सफर ऑकलंडची 

उदय ठाकूरदेसाई
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

आडवळणावर...
 

ऑकलंडला जाऊन आलो असे नुसते सांगून चालत नाही. बे ऑफ आयलंड्समधील चोहोबाजूंनी पाणी असलेल्या, हत्तीच्या खडकाला असलेल्या कमानसदृश भोकाचा फोटो तुमच्या फोटोअल्बममधे दिसला, की मग गमतीत बोलायचे तर तुम्ही ऑकलंडला जाऊन आल्याची पावतीच मिळते जणू! न्यूझीलंडच्या दक्षिण बेटावर विलक्षण सुंदर असे दिवस अनुभवल्यावर, न्यूझीलंडच्या उत्तर बेटावर कितपत मजा येईल, असे वाटत असतानाच रोटोरुआतील दिवसही कसे सरले ते कळलेदेखील नाही. म्हणूनच रोटोरुआवरून ऑकलंडला जाण्यासाठी निघताना मनात केवळ आनंदच वाटत होता. आमचा चक्रधर आणि गाइड असलेला डॉन म्हणाला, ‘आतापर्यंत तुम्ही विरळ वस्तीतून चालत होता; आता तुम्ही न्यूझीलंडच्या दाट वस्ती असलेल्या सर्वांत मोठ्या शहराकडे निघाला आहात. सोळा लाख लोकसंख्येच्या ऑकलंडमध्ये बरेच भारतीय तुम्हाला बघायला मिळतील.’ अशारितीने ऑकलंडला नुसता भोज्जा करायचा नव्हता; तर ऑकलंडच्या भव्य सिटी हॉटेलमध्ये आरामदायी वास्तव्य करायचे होते. सुशेगात फिरायचे होते. त्यामुळे बसमधील आम्ही सारे प्रवासी अगदी खुशीत होतो. 

न्यूझीलंडमधे प्रवास करताना वेळ कसा गेला हे खरेच कळत नाही. एकतर रस्त्याच्या दुतर्फा अप्रतिम निसर्गदृश्ये सतत दिसत असतात. एक-दोन तासांच्या दरम्यान काहीतरी महत्त्वाचे घडतेच, नाहीतर दिसतेच. आम्ही रोटोरुआ सोडल्यापासून केवळ दोन तासांच्या आत चक्रधर डॉन म्हणाला, ‘आता तुम्ही ग्लोवर्म (चकाकणारे कीटक) बघण्यासाठी म्हणून वायटोमो गुहेजवळ उतराल. न्यूझीलंडमधील अनेक आकर्षणांपैकी एक असलेले हे पर्यटनस्थळ तुम्ही बघा. मात्र, चमचमणाऱ्या किड्यांवर प्रकाशझोत पाडून फोटो काढू नका.’ न्यूझीलंडमधे हे एक वैशिष्ट्य तुम्हाला बघायला मिळेल, की प्रत्यक्ष फेरीतला गाइड तर सूचना देतोच; परंतु तुमचा चक्रधरही तुम्हाला सूचना देऊन आगाऊच जागरूक करून ठेवतो. डॉनच्या अपुऱ्या बोलण्यामुळे काजव्यासारखा काहीतरी प्रकार बघायला मिळणार हे जरी माहिती असले तरीदेखील नक्की काय? ही उत्कंठा होतीच! शिवाय अंधाऱ्या गुहेतून ४५ मिनिटांची फेरी हेदेखील एक आकर्षण होतेच! 

