एक स्वप्नील प्रवास... 

उदय ठाकूरदेसाई
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

आडवळणावर...
 

औलीला सुरू झालेला पाऊस गोपेश्वर, चोपटाजवळ वाढता राहिला. वाटेत अक्षरशः असंख्य धबधबे पाहायला मिळाले. कमी वर्दळीचा छोटा रस्ता, छोट्या वळणदार रस्त्याच्या दुतर्फा दिसणारी हिरवळ, वाटेत पिसारा फुलवताना पाहिलेला मोर, केवळ दोन उंच आणि लांब उडीत रस्ता पार करणारी हरिणाची पाडसे.. हे सारे पाहून, खरोखर आपण स्वप्नात तर नाही ना? असा भास वाटायला लावणारे चित्र चोपट्यापर्यंतच्या प्रवासात पाहिले. चोपट्याहून भर पावसात, कडाक्याच्या थंडीत तुंगनाथ ट्रेक झाला. पुन्हा अरुंद वाटेवरून, वळणदार रस्त्यावरून भर पावसात उखीमठ गाठण्याच्या थोडे अगोदर पाऊस थांबून सूर्याचे दर्शन झाले. संध्याकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात केवळ अप्रतिम दिसणारे उखीमठमधील टेरेस फार्मिंग पाहिले. वरील स्वप्नील चित्राची पूर्तता करण्यासाठी म्हणून कोमल तरंगणाऱ्या ढगांची त्यावर सजलेली महिरप पाहिली. संपूर्ण दिवसभर भान हरपून पाहात राहण्याजोगा इतका देखणा प्रवास मी भारतात तरी अनुभवला नाही हे मात्र खरे! 

खरे तर बद्रीनाथहून वसुधारा धबधबा बघून, स्वर्गारोहण शिखर लांबून पाहिल्यावर जर का लगोलग हा चोपटा-उखीमठचा प्रवास केला असता, तर प्रवास नक्कीच स्वर्गीय वगैरे वाटला असता. परंतु आम्ही जोशीमठ, तपोवन बघून औलीला थांबलो आणि एका अर्थाने बरेच झाले. एकतर आम्ही औलीला झुल्यामधून दीर्घ प्रवास केला आणि दुसरे म्हणजे हिलस्टेशनची राणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या औलीला एक दिवस राहून, औलीचा नजरा पाहून मगच चोपटा आणि उखीमठला जायला निघालो. मजा माहितीय का? लोक केदारनाथहून बद्रीनाथला जातात. आम्ही बद्रीनाथहून केदारनाथला जात होतो. हा पहिला मोठा मुद्दा आणि दुसरा मुद्दा म्हणजे बद्रीनाथहून जोशीमठ-चमोली-कर्णप्रयाग-गोचर-रुद्रप्रयाग-गुप्तकाशी-सोनप्रयाग अशा रस्त्याऐवजी चोपटा-तुंगनाथ करून, उखीमठला थांबून मग केदारनाथला जाणार होतो. या सगळ्या प्रकरणात दोन दिवस वाढले हे तर खरेच; परंतु सावकाश, निसर्गाचा आनंद घेत, गढवाल फिरण्यात एक वेगळाच आनंद आहे आणि बद्रीनाथहून खाली जोशीमठ औलीला आलो तेदेखील एका अर्थाने फारच चांगले झाले. नाहीतर जोशीमठ ते औली हा केबलकरचा थरारक प्रवास कसा अनुभवला असता? म्हणून मुद्दाम औलीला मुक्काम केला. औलीलासुद्धा खूप छान निसर्गदृश्ये पाहायला मिळाली.

