भीषणसुंदर भारमोर

उदय ठाकूरदेसाई
सोमवार, 8 एप्रिल 2019

आडवळणावर...
 

तुम्ही कधी भारमोरला गेला आहेत का? नसल्यास आवर्जून जा. आडवाटेवरचे भारमोर तुम्हाला एकदम आवडून जाईल. परंतु कसे जाल? कारण, प्रवासी कंपन्या काही भारमोरच्या वाटेला जात नाहीत. परिचित प्रवासी कंपन्या, प्रवाशांना, डलहौसी-खजियार-चंबा दाखवून परत पुण्या-मुंबईला आणतात. त्यामुळे एक तर तुमचे तुम्हीच भारमोरला गेलात तर, नाहीतर ट्रेकर असलात तर मणिमहेश ट्रेकच्या निमित्ताने तुमचे भारमोरमध्ये राहणे होईल. माझेही तसेच झाले. 

पुण्याच्या ‘झेप’ संस्थेने ‘मणिमहेश ट्रेक’ची जाहिरात मराठी वृत्तपत्रात दिली आणि त्या ट्रेकमधील आडवाटेवरची भारमोर - हडसर - धांचो - गौरीकुंड - मणिमहेश ही सर्वस्वी नवखी नावे ऐकून मी आणि स्वातीने या ट्रेकला जायचे नक्की केले. 

हिमालयाच्या थंड हवेतील ट्रेक करण्यासाठी, मुंबईतील अति गरम हवामानातून निघणे, वाटते तेवढे सोपे नसते आणि आम्हाला तर सर्वांत प्रथम भर उन्हाळ्याचे मुंबईहून पुणे गाठणे, पुण्याला एक दिवस राहून दुसऱ्या दिवशी पुण्याहून निघणे असे सारे कष्टप्रद काम करायचे होते. हे सारे कमी म्हणून की काय ‘झेलम एक्‍स्प्रेस’सारख्या मंदगती गाडीने पुण्याहून पठाणकोट गाठायचे होते... आणि पठाणकोटचा उन्हाळा काय म्हणता! पुण्या-मुंबईचा उन्हाळा सामान्य म्हणावा असा कडक उन्हाळा पठाणकोटला अनुभवला. थोडक्‍यात, आगीतून फुफाट्यात अशीच आमची त्यावेळी अवस्था झाली होती. पण म्हणतात ना! सहनशीलतेचा कडेलोट झाला, की सुखाचा शिडकावा होतोच! अगदी तसेच झाले. आम्ही पठाणकोटहून डलहौसीच्या मार्गाला लागलो. दुपारी डलहौसीत धाब्यावर जेवताना अंगाची काहिली कमी झाली. सौम्य, मंद झुळूक भर दुपारच्या सावलीत अनुभवायला मिळाली. संध्याकाळी चंबा येथे चहा प्यायला उतरल्यावर वातावरण प्रसन्न, हलकेफुलके वाटू लागले. मग पुढे आमचा भारमोरचा प्रवास सुरू झाला. 

डावीकडे खळाळती रावी, सतत चढ असणारे रस्ते, एकावेळी एकच वाहन जाऊ शकेल असे अरुंद रस्ते, समोरून वाहन आल्यास, गाडी पाठी घेताना, मागच्या बाजूचे एक चाक दरीत गेलेले पाहिल्यावर होणारी प्रवाशांची घालमेल... अशा थरारक क्षणांच्या सोबतीने रौद्रभीषण सौंदर्य पाहात आम्ही भारमोरमध्ये कसे पोचलो ते कळलेच नाही. थोडे वेगळ्या अंगाने सांगायचे, तर डलहौसी-खजियार येथील पीरपांजाल रांगांमधून आम्ही धौलाधार पर्वतराजीत प्रवेश करते झालो. मोहक निसर्ग, हळूहळू रौद्रभीषण रूप धारण करणारा झाला. अस्सल भटक्‍याला आवडावा असाच प्रवास आहे हा! 

