सुरू व्हॅलीचे सौंदर्य  

उदय ठाकूरदेसाई
सोमवार, 20 मे 2019

आडवळणावर...
 

लेखाला सुरुवात करण्यापूर्वी, लेखाशी संबंधित दोन-तीन गोष्टींचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. पहिली गोष्ट म्हणजे, यथावकाश मी शेअरबाजारातील गुंतवणुकीकडे आकर्षित झालो असताना, सहज गप्पांच्या ओघात बोलताना मित्र मला म्हणाला, ‘नुसती गुंतवणूक करू नकोस. गुंतवणुकीतील नफ्याच्या जोरावर फिर. तुझ्या देश-परदेश दौऱ्याचे पैसे शेअरबाजारातील गुंतवणुकीतूनच काढीत जा.’ मित्राने सहज म्हणून सांगितले. पण मी ते कसे कुणास ठाऊक फारच गांभीर्याने घेतले. अंमलात आणले आणि आज अनेक वर्षांनी मला तुम्हालादेखील सांगायला आवडेल, की जे घुमक्कड वारंवार देश-परदेश फिरत असतात, त्यांनी सक्रिय गुंतवणुकीतील फायद्याच्या जोरावरच फिरण्याचा प्रयत्न करावा. एक तर नियोजित गुंतवणुकीच्या नफ्यातून चांगले पैसे मिळत असल्याने प्रत्यक्ष दौऱ्यात पैशांच्या कमी-जास्त वापराबद्दल चिंता राहात नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्यामुळे साहजिकच निवांत मोकळेपणाने छान फिरणे होते. महत्त्वाची गोष्ट अर्थातच नियोजनाची! आम्ही नारळीपौर्णिमेच्या रात्री पेंगाँग लेकला असू, या मुख्य गोष्टीभोवती लेह-लडाख दौऱ्याचा कार्यक्रम आखला. तुम्हीसुद्धा एखाद्या दौऱ्याचे खास नियोजन केलेत, तर तुम्हाला नक्कीच जास्त आनंद लुटता येईल. तिसरी महत्त्वाची गोष्ट अर्थातच आडवळणावरच्या प्रवासाची! 

आडवळणावरचा प्रवास अनुभवण्यासाठी, वेळेवर निघणारे, केवळ खाण्यात लक्ष नसणारे, कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेणारे आणि सर्वांत मुख्य म्हणजे आडवळणावर काहीही बघायला मिळाले नाही तरीही नाखूष न होणारे असे मैत्र (सहप्रवासी) मिळाले, की तुमच्या प्रवासाला चार चांद लागलेच म्हणून समजा! 

‘गारकोन’हून कारगिलला परतल्यावर, संध्याकाळचा चहा पीत असताना नागवेकर म्हणाले, ‘उद्या आपण सुरू व्हॅली बघायला जाऊ. 

छानच आहे सुरू व्हॅली! तुम्हा सर्वांना पाहायला आवडेल. फक्त या ठिकाणीसुद्धा वाटेत हॉटेल्स नसल्याने सर्वांनी थोडे थोडे खायला बरोबर घेऊया.’ आता नेहमीची पंचाईत सुरू झाली. सुरू व्हॅली म्हणजे काय? ते माहीत नसल्यामुळे उद्या काय बघायचे आहे किंवा काय पाहायला मिळणार आहे, हे नीटसे लक्षात येत नव्हते. असून असून द्रास, कारगिल आणि गारकोनपेक्षा काय वेगळे असे सृष्टिसौंदर्य पाहायला मिळणार आहे? असे आम्ही आपसांत बोलत होतो. आम्ही साऱ्यांनी एकच तर्क बांधला होता, की वाटेत हॉटेल्स नाहीत म्हणजे पुन्हा निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण असावी. असा विचार करतच पुन्हा एकदा सुरू नदीचा कानावर येणारा मंद खळखळाट आणि निळे आकाश उजळवणाऱ्या अब्जावधी चांदण्या यांची मूक अनुभूती घेऊन आम्ही झोपी गेलो. 