वायटोमो गुहेजवळील एका प्रशस्त दालनात जमल्यावर आम्ही सारे अंधाऱ्या गुहेत खाली उतरू लागलो. तिथे अगदी थोडा प्रकाश होता. पाणी होते. एक नौका खास आमच्यासाठी राखीव ठेवली होती. त्यात आम्ही सारे बसलो. आम्हा साऱ्यांना गप्प राहण्यास सांगण्यात आले आणि फ्लॅश न वापरता फोटो काढायची परवानगी देण्यात आली. खरे सांगायचे, तर सारेजण गप्प राहून अंधाऱ्या गुहेतून नौकेतून मार्गक्रमणा करीत होतो हीच एक वेगळी बाब होती. त्या वातावरणाची साऱ्यांना मजा वाटली. नौका थोडी पुढे गेली तोच दूरवरून असंख्य चांदण्या दिसाव्यात तसे दृश्य दिसू लागले. आमच्यातील एक तरुण म्हणाला, ‘टॉवरमधे लायटिंग केल्यासारखे दिसतेय नाही?’ त्याच्या कल्पनेवर खुद्द त्या तरुणाचे आईवडिलच रागावले आणि आमच्या टूर गाइडनेदेखील बोलू नका असा इशारा केला. तोपर्यंत आम्ही गुहेच्या अंतरंगात, शांत, प्रकाशमान दिवे पेटले असावेत तसे आकर्षक दृश्य बघत होतो. बरेच सांगूनसुद्धा एका युवा प्रवाशाच्या कॅमेऱ्यातून गुहेच्या छतावर फ्लॅशलाइट पडल्यावर टूर गाइड म्हणाला, ‘तू फ्लॅश मारू नको नाहीतर ग्लोवर्मचा लाइट कमी होईल.’ आणि तो पुढे दबक्या सुरात म्हणाला, ‘एकदा का ग्लोवर्म बिचकले की त्यांचा प्रकाश कमी कमी होत जातो आणि मजा म्हणजे जे भुकेले आहेत ते ग्लोवर्म जास्त चकाकतात.’ एव्हाना आम्ही आमच्या गुहेतील प्रवासाच्या शेवटाला आलेलो होतो. नौकेतून बाहेर पडल्यावर, ग्लोवर्म (किड्यां) साठी किती काळजी घेण्यात येते? जाणकार तज्ज्ञांची टीम सतत त्या किड्यांवर कसे लक्ष ठेवून असते? कर्ब वायूचे प्रमाण कसे योग्य राखण्यात येते? अशा अनेक गोष्टींबरोबरच या परिसरात ३०० गुहा आहेत असे समजल्यावर आम्हा साऱ्यांना चकित व्हायला झाले. त्यानंतर आम्ही आमच्या ऑकलंड येथील सिटी हॉटेलच्या वाटेल लागलो. न्यूझीलंडमधील हॉटेल्स चांगली मोकळी-चाकळी आणि भरपूर मोठाली असतात. युरोपातल्या हॉटेल्ससारखी छोटुकली नसतात. रात्री जवळच्या लिट्ल इंडिया रेस्टॉरंटमध्ये जेवून आपापल्या हॉटेल रुम्सवर गेलो. दुसऱ्या दिवशी दिवसभर ऑकलंड फिरायचे होते. दौऱ्यावरचा अखेरचा दिवस असल्याने भारी मौज-मस्तीदेखील करायची होती! 

दुसऱ्या दिवशी प्रसन्न सकाळी माउंट एडन हे सुंदर गाव बघायला गेलो. येथे ज्वालामुखीमुळे १५० फूट खोल असलेले एक विवर बनलेले आहे. मुख्य रस्त्यापासून ते विवर बघण्यापर्यंतचा रस्ता, उंचीवरून दिसणारे सुंदर इडन गाव हे सारे वेगळ्या वातावरणात नेणारे वाटले. त्यानंतर आम्ही वायतांगी या महत्त्वाच्या, ऐतिहासिक स्थळी जायला निघालो. डॉन म्हणाला, ‘२३५-२४० किलोमीटर अंतर कापायला ३ तास तरी लागतील.’ वाटेतील अप्रतिम निसर्गसौंदर्याने साऱ्या प्रवाशांचे डोळे तृप्त झाले. तीन तासांचा वेळ कसा गेला काही कळलेच नाही. वायतांगी बेटावर उतरल्या उतरल्या स्थानिक टूर गाइडने आम्हा प्रवाशांचा ताबा घेतला आणि एकापाठोपाठ एक गोष्टी सांगताना महत्त्वाच्या आणि आपल्याला वेगळ्या वाटू शकणाऱ्या अशा अनेक गोष्टी सांगितल्या. टूर गाइड म्हणाली, ‘ब्रिटिशांनी या ठिकाणी माओरी प्रमुखांशी तहाची बोलणी केली. ६ फेब्रुवारी १८४० ला तह झाला आणि न्यूझीलंडला टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे एक अशी तारीख नसल्याने न्यूझीलंडमध्ये स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात येत नाही.’ ज्या ठिकाणी तह झाला ती वास्तू आम्ही पाहिलीच; परंतु जवळील माओरी म्युझियमलादेखील भेट दिली. तेथे माओरी कारागिरांची कलाकारी बघता आली. १६.५ टक्क्यांवर असलेल्या माओरी लोकसंख्येचा अगदी आजही न्यूझीलंड संस्कृतीवर प्रभाव टिकून आहे. वायतांगी येथील वातावरण बघताना लहान मुलांनाच काय, मोठ्यांनाही समोरच्या हिरवळीवर किती नाचू, किती बागडू असे वाटले तर नवल नाही अशी छान हिरवळ तिथे आहे. परंतु, स्थानिक गाइड दोन तासांच्या काळात एवढ्या ऐतिहासिक माहितीचा रेटा आपल्यापुढे ओततात की त्यापुढे वायतांगीचे सौंदर्य डोळ्याच्या नजरेतून पीतपीतच सारा परिसर फिरावा लागतो. वायतांगी या ऐतिहासिक स्थळाला भेट दिल्यानंतर आम्ही बे ऑफ आयलंड्सकडे जायला निघालो. 

