निसर्गरम्य ब्रसेल्स

उदय ठाकूरदेसाई
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

आडवळणावर...
 

आठवून बघा... तुमच्या आजवरच्या दोन-तीन आठवड्यांच्या देशी अथवा परदेशी वारीत एक तरी ठिकाण असे असेलच, जिथे आपण - बोलीभाषेत सांगायचे, तर नावाला राहतो किंवा नुसतेच त्या ठिकाणाला भेट देऊन जातो. परंतु ते ठिकाण काही आपण विसरू शकत नाही. कॅनडा - अलास्काच्या मोठ्या दौऱ्यात ‘कॅनमोर’ हे ठिकाण असे होते. त्या दौऱ्यात, आम्ही बांफ, जास्पर बघून जास्परहून निघालो तोवर लगेच बर्फ पडायला सुरुवात झाली. ‘कॅनमोर’ गावाजवळ येईपर्यंत अक्षरशः हीटरने गरम झालेल्या बसमधून बाहेर बर्फवृष्टी होतानाचा (भयप्रद) खेळ बघत प्रवास कसा संपला ते त्यावेळी कळलेच नव्हते! अतिगारठलेल्या अवस्थेत कॅनमोर या गावी येऊन हॉटेलरुमवर विसावलो; तोच दुसऱ्या दिवशी पहाटे निघून कॅनमोरवरून कॅलगॅरी विमानतळावर जाण्यासाठी निघायचे असल्याने सर्व सामानाची आवराआवर करून सारे प्रवासी हॉटेललॉबीत भेटेपर्यंत बाहेर अंधार पडू लागला होता. पोटात कावळे ओरडू लागले होते. मुख्य म्हणजे कॅनमोर हे चिमुकले गाव बघायला न मिळाल्यामुळे खूप खूप वाईट वाटत होते. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे पुन्हा एकदा अफाट बर्फवृष्टीतून अगदी कॅलगॅरी विमानतळ येईपर्यंत गोठून, थिजून गेलेल्या आम्हाला कधी एकदा बसबाहेर पडून सूर्यकिरणे अंगावर घेतो असे झाले होते. आजही हे सारे लख्ख आठवते कारण त्यावेळी आम्ही छानशा टुमदार कॅनमोरमधे, बांफ, जास्परमधे जसे भटकलो होतो तसे भटकू शकलो नव्हतो. 

मला विचाराल तर अशी सुंदर, निवांत ठिकाणे मनात अगदी घर करून राहतात. असाच आणखी एक प्रवास पहिल्या मोठ्या युरोप दौऱ्यादरम्यान झाला. त्यावेळी पॅरिसहून (फ्रान्स) निघून, ब्रसेल्स (बेल्जियम) बघून, इंधोवेन (हॉलंड) येथे मुक्कामाला थांबलो होतो. त्या प्रवासाचे स्मरण झाले. त्या प्रवासात बरेच काही पाहिले. बरेच काही घडले आणि त्यामुळे तो प्रवास चांगलाच लक्षात राहिला. आज त्याबद्दलच बोलायचे आहे. 

पॅरिस-ब्रसेल्स-इंधोवेन प्रवासाची सुरुवात मोठी विलक्षण होती. आदल्या रात्री पॅरिसमध्ये बरोब्बर १२ वाजता प्रकाशमान झालेला आयफेल टॉवर बघितला. तेथील अतिथंड वातावरणात स्थिर, शांत राहून बघणे कठीण होते तरी भरपूर फोटो काढले. मग सारेजण एकत्र येण्याची वाट बघत बसलो. बसमधे अंग ठेवताच झोप लागली. अर्धवट झोपेतच बसमधून उठून हॉटेलरुम गाठली व गडद झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर, पॅरिस शहराबाहेरचे अतिस्वच्छ राहते हॉटेल सोडताना, ‘इतकी स्वच्छता कशी काय पाळता येते?’ असा प्रश्न पडणारी स्वच्छता पाहून, शहाणी सकाळ मन स्वच्छ करून गेली. 