सरावाने एकदम पहाटेच उठलो. बर्फीले डोंगर सोनेरी करून टाकण्याऱ्या सूर्याच्या पहिल्या सोनेरी किरणांची आम्ही सारे वाट पाहात उभे होतो. निसर्गाची ती अगाध लीला कॅमेराबंद करण्यात यशस्वी झाल्यावर, आंबोळीसारखी किशमि रोटी आणि दही टोमॅटो आणि मिरची यांची महाअप्रतिम चटणी प्रामुख्याने खाऊन, इतर नाश्‍ता करून, चहा पिऊन आम्ही सुरू व्हॅलीला जाण्यासाठी निघालो. गाडीच्या चक्रधराला फोटोंसाठी वारंवार थांबण्याची विनंती करून गाडीत बसलो आणि आम्ही सुरू व्हॅलीच्या वाटेला लागलो. 

कारगिल सोडल्या सोडल्या गाडीत आमच्या गप्पा सुरू झाल्या. काही वेळाने नागवेकरांनी एका औद्योगिक प्रकल्पाकडे बोट दाखवून ‘तो पाहा हिंदुस्थान कन्स्ट्रक्‍शन कंपनीचा सुरू नदीवरचा हायड्रो-इलेक्‍ट्रिक प्रोजेक्‍ट’ असे सांगितल्यावर, नामसाधर्म्याच्या इतर शेअर मार्केटमधील कंपन्यांवर गाडी घसरणार; एवढ्यात कुणीतरी ‘शेअर मार्केट हा विषय दौऱ्यात काढायचा नाही असे आपले ठरले आहे ना?’ याची आठवण करून देत विषय बदलला. थोड्या वेळाने ‘ट्रेस्पॉन’ गाव आले. नागवेकर म्हणाले, ‘इथून खूप दूरवर आतमध्ये, गावात, एक मशीद आहे. ती मुसलमान, बौद्ध आणि तुर्क लोकांनी बांधलेली आहे. मशिदीत लाकडांवर बुद्धिस्ट कारागिरांचे कोरीवकाम आहे. घुमट इराणी शैलीतला आहे. त्यामुळे या मशिदीत कोणीही नमाज पढत नाहीत.’ आम्हा साऱ्यांनाच या गोष्टीचा अचंबा वाटला. त्यानंतर काही वेळाने आम्ही संकू गावात पोचलो. चक्रधर चहा पिण्यासाठी थांबला. बाहेर डोकावून पहिले, तर समोरच्या घराच्या खिडकीतून बरीच लहान मुले आम्हाला पाहात होती. कौतुकभरल्या डोळ्यांनी आम्हाला बघणाऱ्या त्या चिमुकल्यांचे फोटो घेतले आणि आम्ही संकू गावाच्या थोडे पुढे आलो एव्हाना गावाच्या खाणाखुणा पुसट होऊ लागल्या. सुरू नदी आमच्याशी लपंडाव खेळू लागली. वालुकामय भासणारे डोंगर दिसू लागले. त्यावर नावाला मोजकी रांगोळी काढावी तशी नाजूक वेलबुट्टीची हिरवळ दिसू लागली. एकेक अफलातून निसर्गचित्रे समोर दिसू लागली... 

खरी मजा तर पुढच्या प्रवासात आली. वळणावळणाच्या प्रवासात गाडीने एक वळण घेतले तर समोरचा दिसणारा अगाध निसर्ग चांगला, की त्यापुढच्या वळणावर दिसणारे निसर्गचित्र छान ते कळेनासे झाले. थोडे पुढे जाऊन बोलायचे झाले, तर सुरू व्हॅलीत फिरताना तुम्हाला कळेल की निसर्गसौंदर्य म्हणजे काय? सुंदर नागमोडी वळणाचा रस्ता, त्या रस्त्याच्या पल्याड कापून ठेवलेली भातशेती, खोल दरीतील नीटस घरे, दूरवर दिसणारा सुरू नदीवरील पूल, पुलापलीकडील गावात आपले वैशिष्ट्य राखून असलेली मशीद, या परिसरातील वेगळ्या देहबोलीचे चेहरे, क्षणाक्षणाला रंग बदलून फोटोग्राफर्सना वेगळ्या चौकटी देणारी बर्फाच्छादित शिखरे.. एक ना दोन... तुम्ही विचारसुद्धा करू शकणार नाही असा नजराणा निसर्ग तुम्हाला देऊ करतो. बरे, बदलत्या वातावरणामुळे एकाने काढले त्यापेक्षा वेगळेच फोटो दुसऱ्या फोटोग्राफरला मिळायची सोय असल्याने निव्वळ आणि निखळ आनंदाशिवाय या प्रवासात दुसरे काहीच मिळत नाही. तुम्हाला निसर्गच आवडत नसला, तर मात्र कठीण आहे! 

