कर्नाटकातील सागरतीरी... 

उदय ठाकूरदेसाई
सोमवार, 16 डिसेंबर 2019

आडवळणावर...
 

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीची चाहूल लागली, की ‘लॉंग ड्राइव्ह’ला जाण्याचे वेध लागतात. थोड्या आडवळणावरची ठिकाणं बघण्याचे बेत आखले जाऊ लागतात. परंतु निघायचं कसं? कुणाबरोबर? हे नक्की असलं आणि महत्त्वाचं म्हणजे ते आपण अमलात आणू शकलो, तर मोठी टूर आटोपशीर करता येऊ शकते. कोस्टल कर्नाटकला अचानक जायचं ठरलं तेव्हा स्वाती, मी आणि मेघना अशा तिघांनीच गाडीनं जायचं ठरलं. चक्रधर ज्योतिबाला म्हटलं, ‘अवघ्या चार दिवसांच्या जोडून आलेल्या सुटीत आपल्याला मोठा पल्ला गाठायचा आहे, तेव्हा पूर्ण तयारीनिशी वेळेवर एकएक टप्पा गाठत जाऊया...’ 

सहा डिसेंबरला सकाळी सहा वाजता आम्ही मुंबईहून जे सुसाट निघालो ते तडक साडेतीन तासांनी साताऱ्याला नाश्ता करायला थांबलो. दुपारी एक वाजता बेळगावला जेवून कर्नाटक राज्यात शिरताना विस्तीर्ण महामार्गावरून भन्नाट वेगात निपाणी, धारवाड पाठी टाकीत हुबळीजवळ आल्यावर ज्योतिबा म्हणाला, ‘आता उड्डाणपूल न चढता डावीकडून यु टर्न घेऊन आडव्या रस्त्यानं अंकोल्याला गेलो, की मग मुर्डेश्वरला सहज मुक्कामाला जाता येईल.’ अशा रीतीनं आम्ही हुबळी-अंकोला या आडवाटेला लागलो. अतिशय खराब रस्त्यामुळं, वेळेवर पोचण्याच्या दडपणापेक्षासुद्धा नवी गाडी खराब होईल या चिंतेनंच चक्रधर ज्योतिबा धास्तावलेला होता. सूर्य अस्ताला जायच्या बेतात होता. ओळखीच्या खाणाखुणा अर्थातच बिलकूल दिसत-समजत नव्हत्या. अशा परिस्थितीत आमचा धीर सुटायच्या आत अंकोला रोडच्या कोपऱ्यावरील ‘कामत हॉटेल’ दिसलं आणि अंकोल्याला पोचल्याच्या आनंदात इडली-डोसा-कॉफीचा समाचार घेऊन पुढं मुर्डेश्वरच्या रस्त्याला लागलो. एव्हाना संध्याकाळचे सात वाजले होते. आणखी अडीच तासांचं अंतर (खराब रस्त्यांमुळं) पार करून रात्री साडे नऊ वाजता मुर्डेश्वरला पोचलो तेव्हा काय आनंद झाला! ऐन समुद्रातल्या नवीन बीच रिसॉर्टमध्ये जेवलो, तेव्हा दिवसभराचा थकवा दूर झाला. आरामदायी हॉटेलरुमवर जाऊन झोपलो, तेव्हा उद्या सकाळी निसर्गाचं कोणतं रूप पाहायला मिळणार आहे, याची त्यावेळी आम्हाला पुसटशीदेखील कल्पना नव्हती. 

सकाळी उठल्यावर डोळे उघडताक्षणी झालेल्या समुद्रदर्शनानं आम्हा साऱ्यांना आनंदित व्हायला झालं. चटकन बाल्कनी गाठून जो तो चहा पिता पिता, समुद्राचं प्रभातदर्शन करू लागला. वरून इतरही नजारा दृष्टीस पडत होता. ‘मॉर्निंग वॉक’ करणारे टुरिस्ट, अचूक मासे टिपणारे सीगल, डोक्यावर माश्यांच्या पाट्या घेऊन जाणाऱ्या कोळिणी, लडिवाळपणं किनारा गाठणाऱ्या सुकुमार लाटा आणि त्यांच्याशी चेष्टा करू पाहणाऱ्या छोट्या छोट्या रंगीबेरंगी होड्या! एखाद्या चित्रपटातील दृश्य बघावे तसे आम्ही एकटक समोरच्या नजाऱ्याकडं पाहत राहिलो. 

