ्यात दुर्बीण फार महत्त्वाची आहे. 
  • या दौऱ्यात खूप म्हणजे खूपच साहसी खेळ तुम्हाला खेळात येतात. त्यामुळे विशेष फिटनेस ठेवल्यास खूप फायदा होईल. 
  • या दौऱ्यात विलासी साधनेदेखील खूप अनुभवता येतात. 
  • ‘सी प्लेन’, उंच टॉवरच्या हॉटेलातील सर्वोच्च मजल्यावरील फिरत्या रेस्टॉरंटमध्ये व्हॅन्कुव्हर शहर पाहत खाण्याचा आनंद द्विगुणित करण्याची मजा काही औरच आहे. 
  • या दौऱ्यात इतर खर्च बराच येत असल्याने बऱ्याचशा डॉलर्सखेरीज बरीच क्रेडिट कार्डसही घेऊन जावीत.

फोटो फीचर

संबंधित बातम्या