पणिखार येथे आल्यावर बर्फाच्छादित शिखरे दिसू लागली आणि साऱ्यांचाच आनंद गाडीत मावेनासा झाला. गाडी थांबवून, बाहेरील थंडावा अनुभवून, मनमुराद फोटो काढून आम्ही तरंगोझ-तोंगुलच्या वाटेला लागलो. 

अशाच एका वळणावरून पुढे गेलो असता उजव्या हाताच्या खोल दरीत ४-५ मुली आम्हाला ‘टाटा’ करीत होत्या. आम्ही गाडी थांबवल्यावर त्या चक्क जीवघेणा चढ लीलया चढत धापा टाकीत आमच्यासमोर उभ्या राहिल्या. आम्हा साऱ्यांना इतका अचंबा वाटला की काही विचारू नका. त्या मुलींना भरपूर खाऊ देऊन, त्यांचे फोटो काढूनसुद्धा त्यांचे आणखीन कौतुक करायला हवे होते असे साऱ्यांनाच वाटले. 

आम्ही गाडीत बसल्यावर थोडे पुढे जातो न जातो तोच समोर नून-कून शिखरे दिसू लागली. क्षणोक्षणी बदलणाऱ्या वातावरणात वेगवेगळी चित्रे मिळणाऱ्या लेह-लडाखची मोहिनी आम्हा साऱ्यांवर पडली. सारेजण समोरच्या नजाऱ्याचे झपाटल्यासारखे फोटो काढू लागले. 

आम्ही निसर्गचित्रात असे हरवून जात असताना नागवेकर म्हणाले, ‘उजवीकडे दिसते ते कून शिखर. ते साधारण ७०८७ मीटर आहे. तर डावीकडे दिसते ते बर्फाळ पठाराने भरलेले नून शिखर. ते ७१३५ मीटर आहे. एकुणात बघायचे, तर नून-कून ही शिखरे २२७३८ फुटांवर आहेत.’ एव्हाना आम्ही सुरू व्हॅलीच्या टोकावर ‘परकाचिक ग्लेशियर’जवळ आलो. नागवेकर म्हणाले, ‘या परिसरात एकूण ३ ग्लेशियर्स आहेत. समोर दिसते ते पराकाचिक ग्लेशियर, तोंगुलजवळील तोंगुलुला ग्लेशियर आणि रंगदूमजवळील प्रसिद्ध सपत ग्लेशियर. आणखी एक प्रसिद्ध ग्लेशियर आहे, ते म्हणजे ड्रेंग-ड्रुंग ग्लेशियर. तेथे नावाप्रमाणेच गडगडाट वगैरे होत असतो. ड्रेंग-ड्रुंग ग्लेशियरजवळ बर्फाचे कडे कोसळणे, हिमउत्पात होणे अशा भयानक गोष्टी सातत्याने घडत असतात.’ 

एव्हाना भर दुपारचे दोन वाजले होते. कुणीही बोलत नसले, तरी सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडत होते. आम्ही ‘पुर्तुकचे’ गावाजवळ होतो आणि तेथील हॉटेलवजा दिसणाऱ्या वास्तूत जेवण सांगून आलो होतो. स्वयंपाक बनवणाऱ्या हॉटेलमालकाने ‘केवळ उकडलेला भात आणि उकडलेला बटाटा मिळेल. जमली तर डाळ करेन’ असे सांगितल्याने डाळ-भात-बटाटा मिळेल या आशेने आम्ही पुर्तुकचे गावातल्या हॉटेलात परतलो. जे काही मिळाले ते खाल्ले आणि जेवल्यानंतर सहज म्हणून हॉटेल परिसरात फिरायला बाहेर पडलो. पुर्तुकचे येथील हॉटेलजवळ हॉटेलमालक आणि गावकरी यांच्यात चाललेले संभाषण कानावर आले. वेगळ्या लहेजामुळे, वेगळ्या ढंगामुळे ते चांगलेच लक्षात राहिले. हे तुम्ही कोणत्या बोलीभाषेत बोलता? असे विचारल्यावर हॉटेलमालक म्हणाला, ‘आम्ही दर्द बोलीत बोलतो. या परिसरात दर्द बोली विशेषकरून बोलली जाते. हॉटेल परिसरातल्या छोट्या मुलींना खाऊ देऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. 

