एक रम्य सफर 

उदय ठाकूरदेसाई
सोमवार, 8 जुलै 2019

आडवळणावर...
 

तुम्ही एकदा हिमालयात पाय ठेवलात, की दरवर्षी हिमालय तुम्हाला नित्यनेमाने साद घालतोच! तुम्हीदेखील अगदी जिवलग सख्याच्या हाकेला ‘ओ’ देऊन प्रतिसाद देता. वरील सार्वत्रिक अनुभव मलादेखील आला. सिमला-कुलू-मनालीला भेट देण्याच्या निमित्ताने सुरू झालेली हिमालयाची वारी पुढे लेह-लडाख ते अरुणाचल प्रदेश या ११०० किलोमीटरच्या पट्ट्यात दरवर्षी कशी वृद्धिंगत होत गेली ते काही कळलेच नाही! 
हेमंत-नंदिनी, मी आणि स्वाती असे चौघेजण कोलकता-दार्जिलिंग-सिक्कीमच्या प्रवासाला निघताना स्वातीच्या ऑफिसतर्फे दार्जिलिंगमधील हॉटेल सिंक्‍लेअर हे अप्रतिम हॉटेल, अगोदरच आरक्षित करून ठेवले होते. त्याचप्रमाणे कोलकात्यामधील महाराष्ट्र निवासातदेखील आगाऊ आरक्षण करून ठेवले होते. त्याशिवाय कुठेही बुकिंग न करताच आम्ही प्रवासाला निघालो होतो. कोलकत्याला आम्ही सुपरफास्ट गीतांजली एक्‍सप्रेसने चाललो होतो. त्यावेळेची माझी एक सवय कामी आली. मी रेल्वेच्या वेळापत्रकातून गाडी कोणत्या स्थानकात किती वाजता थांबणार आहे? त्याच्या नोंदी काढून त्या दरवेळी सहप्रवाशांना देत असे. त्यामुळे प्रवासभर कोणते स्थानक आले? किती वाजता आले? गाडी वेळेवर धावते आहे की नाही? आता कोणते स्थानक येणार? कधी येणार? असे प्रश्‍न पडत नसत! कारण उत्तरे माहिती असत!! 

सकाळची ६ वाजताची गीतांजली एक्‍सप्रेस पकडताना घामाघूम झालो खरे; परंतु दुसऱ्या दिवशीच्या दुपारपर्यंत प्रवासातल्या अनेक व्यवधानांत वेळ कसा निघून गेला ते कळले नाही. परंतु कोलकात्यात उतरता क्षणी जो असह्य उकाडा सुरू झाला तो काही केल्या संपेना. तरी नशीब, आम्ही लगेचच दुसऱ्या दिवशी दार्जिलिंगसाठी निघणार होतो आणि दार्जिलिंग - सिक्कीम पाहून परतल्यावर मग पुन्हा कोलकत्यात फिरणार होतो. खरेच सांगतो, नंतर काय व्हायचे तो होवो; परंतु उद्या आधी दार्जिलिंगसाठी निघतोय त्याचा त्यावेळी मनात आनंद झाला होता ते मात्र आजही चांगलेच आठवतेय. दुसऱ्या दिवशी दिवसभर कोलकता दर्शन करून संध्याकाळच्या रेल्वेने निघून दुसऱ्या दिवशी सकाळी न्यू जलपैगुडीला जाऊन पोचलो. त्यावेळी अचानक कार्यक्रमात बदल करून दार्जिलिंगऐवजी सिक्कीमला जाण्याचे ठरवून लगेच टॅक्‍सी करून गंगटोकला (सिक्कीम) जाण्यासाठी निघालो. 

तीन दिवसांच्या प्रवासानंतर, उकाड्यातून, घामातून, काहिलीतून सुटका झाली. आम्ही रॅंगपो हे ठिकाण पार करून, प्रसिद्ध तिस्ता नदीला रंगपो नदी मिळालेली पाहून मग गंगटोकच्या वाटेल लागलो. स्वच्छ साधी घरे, वळणदार नीटस रस्ते, गुलाबी गालांची लहान मुले पाहून आमचे चेहरे बघता बघता हसरे झाले. आमच्या बोलण्यात कांगचेनजंगा हा शब्द आल्यावर टॅक्‍सीचालकदेखील खुशीत येऊन गंगटोक परिसराची माहिती देऊ लागला. गंगटोकमध्ये आल्यावर हॉटेल सोनम डिलेक या बाजारातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हॉटेलांत उतरलो. तेथेच उतरण्याचे मुख्य कारण त्या हॉटेलातील आमच्या रूममधून कांगचेनजंगाच्या शिखरांचे सतत दर्शन व्हायचे हे होते! 

