कालाटोपची चित्तरकथा 

उदय ठाकूरदेसाई
सोमवार, 6 मे 2019

आडवळणावर...
 

एखाद्या रंजक चित्रपटाची पटकथा वाटावी तशी चित्तरकथा आम्ही कालाटोपट्रेकच्या निमित्ताने अनुभवली! साहस, सुंदर पर्यटनस्थळे, थरार, अपघात, विनोद असे सारे काही अगदी जुळून आले आणि त्यामुळे आमच्या ट्रेकच्या काळातील आनंदाचा आलेख हा सतत उंचावत राहिला. सतत फिरत असणाऱ्या आम्हा मित्रमंडळींची ट्रेकच्या नियोजनाच्या बाबतीत मजा असायची. जानेवारी-फेब्रुवारीमधील थंडीतले ट्रेक सह्याद्रीत करताना, मे महिन्यातील हिमालयातील ट्रेक्‍स ठरायचे. हिमालयातील ट्रेक्‍समधे सह्याद्रीतील पावसाचे ट्रेक्‍स ठरायचे. 

पावसात नाताळ ते नववर्ष या दरम्यानचा हमखास रंगणारा प्रमुख ट्रेक ठरायचा. त्याशिवाय इतर ट्रेक्‍सच्या सोबतीने मित्रमैत्रिणींबरोबर भारतभेटीच्या सहलीचीदेखील गर्दी असायची. माझ्यापुरते म्हणाल, तर या सर्व कार्यक्रमांना जोडून बॅंकेतल्या भारतभरच्या सहकाऱ्यांबरोबर ट्रेक्‍सना जाण्याचे अधिकचे कार्यक्रम असायचे. त्यामुळे शनिवार-रविवार घरी निवांत राहिलोय असे सहसा व्हायचे नाही. इतक्‍या सर्व कार्यक्रमांत एकदा ऐन बर्फाच्या मोसमातील कालाटोप-खजियार-चंबा हा ट्रेक करायचा असे ठरले. मन त्या दिशेने ओढ घेऊ लागले. तीन मित्रांबरोबर जाण्याचा कार्यक्रम ठरल्यावर, यावेळी ट्रेकनंतर आपण भारमोर आणि पंजाब पाहूया असे मित्रांना सांगितले. या कालाटोप ट्रेकपासूनच, ट्रेक संपल्यावर त्याबाजूचा परिसर फिरायची सवय लागली! नवीन वर्षाची पहिली तारीख ट्रेक सुरू करण्यासाठी निवडली आणि सुपरफास्ट ‘स्वराज एक्‍सप्रेस’ने सुभाष, हिरेश, राजन आणि मी असे चौघेजण मुंबईहून निघून चक्कीबॅंक स्टेशनवर उतरलो. 

चक्कीबॅंकहून गाडी करून डलहौसीला जाताना वाटेत आमच्या गाडीचा चक्रधर म्हणाला, ‘यावेळी डिसेंबरमध्येदेखील बर्फ नाही. त्यामुळे पर्यटकांना सोडा; आम्हालाच मजा येत नाही!’ आम्हा सर्वांच्या मनात आले, हमखास बर्फ बघायला मिळणार म्हणून मारे आम्ही डिसेंबरच्या शेवटाला डलहौसीसारख्या ठिकाणी आलो; आता इथेसुद्धा बर्फ नाही म्हणजे कठीण आहे! खरे सांगायचे तर मनाची चक्क समजूत घालून बर्फ पाहायला नाही मिळाले, तरी नाराज व्हायचे नाही असे ठरवून आम्ही युथ होस्टेलच्या कॅंपवर पोचलो. संध्याकाळची वेळ होती. कॅंपमध्ये एक मजेदार दृश्‍य पाहायला मिळाले. आम्ही राहत असलेल्या खोलीच्या बरोबर समोरच्या खोलीत ४ - ५ जण एका प्रचंड देहाच्या ट्रेकरला मालिश करीत होते. तो ट्रेकर ओय ओय करून ओरडत होता. (सरावाचा पहिल्याच दिवशीचा ट्रेक करून त्याची ती अवस्था झाली होती हे आम्हाला नंतर समजले.) आम्हा सर्वांची हसून हसून मुरकुंडी वळली. त्यानंतर आमच्या तुकडीतल्या इतर मंडळींची ओळख-पाळख होऊन जेवणे झाल्यावर आपापल्या स्लिपिंग बॅग्समध्ये आम्ही गुडूप झालो. दुसऱ्या दिवशी आमच्या ग्रुपमधील मंडळींचा पंजपुला येथे सरावाला जायचा दिवस होता. तेथे साऱ्यांनी मिळून माझी लीडर म्हणून, तर हिरेशची सहाय्यक लीडर म्हणून निवड केल्यावर आनंद होण्याऐवजी सर्वांना सांभाळण्याचे दडपण मात्र आले! डलहौसीवरून पंजपुला येथे ६ किलोमीटरचा ट्रेक करून सतधारा धबधबा वगैरे करून रमतगमत कॅंपवर पोचलो. 