न्यूझीलंडच्या उत्तर बेटावरील पूर्वेकडील टोकाला बे ऑफ आयलंड्स आहे. तेथील हिरव्यानिळ्या समुद्राच्या पाण्याने आमचा जीव घायाळ केला होता. त्यात समोर उभी असलेली एक आलिशान दुमजली क्रूझ समुद्राच्या लाटांवर हेंदकाळत आम्हाला जणू येताय ना? विचारीत होती! सारे क्रूझमधे आल्यावर क्रूझ जोरात सुरू झाली. न्यूझीलंडमध्ये सारे वेगात सुरू होते. मिलफोर्डसाउंड येथे क्रूझच्या रेलिंगला रेलून वेगात सुरू झालेल्या क्रूझमध्ये थंड बोचरा वारा सोसता सोसता स्वातीची आणि माझी कशी फजिती झाली होती ते आठवून आम्ही निमूट डेकवर गेलो. सभोवार नजर फिरवल्यावर एकच आनंद झाला. बेभान वारा, सभोवार प्रशांत महासागराचे हिरवेनिळे पाणी, वेगात असलेली क्रूझ, वर निरभ्र आकाश, आम्हाला साथसंगत करणारी आणखी एक क्रूझ आणि त्याच्याच जोडीला वेगाचा अतिरेक दाखवणाऱ्या, लयदार, झोकदार वळणे घेणाऱ्या छोट्या स्पीडबोट्स... हे सारे अनुभवताना आनंद अगदी टिपेला पोचला होता. थोडेसे पुढे गेल्यावर डॉल्फिन मासे साथ देऊ लागले. किनाऱ्यावर दूरवरून दृष्टिक्षेप टाकल्यास वेलबुट्टीने सजवल्यासारखा शोभिवंत किनारा परिसर दिसू लागला. खरे सांगायचे तर मन अतिप्रसन्न झाल्याने सारेच दृश्य शोभिवंत दिसू लागले. एवढ्यात भर समुद्रात अनेक जलतरणपटू, ऐन समुद्रात, कल्ला करीत असल्याचे, पाण्यात खेळत असल्याचे वेगळेच दृश्य बघायला मिळाले. त्याचवेळी वेग आणि धाडस यांचे किती वेड किवीजना आहे याची प्रचिती आली! एव्हाना आम्ही हत्तीच्या सोंडेसारख्या दिसणाऱ्या खडकाजवळ आलो. परंतु नेमकी भरती असल्याने, लाटा उसळत असल्याने कमानीसदृश दिसणाऱ्या भोकातून आमची क्रूझ पार जाऊ शकली नाही. कारण क्रूझ लाटांवर दुचकळत, हिंदकळत होती. नेढ्यातून पार जाण्यायोग्य नव्हती. बराच वेळ थांबून, सर्वांनी खूप फोटो घेतल्यावर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. वाटेत अनेक छोट्या बेटांवर प्रवासी उतरत होते. खरा प्रवास करण्याची हीसुद्धा एक रीत आम्हाला मोहवून गेली. जवळ जवळ असलेली बेटे, त्यावरील अनोखे निसर्गसौंदर्य, सभोवतालचा निसर्गरम्य परिसर, हे सारे दोन डोळ्यात आणि मनाच्या कप्प्यात साठवून, आम्ही बे ऑफ आयलंड्सचा निरोप घेतला. 

