किया ओरा माओरी... 

उदय ठाकूरदेसाई
सोमवार, 11 मार्च 2019

आडवळणावर...
 

रोटोरुआमधील आडवाटा फिरून आम्ही जेव्हा शहराच्या मध्यवर्ती भागातील ‘मिलेनियम’ या सुंदर, देखण्या हॉटेलमध्ये पोचलो, तेव्हा तेथील व्यवस्थापक महाराष्ट्रीय - मराठी असल्याचे ऐकून, साऱ्या प्रवाशांना एकच आनंद झाला. भारताबद्दलच्या इवल्याशा गोष्टीबद्दलसुद्धा परदेशात किती अप्रूप वाटते म्हणतात ते असे! परंतु ते मराठी व्यवस्थापक रजेवर असल्याने आम्हा साऱ्यांचा आनंद तेथेच मावळला. 

आम्ही हॉटेलरूम्सच्या किल्ल्या घेऊन आपापल्या रूम्सवर पोचलो आणि मिलेनियम हॉटेलातील सुंदर खोल्यांत विसावलो. त्या आरामदायी खोल्यांत दिवसभराचा थकवा क्षणार्धात पळाला. युरोपच्या तुलनेत न्यूझीलंडमध्ये चांगल्या मोकळ्या - चाकळ्या हॉटेलरुम्स असतात. ‘स्वीट’ घेतला तर पाहायलाच नको. दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचे प्रथम नागरिक असलेल्या माओरी लोकांना, माओरी वस्तीला, माओरी भागाला भेट देऊन माओरींविषयी जाणून घ्यायचे होते... आणि खरेच सांगतो, पुन्हा एकदा क्‍लीन बोल्ड व्हायला झाले! 

अर्थात, आम्हाला माओरींविषयी काहीही माहिती नव्हते. त्यामुळे एवीतेवी आपल्याला माओरींबद्दल काहीच माहिती नाही तेव्हा सर्व काही उद्याचे उद्या पाहू, असे सारे उद्यावर ढकलून आम्ही निवांत झोपी गेलो. 

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर संपूर्ण वातावरणात काहीतरी बारीक, किंचित बदललेले आहे असे सतत जाणवत राहिले. गंधकमिश्रित हवा - आपल्या झुळकीबरोबर आम्ही नव्या प्रदेशात आल्याचे, वेगळ्या प्रांतात आल्याचे सुचवू पाहात होती. ताजेतवाने होऊन बसमध्ये बसल्यावर साऱ्या प्रवाशांनी ‘ही सकाळ काही वेगळीच असल्याचे’ मान्य केले. बस सुरू झाल्यावर रस्त्याच्या दुतर्फा लहान लहान मुला-मुलींचे घोळके दिसत होते. आपसांत दंगा करणारी ती गोड गोजिरवाणी मुले सहलीला आल्यासारखी बागडत होती. त्या मुलांना सांभाळणाऱ्या शिक्षक-शििक्षकांची तारांबळ उडत होती. लांबून मोठे मजेदार दृश्‍य दिसत होते ते! आम्हा प्रवाशांतील गडबड ऐकून चक्रधर आणि गाइड असलेल्या डॉनने माहिती पुरवायला सुरुवात केली, ‘आता आपण सल्फर सिटी असलेल्या-गंधकाचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोटोरुआतून फेरफटका मारीत आहोत. सर्वांत प्रथम आपण ‘टी पुईआ’ येथे जाऊ. वाटेत तुम्हाला गरम पाण्याच्या कुंडात अंघोळ करणारी, गंधकाच्या पाण्यात अंघोळ करणारी मंडळी दिसतील. इथे ठिकठिकाणी अशी कुंडे आहेत. ‘टी पुईआ’ येथे मड पूल्स म्हणजे अख्ख्या चिखलाने भरलेल्या तळ्यांत चिखल रटरटतो आहे आणि त्यातून वाफ बाहेर येत आहे, असे वेगळे चित्र दिसेल. पुढे जियो थर्मल (भू-औष्णिक) विभाग लागेल. पुढे गेल्यावर एक लाकडी पूलदेखील लागेल. चोहोबाजूंनी वाफ आणि मधे तुम्ही असे स्वप्ननगरीत गेल्यासारखे चित्र तुम्हाला भासू शकेल! समोर दिसणारे ‘पोहुतू गिझर्स’ पाहून तर तुम्ही आनंदून जाल..’ डॉनचे बोलणे संपायच्या आत एक उत्साही पर्यटक म्हणाला, ‘तुझी उत्सुकता वाढवणारी कॉमेंट्री बंद कर आणि आम्हाला एकदाचे खाली उतरू दे.’ या विधानावरून बरेच हास्यविनोद झाले आणि आम्ही बसमधून खाली उतरलो. 

