देखणे व्हिएन्ना! 

उदय ठाकूरदेसाई
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

आडवळणावर...
 

परदेशातील अनेक देशांच्या प्रवासादरम्यान, सहसा आपण एका ठिकाणी उतरलो की त्याच ठिकाणाहून परतत नाही. दुसऱ्या कुठल्यातरी ठिकाणाहून परततो; परंतु दोन वर्षांपूर्वी पूर्व युरोपातील देशांची सफर करताना आम्ही व्हिएन्नात उतरून पाच देश फिरून पुन्हा व्हिएन्नावरूनच परतलो! व्हिएन्नाविषयीची ही ठळक आठवण. साहजिकच देखणे व्हिएन्ना पाहून परतताना, आमच्या दौऱ्याची सुरुवात आणि शेवट लक्षात राहण्याजोगी झाली हे काही वेगळे सांगायला नको. 

आमच्या दृष्टीने पर्वणी म्हणजे पूर्व युरोपच्या दौऱ्यात खूप चालायचे होते. थोडासाच बसप्रवास रोज करायचा होता. नेहमीप्रमाणे दौऱ्यावर जाण्याआधी दौऱ्यामधील ठिकठिकाणची हॉटेल्स बघताना, सर्व देशातील हॉटेल्स ठीक वाटली; परंतु व्हिएन्नामधील एम सॅशेंगांग या हॉटेलबद्दल दोन टोकांच्या भूमिका जगभरच्या पर्यटकांकडून वाचायला मिळाल्यावर खरे तर नाराज व्हायला झाले होते. परंतु, एकच रात्र तर काढायचीय असे मनाला समजावत दौऱ्यावर निघायची वाट बघत राहिलो. खरे सांगायचे तर व्हिएन्ना शहराबद्दल फारसे काही माहीत नव्हते. माहीत होते ते इतकेच, की ऑस्ट्रिया, हंगेरी, पूर्वीच्या झेकोस्लोवाकियातून फुटलेला स्लोवाकिया आणि झेक रिपब्लिक, तसेच जर्मनी हे सारे अंतराच्या दृष्टीने जवळ जवळ असलेले देश आहेत. त्यातही मजेशीर समजलेली माहिती अशी, की जर्मनीतील म्युनिचवरून ऑस्ट्रियातील साल्झबर्ग या दोन देशांतील शहरांमधील अंतर फक्त १४५ किलोमीटर आहे; तर ऑस्ट्रियातील ऑस्ट्रियात साल्झबर्गवरून व्हिएन्ना हे चक्क ३०० किलोमीटरवर आहे. तसेच व्हिएन्नावरून बुडापेस्ट २४८ किलोमीटर, बुडापेस्टहून ब्रातिस्लाव्हा २२६ किलोमीटर, ब्रातिस्लावावरून प्राग ३२६ किलोमीटर, प्रागवरून म्युनिच ३८४ किलोमीटरवर आहेत. एकंदरीत प्रवासात मजा येणार असा कयास बांधून आम्ही व्हिएन्नाला जाण्यासाठी तयार झालो. 

व्हिएन्ना विमानतळावर संध्याकाळचे उतरलो. तेथे भारतभरच्या इतर सहप्रवाशांची वाट बघून आम्ही सारे व्हिएन्ना शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या इंडिया गेट या हॉटेलात जेवलो. व्हिएन्नाचा पहिला नजारा पाहण्यासाठी म्हणून स्वाती, मी अन जोगी (जोगळेकर) असे तिघेजण बाहेर पडलो. हॉटेलसमोर असलेल्या हायवेपलीकडे कसला कल्ला होतोय, ते पाहायला म्हणून निघालो. संध्याकाळची वेळ. ऑस्ट्रियायातील वाहता रस्ता. वेगाने जाणाऱ्या गाड्या. त्या नियंत्रित करणारे पोलिस आणि रस्ता ओलांडून पलीकडचे दृश्य पाहण्यासाठी आतुर झालेले आम्ही तिघे! रस्त्यापलीकडे खाली डोकावून पाहिले अन अवाक झालो! रस्त्यापलीकडे युवाकलाकारांची मैफल रंगात आली होती. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद त्यांच्या रसिकतेची साक्ष देत होता. पलीकडे डॅन्युब वाहत होती. सूर्य अस्ताला जायच्या बेतात असताना, आकर्षक प्रकाशयोजनेत न्हाऊन निघणारा श्रोतृवृंद आणि त्या प्रकाशाचे काही रंग स्वतःच्या पाण्यात रूपगर्वितेप्रमाणे मिरवणारी डॅन्युब बघून खुश व्हायला झाले. व्हिएन्नाचा पहिला परिचय या राजस दृश्याने करून दिला. तेथून इंडिया गेट हॉटेलजवळ आलो आणि सर्व सहप्रवाशांसह २० किलोमीटरवरील गॉर्ब एन्झर्सडॉर्फ या चिमुकल्या गावातील एम सॅशेंगांग या आमच्या हॉटेलवर मुक्कामासाठी आलो. जुनी वास्तू. लिफ्ट नाही. स्वतःची बोचकी (बॅगा) स्वतःच उचलायची. अशा वातावरणात आम्ही सोडून सगळे त्रासलेले होते. 