आमच्या बसचा इंग्रजी न समजणारा इटालियन चक्रधर नजरेनेच ‘चला. बसमधे बसा’ म्हणू लागल्यावर एक-एक करून सारेजण बसमधे बसू लागले. आम्ही ब्रसेल्सच्या वाटेला लागलो... 

रस्त्याच्या दुतर्फा एकएक अप्रतिम निसर्गदृश्ये दिसू लागली. त्यामुळे काहीजण खिडकीबाहेर बघताहेत. काहीजण बसमध्ये खाऊ नका असे सांगूनसुद्धा हळूच खाताहेत. काही हलकेच वामकुक्षी घेताहेत हे पाहिल्यावर सर्वांना सदा तरतरीत ठेवण्यावर कटाक्ष असणाऱ्या गाइडने माईक आणि सूत्रे आपल्या हातात घेऊन अखंड माहितीचा स्रोत चालू ठेवला. गाइड म्हणाला, ‘ब्रसेल्सच्या वाटेवर तुम्हाला अप्रतिम नजारा बघायला मिळेल. विनोदाने सांगायचे तर इथल्या मातीच्या कणाकणात काचेचे अंश आहेत जणू! ब्रसेल्समध्ये तुम्हाला काचेच्या खूपच इमारती बघायला मिळतील...’ असे सांगत त्याने खरोखरच महत्त्वाची माहिती सांगायला सुरुवात केली. गाइड म्हणाला, ‘ब्रसेल्समध्ये अनेक महत्त्वाच्या जागतिक संस्थांची मुख्य कार्यालये आहेत. ब्रसेल्सजवळ १५ किलोमीटरवरील ‘वॉटर्लू’ येथे नेपोलियनचा पराभव झाला. बिग बॅंग थिअरी ही बेल्जियमची जगाला देन आहे. युरोपातली पहिली भव्य इमारत बेल्जियममधीलच. स्कँडेव्हेनियन भूभाग सोडला, तर युरोपात सर्वाधिक कर लावणारा देश बेल्जियमच आहे. गे/लेस्बियन यांच्यातील लग्नाचे स्वातंत्र्य देणाऱ्या बेल्जियममध्ये घटस्फोटाचे प्रमाण खूप आहे, हे वेगळे सांगायलाच नको. येथील चॉकलेट्स जगप्रसिद्ध आहेत. ती अप्रतिम चॉकलेट्स करण्याची सुरुवात बेल्जियममधे ४०० वर्षांपूर्वी सुरू झाली, हे ऐकून तुम्ही चाट पडाल.’ आम्ही खरोखरीच चाट पडलो. 

बेल्जियम हा देश १८३० मध्ये डच लोकांकडून स्वतंत्र झाला हे माहित होते; परंतु फ्रेंच-डच-जर्मन या कडबोळ्यात तो असा काही संमिश्र बनून गेलाय, की काही विचारता सोय नाही. आम्हाला मजा दुसऱ्या एका कारणासाठीदेखील वाटत होती. मुंबईहून कसाऱ्याला जायला, म्हणजे १०५ किलोमीटर अंतर कापायला पद्धतशीर अडीच तास अधिकृतरीत्या लागतात आणि सिग्नल्स लागले तर तीन तासांचा कालावधी हा सर्वमान्य धरला जातो. इथे आम्ही सकाळी पॅरिस (फ्रान्स) सोडून सव्वा तीन तासांत ब्रसेल्सला (बेल्जियम) म्हणजे एक देश सोडून चक्क दुसऱ्या देशात, ३५० किलोमीटरचे अंतर पार करून पोचणार होतो! त्यावरही कडी म्हणजे बेल्जियम या देशातील सारी महत्त्वाची ठिकाणे पाहून चक्क तिसऱ्या देशात रात्रीच्या मुक्कामासाठी थांबणार होतो. युरोपच्या पहिल्याच वारीचा प्रवास असल्याने सुरुवातीला अप्रूप वाटले. पुढील ३-४ युरोप वाऱ्यांत सारे दळणवळण अंगवळणी पडले. यादरम्यान एक मजेची गोष्ट घडली. बस सतत सव्वातीन तास न थांबता चालू असल्याने, बसमधील प्रवाशांची चुळबुळ वाढली. ब्रसेल्स शहरात आल्यावर थांबायचे ठिकाण इटालियन चक्रधराला समजत नसल्याने गाइडवरचे दडपण वाढले. गाइडचे इंग्रजी चक्रधराला समजेना. चक्रधरांची इटालियन भाषा गाइडला समजेना. त्यामुळे बसमध्ये अगोदरच वाढलेली चुळबुळ चरमसीमेला जाऊन पोचली. जीपीएसवर इतके अवलंबून कशाला? असा उफराटा न्याय विचारण्यात येऊ लागला. सुदैवाने अखेर बस थांबवण्याची जागा सापडली. 