बसमधून खाली उतरल्यावर दक्षिण आल्प्सची वैशिष्ट्ये दाखवणारा निसर्ग साद घालीत होता. नुसती आखीव-रेखीव हिरवाई दिसण्यापेक्षा किंचित आदिमपणाकडे झुकणारी गवताची रसरशीत पाती आपले वेगळेपण ठाशीवपणे आमच्यापुढे मांडीत होती. भोवतालच्या जमिनीतून वाफा वर येत होत्या. थोडे पुढे चालल्यावर मड पूल अर्थात तलावातील रटरटणारा चिखल पाहिला. एक घाबरट प्रवासी चिखल उडतोय ते पाहून घाबरला. त्याचा मित्र त्याला म्हणाला, ‘इतका घाबरतोस काय? तो चिखल काय अंगावर पडणार आहे का तुझ्या?’ या प्रश्‍नावर तो घाबरट प्रवासी म्हणाला, ‘नेम नाही! उडेलसुद्धा. कोणी सांगावे? हा परिसरच भयानक दिसतोय!’ आमच्याबरोबर असलेल्या स्थानिक माओरी लीडरने, ‘या मड पुलाचे (रटरटणाऱ्या चिखलाचे) तापमान ९५ अंश असून, रटरटणारा चिखल तीन फूट खोल आहे,’ असे सांगितल्यावर घाबरणारा प्रवासी बाजूला होऊन रस्त्याच्या मधून चालू लागला. केवळ माहिती ऐकून, तो इतका घाबरलेला पाहून साऱ्यांना खूप हसायला आले. त्याच्यावरचे लक्ष कमी करण्यासाठी म्हणा किंवा त्या घाबरट प्रवाशाचे मनोरंजन करण्यासाठी म्हणून म्हणा, आमच्या स्थानिक माओरी लीडरने लाल झुबके असलेल्या पांढऱ्या दोराला लटकलेला थोडा वजनदार पांढरा चेंडू, धरलेल्या हातावर मारून, पुन्हा खाली सोडून पुन्हा मनगटाच्या जोरावर हातावर मारून दाखवला. दिसायला आणि सांगायला सोप्पी असणारी ती कृती किती कठीण होती ते आमच्यातील एका तरुणाने प्रत्यक्ष केल्यामुळे कळले. दोरीला लोंबकळणारा चेंडू काहीसा जड होता. तो मनगटाच्या जोरावर उचलून धरलेल्या हातावर मारणे कठीण होते. माओरी लीडरने मग दोन दोर हातात पकडून त्या दोरांना लटकलेले दोन चेंडू एकमेकांवर आपटून ड्रम वाजवतात तसा आवाज त्यातून (त्या क्रियेतून) काढून दाखवला. आणखीही बरेच खेळ करून दाखवले. दणकट माओरींचे पहिलेच दर्शन असे रम्य होते! 

