शांत, रमणीय हेलसिंकी 

उदय ठाकूरदेसाई
सोमवार, 25 मार्च 2019

आडवळणावर...
 

मुंबईच्या ‘मामि’ चित्रपट महोत्सवात, बऱ्याच वर्षांपूर्वी एक फिनिश (फिनलंड) चित्रपट पाहिला होता. त्या चित्रपटाचे नाव आठवत नाही; परंतु तो चित्रपट वेगळ्या दृश्‍यांमुळे लक्षात मात्र राहिला. त्या चित्रपटाचा नायक मोठ्या झाडांचे बुंधे कापून, दोन मोठ्या लाकडी ओंडक्‍यांवर तोल सावरीत उभे राहून, खळाळत्या नदीपात्रातून ते ओंडके इच्छितस्थळी पोचवत असे. जंगल, धबधबे, नदी, पर्वत यांच्या पार्श्‍वभूमीवर चितारलेली ती प्रेमकथाच होती. ओंडक्‍यांचे दळणवळण करण्याच्या या अनोख्या प्रवासात नायक नायिकेला भेटत असे. ठेकेदाराच्या रूपातल्या खलनायकाने नायकाच्या सर्वच मार्गात अडथळा आणणे आणि नायकाने त्या संकटांवर मात करून नायिकेचे मन जिंकणे अशी छोटीशी, परंतु खूप वेगळ्या पद्धतीने चित्रित केलेली ती कथा त्या चित्रपटाचे आणि फिनलंडचे एक वेगळेपण अधोरेखित करून गेली. 

हेलसिंकी या फिनलंडच्या राजधानीतून फिरताना मनातल्या मनात वरील गोष्टीची उजळणी झाली आणि हेलसिंकीचे वेगळेपण मनावर ठसायला नकळत सुरुवात झाली. युरोपात फिरताना किरकोळ अपवाद वगळता तुम्ही बसमधून फिरत असता. फिनलंडमध्ये मात्र बस, ट्रेन, क्रूझ, विमान अशा सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या साधनांचा तुम्ही वापर करीत असता. हेलसिंकी तीन बाजूंनी पाण्याने वेढलेले असल्यामुळे तेथे क्रूझचे दळणवळण मोठ्या प्रमाणावर आहे. हेलसिंकीच्या पूर्वेला असलेल्या रशियाच्या सेंट पीटर्सबर्गवरून हेलसिंकी ३९० किलोमीटरवर आहे. पश्‍चिमेला ४०० किलोमीटरवर स्टॉकहोम आहे, तर दक्षिणेला अवघ्या ८० किलोमीटरवर टालिन आहे. त्यामुळे सरसकट बसप्रवास न करता ट्रेन, विमान आणि क्रूझप्रवास करण्याकडेच साऱ्यांचा कल असतो. 

आम्ही सेंट पीटर्सबर्गवरून अतिजलद अलेग्रो ट्रेनने हेलसिंकीला आलो खरे; परंतु खरे सांगायचे तर आमचे मन मॉस्कोहून सेंट पीटर्सबर्गला जाणाऱ्या सेपसान ट्रेनने जिंकले होते. दिमाखदार सेपसान ट्रेनमध्ये आम्ही ताशी २५० किलोमीटर वेगाने वेगाचा थरार अनुभवला होता. त्यामुळे प्रत्यक्षात अलेग्रो ट्रेनमधे बसायची वेळ आली तेव्हा आम्हाला रोमांचित वगैरे व्हायला झाले नव्हते. परंतु म्हणतात ना, अतिजलद ट्रेनने प्रवास करण्याची गंमतच न्यारी. ती गंमत वाटत होती. मात्र आमच्यातील काही सहप्रवाशांना रशिया आणि फिनलंड या दोन देशांदरम्यान धावणाऱ्या अतिजलद ट्रेनचे अप्रूप वाटत होते. 

आपल्याकडे भारतात प्लॅटफॉर्मवरून ट्रेन सुटताना गर्दी दिसते तसा काही प्रकार अर्थातच सेंट पीटर्सबर्गला दिसला नाही. आम्ही भारतीय मंडळी आसनस्थ होऊनसुद्धा बरीच जागा रिकामी होती. ट्रेन सुरू झाल्यानंतर काही वेळातच सुरुवातीची उत्साही बडबड करणारी मंडळी हळूहळू पेंगू लागली. काहीकाहींनी तर, हेलसिंकीला पोचायला पावणेचार तास लागतील असे ऐकल्यावर सीटवर कलते होत झोपण्याचा पवित्रा घेतला. मी मात्र वेगाने जाणाऱ्या गाडीतून बाहेरच्या दृश्‍यांचे व्हिडिओ घेत होतो. मजा वाटली. रस्त्यात कुणीही नव्हते. रेल्वे फाटकाजवळ कुणीही नव्हते. अगदी क्वचित दिसणाऱ्या घरांतून आमच्या ट्रेनकडे पाहणारेसुद्धा कुणीही नव्हते. अखेर पावणेचार तासांच्या प्रवासानंतर आम्ही हेलसिंकी रेल्वेस्थानकावर उतरलो आणि आमच्या फ्लेमिंगो हॉटेलकडे नेणाऱ्या बसमध्ये बसलो. 