आम्ही आमच्या हॉटेलरुमवर गेलो. रुम चांगली प्रशस्त होती. एसी नव्हता. बाहेर वातावरणात गारवा होता. खिडक्या उघडल्यावर अगदी छान वाटले. सकाळी उठून हॉटेल परिसर पाहून खुश होऊन गेलो. खूप गुलाबाची झाडे, असंख्य वेली, अतिस्वच्छ परिसर, या साऱ्या गोष्टींनी मन खुश होऊन गेले. सुंदर वातावरणात भरपूर फोटो काढून झाल्यावर, नाश्ता झाल्यावर आम्ही सारे तयार होऊन व्हिएन्ना पाहण्यासाठी तयार झालो. 

प्रथम आम्ही व्हिएन्नाच्या मध्यवर्ती भागात जाऊन आमच्या ऑस्ट्रियन गाइडला भेटणार होतो. मग आमचे व्हिएन्नादर्शन सुरू होणार होते. तोपर्यंतच्या काळात (२० किलोमीटरच्या अंतरादरम्यान) आम्ही नुकतेच सोडलेले एम सॅशेंगांग हे हॉटेल चांगले की वाईट यावर तावातावाने मतप्रदर्शन झाले. आमचा तेवढाच चांगला वेळ गेला! 

शहराच्या मध्यवर्ती भागात आल्यावर ऑस्ट्रियन गाइडने बसमध्ये प्रवेश करून ऑस्ट्रियाचे, व्हिएन्नाचे महत्त्व सांगायला सुरुवात केली. सिग्मंड फ्रॉइड, बीथोवन, मोझार्ट या व्यक्तिमत्त्वांमुळे व्हिएन्नाला कसे महत्त्व प्राप्त झाले, व्हिएन्नामधील प्रत्येक म्युझियम कसे आणि किती जपले आहे याची तपशीलवार माहिती देऊन व्हिएन्नामधील राजवाडे, बागादेखील कशा जपल्या आहेत हे सांगताना ठायी ठायी त्या गाइडचा व्हिएन्ना आणि ऑस्ट्रियाबद्दलचा अभिमान डोके वर काढताना दिसत होता. दुसरे महायुद्ध आणि जर्मनीचा प्रभाव हे सांगताना त्याने हळूच आम्ही राहिलेल्या हॉटेलचे नाव एम सॅशेंगांग असे नसून आम जॅक्सनगांग असे उच्चाराने असल्याचेदेखील सांगितले. गाइडचे सर्व ऐकून आम्ही बसमधून उतरलो आणि व्हिएन्ना शहर बघण्यात रंगून गेलो. 

पहिल्या राष्ट्रीय ऐतिहासिक म्युझियममधे, आतून-बाहेरून परिसर फिरतानाच किती वेळ गेला! म्युझियमबाहेरील उद्यानात मुख्य पुतळ्याखाली एक गाणे कोरसमधे गायचे प्रात्यक्षिक चालले होते. छोटी गोष्टसुद्धा भान हरपून करण्याची ऑस्ट्रियन पद्धत आवडून गेली. कोरसमधे गाणाऱ्या त्या युवा गायक-गायिकांचे समोर जमलेल्या जनसमुदायाकडे जरासुद्धा लक्ष नव्हते. अनेक बागांमधे गुलाबाच्या फुलांचे ताटवेच्या ताटवे फुलले होते. त्यामुळे फोटो काढणाऱ्यांचे चित्त विचलित होत होते. उत्कृष्ट वातावरण, मोकळा परिसर, मोहक निसर्ग इतके सारे सहजी उपलब्ध असताना साऱ्या ग्रुपने दरवेळी दीर्घकाळ म्युझियममधे, बागेमधे, चर्चपरिसरात अडकून पडणे आणि पांगलेल्या साऱ्यांना एकत्र गोळा करून वेळेवर पुढच्या ठिकाणी नेणे संयोजकांच्या दृष्टीने मोठे कठीण होऊन बसले. 