परंतु वेळ घालवून चालणारं नव्हतं. आंघोळी उरकून, आम्ही शंकराच्या भल्यामोठ्या मूर्तीला जवळून निरखलं. गोपुर, मंदिर, मंदिरापाठाच्या विजयनगर साम्राज्याच्या खुणा पाहिल्या. संपूर्ण मंदिर परिसर फिरून १२३ फुटी भव्य मूर्तीची छायाचित्रं घेतली. इडली-डोश्याच्या राज्यातील आवडती पोटपूजा करून जोग धबधब्याकडं निघायच्या तयारीला लागलो. 

मुर्डेश्वर-होनावर हा सरळ मार्ग सोडून सिर्सीच्या जंगल रस्त्याला लागलो, की आपला वळणदार लयीत प्रवास सुरू होतो. गुंडीबाल गावाजवळ उडीनबाल पूल पार केल्यावर टुमदार घरांच्या बाजूनं जाणारा वळणदार रस्ता आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या नारळी-पोफळींनी आणि गावातून जाणाऱ्या शांत वाहणाऱ्या नदीनं, धावपळ-गडबड न करणाऱ्या शांत गावकऱ्यांना तृप्तीचं वरदानच दिलं होतं जणू! 

एका दुमजली घराच्या रस्त्याला समांतर असणाऱ्या वरच्या मजल्यावर, पत्र्याच्या छपरावर वाळत घातलेल्या सुपाऱ्यांचं दृश्य बघून ‘दापोलीत असंच तर चित्र असतं’ असं म्हणत आम्ही पुढं निघालो. वाहणारी नदी, त्यावर कललेली माडांची झाडं, हिरवागार शांत परिसर आम्हाला लगेच पुढं जाऊ देईना! समोर दिसणारं निसर्गाचं सारं सौंदर्य डोळ्यांनी पिऊन, कॅमेऱ्यात साठवूनसुद्धा पावलं पुढं जाईनात.. तेवढ्यात एक गावकरी भलाथोरला मोठ्ठा असा फ्लॉवर घेऊन चालला होता. त्यामुळं त्याचं एक छोटंसं फोटोसेशन आटोपून आम्ही गाडीत बसलो. वळणदार लयीत जोग धबधब्याच्या दिशेनं आमचा प्रवास पुढं सुरू झाला. आम्ही टळटळीत दुपारी जोग धबधब्यावर जाऊन पोचलो होतो. राजा, राणी आणि राजकुमार अशा तीन धारांत जोग धबधबा कोसळत होता. भर पावसात तीन धबधब्यांच्या मीलनानं एकत्रितपणे कोसळणारा धबधबा किती अजस्रपणे कोसळत असेल या कल्पनेनंसुद्धा मजा आली. दुपारच्या शुष्क वेळात आमचा वेळ अगदीच काही निरास गेला नाही; कारण निसर्गानं त्या तीन धबधब्यांत एक इंद्रधनुष्य सोडून अशी काही मौज आणली होती की बस्स! भर दुपारीदेखील ते दृश्य आमच्यासाठी अगदी खास होऊन गेलं. सावली-सावलीतून परिसर फिरत दोन तास सहज निघून गेले. जास्त रमण्यात अर्थ नव्हता.

आम्हाला उडपी गाठायचं होतं. पुन्हा वळणदार रस्त्यानं होनावरला येऊन मंगलोर महामार्गाला लागलो आणि मग भटकळ, मरवंथे, कुंदा अशी छान छान गावं मागं टाकत आम्ही उडपी येथील ‘करवली’ हॉटेलात आमचं सामान ठेवून सहा किलोमीटरवरील मालपे गावच्या समुद्रकिनारी सूर्यास्त बघायला निघालो. 