औलीला केबलकारमध्ये म्हणजे पाळण्यात बसल्यावर सगळ्यात थरारक गोष्ट म्हणजे तुम्ही पर्वतशिखरांच्या समांतर उंचीवर उंच टोकावर पाळण्यात असता! पावसाची सर थांबल्यावर हलके हलके कापसाच्या पुंजक्यांसारखे भासणारे ढग तुमच्याभोवती गर्दी करतात. तुम्ही पाळण्यात असता. खाली खोल दरी असते. दुर्दैवाने, आमच्यावेळी थांबला तसा पाळणा काही कारणाने थांबला असला तर, सहकाऱ्याने केलेली थोडीशी हालचालसुद्धा खालच्या खोल दरीचे अंतर तुम्हाला बघायला लावते! पाळणा थांबल्याने थंडी वाढत जाते आणि आपला अनुभव खास होऊन जातो. तो अनुभव चांगला होता हे नंतर म्हणायचे; परंतु त्यावेळी आपली चांगलीच तंतरलेली अवस्था असते हे आपले आपल्याला माहीत असते! बद्रीनाथहून खाली आल्यामुळे या सगळ्या गोष्टी अनुभवता आल्या. थोडक्यात नुसते आडवाटेने जाऊन उपयोग नाही; चांगली वाट, चांगला रस्ता, वाटेवरील सोय, वाटेवरील निसर्ग या साऱ्याची दखल घेऊन तुम्ही मार्गाची निवड करायला हवी. 

औली येथील गढवाल मंडलचे निवासदेखील खूप छान आहे. संध्याकाळी तेथे पोचलो. बाहेर पाऊस होता. तसेच दुसऱ्या दिवशी फार लवकर निघायचे होते, त्यामुळे औलीमधे खूप रमणे झाले नाही; परंतु औलीत पोचणे आणि सकाळी औलीबाहेर पडणे हेच खूप रम्य होते. या साऱ्या प्रकारामुळे आमच्या सहा जणांच्या कंपूला, पाऊस अत्यंत प्रिय असूनसुद्धा मनाजोगते फोटो काढायला मिळाले नाहीत. औली आणि सोबत चोपटा आणि तुंगनाथ रस्त्यावरची सौंदर्यस्थळे टिपता आली नाहीत. त्यामुळे एक प्रकारची रुखरुख वाटत होती. उखीमठला जेमतेम काही फोटो घेता आले. परत सुरू झालेल्या पावसामुळे ‘येरे माझ्या मागल्या’च्या धर्तीवर कॅमेरा सॅकबाहेर काढणे अशक्य होऊन बसले. औलीहून चोपटा गाठताना एकापेक्षा एक अप्रतिम दृश्यांनी आम्हाला वेड तर लावलेच होते; परंतु त्यावेळचा आमच्यातील एक विनोद सांगायचा तर आम्हा साऱ्यांचे धबधब्याचे आकर्षण त्या एका दिवसात पूर्ण संपले होते. आयुष्यात एकाच वाटेवर इतके धबधबे मी तरी परत कधीच अनुभवले नाहीत. इथे पावलापावलावर महाभारताच्या खुणा असल्याने, धबधब्यांतून, हिरवाईतून प्रवास करणे, वाटेत मोर दिसणे, मोराचा पिसारा फुललेला पाहणे, हरिणे पाडसांसह रस्ता ओलांडताहेत इत्यादी दृश्य पाहणे ते सारे भूतकाळात नेणारे वाटले. 

खरी मजा चोपट्याहून तुंगनाथचा ट्रेक करताना आली. पाऊस ‘मी’ म्हणत होता. एसी आणि खिडक्या बंद असल्याने आणि आम्ही सात जण गाडीत बसलेले असल्याने गाडीत उबदार वातावरण होते. बाहेर अर्थातच कडाक्याची थंडी आणि पाऊस होता. तुंगनाथ ट्रेक करायला चला म्हटल्यावर स्वाती, राजन आणि मी असे तिघेजणच गाडीबाहेर पडून, चोपट्याहून तुंगनाथला जायला सज्ज झालो. बाकीच्या तिघांनी गाडीतच थांबायचा निर्णय घेतला. 