म्हटले तर ही व्हिएन्नाची खासियत म्हणता येईल, की व्हिएन्नामधे परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम बघता येतो. जुन्या ट्राम बाजूने जात असता, वळणावर मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू गाडीचे ट्रामच्या साथीने असणे जेवढे बोलके चित्र म्हणावे तितकेच स्पोर्ट्‌सकारच्या बाजूने पायडल मारीत, बियरचे पेयपान चालू ठेवीत व्हिएन्नाचा फेरफटका मारणाऱ्यांचे चित्र दिसते. 

तुम्हीदेखील अशा सफारी करू शकता. लांबलचक गाड्यांतून निवांत फेरफटका मारणाऱ्या प्रवाशांचा घोळका किंवा राजवाड्याजवळची नामी सफर करणाऱ्या बग्गीच्या फेऱ्या यातून काहीही एक अथवा वेळ असेल, तर तिन्हीही पर्यायांचा वापर करून तुम्ही व्हिएन्नादर्शनाचा आनंद लुटू शकता! 

फिर फिर फिरल्यावर आम्ही पार्लमेंट बिल्डिंगजवळ फिरत असता, समोरच्या खाऊगल्लीच्या दिशेने गेलो. दुपारपर्यंतची तंगडतोड विसरायला झाली. एका शब्दात सांगायचे, तर आदर्श खाऊगल्ली कशी असावी त्याचे ते प्रतीक होते असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. वाहनांना बंदी असलेल्या रस्त्यावर दुतर्फा असलेल्या असंख्य हॉटेल्समधे कैक पदार्थ सजवून शोकेसमध्ये मांडलेले होते. येणाऱ्याजाणाऱ्याचे मन आकर्षित करीत होते. सीझलर्सचे धूर, पदार्थांचा सुगंध खाऊगल्लीवर पसरवीत होते. खवय्यांची भूक वाढवीत होते. व्हिएन्नावासीयांना जीव की प्राण असणाऱ्या कॉफीचा विशिष्ट सुगंध, गिऱ्हाइकांना जवळच्याच हॉटेलमध्ये बसायला आर्जवे करू पाहत होता. सॅण्डविचेसचे असंख्य प्रकार, चिकनची मोहक मांडणी, आईस्क्रीमकोनवरून कधीही घरंगळू शकणाऱ्या चेरीज, आइस्क्रीम देताना, खाताना ते घेऊन चालताना आइस्क्रीममय झालेले रसिक, हे सारे इतक्या टापटिपीत, कुजबुज-कोलाहलात चालले होते, की या सर्व वातावरणाचाच आनंद घेत राहावासा वाटला. आजवरच्या परदेशभ्रमणात व्हिएन्नातील खाऊगल्लीचा अनुभव, उच्च अभिरुचीचा या अर्थाने कायमचा लक्षात राहणारा ठरला. 

जेवल्यावर पुन्हा एकवार चर्चेस, बागा, राजवाडे फिरणे झाले. कुठूनही कुठेही फिरताना एक एकदम चांगले आणि दुसरे भकास किंवा एक चांगले आणि दुसरे कमसर असे अनुभवास आले नाही. सर्वत्र एक अतिउच्च दर्जा जपला होता जणू! आम्ही व्हिएन्ना सोडून, इतर पूर्व युरोपीय देश पाहून जेव्हा ऑस्ट्रियाच्या दुसऱ्या भागात साल्झबर्ग, इंन्सब्रुक ठिकाणी पोचलो, तिथेसुद्धा वरील गोष्टींचाच प्रत्यय आला. शिवाय एक वेगळी गोष्टदेखील अधोरेखित झाली. निसर्गसौंदर्याच्या दृष्टीने साल्झबर्ग आणि इंन्सब्रुक ही शहरे अप्रतिम असली तरी जगभरच्या पर्यटकांची पहिली पसंती व्हिएन्नालाच आहे. यावरून हिएन्नाचा महिमा दिसून येतो. साहजिकच वर्षानुवर्षे ‘जगातील सर्वोत्तम शहरांच्या यादीत व्हिएन्नाच प्रथम क्रमांकावर का आहे?’ याचा सहज उलगडा आम्हा सर्वांना होऊन गेला. 