मालपेमधील सूर्यास्ताचा नजारा जरी चांगला असला, तरी समुद्र शांत असल्यानं आणि किनाऱ्यावर वर्दळ नसल्यानं अबोल, अंतर्मुख करणारा तेथील अनुभव ठरला. अंधार पडताच आम्ही उडपी गावात आलो. गावात कृष्ण मंदिराजवळ बरीच लगबग सुरू होती. मंदिराजवळच्या मित्र समाज या खानावळीत लसूण आणि कांद्याशिवाय मिळणाऱ्या अतिअल्प किमतीतल्या रसम-सांबार-भाताची चव चाखून आणि इरावती हॉटेलातल्या चमचमीत माशांची चव चाखून चिमुकल्या उडपी गावातील उत्सव पाहात राहिलो. सजवलेला रथ, रथापुढची सोंगं आणि पंचारती-धुपारतीसह बेभान झालेला माहोल बघण्यात बरीच मजा आली. एकंदरीत दोन दिवसातील फिरण्यात, चिमुकल्या मुर्डेश्वरचा कायापालट कसा झाला? अनेक दंतकथांनी इथला परिसर कसा बांधून ठेवला आहे? उडप्यांची खाद्यसंस्कृती कशी फोफावत गेली? अशा कितीतरी गोष्टी कानावर सहज पडत गेल्या. 

तिसऱ्या दिवशी सकाळी लवकर उडपी सोडल्यावर मरवंथेच्या सागरतीरी पांढऱ्या वाळूवरून चालत राहिलो. मरवंथेची एक गंमत आहे. एका बाजूला अरबी समुद्र, दुसऱ्या बाजूला सुपर्णिका नदी आणि दोन्हीमधून जाणारा मंगलोर महामार्ग! महामार्गाच्या दोन्हीही बाजूचं मिळून एकसंध चित्र बघताना खूप छान वाटतं. इतकं अद्‍भुत दृश्य क्वचितच पाहायला मिळतं. 

मरवंथेवरून गोकर्णला जाताना दुपार झाली. तरीसुद्धा किनाऱ्यावरून फिरणं, गाव भटकणं झालंच! परदेशी पर्यटक, भटजी, गावकरी यांच्या संमिश्र संवादांच्या पार्श्वभूमीवर आम्हा तिघांमध्ये बोलायला भरपूर काही मिळालं. गोकर्णहून पुढं अंकोल्याला गेल्यावर दोन भटजी मराठीत बोलत असलेले पाहून मजा वाटली. अंकोल्याहून गोव्याच्या रस्त्याला लागल्यावर मात्र परतीचे वेध लागले. वाटंत कारवारचा अप्रतिम उसळता किनारा आमचं भान हरपवून गेला. सूर्यास्त होत असतानाच्या कातरवेळी कारवारचा उचंबळणारा समुद्र मनात कालवाकालव करून गेला. रात्री गोव्यात जेवून रात्रीच्या मुक्कामासाठी खारेपाटणच्या महामार्गावरील वळणावरील हॉटेल मधुबनमध्ये थांबलो. 

खारेपाटणजवळचं वायंगणी हे माझं गाव आणि गावानिकट असलेलं वास्तव्य त्यानिमित्तानं जमवून आणलं. मधुबन हॉटेलच्या बाजूला असलेल्या पुलाचंदेखील एक छायाचित्र घ्यावं असं दीर्घकाळ मनात होतं. त्यानिमित्तानंदेखील खारेपाटणला थांबलो होतो. दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी सकाळी उठून पुलाची छायाचित्रं घेतली. नाश्ता करून आम्ही मुंबईच्या मार्गाला लागलो. 

या संपूर्ण प्रवासाची गंमत अशी, की वाटेत अनेक मित्रमैत्रिणींची सुंदर गावं लागली. त्या गावांच्या नावावरून त्या साऱ्यांची आठवण आली. उदाहरणार्थ, वाटेत धारवाडला जी. ए. च्या बरोबरीनं अविनाशची, आंबडसला मीनाची, नेरुरला शिरीषची, अंकोल्याला अमिताची, गोकर्णला प्रियाची, होनावरला माधुरीची आठवण आली. नेहमीच्या प्रवासाबरोबर सर्वांच्या बरोबरीनं मनाचाही प्रवास झाला. आमच्यासाठी तोदेखील महत्त्वाचा!

