देवभूमीतील आडवाटा 

उदय ठाकूरदेसाई
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

आडवळणावर...
 

ऑगस्ट -सप्टेंबर महिना सुरू झाला, की घुमक्कडांचे हिमालयात ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ला जाण्याचे बेत सुरू होतात. काही वर्षांपूर्वी आमचेदेखील तसेच झाले. सहा जणांच्या आमच्या कंपूने ठरवले, की नेहमी सगळेजण जातात त्या राजमार्गावरून न जाता आडवाटेने जायचे. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स ट्रेक करायचा आणि पुन्हा आडवाटेने गढवाल परिसर फिरून परतायचे. गोष्ट बोलायला सोपी वाटत असली, तरी ‘वाट’ सापडत नव्हती. परंतु, अंधारात आशेचा किरण वाट दाखवतो म्हणतात ना, तसा एक आशेचा किरण दिसू लागला... आणि ‘वाट’ सापडली. 

काय झाले! त्यावेळी मी प्रमुख मराठी दैनिकात क्रीडालेखन करीत असे. त्यावेळी हिंदुस्थान टाइम्स, हिंदू, द टेलिग्राफ, पायोनियर अशी चार वृत्तपत्रे रोज घेत असे. त्यातील पायोनियर या दैनिकात दर रविवारी ‘छोटा ब्रेक’ हे सदर येत असे. त्या सदरांत शनिवार-रविवारच्या सुटीत भेट देण्याजोग्या दिल्लीजवळच्या ठिकाणांची माहिती दिलेली असे. मी त्या नित्यनेमाने येणाऱ्या सदरातील आडवळणांवरच्या गावांची कात्रणे माझ्याजवळ जपून ठेवली होती. ती संग्राह्य माहिती आमच्या कामी आली. त्यानंतर आम्ही आजवर न 

ऐकलेल्या काही गावांच्या नावांचा पुकारा करीत आमचा कार्यक्रम आखू लागलो. मुंबईच्या गढवाल मंडल विकास निगम (GMVN) मध्ये आरक्षण करून, एक गाडी दिल्लीहून आरक्षित करून, राजधानीने दिल्लीला पोचलो. स्थानकाबाहेर कुक्कू ऊर्फ गंगाराम चौधरी आमची वाट पाहत उभा होताच. लगेच गाडीत बसून गाझियाबाद, हापूर, मुझफ्फरनगर, रुडकी असा प्रवास करीत खतौलीच्या प्रसिद्ध चितल ग्रँट हॉटेलमध्ये जेवून चिला येथे पोचलो. आज संध्याकाळी मुंबई तर उद्या संध्याकाळी चिला अशा योजलेल्या जलदगती प्रवासाने आपण पहिला टप्पा तर आरामात गाठू शकलो म्हणून सारेजण खुश झाले. आता शहरीपणाची झूल उतरवून निसर्गात मनसोक्त भटकायचे होते. म्हणूनच तर अपरिचित, तोवर न ऐकलेल्या ‘चिला’ म्हणजेच राजाजी नॅशनल पार्क या ठिकाणी आम्ही पोचलो होतो. 

दुपार टळायची होती. थोडेसे खाऊन, एक हलकीशी डुलकी घेऊन, त्यानंतर चहा पिऊन आम्ही चिलाच्या जंगलात म्हणजेच राजाजी नॅशनल पार्कमध्ये फिरायला निघालो. आमच्या विश्रामधामाच्या समोरून एक सरळसोट वाट चालली होती. डावीकडे जंगल होते. पलीकडे नदी होती. निसर्गाची जबरदस्त मोहिनी अशी, की सरळसोट वाटेने आम्हाला फार काळ चालवेना. आम्ही सरळ वाट सोडून, वाट वाकडी करून जंगलात शिरलो... आणि ‘अहाहा.. अहाहा...’ म्हणत पुढे जात राहिलो. वाटेत एक पांथस्थ दिसला. सहज म्हणून त्याला विचारले, ‘इकडे काही त्रास नाही ना फिरायला?’ तर रामसेच्या भयपटात शोभून दिसणाऱ्या त्या पांथस्थाने खर्जातल्या आवाजात, ‘थोडे पुढे घनदाट जंगल आहे. इथे वाघ आहे. साप आहेत. डुक्कर आहे. अस्वलेदेखील आहेत. सांभाळून राहा. नीट परत या...’ असे सांगितल्यावर, तोपर्यंत खिदळत असणारे आम्ही क्षणात गंभीर झालो. पुढे गेल्यावर खरोखरच नदी लागली. नदीकाठी वाढलेल्या गवतांचे तुरे पाहताना मोठा आनंद झाला. एकुणात निसर्गदृश्य म्हणून ते खूप छान दिसत होते. आम्ही नदीकाठी बसलो. पाण्याचा खळखळाट ऐकत राहिलो. शहराबाहेर नदीकाठी एकत्र बसूनही एकांताचाच अनुभव सारेजण घेत होतो जणू! ‘आता निघायचे का?’ असा प्रश्न आमच्यातील कुणीतरी विचारल्यावर सारेचजण भानावर आले आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. येताना म्हणजे जंगलात शिरताना अनेक अस्पष्ट वाटांवरून आत जंगलात शिरलो. परंतु, परतताना वाट मिळेना. तेवढ्यात बाजूच्या गवतात खसखस झाले आणि सगळेच जण न घाबरल्याचा अभिनय करू लागले. अंधार झपाट्याने पडू लागला. मोठ्या मुश्किलीने मुख्य पायवाटेला लागलो आणि दिवेलागणीच्या वेळी कसेबसे विश्रामधामाच्या बंगल्यावर पोचलो. 