वास्तविक नयनरम्य धबधब्यांमुळे आणि हिरव्यागार टेकड्यांमुळे (बुग्याल) तुंगनाथचा ट्रेक अतिशय नयनरम्य वाटतो असे वाचले होते. केवळ पावसामुळे आणि बोचऱ्या थंडीमुळे आम्हाला तुंगनाथ ट्रेक आमची थोडी कसोटी बघणारा ठरला असे वाटले. साडेतीन किलोमीटरचा ट्रेक करून मंदिरात पोचण्यापूर्वी बुटांतून, मोज्यांतून पायांची सुटका करून घेत पाय त्या मंदिराच्या काळ्याभोर दगडावर ठेवले, मात्र... एक सरसरीत कळ थेट डोक्यापर्यंत गेली! थंड थंड म्हणजे काय याचा तो एक प्रत्यक्षयदर्शी पुरावाच होता जणू! आम्ही तुंगनाथाचे दर्शन घेऊन, प्रदक्षिणा घालून तुंगनाथासमोर हात जोडणार, तोच पुजारी म्हणाले, ‘तीर्थ घ्या...’ पुजाऱ्यानी तळहातावर तीर्थ दिल्यावर पुन्हा एक जीवघेणी कळ थेट डोक्यापर्यंत गेली. आपण थंड हा शब्द फार सामान्यपणे वापरतो; तुंगनाथच्या ट्रेकमधे ‘थंड’ या शब्दाचा खरा अर्थ पूर्णपणे कळला असे वाटले. परंतु खरा अर्थ तर अजून पुढेच कळायचा होता. पुजाऱ्याने लगेच शेकोटीला बसवून आमच्या अंगात थोडी ऊब आणली खरी; परंतु निघताना महागारेगार बूट, थंड मोज्यांसह पायात चढवताना साध्या गोष्टी कधी कधी किती कठीण होऊन बसतात ते कळून आमचे आम्हालाच हसू आले. जवळजवळ बधिर पायांनी आम्ही निघायची तयारी करीत असताना पुजारी बाजूचे गणपती आणि पार्वती मंदिर दाखवायला आले. ती मंदिरे बघून अर्ध्या वाटेत त्यांचा निरोप घेऊन आम्ही चोपट्याला परतलो. टपरीवर गरमगरम दूध प्यायलो आणि उखीमठच्या रस्त्याला लागलो. 

चोपट्याहून उखीमठचा प्रवासदेखील सुंदर आहे. अरुंद वाटांचा घाटरस्ता पार करून तुम्ही उखीमठमधे पोचलात की टेरेस फार्मिंगचा नजारा तुमचे डोळे तृप्त करतो. उखीमठचे गढवाल निगमचे विश्रामधाम अप्रतिम आहे. परंतु ते छोटेखानी आहे. तेथे राणा नावाच्या खानसामा युवकाची भेट झाली. राणा अगत्यशील होता. बी. एस्सी. झालेला होता. पदवीधर असूनही नोकरी नसल्याने नाईलाजास्तव कमी शिकलेल्या अधिकारी लोकांच्या हाताखाली काम करीत होता. आम्हाला राणाचे कौतुक वाटले. राणाच्या हातचा अप्रतिम चहा गेल्यागेल्या पीत असता बाहेरची हवा आम्हाला बोलाविती झाली आणि आम्ही मोक्याच्या जागी असलेल्या उखीमठच्या गढवाल निगमच्या विश्रामधामातून अप्रतिम टेरेस फार्मिंग बघण्यात रंगून गेलो. दिवेलागण व्हायची होती. राणा आम्हाला म्हणाला, ‘बाणासुराची कन्या उषा, तिच्या नावावरून ऊषामठ नावारूपाला आले. ऊषामठचा अपभ्रंश होऊन उखीमठ असे नाव तयार झाले. लोकांच्या स्मृतीत राहिले.’ उखीमठमध्ये बाणासुराच्या उषाचे, कृष्णाचा नातू असलेल्या अनिरुद्धशी लग्न झाल्याने उखीमठ फार महत्त्वाचे असे धार्मिक स्थळ आहे. केदारनाथमध्ये डिसेंबर ते मार्च-एप्रिलपर्यंतच्या थंडीच्या काळात केदारनाथवरून देव, खाली उखीमठला आणतात. त्या काळात इथेच त्यांची पूजा करतात. त्यामुळे उखीमठमध्ये अनेक देवळे आहेत. आपण उद्या ती पाहायला जाऊ.’ 