आता ब्रसेल्समध्ये निवांत ३-४ तास फिरायचे होते. समोरच ॲटोमियमची देखणी कलाकृती खुणावत होती. अणूच्या अद्‍भुत क्षमतेचा शांततामय पद्धतीने पुरस्कार करण्यासाठी म्हणून दुसऱ्या महायुद्धाच्या संहारानंतर अवघ्या १३ वर्षांनी भरलेल्या जागतिक प्रदर्शनात बेल्जियमकडून मांडल्या गेलेल्या ॲटोमियम या कलाकृतीने साऱ्या जगाचे लक्ष कलाकृतीवर खिळवून ठेवले. प्रदर्शन संपल्यावर लोकाग्रहास्तव ते कायमचे तिथेच ठेवण्यात आले. आज दरवर्षी ६-७ लाख लोक ॲटोमियमला भेट देतात. 

जवळच असलेल्या मिनी युरोप पार्कला भेट देण्यासाठी तुम्ही अगदी उत्सुक असता आणि या बागेत फिरताना तुमच्या चेहऱ्यावर कुठलीही निराशा म्हणून शिल्लक राहात नाही. लंडनचे बिग बेन, इटलीमधील पिसाचा मनोरा, अगदी साऱ्या साऱ्या म्हणजे जवळपास ८० देशांच्या ३५० वास्तूंची रूपे चिमुकल्या गोंडस स्वरूपात तुम्हाला बघायला मिळतात. अगदी डीएचएलची गाडी आणि बोगद्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनसकट दिसणारा नजारा काही क्षण तरी तुम्हाला कालचक्रात गरगरवून टाकतो. साऱ्यांच्याच आवडीचा विषय असलेल्या या बागेत वेळ कसा जातो हे खरोखरीच कळत नाही. 

त्यानंतर अनेक मुख्य इमारती, काचेच्या इमारती, बघत आपण जवळच असलेल्या ग्रँड प्लेसपाशी येतो. या चौकातल्या अफाट मोकळ्या जागेवर बऱ्याच वेळा फुलांनी आरास करून चौक सजवलेला असतो. आम्ही गेलो तेव्हा तो चौक मोकळाच होता. त्यामुळे आम्हाला फोटो काढत सुशेगात फिरता आले. बाजूलाच टाऊन हॉल म्युझियमच्या इमारती बघता बघता गाइडकडून आग, होरपळ, रक्तरंजित क्रांत्यांचा साक्षीदार असलेल्या या चौकाबद्दल अनेक कहाण्या ऐकायला मिळाल्या. अगदी आजही स्थलांतरितांचा प्रमुख थांबा असलेल्या या ठिकाणाचे सांस्कृतिक महत्त्व फारच असल्याचे जाणवले. 