भारमोरला पोचल्यावर आमची बस भारतीय गिर्यारोहण संस्थेच्या (IMF) प्रवेशद्वाराजवळ थांबली. आम्ही सारे बसमधून उतरल्या उतरल्या थंडीने कुडकुडू लागलो. आपापल्या सॅक काढून, इमारतीच्या पायऱ्या चढून मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो. त्या पायऱ्या चढताना दोन नवखे ट्रेकर्स आपसांत म्हणाले, ‘मणिमहेशचा ट्रेक आपल्याला झेपेल ना?’ एकापरीने ते दोघे साऱ्यांच्याच भावना जणू बोलून दाखवीत होते. 

रात्री लवकर जेवणे आटोपून छोट्याशा खोलीत दाटीवाटीने उबदार वातावरणात झोपलेलो आम्ही ‘गडद’ झोपी जाणार तेवढ्यात वैभव आणि मंदार या लीडर्सनी आम्हाला सांगितले, की उद्या सर्वांनी अंघोळ करायची आहे. कारण पुढे पाच दिवस अंघोळीचे काही खरे नाही. सारेच ट्रेकर! उद्या अंघोळ करायची म्हटल्यावर सारेच हिरमुसले! 

दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे ओरडण्याचे, चित्कारांचे आवाज आले. भल्या पहाटे, भारमोरच्या थंड वातावरणात, थंड पाण्याने अंघोळ करणाऱ्यांचे ते आवाज होते हे कळल्यावर सारेजण, ‘आता आपले काय?’ याच विवंचनेत होते. एका मित्राच्या भाषेत, ‘दोन दिवसांच्या आंबून गेलेल्या, घामेजलेल्या शरीरावर जिथे जिथे पाण्याचा स्पर्श झाला तो तो अवयव ‘लाकडी’ बनत गेला.’ मजेचा भाग वगळता बरीच बोंबाबोंब होऊन, सारे तरतरीत होऊन, अंगावर गरम कपडे चढवून, बाहेर पडण्याच्या आदेशाची वाट पाहात होते. 

मी संस्थेच्या बाहेर आलो. बाहेरील अप्रतिम वातावरण पाहून हरखून गेलो. अतिशय प्रसन्न वातावरणात संस्थेच्या इमारतींसमोरून दोन 

झरे दोन दिशांना खळखळाट करीत धावत (वाहात) होते. कोवळ्या सूर्यप्रकाशात आमच्यातल्याच एक मॅडम शांतपणे पुस्तक वाचीत ऊन खात होत्या. त्यांचे लक्ष गेले म्हणून सहज त्यांना विचारले, ‘तुम्हाला थोरो आवडतो का?’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘हो. तुम्हाला कसे 

माहीत?’ त्यावर मी म्हटले, ‘इतक्‍या सुंदर नैसर्गिक पार्श्‍वभूमीवर भर सकाळी मन लावून वाचताना पाहिले म्हणून विचारले.’ यावर त्या मॅडम म्हणाल्या, ‘हे पाहा. ‘वॉल्डन’च वाचते आहे.’ त्या बाई पक्‍क्‍या भटक्‍या जातकुळीतल्या निघाल्या. त्यांचा नवरा, तर कर्णबधिरांना शिकवण्याचा छंद जोपासत जग फिरला. बरेच वेगळे किस्से ऐकायला मिळाले. याच बाई पुन्हा एकदा हिमालयावारी करताना दिल्ली - हरिद्वारच्या प्रवासात भेटल्या. तेव्हा पुन्हा एकदा गप्पांचा सिलसिला झाला. 