एव्हाना आम्हाला उखीमठचे धार्मिक महत्त्व समजायला लागले होते. एक अगदी टिपिकल, सतत आरत्यांचा आवाज जसा पहाडी विभागात ऐकायला येतो ना? तसे सततचे पार्श्वसंगीत उखीमठ सोडेपर्यंत आमच्या साथीला होते. अनेक देवळांचे दर्शन घेताना अनेक आख्यायिका कानावर पडल्या. अनेक देवळांचे दर्शन घेतल्यावर सहज गावातून एक रपेट मारून आम्ही अतिशय मोक्याच्या जागी असलेल्या उखीमठमधील गढवाल निगमच्या विश्रामधामाजवळ आलो. पुन्हा एकदा दोन डोळ्यांनी समोरचा महाअप्रतिम नजरा डोळ्यांनी पिऊन घेतला आणि नंतरच केदारनाथकडे कूच करण्यासाठी जवळच्या गौरीकुंड येथे जाण्यास निघालो. 

निघताना सर्वांच्या मनात एकच प्रश्न सतत भेडसावत होता, की इतक्या महाअप्रतिम उखीमठबद्दल विशेष असे वाचायला कसे मिळाले नाही आजवर?

औली ते उखीमठ 

  • बद्रीनाथ-जोशीमठ -चमोली-कर्णप्रयाग-गोचर-रुद्रप्रयाग-गुप्तकाशी-सोनप्रयाग-केदारनाथ अशा नेहमीच्या मार्गाऐवजी आम्ही बद्रीनाथहून औलीला थांबलो. 
  • औलीवरून औली-गोपेश्वर-मंडल-चोपता-तुंगनाथ-उखीमठ हा मार्ग निवडला. मग दुसऱ्या दिवशी केदारनाथला गेलो. 
  • बद्रीनाथच्या पुढे माना गावाच्यापुढे वसुधारा धबधब्याजवळून स्वर्गारोहण शिखर (जेथे पांडवांनी देह ठेवला) पाहून तत्काळ चोपटा-तुंगनाथ मार्गाने गेल्यास ‘स्वर्गीय’ या संकल्पनेतून स्वतःची सोडवणूक करून घेणे तुम्हाला कठीण जाईल इतका हा प्रवास महाअप्रतिम आहे. 
  • केवळ कल्पनातीत असा प्रवास करून आपण जेव्हा उखीमठ गावाचे सौंदर्य बघून वेडावून जातो, तेव्हा नकळत त्या अद्‍भुत निसर्गाच्या दर्शनाला पाहून आपले हात आपोआप जोडले जातात. इतके अद्‍भुत सौंदर्य क्वचितच पाहायला मिळते. 

कसे जाल? 
औलीवरून-गोपेश्वर-मंडल-चोपता-तुंगनाथ-उखीमठ. 

कुठे राहाल? 
गढवाल मंडलचे मोक्याच्या ठिकाणी असलेले अप्रतिम विश्रामधाम बहुतेक ठिकाणी उपलब्ध असल्याने पर्यटकांची चांगली सोय होते. 
आता तर खासगी हॉटेल्ससुद्धा पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत. 

कधी जाल? 
    मे ते ऑक्टोबर हा कालावधी येथे जाण्यासाठी चांगला आहे. 
    पंचकेदार - केदारनाथ, मदमहेश्वर, तुंगनाथ, रुद्रनाथ, कल्पेश्वर. 

उंची मीटरमध्ये  
औली - ३०४९. 
चोपटा - २६८०. 
तुंगनाथ - ३६८०. 

पर्यटनस्थळादरम्यानचे अंतर  
औली-गोपेश्वर = ४४ किमी. 
गोपेश्वर-चोपटा = १०५ किमी. 
चोपटा-उखीमठ = ४४ किमी. 
उखीमठ-गौरीकुंड = ३० किमी.

संबंधित बातम्या