अखेर सुसु करणाऱ्या बालकाच्या पुतळ्याकडे आलो तेव्हा माहोल अर्थातच चेष्टेखोर बनला. मेनाकिन पिस या प्रतिकृतीकडे बघताना, ‘यांच्या (बेल्जियन लोकांच्या) डोक्यातून काय निघेल ते सांगता येत नाही’ इथपासून ‘आणखीन काही दाखवण्यासारखे नाही का?’ असे म्हणण्यापर्यंत भारतीयांची मजल गेल्यावर गाइड म्हणाला, ‘मूळ शिल्प म्युझियममध्ये ठेवले आहे. हा पुतळा बेल्जियम लोकांच्या विनोदबुद्धीचा नमुना आहे.’ त्यानंतर सारेजण चॉकलेट खरेदीकडे वळले. चॉकलेटच्या दुकानातील तोपर्यंतचा शांत माहोलगोंगाटाने गजबजला. असंख्य तऱ्हेची चॉकलेट्स पाहून अनेक किलो चॉकलेट्स विकत घेणे झाले. यापुढच्या गमतीचा भाग असा की फारच थोड्या लोकांना बेल्जियन चॉकलेट्स ही १८ अंश सें.ग्रे. पुढच्या वातावरणात चटकन विरघळतात हे माहिती होते. त्यामुळे चॉकलेट्सची नीट तजवीज करून न ठेवणाऱ्यांना दोहा (कतार) येथील ५० अंश सें.ग्रे.च्या वातावरणात आणि मुंबईच्या मे महिन्यातील उकाड्यामुळे, रंग, आकार बदललेली चॉकलेट्‌स घेऊन जावी लागली. 

खरेदी उरकल्यावर, ग्रँड प्लेसपाशी एकत्र जमल्यावर साऱ्यांना बसमधे परतायची घाई झाली. बसमध्ये बसल्यावर पुन्हा एकदा रस्त्याच्या दुतर्फा अप्रतिम निसर्गचित्रे बघत आम्ही इंधोवेन या अप्रतिम निसर्गरम्य गावात, एका चांगल्या हॉटेलच्या विस्तीर्ण अशा, हल्लीच्या लोकप्रिय भाषेत अप्रतिम प्रॉपर्टी मधे जाऊन विसावलो.

पॅरिसहून निघून हॉलंडच्या वाटेवरील ब्रसेल्स आम्ही ४-५ तासांत सोडले खरे; परंतु आठवणींच्या कप्प्यात मात्र ब्रसेल्स अगदी आरपार जाऊन बसले.

कसे जाल? 
पॅरिसवरून सव्वातीन तासात किंवा ॲमस्टरडॅमवरूनही अवघ्या अडीच - तीन तासांवर ब्रसेल्स आहे. 

कुठे राहाल? 
तुमच्या बजेटनुसार राहण्यासाठी सर्व तऱ्हेची हॉटेल्स उपलब्ध आहेत. असे असले तरी बहुसंख्य एका थांब्यापुरताच या ठिकाणाचा विचार करतात. वास्तविक ब्रुग, घेंट, अँटवर्प ही शहरेदेखील बघण्यासारखी आहेत. परंतु राजधानीचे ब्रसेल्स विशेष लोकप्रिय आहे. 

काय खाल? 

  • फ्राईज, वॉफल्स, चॉकलेट्स हे तर खास बेल्जियम पदार्थ. 
  • बिअरप्रेमींसाठी तर बेल्जियम स्वप्नवत ठिकाण आहे. 
  • जे अस्सल मांसाहारी आहेत त्यांना अतिविक्षिप्त वाटू शकणाऱ्या डिशेस येथे खाता येतील. 

काय पाहाल? 
ग्रँड प्लेस, मेनाकिन पिस, ॲटोमियम, मिनी युरोप, अनेक जागतिक संस्थांच्या महत्त्वाच्या प्रमुख इमारती इत्यादी.

संबंधित बातम्या