दुसऱ्या दिवशी म्हणजे ३१ डिसेंबरला सकाळी सकाळी कालाटोपट्रेकसाठी बाहेर पडलो. ओमप्रकाश आणि अश्‍विनीकुमार या दोन होमगार्डसच्या मधोमध आमची मंडळी ठेवत आमचा ट्रेक सुरू झाला. ३ किलोमीटरवरच्या लकडमंडी या छोटेखानी गावाच्या ठिकाणी आम्हा सर्वांची जेवणे झाली. इथपर्यंत सारे काही नेहमीचे असल्यासारखे चालले होते. जेवणे उरकल्यावर आम्ही सूचिपर्णी वृक्षांच्या गर्द जंगलात घुसलो आणि ट्रेक सुरू असताना खिडक्‍या लावून घेतल्यासारखी शांतता अनुभवायला मिळाली. आश्‍चर्य प्रकट करणार तोच चक्की चालू झाल्यावर येतो तसा बारीक घरघर घरघर आवाज सुरू झाला. आकाशातून चक्क बर्फ पडू लागले. सगळे ट्रेकर्स बेभान झाले. जंगलात आवाज करू नये हे भान कुणालाच राहिले नाही. कुणी जीभा बाहेर काढून ‘ओरिजिनल बर्फ’ चाखू लागले. कुणी शर्टावरचा, विंडचीटरवरचा बर्फ झटकतोय अशा अविर्भावातले फोटो काढू लागले. नशीब! लवकरच साऱ्यांना समजले, की आपण चालत आहोत ती अतिशय अरुंद पायवाट आता ओली होऊन निसरडी झाली आहे. तेवढ्यात पाठी धपाक असा कोणीतरी पडल्याचा आवाज आलाच! गंभीर होण्याऐवजी आम्ही मोठ्या हास्यकल्लोळात लवकरच कालाटोपला पोचलो. कालाटोपच्या जंगलातील डाकबंगला हा राहण्यासाठी अगदीच आदर्श म्हणावा असा आहे. डलहौसीसारख्या आल्हाददायी वातावरणातून, दाट जंगलात घुसून, बर्फाचा अनुभव घेऊन स्वप्ननगरीत वास्तव्य करायला कोणाला आवडणार नाही? फारच दृष्ट लागण्यासारखी जागा आहे ती! मला तर तुम्हाला असे सांगावेसे वाटते, की निदान या एका अनुभवासाठी तरी हा ट्रेक तुम्ही साऱ्यांनी करायला हवा. दुसऱ्या दिवशी १ जानेवारीचा नवीन वर्षाचा ट्रेक कालाटोप ते खजियार असा चांगला १७ किलोमीटरचा होता. टेरेस फार्मिंग, खोल-खोल दऱ्या, अरुंद परंतु चालायला सोपी अशी पायवाट, स्नेह्यांची साथ हे सारे अनुभवत असताना परत जोरदार बर्फवृष्टी व्हायला सुरुवात झाली. प्रवास अगदी स्वर्गीय होऊन गेला. त्यातच खजियार बेस कॅंपला चहा-पकोडा (भजी) असा बेत आहे हे कळल्यावर जलद चालता चालता सारेजण बर्फवृष्टी अनुभवू लागले. भर जंगलात झाडांमधून दूरवर दिसणाऱ्या घरांची चित्रे आता सत्यातली न राहता कल्पनेतली वाटायला लागली. ‘याहून चांगला प्रवास तो कोणता?’ असा प्रश्‍न विचारण्याइतपत साऱ्यांची मजल गेली. आम्ही खजियार बेसकॅंपजवळ आलो आणि समोरचे दृश्‍य पाहून आनंदून गेलो. खजियरमध्येसुद्धा त्यावेळी बर्फ पडत असल्याने तेथील जवळच्या हॉटेलात असलेले पर्यटक बेभान होऊन नाचत जल्लोष करीत होते. त्यांच्यात आमचे ट्रेकर्सदेखील सामील झाले. हिरेशनेदेखील बेभान नाचून बहार आणली. 