त्यानंतर थोड्याच वेळात, आम्ही सारेजण चौरासी मंदिरात एकत्र भेटण्यासाठी म्हणून जमलो. चौरासी मंदिर हे एक मंदिर नाही, तर मंदिरसमूह आहे. येथील मंदिर परिसरात तुम्हाला पहाडी शैलीतील नक्षीकाम बघायला मिळते. नृसिंह मंदिराजवळ १२ हातांची गरुडावर स्वार झालेली विष्णूची मूर्ती पाहायला मिळते. तर मणिमहेश मंदिराजवळ ब्राँझ धातूमधील नंदी आपले लक्ष वेधून घेतो. येथील देवालयांवरील अखंड कोरीव मूर्ती तुमचे मन शांत करतात. मूर्तींचा विध्वंस करणारे चंबापर्यंत थडकले, परंतु भारमोरपर्यंत येऊ शकले नाहीत. त्यामुळे ही सारी मंदिरे त्या विध्वंसातून वाचली. भारमोर आवडण्याचे महत्त्वाचे कारण ही सारी मंदिरेसुद्धा आहेत. तुम्ही मंदिराच्या टोकापर्यंत दाराजवळ गेलात, तर सुंदर ‘टेरेस फार्मिंग’ बघायला मिळते. उंचीची भीती वाटणारी किंवा उंचावरून खाली पाहिल्यावर भोवळ येणारी मंडळी इथे फिरताना दिसणे कठीण आहे. कारण इथे जागोजागी अतिभव्य निसर्ग आपल्या पर्वत दरबारातील अद्‌भुत निसर्गसौंदर्य दाखवीत असतो. आपल्या अगाध लीला दाखवीत असतो. एखादा कमकुवत हृदयाचा कुणी इथे चुकून वळलाच, तर चोहोबाजूंचे अवाढव्य पर्वत-पहाड पाहून त्याचा श्‍वास अडकायचा! हे मंदिर पुन्हा एकदा संध्याकाळी पाहू असे ठरवून आम्ही भर्माणीदेवीच्या ट्रेकला निघालो. 

हिमालयात फिरताना हे एक छान असते. पहिल्या दिवशी वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी म्हणून एक छोटेखानी ट्रेक असतोच असतो. गावातून निघताना शाळेतल्या लहान मुलांना आम्ही गावात आल्याची वर्दी मिळाली होती. आमच्या ट्रेकच्या वाटेतच त्यांची निसर्गशाळा होती. मुक्त वातावरणातली ती खूप छान शाळा पाहून, किलबिलणाऱ्या चिमण्यांचा फोटो घेण्याची मला इच्छा ना होती तरच नवल! आश्‍चर्य म्हणजे फोटो काढायचा म्हटल्यावर ती सारी मुले इतकी शिस्तीत बसली की बस्स! 

एक एक चढ चढत आम्ही भर्माणीकडे वाटचाल करीत असताना वैभव आमच्यातल्या एका काकूंना म्हणाला, ‘काय काकू? कसे वाटतेय?’ त्यावर काकू फणकारून म्हणाल्या, ‘काकू काय म्हणतोस?’ वैभव म्हणाला, ‘का आले? आणि कुठे आले? असे म्हणताय ना मनात? म्हणून काकू म्हटले!’ एव्हाना आम्ही भर्माणीदेवीच्या मंदिराजवळ आलो. परंतु, मंदिरात जाण्याऐवजी प्रथम ग्लेशियर बघून साऱ्यांना ‘घसरगुंडी’ करण्याचा मोह झाला. साऱ्यांचे मनसोक्त खेळून झाल्यावर आम्ही भर्माणीच्या दर्शनाला गेलो. तेव्हा मंदिराचा पुजारी म्हणाला, ‘मणिमहेशाचे दर्शन घेण्यापूर्वी भर्माणीदेवीचे दर्शन प्रथम घ्यायला हवे हे तुम्हाला ठाऊक आहे काय? त्याची एक कथा आहे ती सांगतो.’ असे म्हणून पुजाऱ्याने कथा सांगायला सुरुवात केली - ‘एकदा भर्माणीदेवी (गौरी) चौरासी मंदिरात तप करीत बसली होती. त्यावेळी शंकर भगवान आपल्या ८४ भक्तगणांसह तेथे आले. परंतु, भर्माणी काही शंकराला ओळखू शकली नाही. शंकराला हा अपमान वाटला. शंकराने भर्माणीला शाप दिला. ‘तुलासुद्धा कुणी ओळखणार नाही.’ भर्माणी रडू लागली. भर्माणीने गयावया केल्यावर शंकराने 

तिला उःशाप दिला. भर्माणीला तप करण्यासाठी या डोंगरावर जागा दिली आणि ‘मणिमहेशाची वारी करताना सर्व लोकांना प्रथम तुझे दर्शन घ्यावे लागेल आणि तसे त्यांनी केले तरच त्यांची वारी माझ्या दर्शनाने पूर्ण होईल आणि त्यांना वारीचे पुण्य मिळेल.’ तेव्हापासून मणिमहेश यात्रेइतकीच भर्माणीदेवी आणि चौरासी मंदिराची कीर्ती परिसरात गाजू लागली. 