त्यानंतर आम्ही व्हाकारेवारेवा (उच्चार - फाकारेवारेवा) येथे माओरी लोकांचे गाव, त्यांची जीवनशैली, त्यांचे प्रार्थना मंदिर पाहावयास गेलो. हे संपूर्ण गाव तुम्हाला टांगाटा व्हेनुआ (उच्चार - टनाटा फेनुआ) म्हणजे स्थानिक गावकरीच दाखवतात. या ठिकाणी एक गमतीदार उल्लेख करायला हवा... आमच्या बसमध्ये काही मिस्कील तरुण मंडळी होती. चटकन अपभ्रंश करण्याच्या भारतीय कलेत ती पारंगत होती. त्यांच्या मोठ्या कंपूतल्या कुणीही बोलण्या-ऐकण्याकडे काणाडोळा केला की लगेच ती आपसांत बोलायची, ‘ए, फाकारेवारेवा, इकडे ये!’ किंवा ‘ए टनाटा ते बघ..’ त्यांच्या अशा मस्तीमुळे बसमधील बरीचशी मंडळी माओरी भाषेतले शब्द तर अनायासे शिकलीच; परंतु मिश्‍किलीतून भाषा शिकण्याचे नवीन धडे जणू साऱ्यांना मिळाले. पुढील सर्व दिवस मंडळी, ‘फाकारेवारेवा, टनाटा, पुरापुराफेटू, टी वेरीवा, किया, रोटा, मनू, पुक, टोंगा, काका’ असे माओरी शब्द आपसांत बोलून एकच धमाल उडवू लागली. वरील माओरी शब्दातील ‘काका’ या माओरी शब्दाचा अर्थ पोपट असा असल्याने बऱ्याच काकांची एकच पंचाईत झाली होती. 

फाकारेवारेवा येथील माओरी गावात शिरताना वेशीवरील टनाटाने (स्थानिक गावकऱ्याने) ‘किया ओरा’ म्हणत आमचे स्वागत केले. 

आम्हीदेखील ‘किया ओरा’ म्हणत गावात शिरलो. वेशीवर उंचच उंच लाकडी खांबावर अरनॉल्ड श्‍वारझेनेगरच्या रागीट चेहेऱ्यासारखा एक मुखवटा कोरीव कामात उंचावलेला दिसत होता. स्थानिक माओरींमध्ये ‘टामोको’ म्हणजे माओरी ‘टॅटूं’ची समस्त स्त्री-पुरुषांमध्ये जबरदस्त आवड असलेली दिसली. हे टॅटू विशेषकरून पुरुषांच्या चेहऱ्यावर तर बायकांच्या हनुवटीवर असलेले दिसले. पुढे गेल्यावर मंदिरावरचे लाकडी कोरीव काम बघायला मिळाले. मंदिराच्या बाह्य चौकटीवर पूर्वजांचा (आपल्याला भयप्रद वाटणारा ) मुखवटा कोरलेला असतो. सभोवतालचा परिसर अतिशय शांत असतो. साध्या लाकडी त्रिकोणातले, सामान्य चौकटीतले ते सोपे साधे मंदिर पाहून माओरींच्या साध्या-सोप्या जीवनाची कल्पना येते. मंदिर परिसर अतिशय सुंदर आहे. जियोथर्मल विभागामुळे सतत वाफा वर जाण्याचे दृश्‍य सुंदर छोट्या लाकडी घरांच्या (कुटिया) पार्श्‍वभूमीवर उठून दिसते. या संपूर्ण विभागाचे पूर्ण वेगळेपण आपल्या मनावर ठसवते. त्यानंतर आम्ही माओरींची कला आणि हस्तकला पाहावयास गेलो. दणकट अंगाचे, रुक्ष भासणारे आणि अंमळ रंगीत चेहऱ्याचे माओरी आम्ही आल्याची नोंद न घेतल्याचे दाखवीत आपापल्या कोरीवकामात मग्न होते. काही वेळ आम्ही त्यांचे ते कोरीवकाम पाहतच राहिलो. माओरी महिलाही कलाकुसरीत मागे नाहीत. पुढच्या दालनात माओरी महिलांनी अत्याधुनिक महिलांना सहज आवडतील असे आकर्षक कपड्यांचे प्रदर्शन साऱ्यांसमोर मांडले होते. बसमधून उतरल्यापासून स्थानिक माओरी गाइडने माओरींबद्दल इतकी माहिती पुरवली, की आमचे संपूर्ण स्थलदर्शन होईपर्यंत आपण खरोखरीच पृथ्वीवरील एका वेगळ्याच प्रांतात आल्याचा साक्षात्कार आम्हाला झाला. 