खजियार ते साच ते चंबा असा अखेरच्या दिवसाचा ट्रेकसुद्धा बहारदार झाला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दोन दिवसानंतर प्रथमच सूर्यप्रकाश अनुभवायला मिळाल्याने साऱ्या जणांनी फोटो काढायची हौस भागवून घेतली. डलहौसीवरून कालाटोपला जाताना आपण २००० फूट वर चढतो. खजियारला येताना २००० फूट आपण उतरतो. खजियारहून साच गावी येताना आपण आणखी खाली उतरतो. ‘साच’ या सुंदर हिमाचल गावात आमचा लंच ब्रेक होता. तेवढ्यात पाहिले, तर १०० वर्षे वयाच्या एक आजीबाई नटून थटून लग्नाला चालल्या होत्या. त्यांच्याशी गप्पा मारून, अर्थातच त्यांचा फोटो काढून, आजीबाईंच्या जीवन जगण्याच्या ऊर्जेचे मनापासून कौतुक करून, आम्ही जवळच्या टपरीवर ऑम्लेट खाऊन चंबाच्या वाटेला लागलो. वाटेत सुंदर निसर्गचित्रे मिळाली. वाटेत खूप गावेदेखील लागली. आसपासच्या दऱ्याखोऱ्यांतसुद्धा खूप गावे दिसली. तेवढ्यात एक शाळकरी मुलगा दोन हातात दोन फुलांचे गुच्छ घेऊन चालला होता. त्याला विचारले, ‘या फुलांचे नाव काय?’ तर म्हणाला, ‘या फुलांचे नाव नरकू आहे. यांचा वास खूप छान आहे. ही फुले चांगली २ - ३ महिने टिकतात.’ हळूहळू आमच्या लक्षात आले, की आता ट्रेक संपत आलाय. आम्हा चौघा मित्रांना डलहौसीला परतण्याऐवजी भारमोरला जायचे होते. ते लक्षात ठेवून आम्ही चंबा येथील लक्ष्मीनारायणाचे मंदिर बघून शहराच्या मुख्य टॅक्‍सी स्टॅंडच्या पाठी असलेल्या पोस्ट ऑफिसच्या बाजूच्या एका इमारतीत विसावलो. 

ट्रेक संपला होता. सर्वजण मजेत होते. नेमक्‍या त्याचवेळी मी समोरच असलेल्या टॅक्‍सी स्टॅंडवर दुसऱ्या दिवसासाठी टॅक्‍सी ठरवली. सकाळी बरोब्बर ६ वाजता निघण्याचे चक्रधराला सांगितले आणि आमच्या सहकारी मंडळींत येऊन छान, सोप्या धमाल ट्रेकबद्दल बोलत बसलो. दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता सारे ट्रेकर्स साखरझोपेत असताना आम्ही चौघे मित्र भारमोरला जाण्यासाठी टॅक्‍सीस्टॅंडवर आलो. चक्रधर तयार होताच. आम्ही निघालो. वेळेवर निघण्यासारखी दुसरी गंमत नाही! चंबापर्यंत मनोहारी निसर्ग साद घालतो. चंबाच्यापुढे मात्र तो निसर्ग रौद्रभीषण रूप घेतो. घुमक्कडांना आवडणाराच हा प्रवास! एव्हाना संदर्भ बदलत जातात. कडेकपारी उंच होत, दऱ्या खोल होत जातात. एक वळण तर एवढे जीवघेणे होते, की तेथे आम्ही साऱ्यांनी गाडीतून उतरून आमचाच एक फोटो चक्रधराकडून काढून घेतला. या थरारक रस्त्याची आठवण म्हणून! गाडीत राजन आणि हिरेश दोघेही म्हणू लागले, ‘उदय, तू भारमोरबद्दल फार हात राखून सांगितलेस आम्हाला! प्रत्यक्ष निसर्ग वर्णनातीत आहे..’ आम्ही सारे खुशीत असताना चक्रधर म्हणाला, ‘राख गाव आले. इथे ‘मद्रा’ छान मिळते (राजम्याची दह्यातील उसळ). पराठ्याबरोबर खाणार काय?’ आम्हाला भूक तर लागलेलीच होती. साऱ्यांनी खुशीने पराठा-मद्रा आणि पहाडी लोणचे अशी खाबुगिरी केली. तृप्तीचा ढेकर देऊन भारमोरला निघालो. भारमोर गाव, चौरासी मंदिर, टेरेस फार्मिंग, उतरत्या छपरांची घरे हे सारे पाहून हडसरच्या वाटेला लागलो. वाटेवरील ग्लेशियर पाहून, हडसरला टपरीसमोरच्या अफाट पहाडातील बुलमई गावाचे एकंदर चित्र पाहून पुन्हा एकवार अचंबित झालो. सारे तपशीलवार पाहून चंबाला परतलो. चंबाला दुसरी गाडी ठरवून डलहौसीला हॉटेल मणिमहेशमध्ये थांबलो आणि दुसऱ्या दिवशी अमृतसरला जायला निघालो. 