ऑकलंडला फिरण्यासारखे, बघण्यासारखे खूप आहे. मिशन बे, हार्बर पूल, पार्नेल गाव, मत्स्यालय हे सारे बघता बघता निळ्या समुद्रावर भरलेले आभाळ मन मोहित करून घेत होते. अखेर आम्ही स्काय टॉवर बघायला निघालो. दोन दिवस ऑकलंड फिरताना आमच्या राहत्या हॉटेलजवळ असलेल्या स्काय टॉवर भेटीची वेळ रात्रीची असावी आणि चमचमती ऑकलंडनगरी १०७६ फूट उंचीच्या टॉवरच्या डेकवरून बघायला मिळावी हा एक छान योगायोग त्यानिमित्ताने जुळून आला. सर्वांत उंचावरून, पारदर्शक काचेवरून चालताना, पायाखाली १०७६ फुटांवरचे दृश्य प्रथमच पाहताना उडालेला आपला थरकाप, इतरांसाठी हास्याच्या चिळकांड्या उडवणारा ठरत होता. एक-एक करून साऱ्यांनी तळ दिसणाऱ्या काचेवरून चालण्याचा अनुभव घेतला. तेथून हलू नये असे वाटत असतानादेखील डोळे पेंगू लागले होते. मध्यरात्र होऊ लागली होती. आणखी चार तासांत आम्हाला तयार होऊन परतीच्या प्रवासासाठी तयार व्हायचे असल्याने आम्ही ऑकलंड शहराला स्काय टॉवरवरूनच बायबाय केले. प्रथम सिटी हॉटेलमध्ये परतलो आणि त्यानंतर चार तासात तयार होऊन आणखी काही तासांत मायदेशी परतलो. 

मला न्यूझीलंडमधील दक्षिणेकडचा भाग खूप आवडला. तुम्हालादेखील तसेच वाटेल. खरे तर उत्तरेकडील बेटावरील स्थलदर्शन करून मग दक्षिण बेटावरील स्थलदर्शन करायला जायला हवे. परंतु, भारतात परतण्याच्या दृष्टीने सोईचे म्हणून आयोजकांना ऑकलंड सोईचे पडले असावे. खरे तर उजवे-डावे करू नये इतके न्यूझीलंडमध्ये भटकणे आवडणारे आहे. 

कसे जाल? 
    ‘क्वांटास’ची (ऑस्ट्रेलिया) विमानसेवा स्वस्तात न्यूझीलंडला नेते; परंतु प्रवासात फार वेळ लागतो. २-२ थांब्यांवर वेळ काढून आपण हैराण होऊ शकतो. त्यापेक्षा एकाच थांब्यात न्यूझीलंडला पोचवणारी विमानसेवा स्वीकारावी. 

कुठे राहाल? 
    ऑकलंड सिटी हॉटेल, १५७, हॉब्सन रस्ता, ऑकलंड. दूरध्वनी : ०९ ९२५०७७७. 
    याशिवाय तुमच्या बजेटनुसार अनेक पर्याय तेथे उपलब्ध आहेत. 

काय पाहाल? 
    वायटोमो गुहा, बे ऑफ आयलंड्स, स्काय टॉवर, मिशन बे, हार्बर पूल, पार्नेल गाव, मत्स्यालय, माउंट एडन, तमाकी ड्राइव्ह , क्वीन्स रस्ता, सिटी सेंटर, वायतांगी इत्यादी. 

कुठे आणि काय खाल? 
    इंग्रजी बोलण्यामुळे आणि आपले आवडते खाद्यपदार्थ सहज मिळत असल्यामुळे न्यूझीलंड दौऱ्यावर खाण्याची चंगळ होते. दिवसभर किवीफूड खाऊन मग भारतीय पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास किंवा रुचकर भारतीय जेवण जेवायचे असल्यास लिट्ल इंडिया रेस्टॉरंट, १९-२३, अँझाक ॲव्हेन्यू, ऑकलंड. दूरध्वनी : ०९ ३६६०७११. 
    रविझ इंडियन रेस्टॉरंट, ६१, अ, हॉब्सन रस्ता, स्काय सिटी हॉटेलसमोर, ऑकलंड. दूरध्वनी : ०९ ३०९८८००.

संबंधित बातम्या