भर्माणीच्या डोंगरावरून भारमोर गावाचे रुपडे अगदी देखणे दिसत होते. काही गावकरी देवळाजवळ होते त्यांना विचारले, ‘भर मे महिन्यात इतकी थंडी; मग डिसेंबर ते फेब्रुवारीमध्ये इथे काय असेल?’ यावर एक म्हातारा गावकरी म्हणाला, ‘इथे गड्डी जातीचे लोक मेंढ्या घेऊन डिसेंबरलाच खालच्या गावात म्हणजे विलासपूर, मंडी इथे जातात.’ दूरवर एकमजली घरे दिसत होती. गावकऱ्यांनी आमच्या मनातील विचार ओळखून सांगितले, की ती सारी घरे एकमेकाला लागून आहेत. साऱ्या घरांचे मिळून एक घर ते करतात. बकरे सोलून ठेवतात आणि चार महिने तेच खातात. अर्थात त्यांनी बेगमी केलेली असते. त्यांचे तसे अडत नाही. गावकऱ्यांबरोबर थोडा वेळ घालवून स्वच्छ ताजी हवा छातीत साठवून अतिशय आनंदात आम्ही परतीच्या रस्त्याला लागून खाली उतरू लागलो. यावेळी थोड्या वेगळ्या मार्गाने खाली उतरलो. तेथून भारमोरचा रस्ता सरळ असला, तरी लांब होता. परंतु, आमच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे वाटेत ग्लेशियर होते. ते आम्हाला पाहायचेच होते! बर्फाने लगडलेल्या ग्लेशियरच्या आत तर सर्वांना जायचे होते. परंतु, आत गेल्यागेल्याच एका क्षणात दातावर दात आपटू लागले. सगळेजण पटकन बाहेर आले. काही हौशींना ग्लेशियरच्या आत असल्याचे फोटो घ्यायचे होते. म्हणून सारे मला, ‘लवकर फोटो घे’ म्हणू लागले. निसर्गाची किमया किती अगाध असते नाही! बाहेरून ग्लेशियर थंड, शांत असते. सर्वांना त्यात जावयाचे असते. पण आत एक सेकंदसुद्धा राहता येत नाही, म्हणून लगेच बाहेर यायचे असते. तरीही परत आत ग्लेशियरमध्ये जायचे असते. थोड्या कालावधीत झालेली ती ग्लेशियरजवळची लगबग अजूनही चांगलीच लक्षात आहे. सर्वजण तृप्त झाल्यावर मग काय आम्ही जवळजवळ बागडतच चौरासी मंदिरात आलो. पुन्हा एकवार मंदिर बघून आमच्या राहत्या इमारतीच्या वरच्या अंगाने पलीकडच्या बाजूचे भारमोर पाहण्यासाठी म्हणून, न दमलेले आम्ही काही जण निघालो. 

एव्हाना संध्याकाळ होऊ लागली होती. काय मजा पाहा. सकाळी तेजतर्रार दिसणारी हिरवाई वातावरण प्रसन्न करीत होती. तर संध्याकाळी हिरवे-करडे रंग लेवून तीच हिरवाई निसटत्या संधिप्रकाशात आब राखून उभी होती. काळ्या पाट्यांची उतरती छपरे, सर्व प्रकाश पोटात साठवून उजळून निघत होती. अतिशय विलोभनीय दृश्‍य होते ते! अशा कातरवेळी जमलेल्या साऱ्यांनी पुन्हा एकदा भारमोरला यायचे नक्की केले. 