आम्हा चौघांना सॅकसह घेऊन जाणारी मारुती ओम्नी जशी १०० किलोमीटरचा आकडा पार करून पळू लागली, तसे आम्ही खुशीत आलो. त्याचवेळी गाडीचे पुढचे चाक गाडीपासून अलग होऊन, गाडीच्या पुढे दुप्पट वेगाने आमच्या समोरून पळू लागले. क्षणार्धात गाडीतले वातावरण बदलले. चारचाकी गाडीचे एक चाक निखळून पडल्याने तिरप्या झालेल्या गाडीचा वेग चक्रधर आटोक्‍यात आणेपर्यंत घाबरण्याऐवजी हास्यकल्लोळात बुडालेल्या आम्हाला पाहून तो पंजाबी चक्रधरसुद्धा पागल झाला. यथावकाश गाडीला दुसरे चाक बसवून आम्ही अमृतसरला जाऊन पोचलो. अमृतसरला, वारंवार ट्रेक करण्याच्या निमित्ताने परिचित झालेल्या हॉटेलात उतरलो. तेथून वाघा बॉर्डर, सुवर्णमंदिर आणि जालियनवाला बाग बघून पंजाब मेलने मुंबईला परतलो.

ट्रेक जरूर करावा 
चांगल्यापैकी आणि सोपा असलेला हा थंडीच्या दिवसातला ट्रेक तुम्ही आवर्जून करायला हवा. युथ होस्टेलसारखी दर्जेदार संस्था हा ट्रेक आयोजित करीत असल्याने मनात किंतु-परंतु न आणता तुम्ही सहभागी होऊ शकता. थोडी अधिक ऊर्जा असलेल्यांनी, घुमक्कडांनी चंबा येथे ट्रेक संपल्यावर गाडी करून जरूर भारमोर - हडसरला जाऊन यावे. आम्ही पाहिला तसा पंजाब प्रांतदेखील तुम्ही याच ट्रेकला जोडून पाहण्याचा कार्यक्रम आखू शकता. 

कसे जाल? 

  • मुंबईहून सुपरफास्ट स्वराज एक्‍सप्रेसने चक्कीबॅंक. चक्कीबॅंकहून डलहौसी. पुण्याहून मंदगती झेलम एक्‍स्प्रेसने पठाणकोट. पठाणकोटहून डलहौसी. 
  • जलद जाऊ-येऊ इच्छिणाऱ्यांसाठी अर्थातच अमृतसर विमानतळ सोयीचा आहे. 

कुठे राहाल? 
युथ होस्टेलच्या कॅंपजवळचे हॉटेल मणिमहेश हे ट्रेकर्ससाठी चांगले आणि मस्त हॉटेल आहे. डलहौसीशेजारच्या बनिखेत नावाच्या गावातसुद्धा छानसे घर स्वस्तात भाड्याने मिळू शकते. 

काय पाहाल? 

  • थोडी चाल चालणार असेल तर या ट्रेकला येऊन डलहौसी, खजियार, चंबा हे पाहता येण्यासारखे आहे. नव्हे, अवश्‍य अनुभवण्याजोगे आहे. 
  • निसर्गरम्य डलहौसी, भारताचे स्वित्झर्लंड म्हणून ख्यातनाम झालेले खजियार आणि परदेशातील अप्रतिम छोट्या गावांची आठवण येण्याजोगी चंबा येथील अनेक पर्यटनस्थळे तुम्ही अनुभवू शकता.

संबंधित बातम्या