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून चिला विद्युत केंद्र आणि बाजूचा परिसर पायी फिरून आलो. नाश्ता-चहा करून पौडीला जाण्यासाठी तयार झालो. चिलाहून पौडी अंतर केवळ १३१ किलोमीटर असले तरी छोट्या, आतल्या, चढ्या रस्त्याने जायला चांगला चार तासांचा वेळ लागतो. याठिकाणी पौडीवरून झालेली गंमत सांगण्यासारखी आहे. पौडीचा उच्चार पौडी असा असला, तरी इंग्रजीतील शब्दाप्रमाणे ‘पावरी’ असा केल्याने आम्हाला उगाचच कृष्णाची पावरी, रम्य वन असलेला प्रदेश असे काय काय वाटू लागले होते आणि मुंबईत मी तर दीर्घकाळ ‘पौडी’ला ‘पावरी’ असेच समजून चाललो होतो. ते डोक्यात असल्यामुळे चक्रधर कुक्कू म्हटले, ‘चालो, पावरी जायेंगे नं?’ कुक्कू म्हणाला, ‘पावरी या पौडी?’ त्याला म्हटले, ‘पौडी हरिद्वारमधे बघितली. आता पावरीला जाऊया.’ तर म्हणाला, ‘पावरी हमें मालूम नही। पौडी मालूम है।’ असे करीत आम्ही अखेर ‘पौडी’ला जायला निघालो. सकाळीच चिला येथील चांगली शुद्ध हवा फुप्फुसात गेल्याने दही-आलूपराठा असा गावरान नाश्ता झाल्यानंतर गंगामैयाचे दर्शन घेत वळणदार रस्ता चढणे कमालीचे आनंददायी वाटत होते. चिला येथून वाहणाऱ्या गंगेला गावकरी प्रेमाने ‘सोना’ नदी असे म्हणतात. वाटेत बूबखल, गुमखल अशी गावे लागली. ओक आणि देवदार झाडांची दाटी वाढू लागली. झाडांच्या आडून हळूच बर्फाच्छादित शिखरे डोकावू लागली. ‘वो देखो चौखंबा।’ एका पर्वतशिखराकडे बोट दाखवून कुक्कू म्हणाला. एका चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी थांबलो असताना, कोटद्वारमार्गे जाऊन कन्व्ह मुनींचा आश्रम बघायचा? की पौडीला जाऊन एक छोटेखानी खांडूसीनचा ट्रेक करायचा? या प्रश्नावर ट्रेक करण्याच्या बाजूने मत पडल्याने पौडीला जायचे ठरले. पौडीच्या गढवाल मंडलमध्ये गेल्यागेल्याच सॅक टाकून, पिट्टू सॅक घेऊन लगेच खांडूसीनचा ट्रेक करायला निघालो. निघायला कंटाळा आला असला किंवा डोळ्यावर उन्हे येत असली, तरी खांडूसीनमधील टेरेसफार्मिंग, झाडांना लगडलेली सफरचंदे आम्हाला एका जागी स्वस्थ बसू देत नव्हती. गढवालमंडळमधीलच एक गाइड घेऊन आम्ही खांडूसीन फिरून आल्यावर मुंबईत ठरवल्याप्रमाणे हिमालयात रोज गाडीने आरामदायी प्रवास; परंतु रोज एक ट्रेक असा कार्यक्रम चालू ठेवण्याचा दुसरा दिवसदेखील उत्तम पार पाडला. गढवालमधील भटकंतीत एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी तुम्ही मावळत्या सूर्याच्या साक्षीने मित्रमंडळींशी हितगूज करीत संध्याकाळ घालवावी यासारखे सुख नाही! अवघी पंचवीस हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या छोट्याशा शहरवजा गावात राहायला तुम्हाला फार मजा येते हे मात्र खरे. रात्री गढवाल मंडलच्या प्रेमळ आणि चविष्ट जेवण करणाऱ्या बल्लवाचार्यांच्या उपस्थितीत गरमागरम जेवण जेवून विश्रामधामाबाहेर चांदण्या रात्री शतपावली करताना, कधी न ऐकलेले ‘खिरसू’ गाव कसे असेल? याबद्दल विचारले असता, गढवाल मंडलमधील सारेजण एकसुरात म्हणाले, ‘तुम्हाला पौडी आवडले म्हणजे तुम्ही खिरसूच्या तर प्रेमातच पडाल! खूप सुंदर गाव आहे.’ आम्हा सर्वांची शरीरे दोन दिवसांत तीन छोटे ट्रेक्स केल्याने, गढवालच्या वातावरणाला छान सरावली होती. त्यामुळे आता आणखीन उंचीवरच्या ‘खिरसू’चा डोक्यात विशेष बागुलबुवा नव्हता. 

दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजताच निघालो. पौडीहून खिरसू केवळ १५ किलोमीटरवर आहे. हरिद्वार ते बद्रीनाथ जाणारा मुख्य रस्ता आपल्याला डावीकडे दिसत राहतो. आपण उजव्या हाताच्या घाटातल्या नागमोडी वळणाच्या अप्रतिम रस्त्याने खिरसूची वाट चढत जातो. रस्त्याच्या दुतर्फा हिरवळीवर फुललेली चिंटुकली रानफुले, सूचिपर्णी वृक्षांमधून दिसत राहणारी बर्फाच्छादित पर्वतशिखरे बघता बघता तुम्ही खिरसूला कसे पोचता हे कळतच नाही. खिरसूला गेल्यागेल्याच रघुवीर-कमलेश या हसऱ्या युवकांनी आमच्या चमूचा ताबाच घेतला. विश्रामधामात इतर प्रवासी कोणीही नव्हते. त्यामुळे ऐसपैस गप्पा, सुंदर जेवण, सुंदर निवास, मोकळ्याचाकळ्या वातावरणातील गढवाली युवकांशी रंगलेला संवाद यांनी साऱ्यांना खुश करून टाकले. संध्याकाळी ट्रेकिंगला कुठे जाऊया? म्हटल्यावर कमलेश खुश झाला. उल्कागढीचा ट्रेक करूया, म्हणाला. जवळजवळ ३-४ किलोमीटरवर उल्कादेवीचे मंदिर आहे चौबट्टा येथे ट्रेक करून येऊ, असे ऐकल्यावर दुपारची एक झोप काढल्यावर, चहा पिऊन ट्रेकला जायला तयार झालो. अशावेळी काय होते नेहमी माहितीय ना? झोप झाल्यामुळे शरीर आळसावलेले असते. बाहेर चांगलेच ऊन असले तर वाईट घाम येतो. परंतु मग काट्याकुट्यातून चालताना, घाटी उतरताना, चालायला नको नको असे वाटत असताना एकदा थोडे रेमटवून नेले, की मग शरीरातून निघणारा घाम, आपल्या चित्तवृत्ती उल्हसित करीत जातो. मग होणारा आनंद अवर्णनीय असतो. आमच्या चमूच्या एकूण पळण्यावर, म्हणजे ट्रेक करण्यावर कमलेश जाम खुश होता. म्हणाला, ‘खिरसूत आलेले फारच थोडे पर्यटक इथपर्यंत वाट तुडवीत देवळापर्यंत येतात.’ कमलेशला म्हटले, ‘तू होतास म्हणून आम्हाला वेगळे खिरसू पाहायला मिळाले. नाहीतर आम्हीसुद्धा विश्रामधामासमोरचा निसर्ग तेवढाच छान म्हणत बसलो असतो.’ उल्कादेवी मंदिरापाशी सारेजण खुशीत असताना मी कमलेशला म्हटले, ‘उद्या सकाळी एक छोटासा ट्रेक करता येईल का?’ कमलेश म्हणाला, ‘फारच छान. उद्या सकाळी आपण फुरकुंदा ट्रेक करूया.’ 