संध्याकाळी रुमटेक मोनॅस्ट्रीला भेट देऊन, वाटेतील स्तूपांना भेट देऊन हॉटेलवर परतण्याच्या वेळी टॅक्‍सीचालकाला छांगु लेकविषयी विचारले असता, त्याने ‘बर्फवृष्टीमुळे छांगु लेकला जाण्याचा मार्ग बंद आहे’ असे सांगितले. नाराज होऊन आम्ही हॉटेलवर परतेपर्यंत त्याच टॅक्‍सीचालकाने, ‘पटकन पैसे द्या. आत्ताच परमीट घेऊन ठेवतो,’ (छांगू लेकला जाण्यासाठी परमीटची आवश्‍यकता असते) असे सांगितले. ‘उद्या सकाळी लवकर तयार राहा. आपण सकाळीच लवकर निघू,’ असे सांगून तो चालक गेला. एव्हाना छांगु लेक प्रकरण मोठे असणार असे आम्हाला वाटून गेले. 

दुसऱ्या दिवशी सकाळी निघतो ते काय! गंगटोक शहराच्या बाहेर बर्फवृष्टी सुरू झाली होती. आमच्या पुढच्या गाडीच्या टायर्सना साखळदंड लावले होते. टॅक्‍सीचालक रस्त्यातील बर्फाचे खडे फोडत, साचलेले बर्फ साफ करीत, आपल्या पाठच्या गाड्यांसाठी रस्ता साफ करून देत होते. इतरही टॅक्‍सीचालक तशाच पद्धतीने टॅक्‍सी चालवून बर्फमुक्त रस्ता करायचा प्रयत्न करीत होते. एक मजेशीर दृश्‍य होते ते! ते बघत, फोटो घेत वेळ कसा निघून गेला ते कळलेच नाही. वाटेत एक फोटोसाठी तर दुसरा चहासाठी ‘थांबा’ घेत आम्ही अवघ्या ४० किलोमीटर अंतरासाठी चक्क अडीच-तीन तास घेत छांगु लेकला जाऊन पोचलो. तेथील रम्य परिसर पाहून, बागडावे.. ओरडावे.. की काय करावे... काहीच कळेना! खूप कमी वर्दळ असल्याने बर्फवृष्टीमुळे ध्यानस्थ झालेला परिसर, सूर्याच्या किरणांबरोबर छाया-प्रकाशाचा खेळ करीत होता. त्यामुळे क्षणाक्षणाला निसर्गाची रूपे बदलताना दिसत होती. अवखळ, ध्यानस्थ, गंभीर, गूढ अशी विविध रूपे पाहून आम्हाला बर्फात चालायचा, धावायचा मोह झालाच! हळूहळू गाड्यांची वर्दळ वाढू लागली. माणसे पटापट उतरून आवाज करू लागली. तसे आम्ही ‘मोमो’ खाऊन बाजूलाच उभ्या असलेल्या ‘याक’ या प्राण्याचे आणि तो ‘याक’ सांभाळणाऱ्या परिवाराचे व्यवहार पाहू लागलो. पर्यटकांवर अवलंबून असणाऱ्या व्यवहारांचे जे रुपडे सर्वत्र दिसते तेच अर्थात तेथेही पाहायला मिळाले. 

छांगू लेकहून परतताना, लष्करातल्या दोन अधिकाऱ्यांनी बर्फाची बनवलेली प्रतिकृती पाहून, थंड प्रदेशात जणू जान फुंकली गेल्याची भावना झाली. आम्ही टॅक्‍सीतून उतरून त्यांची विचारपूस केली. (जवळ नथू ला (पास) असल्याने, चिनी सरहद्द जवळ असल्याने या विभागात लष्करी तळसुद्धा आहे.) कर्नल रोहिणीसिंग यांच्याशी बोलून आम्ही गंगटोकला परतलो. हॉटेलवर परतल्यावर हॉटेल सोनम डिलेकच्या बल्लवाचार्यांना पूर्ण सिक्किमी पद्धतीचे जेवण द्याल का? अशी विचारणा केल्यावर त्यांना झालेला आनंद त्यांनी उत्कृष्ट स्वयंपाक करून त्यातूनच दाखवून दिला. खरे सांगायचे तर जेवण काही फार थोर वगैरे नव्हते; परंतु त्यांनी ज्या निगुतीने ते बनवले आणि आम्हाला वाढले त्यानेच आमचे खरे तर पोट भरले. वर काय काय खाल्ले ते सिक्किमी पदार्थदेखील लिहून दिले. आजही तो तपशील माझ्याजवळ आहे. 