केवळ रोटोरुआत नव्हे, तर बे ऑफ आयलंड, ऑकलंड येथील वायतांगी म्युझियममध्येदेखील आम्हाला माओरी कलाकारांची काष्ठशिल्पकला पाहावयास मिळाली. तेथेच कोरीवकाम केलेली लांबलचक नौकादेखील पाहावयास मिळाली. निसर्गाजवळचे अतिरम्य असे निवासस्थान, आपली वसाहत, अत्याधुनिक काळात प्राचीनतेचे मापदंड कायम ठेवीत, आयुष्यात पुढे जाण्याची माओरी लोकांची रीत फार मोहवून गेली. आपल्याला सतत जाणवत राहते, की या माओरी लोकांना त्यांच्या प्राचीन परंपरेशिवायसुद्धा बरेच काही सांगायचे आहे. अखेर माओरींना ‘किया ओरा’ म्हणण्याची वेळ आली. एका रम्य, गूढ प्रांतातला रंजक असा प्रवास आठवणींच्या कुपीत साठवून आम्ही सारे सहप्रवासी पुढच्या प्रवासवाटेवर निघालो.  

रोटोरूआ 
काहींच्या मते इ. स. १००० - १२०० च्या सुमारास, तर काहींच्या मते इ. स. १२०० - १३०० च्या सुमारास माओरी हा समूह सर्वांत प्रथम न्यूझीलंडमध्ये वास्तव्यास आला. आजपर्यंत न्यूझीलंडमध्ये एकूण लोकसंख्येच्या साधारण १५ टक्के लोकसंख्या ही 
माओरी लोकांची आहे. सध्या न्यूझीलंडमध्ये दोन अधिकृत भाषा आहेत. एक इंग्रजी आणि दुसरी माओरी! अनेक लढे देत, अनेक संघर्ष करीत न्यूझीलंडमधील माओरींनी आपले स्थान न्यूझीलंडमध्ये उंचावले आहे. न्यूझीलंडच्या प्रामुख्याने उत्तर बेटावर राहणाऱ्या माओरींची न्यूझीलंडमधील लोकसंख्या सध्या साडेसात लाखांच्या घरात आहे. १८४० मध्ये ऑकलंडमधील वायतांगी येथे ब्रिटिशांचा माओरी प्रमुखांबरोबर समान नागरी कायद्याने राहण्यासाठी तह झाला. त्यानंतर माओरींनी बदलत्या जगाशी जुळते घेत आजचा टप्पा गाठला आहे. रोटोरूआ येथे विविध स्तरांतून, विविध माध्यमांतून आणि आगळ्यावेगळ्या पर्यटनांतून माओरींच्या जीवनाची व्यवस्थित कल्पना येते. 

वैशिष्ट्ये 

  • टी पुईआ भागातील पोहुतू गिझर्सचा तासाभरातून एकदोन वेळा शंभर फूट उंच फवारा उडालेला बघता येतो. 
  • पोहुतू गिझर्सजवळ पोहुतू कॅफे आहे. 
  • लहान मुलांसह साऱ्यांसाठी वाई-ओ-तापू ते टी पुईआ हा एक रंगीतसंगीत विमानप्रवास आहे, असे ऐकून आहे. या विमानात फक्त खिडकीजवळच्याच जागा असल्याने साऱ्यांनाच उत्कृष्ट विमानप्रवासाचा आनंद मिळतो. 
  • पहिला माओरी चित्रपट १९८७ प्रसिद्ध झाला. 
  • मेरेता मिताया या माओरी महिलेने १९८८ मध्ये प्रथमच माओरी चित्रपट दिग्दर्शित केला. 

काही माओरी शब्द  
मनू - पक्षी. 
पुक - टेकडी. 
टोंगा - दक्षिण. 
आवा - नदी. 
काका - पोपट. 
रोटो - तळे. 
रुआ - दोन. 
वाई - पाणी. 
किया ओरा -  हॅलो, काय म्हणताय? नमस्कार.

संबंधित बातम्या