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बघतो तर खिरसूचे रूप उठून दिसत होते. उतरत्या छपराच्या घरांचे खिरसू, थोडी बर्फाची चादर लपेटून तेजस्वी तजेलदार दिसत होते. विश्रामधामासमोरच्या हिरव्या गालिच्यावर, गवतांच्या पात्यांवरील दवबिंदूंचा प्रकाशाशी चाललेला खेळ निसर्गाच्या अगाध लीला दाखवीत होता. आमच्या विश्रामधामासमोरचे वातावरण लखलखीत करून टाकत होता. चिमुकली नाजूक फुले जणू स्मित करून आमच्याकडे पाहात होती. त्यांचे फोटो घेतल्याशिवाय पुढे पाऊल टाकणे कठीण होते. त्यामुळे बराच वेळ सारेजण फोटो काढत राहिले. कमलेश म्हणाला, ‘यावेळी व्हॅलीपेक्षा औली आणि खिरसूमधेच जास्त फुले फुलल्याचे सारेजण म्हणताहेत!’ फोटो काढून झाल्यावर चहा पिऊन छोटेखानी फुरकुंदा ट्रेक करून आलो आणि अतिशय जड अंतःकरणाने रघुवीर-कमलेश या जोडगोळीचा निरोप घेऊन जोशीमठच्या वाटेला लागलो. 

देवभूमीची सफर 
तुम्ही ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर’ला जाणार असाल, तर त्याअगोदर केवळ चार दिवस जास्तीचे काढून तुम्ही या रम्य सफरीवर जाऊ शकाल. आमच्यासारखे ट्रेक्स केलेत तर तुम्हाला जास्त आनंद होईल; परंतु नुसते फिरण्यासाठी म्हणून जरी गेलात तरीदेखील तुम्ही खूप खुश व्हाल. अतिशय ताजी हवा, बंदरपूछ, हत्ती पर्वत, सतोपंथ, चौखंबा, नीलकंठ इत्यादी शिखरांचे दर्शन, तुमच्या हाताच्या उंचीएवढ्या झाडांवर लटकलेली सफरचंदे, जर्दाळू, आलुबुखार पाहताना, खाताना तुम्हाला वेगळ्या दुनियेत गेल्यासारखे वाटेल. पुण्या-मुंबईहून गढवाल मंडळ विकास निगमशी संपर्क साधून तुम्हाला हवी तशी, तुमच्या सोयीने खास तुमची अशी सफारी तुम्ही आखू शकता. हरिद्वार - हृषिकेश येथूनदेखील तुम्ही ऐनवेळी आरक्षण करून निघू शकता. मोक्याच्या जागेवरील गढवाल मंडलचे निवास, तेथील प्रेमळ कर्मचारी वर्ग, वेगळ्या जेवणाचा स्वाद घेता घेता तुम्ही शहर सोडून मनाने हिमालयात कसे अलगद पोचता ते तुमचे तुम्हालाही कळत नाही!

कसे जाल? 
दिल्लीहून थेट गाडीने चिला किंवा दिल्लीहून रेल्वेने हरिद्वार, हरिद्वारवरून चिला. 

कुठे राहाल? 
गढवाल मंडळ विकास निगमचे उत्कृष्ट निवास. 
आता प्रत्येक ठिकाणी तुमच्या आवडीनुसार इतरही अनेक निवास उपलब्ध आहेत. 

कधी जाल? 
ऑगस्टचा उत्तरार्ध ते ऑक्टोबरचा पूर्वार्ध. 
घुमक्कडांसाठी अर्थातच कुठल्याही मोसमात जाणे चांगले. 

ट्रेक्स 
पौडी-खांडुसीन = ६ किलोमीटर. 
उल्कागढी = ६ किलोमीटर. 
फुरकुंदा = ६ किलोमीटर. 

पर्यटनस्थळांदरम्यानचे अंतर 
दिल्ली-पौडी = ३५० किलोमीटर. 
पौडी-खिरसू = १५ किलोमीटर. 
दिल्ली-कोटद्वार = १६५ किलोमीटर. 
कोटद्वार-पौडी = ८५ किलोमीटर. 
हरिद्वार-चिला =१८ किलोमीटर. 
हृषिकेश-चिला = २० किलोमीटर. 
दिल्ली-चिला = २२२ किलोमीटर. 
पौडी-चिला = १३१ किलोमीटर. 
दिल्ली-हरिद्वार = २०४ किलोमीटर.

संबंधित बातम्या