गाडीतील बोलणी रंगात येत होती. बाहेर ऊनसावल्यांचा खेळदेखील रंगात येत होता आणि अखेर ज्या क्षणाची आम्ही वाट पाहत होतो तो क्षण आला. संध्याकाळच्या सोनेरी किरणांनी सुरू नदीचे पाणी, डोंगर असा सारा परिसर आपल्या परिसस्पर्शाने सोनेरी करून टाकला होता. गाडीतून बाहेर येऊन आम्ही सारेजण निसर्गाची ती मोहिनी बघत बसलो. सूर्य झपाट्याने अस्ताला गेला. रस्त्यावर काळोख दाटला आणि रात्री साडेसात-आठच्या सुमारास आम्ही कारगिल येथे पोचलो. आम्ही साऱ्यांनी सुरू व्हॅलीचे गुणगान केलेले ऐकल्यावर नागवेकर म्हणाले, ‘सुरू व्हॅली तर छान आहेच. परंतु साफी व्हॅली, हानले आणि पुर्तुकचे हे प्रदेशदेखील मुद्दाम बघण्यासारखे आहेत. पुढे जेव्हा केव्हा आपल्याला जमेल तेव्हा आपण पाहूया.’ 

आम्ही सारे म्हणालो, म्हणजे आता आणखीन एक १५ दिवसांचा लेह-लडाखचा दौरा करायला लागणार तर! 

सुरू व्हॅलीचे सौंदर्य 
कुणीही कितीही वर्णन केले तरी सुरू व्हॅलीचे सौंदर्य बघणे, अनुभवणे, टिपणे आणि नंतर त्याविषयी बोलणे हे सारे स्वप्नातीत आहे. म्हणून तुम्ही सुरू व्हॅलीला जरूर भेट द्या. गारकोनप्रमाणेच सुरू व्हॅली इथेसुद्धा प्रवासी कंपन्या पर्यटकांना नेत नसल्याने, कारगिल येथे 
३-४ दिवस थांबून एक दिवस गारकोन, दुसऱ्या दिवशी सुरू व्हॅली आणि तिसऱ्या दिवशी कारगिल फिरून मगच लेहकडे निघावे अथवा द्रासला यावे. 

कसे जाल? 
कारगिल येथे मुक्काम करून एका पूर्ण दिवसाची सफर करून तुम्हाला सुरू व्हॅलीला जाता येईल. अंतर केवळ १०० किलोमीटर असले तरी त्यात पुरा दिवस जातो. 

काय पाहाल? 
कारगिलजवळची छोटी गावे, सुरू व्हॅली, नून-कून शिखरे, परकाचिक ग्लेशियर आणि वाटेवरचे अफाट निसर्गसौंदर्य. 

कुठे राहाल? 
कारगिलमध्ये तुमच्या बजेटनुसार सोयीच्या हॉटेलमध्ये तुम्हाला राहता येईल. 

विशेष 
अगदी अलीकडे पुर्तुकचे इथे एक बऱ्यापैकी हॉटेल झाल्याचे ऐकतो. तरीसुद्धा तुमच्याकडे दिवसभराचे खाणे-पिणे यांची साठवण असलेली बरी. वाटेत अनेक लहान मुले दिसत असल्याने त्यांना खाऊ, कपडे नेता आले तर फारच छान. या परिसरात प्रवासी कंपन्या गेल्याचे न ऐकल्याने पुन्हा एकदा नागवेकरांचा नंबर देतो आहे.
विवेक नागवेकर - ९८६९६६५५४८.

संबंधित बातम्या