व्हिएन्नाच्या झोकदार दर्शनाने अतिशय उल्हसित झालेले आम्ही सारे त्यानंतर बुडापेस्ट, सेंतेन्द्रे, किसोराझी या हंगेरीतील डॅन्युबकाठाच्या सुंदरशा गावांना भेटी देऊन ब्रातिस्लाव्हा, प्राग, म्युनिच करीत पुन्हा ऑस्ट्रियात साल्झबर्ग येथे येऊन पोचलो. साल्झबर्गदेखील पाहून झाल्यावर पुढच्या म्हणजे अखेरच्या दिवशी पुन्हा व्हिएन्नाला जाणार म्हणून आनंद झाला. आम्ही साल्झबर्गवरून दुपारचे निघणार होतो. तेवढ्यात सकाळी ९ ते १२ दरम्यान साल्झबर्गजवळच्याच बॅड ड्युरंबर्ग गावात मिठाची खाण बघायचा रंजक कार्यक्रम ठरला. आमची अर्थातच ना नव्हतीच. आम्ही हालेम गावाजवळच्या बॅड ड्युरंबर्ग या अगदी चिमुकल्या गावाजवळ पोचलो. तेथील रंजक कार्यक्रम पाहिला आणि सगळ्यांना मुंबईला परतण्याचे वेध लागल्याने सगळे जण निघायची घाई करू लागले. भोवती अप्रतिम निसर्ग होता. तो काही करून कॅमेऱ्यात बंदिस्त करावाच असे वाटले. त्यासाठी बोलणी खायची तयारी ठेवली. तेवढ्यात त्या शांत वातावरणात दोन स्त्री-पुरुष टॉक टॉक बुटांचा आवाज करीत आले आणि समोरच्या बंगल्यात गुडूप होऊन गेले. पुन्हा सारा भवताल कॅमेऱ्यात बंदिस्त होण्यासाठी समोर उभा राहिला. अखेर त्या अतिसुंदर परिसराचे खूप फोटो घेऊन साल्झबर्गचा निरोप घेऊन पुन्हा एकदा व्हिएन्नाच्या वाटेल लागलो. चांगला तीन तासांचा अवधी होता. बस सुरू झाल्यावर दोन्ही बाजूला दिसणारी सुंदर हिरवाई, मनात व्हिएन्नाचा ठसलेला अभिजात दर्जा, डॅन्युबचे होणारे लोभस दर्शन, आपल्या कलासंस्कृतीची ऑस्ट्रियन लोकांनी केलेली जपणूक, या गोष्टी जाणवून, आम्हाला गंभीर करून गेल्या. अखेर विमानतळाजवळ आम्ही सर्व प्रवाशांनी व्हिएन्नाचा निरोप घेतला. व्हिएन्नाचा निरोप घेणे सर्वांनाच जड जात होते. अखेर, देखणे व्हिएन्ना सर्वांच्याच हृदयात जाऊन बसले होते हेच खरे!    

व्हिएन्ना 
पूर्व युरोपच्या छोट्या दौऱ्यावर जायचे ठरवत असाल तर त्यादृष्टीने व्हिएन्ना ते व्हिएन्ना असा छोटासा दौरा चालण्याची आवड असणाऱ्या घुमक्कडांना आवडू शकतो. ऑस्ट्रिया, हंगेरी, पूर्वीच्या झेकोस्लोवाकियातून फुटलेला स्लोवाकिया आणि झेक रिपब्लिक तसेच जर्मनी हे सारे अंतराच्या दृष्टीने जवळ जवळ असलेले देश आहेत. व्हिएन्ना-बुडापेस्ट-स्लोवाकिया-प्राग-म्युनिच-साल्झबर्ग-व्हिएन्ना असा कार्यक्रम तुम्ही तुमच्या आवडीनुसार आखू शकता. 

कुठे राहाल? 

  • साध्या निवासासाठी स्वस्त आणि मस्त म्हणून आम जॅक्सनगांग हे गॉर्ब एन्झर्सडॉर्फ येथील हॉटेल छान आहे. 
  • उत्तम निवासासाठी हिल्टन गार्डन इन. 

काय पाहाल? 

  • तेराव्या शतकातील हॉफबर्ग राजवाडा, बेल्व्हदेर राजवाडा, शॉनब्रून राजवाडा, ऑपेरा हाउस, सेंट स्टीफन कॅथेड्रल, व्हिएन्ना प्राणिसंग्रहालय, व्हिएन्ना सिटी हॉल, नॅचरल हिस्टरी म्युझियम आणि बरेच काही... 

काय खाल? 

  • व्हिएन्नात जगभरातील चवी तुम्हाला चाखता येतील. 
  • व्हिएन्नातील खाऊगल्ली लाजवाब आहे.

संबंधित बातम्या