बस सुरू झाल्यावर लीडरने हेलसिंकीविषयी सांगायला सुरुवात केली, ‘स्वीडनच्या गुस्ताव राजाने १५५० ला हेलसिंकी वसवले. रशियाने फिनिश युद्धात स्वीडनचा पराभव केला आणि रशियाच्या अलेक्‍झांडर राजाने १८१२ मध्ये जुन्या टुर्कू या राजधानीऐवजी सेंट पीटर्सबर्गजवळचे हेलसिंकी हे ठिकाण फिनलंडची नवी राजधानी म्हणून घोषित केले. जगामधल्या एक चतुर्थांश पेपरची मागणी एकटा फिनलंड देश पूर्ण करतो. नोकिया मोबाईलचे उत्पादन करणारा फिनलंड हा देश कनेक्‍टिव्हिटीच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर होता. तो आता आठव्या क्रमांकावर आहे. ‘नोकिया’चे काय झाले हे आपण सारे जाणतोच. ५५ लाख लोकसंख्येच्या फिनलंडमध्ये जवळजवळ साडेसहा लाख लोक तर केवळ हेलसिंकीतच राहतात. एकेकाळी जगात राहण्यासाठीचे सुंदर ठिकाण म्हणून आपला पाचवा क्रमांक हेलसिंकी मानाने मिरवीत होती. आता मात्र हेलसिंकी शहराबाहेर टुलू आदी ठिकाणी हेलसिंकीचा विस्तार वाढत चालला आहे. जंगलसंसाधन, जहाजबांधणी, पेपरइंडस्ट्री याशिवाय येथे मासे मुबलक प्रमाणात मिळत असल्याने येथे तुम्हाला ‘सामन’ मासेदेखील खाता येतील.’ 

माशाचा विषय निघताच बसमधील मंडळींत चलबिचल सुरू झाली. बसमधून हेलसिंकीचा पहिलावहिला चेहरा जरा वेगळा दिसत होता. आम्ही बसमधून उतरलो आणि फ्लेमिंगो हॉटेलमध्ये गेलो. ते हॉटेल शहरापासून लांब आणि ना धड चांगले आणि ना धड वाईट असे बेतासबात पद्धतीचे होते. हॉटेलची लॉबी चांगली होती, परंतु इंग्रजी बोलण्याचा आनंदच होता. 

हेलसिंकीत फिरून बघण्यासारखी अनेक छोटी छोटी ठिकाणे आहेत. सर्वांत जुन्या अशा सिनेट चौकात हेलसिंकी कॅथेड्रलजवळ बसमधून लवकर उतरण्यासाठी चक्रधर तुम्हाला घाई करतो. कारण इथे दर सेकंदाला बसेस थांबत असतात. बसेसमधून पर्यटक उतरत असतात आणि चौकात आणि चौकाबाहेर असलेल्या शिल्पाकृतींव्यतिरिक्त हेलसिंकी कॅथेड्रल बघून पायऱ्यांवर स्थिरावताना दिसतात. नाही म्हटले तरी समोर दिसणारा सर्व खेळ बघण्यात वेळ कसा जातो ते कळत नाही. 

कातायानोक्का हा हेलसिंकी बंदराजवळचा फार देखणा परिसर आहे. येथे युस्पेंस्की हे भव्य कॅथेड्रल बघता येते. भव्य वास्तूबाहेर तीन दिशांचे तीन विविध रस्ते आरामात न्याहाळता येतात. ते न्याहाळता न्याहाळता हेलसिंकीचे वेगळेपण नजरेत भरते. जवळचे बंदर, बंदरात नांगरलेल्या अक्षरशः प्रचंड प्रमाणातल्या बोटी, शेजारच्या लांबलचक सरळसोट रस्त्यावरून तुरळक प्रमाणात धावणाऱ्या वेगळ्या कंपन्यांच्या फिनिश गाड्या, एक-दोन मजल्यांच्या असंख्य इमारती, वाहत्या वाऱ्याच्या तालावर नाचून हेलसिंकी कॅथेड्रलचे दर्शन नयनरम्य करणारी झाडे अशी सारी भोवतालची नवलाई पाहता येते. मजा म्हणजे हेलसिंकीत एक सोडून दोन - दोन कॅथेड्रल आहेत. फिनिश लोकांच्या मते हेलसिंकी कॅथेड्रल हे हेलसिंकीच्या भावभावनांचे प्रतीक आहे, तर युस्पेंस्की कॅथेड्रलवर रशियन प्रभाव आहे. 