कोस्टल कर्नाटक 
कारवारचा उसळता समुद्र आणि मरवंथेचा देखणा समुद्रकिनारा वगळल्यास इतर ठिकाणचे समुद्र ओहोटी असल्यानं निस्तेज वाटले. आम्ही केवळ चार दिवसांसाठीच गेलो होतो; परंतु ज्यांच्याजवळ सुटीचे अधिक दिवस असतील त्यांनी सिरसी आणि दांडेलीच्या अभयारण्याला जरूर भेट दिली पाहिजे. खाण्यापिण्याची चंगळ असणाऱ्या कर्नाटकातील साधी  टुमदार घरं आणि उत्कृष्ट निसर्ग मनाला भुरळ घालतो. 
डिसेंबर ते फेब्रुवारी हा काळ कर्नाटकाच्या सागरी तटानं फिaरताना अधिक आल्हाददायक वाटावा. मासे आवडणाऱ्यांना तर या विभागात फेरी मारल्याचा विशेष आनंद होईल. 
घुमक्कडांनी तर कोकणात गाडी घेऊन गेल्यास थोडं पुढं कारवार, उडपी, मंगलोर इथंदेखील जाण्यासारखं आहे.

कसे जाल? 
    मुंबई/पुणे - कोल्हापूर, बेळगाव, धारवाड, हुबळी, अंकोला, मुर्डेश्वर, जोग, भटकळ, उडपी, मालपे, मरवंथे, भटकळ, कुमठा, गोकर्ण, अंकोला, कारवार, सावंतवाडी, खारेपाटण, महाड - मुंबई/पुणे. 

कुठे राहाल? 

  • मुर्डेश्वर - नवीन बीच रिसॉर्ट, आरएनएस यात्रीनिवास, मुर्डेश्वर गेस्ट हाऊस. 
  • उडपी - हॉटेल करवली. 
  • खारेपाटण - हॉटेल मधुबन. 

कुठे आणि काय खाल? 

  • मुर्डेश्वरच्या नवीन बीच रिसॉर्टच्या रेस्टॉरंटमध्ये इडली-डोसा वगैरे पदार्थ समुद्राच्या सान्निध्यात बसून खाताना मजा येईल. 
  • उडपीचे हॉटेल करवली उत्तम आहे. 
  • सहज मजा म्हणून किंवा सर्वांत स्वस्त जेवण आणि सांबार-रसम-भात यांची मजा चाखायची असेल, तर मित्र समाज येथील खानावळीला भेट देणे हे तुम्हाला आवडून जाईल. 

गंभीर आणि गमतीदार 

  • कारवारमधून काली नदी वाहते. 
  • गोकर्ण इथं शंकराचं आत्मलिंग गाईच्या कानाच्या आकाराचं आहे म्हणून या विभागाचं नाव गोकर्ण असे पडले. 
  • भटकळमधील बरेचसे लोक कामानिमित्त दुबईला असल्यानं भटकळला ‘मिनी दुबई’ म्हणतात. 
  • रवींद्रनाथांनी पहिलं नाटक कारवारच्या किनाऱ्यावर लिहिलं असं म्हणतात. 

प्रवासादरम्यानचं अंतर (किलोमीटरमध्ये) 
मुंबई - कोल्हापूर = ४००. 
होनावर - जोग = ६१. 
उडपी - गोवा = ३१८. 
उडपी - खारेपाटण = ५००. 
मुंबई - मुर्डेश्वर = ८३१. 
मुर्डेश्वर - जोग = ९०. 
मुर्डेश्वर - उडपी = ११६. 
खारेपाटण - कर्नाळा = ३६२. 
कारवार - गोकर्ण = ६०. 
कारवार - सिरसी = ४०. 
मंगलोर - उडपी = ५९.

संबंधित बातम्या