मणिमहेश ट्रेक केल्यावर आम्ही पुन्हा एकदा भारमोरला आलो. ओळखीचे भारमोर आणखी एक दिवस पाहिले. अनुभवले आणि अखेर अफाट उकाड्याच्या दिशेने आमचा प्रवास पुन्हा एकदा सुरू झाला. पठाणकोटला दुपारच्या काहिलीत काढलेला अर्धा दिवस, महाकंटाळवाणा परतीचा प्रवास, मनमाडहून गाडी करून गाठलेले कसारा आणि कसाऱ्याहून ट्रेनने गाठलेली मुंबई. या सर्व प्रवासातल्या घामाच्या चिकचिकाटात भारमोरची हळुवार आठवण, तेथील रौद्रभीषण निसर्गसौंदर्यासह येत राहिली. मित्रामित्रांत पुन्हा एकदा भारमोरला भेट द्यायचे ठरवून आम्ही शहराच्या धबडग्यात सामील झालो.

कसे जाल? 

  • पुण्याहून झेलम एक्‍सप्रेसने पठाणकोट. पठाणकोटवरून डलहौसी, चंबा करीत भारमोर गाठता येईल. 
  • मुंबईकरांना जम्मूतावी एक्‍स्प्रेसने चक्कीबॅंक या पठाणकोटच्या थोडेसेच पुढे थांबणाऱ्या जलद गाडीने जाता येईल. 
  • अतिजलद जायचे असल्यास अर्थातच पुण्या-मुंबईहून विमानाने जाता येईल. अमृतसरवरून बस अथवा टॅक्‍सीने थेट भारमोर गाठता येईल. 
  • एकंदरीत, बर्फाची अपूर्व मजा लुटायची असेल, तर एप्रिल-मे महिना आदर्श आहे. 
  • भाविकांना मणिमहेशाची वारी करायची असेल, तर सप्टेंबर महिना आदर्श आहे. 

कुठे राहाल? 
ट्रेकर्स मंडळींना भारतीय गिर्यारोहण संस्थेच्या वास्तूत राहण्यास मिळाले तर फारच छान. नाहीतर आता बरीचशी हॉटेल्स भारमोरमध्ये निवासासाठी उपलब्ध आहेत. केवळ फिरायला जाणाऱ्यांनी चंबा येथील इरावती हॉटेलमध्ये मुक्काम करून चंबा येथून टॅक्‍सी करून एका दिवसात भारमोरला जाऊन येणे सहज शक्‍य आहे. 

काय खाल? 
भारमोर येथे मिळणारी, खास भारमोरी मुद्रा 
असलेली ‘मद्रा’ ही राजम्याची दह्यातील उसळ जरूर खायला हवी! भारमोरवरून १५ किलोमीटरवरचे हडसर हे ठिकाणही भेट देण्याजोगे आहे. येथील टपरीवर मिळणारे ऑम्लेट, आठवड्याच्या ट्रेकनंतर परतणाऱ्या ट्रेकर्सच्या विशेष आवडीचे आहे. हडसर येथील टपरीसमोरील पर्वतावर बुलमई गाव पाहताना तेथील लोक कसे जगतात? कसे व्यवहार करतात? कसे जातात-येतात? याचे आश्‍चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. 

काय पाहाल? 
भारमोर गाव, टेरेस फार्मिंग, ग्लेशियर्स, चौरासी 
मंदिर, भर्माणी मंदिर, भारमोर येथील वैशिष्ट्यपूर्ण 
घरे, चौरासी मंदिरातील ब्राँझमधील नंदीचा पुतळा 
आणि मंदिरावरील पहाडी शैलीतील अनोखे 
कोरीवकाम.

पर्यटनस्थळादरम्यानचे अंतर  
     पठाणकोट-भारमोर = १८० किमी. 
     अमृतसर-भारमोर = ३०० किमी. 
     अमृतसर-डलहौसी = २०२ किमी. 
     पठाणकोट-चंबा = १३० किमी. 
     चंबा-भारमोर = ६१ किमी. 
     डलहौसी-खजियार = २७ किमी. 
     खजियार-चंबा = २२ किमी. 
     भारमोर-हडसर = १६ किमी. 
     पठाणकोट-डलहौसी = ८० किमी. 

गावांची उंची (मीटरमध्ये) 
     चंबा - ९९६ 
     खजियार - १८५१ 
     डलहौसी - २०३६ 
     मनाली - २०५० 
     भारमोर - २१९५ 
     मणिमहेश ४१७०
 

संबंधित बातम्या