सिबेलियस पार्कमध्ये जाण्यासाठी तुम्हाला हेलसिंकी शहर सोडून उत्तरेकडच्या टाका टुलू विभागात जावे लागते. गेल्या गेल्या शहर सोडल्याच्या खुणा दिसू लागतात. बसमधून उतरल्यावर रस्त्यापुढील चढ चढल्यावर आपण विस्तीर्ण अशा उद्यानात प्रवेश करतो. पायाखाली हिरवीगार गुबगुबीत गवताची पाती आपले स्वागत करीत, चालण्याचा आपला वेग वाढवितात. एवढ्यात समोरील शिल्प आपले लक्ष वेधून घेते. पहिल्याच प्रयत्नात ते शिल्प आपल्याला विचार करायला लावते आणि स्थानिक गाइडने सांगितल्यावर आपल्याला उलगडा होतो की इला हिलतुनेन या फिनिश शिल्पकर्तीने जीन सिबेलियस या महान संगीतकाराला सलाम करताना, संगीतातील नाजूकपण लाटांच्या लयकारीत बांधून स्टील पाइप्सच्या साहाय्याने एक अप्रतिम कलाकृती सादर केली आहे. ‘पॅसियो मुसिकाय’ नावाने ती जगद्विख्यात झाली. त्यापुढे जीन सिबेलियसचा पुतळा इतका अप्रतिम आहे, की त्या पुतळ्यापुढून माणूस हलत म्हणून नाही. विलक्षण देखणी शिल्पकृती पाहून जीन सिबेलियसचे नाव जणू तुमच्या तोंडातच बसते. हेलसिंकी पाहायला आलेल्या साऱ्यांनाच सिबेलियस पार्कची मोहिनी असते आणि या दोन शिल्पाकृतींपुढून तर पर्यटक हलायला तयार होत नाहीत. परंतु जरा बाजूला पाहिले तर रंगीबेरंगी वृक्षराई आपले अंगीभूत सौंदर्य दाखवून तुम्हाला पार्कची फेरी मारायला लावते. स्थानिक गाइडच्या, चक्रधराच्या दोन-तीन हाका आल्याशिवाय मंडळी हलतच नाहीत. 

हेलसिंकीत एस्प्लनॅडीन पोईस्तो हा एक सुंदर असा परिसर आहे. तेथून तुम्ही बाकावर बसून आजूबाजूची वर्दळ बघू शकता. उत्कृष्ट आइस्क्रीम्स खाऊ शकता. चौकाचौकात रेखीवपणे सजवलेले ट्युलिप्सचे छोटे छोटे वाफे बघू शकता. कविमनाच्या एखाद्या रसिक पर्यटकाला झाडांच्या खाली पडलेला हिरवा सडा बघतच राहावेसे वाटल्यास नवल नाही. 

जाताजाता कौपांतोरी भागात म्हणजे बंदरासमोरच्या भागात तुम्ही मज्जा करण्यासाठी येता. समोर सारेच सुंदर दृश्‍य असते. सुंदर झुळूक शरीराला स्पर्श करून गेल्यावर चालण्याचा उत्साह वाढतो. बंदरासमोर बरेच छोटे छोटे स्टॉल्स दिसतात. त्यात चेरी, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी, श्रुबेरी - छोट्या छोट्या द्रोणात मांडलेल्या पाहिल्यावर, खाण्याचा मोह नाही झाला तरच नवल! चेरी खात बंदराकाठी बसल्यावर काही शुभ्र आणि काही करड्या रंगाचे सीगल तुमच्या जवळ येतात. त्यांना तुम्ही चेरी दिल्यावर धीटपणे तुमच्या जवळ येतात. तेथून निघताना पुन्हा एक आइस्क्रीम खाऊन तुम्ही परतता आणि बसमधून हॉटेलवर जाऊन सामानाची बांधाबांध करून संध्याकाळच्या क्रूझने निघण्याची साऱ्यांची तयारी सुरू होते. 

हेलसिंकी धक्‍क्‍यावर पोचल्यावर ‘सिलया लाइन’ क्रूझ समोरच दिसते. विमानासारखे चेक इन करून आपण क्रूझमधे स्थिरावतो. सामान केबिनमध्ये टाकून सर्वांत प्रथम डेकवर येतो. क्रूझ हळूहळू हेलसिंकीचा किनारा सोडीत असते. दूरवर दिसणाऱ्या हेलसिंकीची स्कायलाईन अस्पष्ट होत जाताना दिसते आणि हेलसिंकीच्या आठवणीत मन रमून जाते... 