तिसऱ्या दिवशी बोटॅनिकल गार्डन, मठ आणि स्तूप बघून परतताना सतत दिसणाऱ्या, प्रवासात साथ देणाऱ्या, तिस्ता नदीच्या दर्शनात काही काळ घालवला. रॅंगपो येथे रॅंगपो नदी तिस्ता नदीत मिसळताना दिसली. कॉलिंपाँगजवळ रंगीत नदी तिस्ता नदीत मिसळताना दिसली. तिस्ता नदीची साथ अशी रंगीत-संगीत होती. 

गंगटोक शहराचा निरोप घेऊन दार्जिलिंगच्या वाटेवर मिरीक लेक या ठिकाणी शांत रम्य जलाशय आणि कॉलिंपाँग येथे प्रसिद्ध निवडुंगांची नर्सरी बघून दार्जिलिंगला आलिशान हॉटेल सिंक्‍लेअरमधे जाऊन पोचलो. संध्याकाळी लगेच मुख्य बाजारात जाऊन, नवी कोरी गाडी ठरवून, माल रोडला फेरी मारून, दुसऱ्या दिवशी दार्जिलिंग फिरण्यास सज्ज झालो. परंतु हाय रे कर्मा! दार्जिलिंगमधील आमच्या नव्या कोऱ्या गाडीचा चक्रधर, नवी कोरी गाडी इतकी हळुवार चालवीत होता की शेवटी आम्हाला पहिल्या अर्ध्या तासातच कंटाळा आला. त्यापेक्षा जुनी गाडी चालली असती असे म्हणालो आम्ही सगळे! 

अखेर दार्जिलिंगमधील चहाचे मळे, बतासिया लूप, रंगीत व्हॅली पॉइंट, चहाचे मळे पाहिले. हॉटेल सिंक्‍लेअरमध्ये उत्तमोत्तम पदार्थांचा आस्वाद घेतला. दार्जिलिंग वास्तव्यातील अखेरच्या दिवशी अगदी पहाटे अडीच वाजता उठलो. टायगर हिलला जाऊन कांगचेनजंगाची शिखरे आणि सूर्याची कोवळी किरणे यांचा उत्सव बघायला गेलो खरे; परंतु ढगाळ वातावरणामुळे आणि त्यापल्याड लपलेल्या सूर्याने आम्हाला दर्शनाशिवायच माघारी पाठवले. त्यानंतर दार्जिलिंगचा निरोप घेऊन आम्ही न्यू जलपैगुडी येथे कोलकत्याला जाणाऱ्या गाडीत बसलो आणि कोलकत्याला महाराष्ट्र निवासात परतलो. गाडीतल्या प्रवासात सुंदरबनला जायचे नक्की केलेलेच होते. त्यामुळे आम्ही प. बंगालच्या पर्यटन खात्यात जाऊन तेथील अधिकाऱ्यांना आम्हा चौघांसाठी सुंदरबनचा खासगी दौरा आखायची विनंती केली. त्या अधिकाऱ्यांनी ती मान्य केली आणि आम्ही थोडेसे सामान आमच्या बरोबर घेऊन सोनखालीच्या दिशेने प्रवास करू लागलो. सोनखालीवरून सजनीखाल असा बोटीने प्रवास केला. सजनीखाल येथे टेहेळणी बुरुजावरून वाघाचे ओझरते दर्शन घेतले. खरे तर इतक्‍या उकाड्यात सुंदरबनला भेट द्यायची ठरले तेच फार बरे झाले. कारण त्यामुळेच आम्हाला बोटीतून (भटभटीतून) प्रवास करण्याची मजा कळली. वाघांच्या हल्ल्याच्या हकिकती ऐकायला मिळाल्या. खारफुटी, कांदळवन, त्रिभुजप्रदेश, दलदल या एरवी कानावरून जाणाऱ्या शब्दांचा खराखुरा अर्थ समजला आणि बोटीच्या इंजिनात तेल (डिझेल) घालण्याच्या निमित्ताने वाटेतील ‘जेम्सपूर’ या गावालासुद्धा भेट देता आली. 

खरे सांगायचे, तर पूर्वेकडील १५ दिवसांच्या भेटीने आम्हाला इतके भरभरून अनुभव दिले, की कोलकता-दार्जिलिंग-सिक्कीम-सुंदरबन यांच्यावर एक-एक विस्तृत असे लेख लिहिले तरीही ते कमीच वाटेल; इतके सारे या प्रदेशात बघण्यासारखे-सांगण्यासारखे आहे. 