पावो नुर्मी 
फिनलंडचा पावो नुर्मी त्याच्या जिवंतपणीच दंतकथेचा विषय झाला होता. एका सामान्य फिनिश कुटुंबात पावो नुर्मीचा जन्म झाला. 
शिक्षणात लक्ष नसल्याने लहानपणीच त्याने शाळेला रामराम ठोकला. तो धावू लागला. धावण्यात मात्र त्याने खूप नाव कमावले. आपल्या हयातीत त्याने धावण्यात तब्बल २२ विश्‍वविक्रम केले. ८०० मीटर ते २० किलोमीटर अंतरावर त्याने स्वतःची दहशत बसवली. पावो नुर्मीने फिनलंडला ९ सुवर्ण आणि ३ रौप्य एकहाती मिळवून दिली. धावण्याची कारकीर्द संपल्यावर त्याने कपड्याचे दुकान उघडले. ते खूप चालले. बांधकाम व्यवसायात नाव काढले. एवढेच काय त्याने शेअर मार्केटमध्येदेखील पैसे कमावला. १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिक्‍समध्ये तो मशाल घेऊन जात असताना, त्याला फिनिश लोकांतर्फे टाळ्यांच्या गजरात अफाट मानवंदना देण्यात आली. ‘फ्लाइंग फिन’ ही उपाधी त्याने मानाने मिरवली. टुलू विभागात त्याचा पुतळा आपल्याला बघायला मिळतो.

कसे जाल? 
     बस, विमान, ट्रेन, क्रूझ अशा चारही मार्गाने हेलसिंकीला जात येते. 

काय पाहाल? 
     सिनेट चौक, सरकारी राजवाडा, हेलसिंकी विश्‍वविद्यालय, ऑपेरा हाउस, सिबेलियस पार्क, हेलसिंकी आणि युस्पेंस्की कॅथेड्रल, कातायानोका परिसर, हेलसिंकी धक्का, टुलू परिसर, सिटी हॉल, एस्प्लनाडींन पोईस्तो परिसर, कौपातोरी अर्थात बाजार चौक, हेलसिंकी स्टेडियम, पावो नुर्मीचा पुतळा. 

कुठे आणि काय खाल? 

  • कौपातोरी परिसरात अनेक छोट्या छोट्या स्टॉल्सवर तुम्हाला अतिशय ताजी चेरी, स्ट्रॉबेरी, श्रुबेरी, ब्लॅकबेरी अशी फळे मिळू शकतात. 
  • सामन मासे आणि इतर स्थानिक मांसाहारी पदार्थांचे अनेक स्टॉल्स तेथे चालू असतात. समोरच्या एस्प्लनाडींन पोचेस्तो परिसरात उत्कृष्ट महागड्या हॉटेलात तुम्हाला छान छान पदार्थ खाता येतील. 
  • दिवसभरात एकदा भारतीय खाणे खायची इच्छा झाल्यास महाराजा, इंडियन तंदूर, इंडिया हाऊस, नमस्कार, सम्राट, मोनल अशी अनेक रेस्टॉरंट्‌स हेलसिंकीत आहेत. 

महत्त्वाचे - 

  • रशिया-स्कॅंडेनेव्हिया भागात केवळ फिनलंडमध्ये युरो चलनामध्ये व्यवहार चालतो. इतर देशात युरो तर घेतात; परंतु परतीचे चलन मात्र स्थानिक चलनात देतात. जे तुम्हाला त्रासदायक होऊ शकते. म्हणून खर्च करताना त्यानुसार खर्च करावेत. 
  • उदाहरणार्थ, फिनलंडला युरोचे चलन वापरून इतर ठिकाणी तुम्हाला क्रेडिट कार्डस वापरता येतील. 
  • त्याचप्रमाणे जर का तुम्हीसुद्धा हेलसिंकीहून स्टॉकहोमला जाताना क्रूझप्रवास करणार असाल तर क्रूझमधे गेल्यावर खिडकीतून समुद्र दिसणाऱ्या केबिनमध्ये दीर्घकाळ न रेंगाळता डेकवर जाऊन हेलसिंकीचे अखेरचे दर्शन घ्यायचे विसरू नका. हेलसिंकी सोडल्या सोडल्या प्रवासात लागणारी छोटी छोटी बेटे तुमचे लक्ष वेधून घेतात. डेकवर मिळणारी समुद्रपक्ष्यांची साथ तुमची संध्याकाळ रंगीन करून टाकेल. 
  • सूर्य अस्ताला जाताना पेनिनसुला हेलसिंकीला बाय बाय करून तुम्ही क्रूझच्या अंतरंगात शिरू शकता.

संबंधित बातम्या