माणिक-रत्नांच्या प्रदेशात 
तिबेटी भाषेत दार्जिलिंग म्हणजे ‘माणिक रत्नांचा प्रदेश’ होय. नामाभिधान सार्थ करणाऱ्या या रम्य भूमीत चहाचे मळे, कांगचेनजंगाची शिखरे, सात हजार फूट उंचावरील पद्मजा नायडू प्राणिसंग्रहालय, दरीतून ढग वर येत असताना एकीकडे गाव, दुसरीकडे अद्‌भुत निसर्ग, तिसरीकडे त्यातून धावणारी टॉय ट्रेन... अशी स्वप्नील दृश्‍ये, १५ फुटी मैत्रेय बुद्धाची मूर्ती, निचिदात्सु फुजी या बुद्ध भिक्‍खूच्या मार्गदर्शनाखाली बांधला गेलेला पीस पॅगोडा, रंगीत व्हॅली, पाइन व्ह्यू नर्सरी अशा कितीतरी गोष्टी दीर्घकाळ स्मरणात राहतात. 
सिक्कीमच्या उत्तरेला तिबेट, दक्षिणेला प. बंगाल, पूर्वेला भूतान, तर पश्‍चिमेला नेपाळ... हे वास्तव अनुभवताना नक्कीच मजा वाटते. सिक्कीममध्ये नेपाळी, सिक्किमी भाषेशिवाय लेपचा भाषादेखील बोलली जाते. 

कसे जाल? 

 • पुण्या/मुंबईहून रेल्वेने कोलकता. तेथून रात्रीच्या गाडीने न्यू जलपैगुडी. तेथून दार्जिलिंग किंवा सिक्कीम किंवा विमानाने कोलकता. 
 • तेथून छोट्या विमानाने बागडोगरा. 
 • तेथून दार्जिलिंग किंवा सिक्कीम. 

कुठे राहाल? 

 • कोलकता : महाराष्ट्र निवास. 
 • गंगटोक : हॉटेल सोनम डिलेक, हॉटेल तिबेट. 
 • दार्जिलिंग : हॉटेल सिंक्‍लेअर किंवा तुमच्या बजेटनुसार अनेक हॉटेल्स उपलब्ध आहेत. 

काय पाहाल? 

 • कोलकता : हावडा ब्रिज, इंडिया म्युझियम, व्हिक्‍टोरिया मेमोरिअल, बिर्ला तारांगण, बेलूर मठ, शांतिनिकेतन, ईडन गार्डन, रवींद्र गॅलरी, विद्यासागर सेतू, बोटॅनिकल गार्डन, शाहीद मिनार, राष्ट्रीय ग्रंथालय. 
 • गंगटोक : रंगपो, विविध मठ आणि स्तूप, बोटॅनिकल गार्डन, रुमटेक मोनॅस्ट्री, छांगु लेक. 
 • दार्जिलिंग : बतासिया लूप, रंगीत व्हॅली, घूम मोनॅस्ट्री, चहाचे मळे, टायगर हिल, बोटॅनिकल गार्डन, पद्मजा प्राणिसंग्रहालय, म्युझियम, ताशी व्ह्यू पॉइंट, हिमालयीन गिर्यारोहण संस्था. 

पर्यटनस्थळादरम्यानचे अंतर - 

 • न्यू जलपैगुडी - गंगटोक = १२२ किलोमीटर. 
 • गंगटोक - कॉलिंपाँग = ७५ किलोमीटर. 
 • कॉलिंपाँग - दार्जिलिंग = ५५ किलोमीटर. 
 • दार्जिलिंग - गंगटोक = ११० किलोमीटर.

विशेष महत्त्वाचे 
तपशीलावरून तुम्ही जाणलेच असेल, की हा दौरा तुमचा तुम्ही आखलात, तर बरेच काही पाहू शकाल. विशेषतः कोलकत्यात गेल्यावर सुंदरबन पाहायला विसरू नका. त्यासाठी प. बंगालच्या पर्यटन महामंडळाला भेट द्या. ते महाराष्ट्र निवासाजवळच आहे. प्रथम कोलकत्यात पूर्ण स्थलदर्शन करून नंतर दार्जिलिंग-सिक्कीम बघून परतताना थेट विमानाने परतल्यास प्रवासाचा शीण टळेल. किमान १५ दिवसांचा कार्यक्रम असल्याने व्यवस्थित तयारी करून निघावे लागेल. बजेटच्या दृष्टीने महाराष्ट्र निवासात अल्पदरात उत्तम सोय होऊ शकते. त्यामुळे दार्जिलिंग-सिक्कीम येथे तुम्हाला चांगला निवास करता येऊ शकेल.

संबंधित बातम्या