उपयुक्त गॅजेट्स

समृद्धी धायगुडे
सोमवार, 24 जून 2019

ॲक्‍सेसरीज
 

पर्यटन म्हटल्यावर त्यात विविध प्रकार येतात. पर्यटनाच्या प्रकारांप्रमाणेच त्यासाठी येणाऱ्या ॲक्‍सेसरीजदेखील बदलतात. काही बेसिक ॲक्‍सेसरीज जरी त्याच असल्या, तरी स्मार्ट पॅकेजिंगसाठी अत्याधुनिक वस्तूंचा शोध लागला आहे. या वापरून तुमचे साहस पर्यटन निश्‍चितच संस्मरणीय आणि सुसह्य करू शकता. साहसी पर्यटनातून आपला आत्मविश्वास वाढतो. असे पर्यटन तेव्हाच होऊ शकते, जेव्हा तुमची साहसी पर्यटनाची तयारी एकदम आटोपशीर आणि उत्तम असते. साहसी पर्यटनात पॅकिंग महत्त्वाचे असते. यासाठी बाजारात आलेल्या काही स्मार्ट गोष्टींची थोडक्‍यात माहिती घेऊ...

स्पेस सेव्हर : पर्यटनासाठी बॅग भरताना आणि साहसी पर्यटनासाठी बॅग भरताना या दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक आहे. साहसी पर्यटन करताना आपला भार आणि आपल्या सामानाचा भार आपल्यालाच सांभाळून चढाई करावी लागते. त्यामुळे कमीत-कमी सामान भरण्यासाठी जागा वाचविणाऱ्या काही बॅग्ज बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये बॉटम लेस असे या बॅगचे स्वरूप असते. या बॅगची एकदा चेन लावली, की त्याचे आटोपशीर स्वरूप आपल्या लक्षात येते. यामध्ये एक ड्रेस, पाण्याची बाटली, अजून दोन ॲक्‍सेसरीज सहज मावतात आणि ही बॅग उगाच बोजड होत नाही.

सोलार किट : आपल्यासोबत असलेली मोजकी गॅजेट्‌स बाहेर पडल्यानंतर सौर ऊर्जेवर चार्ज करता येतात. त्यासाठी एक संपूर्ण किट बाजारात उपलब्ध आहे. हे फोल्डेबल असून एखाद्या ठिकाणी तुम्ही जास्तवेळ थांबलात, तर तिथे पसरून त्यावर मोबाईल किंवा कॅमेरा, प्युरिफायर, इयरफोनसारखी गॅजेट्‌स सहज चार्ज करू शकता.

पोर्टेबल वॉटर प्युरिफायर : साहसी पर्यटन म्हटल्यावर कुठेही पाण्याची गरज भासू शकते. प्रत्येकवेळी बरोबर घेतलेले पाणी आपल्याला पुरेसे होईलच असे नाही. एखाद्यावेळी वाहते किंवा साठलेले पाणी प्यायचीही वेळ येऊ शकते. तर ते पाणी तसेच न पिता ते थोडे प्युरीफाय करून घेतले तर आरोग्याला त्याचा त्रास होणार नाही. यासाठी पेनाच्या आकाराचा छोटा प्युरिफायर मिळतो. जो आपण सहज सांभाळू शकतो. हा यूएसबीवरदेखील चार्ज करता येतो. काही प्युरिफायर्स एकदा चार्ज केल्यावर ४० लिटर पाणी प्युरीफाय करू शकतात.

बॅकपॅक स्नॅप स्ट्रॅप : कधी-कधी आपले सामान थोडे जास्त झाले, की त्या बॅकपॅकचे बेल्टस लागत नाही किंवा घट्ट बसत नाहीत. एखाद्यावेळी रोलरला गुंडायला दोरी मिळत नाही. अशावेळी हे बॅकपॅक स्नॅप स्ट्रॅप उपयोगी पडते. याचा तुमच्या पुरवणी साहित्यात नक्की समावेश करा. यामुळे अतिरिक्त सामान सहज कॅरी करता येते.

स्मार्ट वॉच : हे घड्याळ फक्त वेळ सांगत नाही, तर याला जीपीएसदेखील असते. त्यामुळे तुमचे हायकिंग, रनिंग, सायकलिंग, स्वीमिंग या सर्व क्रिया एका ॲपमध्ये सेव्ह होतात. याशिवाय तुम्ही घेतलेली विश्रांतीदेखील यात ट्रॅक करता येते. अर्थातच साहसी पर्यटनासाठी हे घड्याळ असल्याने ते वॉटरप्रूफ आहे.

वॉटरप्रूफ स्मार्टफोन केस : पर्यटन कोणतेही असो त्याच्या आठवणी जर आपल्या स्मार्टफोनमध्ये टिपल्या नाही, तर नवलच. साहसी पर्यटन पाण्याखालीपण केले जाते. तेथील आठवणी टिपण्यासाठी स्मार्टफोन तर हवाच पण वॉटरप्रूफ केससोबत. नामांकित ब्रॅंडच्या उत्तम केसेस बाजारात आल्या आहेत. यातील आपल्या स्मार्टफोनला बसेल अशी निवडून बिनधास्त मोबाईल कॅरी करा.

सेन्सिटिव्ह लाइट : तुम्हाला साहसी पर्यटन करताना हात मोकळे ठेवावे लागतात. अशावेळी तुम्ही हा नवीन हेडलॅम्प जरूर ट्राय करा. हा वर-खाली तसेच धुळीमध्येही तितक्‍याच क्षमतेने प्रकाश देतो. त्याचा ब्राइटनेस गरजेनुसार कमी जास्त करता येतो.

कॅमेरा : तुम्ही करत असलेल्या प्रत्येक साहसी पर्यटनाच्या आठवणी टिपण्यासाठी एक परिपूर्ण कॅमेऱ्याची गरज असते. कारण हजार शब्दांत जे मांडले जाते ते एका छायाचित्रातूनदेखील सांगता येते. यासाठी एका नामांकित कंपनीचा पॉवर शॉट हा पॉकेट फ्रेंडली, वॉटरप्रूफ शिवाय जीपीएस ट्रॅकर असलेला कॅमेरा आहे. अतिथंड वातावरणात गेल्यानंतरही नुसत्या फिंगर प्रिंटने ऑपरेट करता येतो. हा कॅमेरा तुम्हाला आकाशात, जमिनीवर, पाण्याखाली, बर्फात सगळ्या साहसी पर्यटनात उत्तम साथीदार ठरेल. 

मोशन रिलीफ रिस्ट बॅंड : साहसी पर्यटन म्हटल्यावर थोडी दुखापत, अवघडणे, क्रॅम्प येणे अशा अडचणींना पार करण्यासाठी तुमच्या मेडिकल किटमध्ये हा एक बॅंड ठेवावा. मनगटावर जोर आल्यास हा हाताला गुंडाळून तुम्ही आरामदायी चढाई करू शकता. शिवाय हा बॅंड वॉटरप्रूफ असून पाण्याखालीदेखील सहज वापरू शकता.

छोटी सुरी : खिशातील पाकीटापेक्षा लहान अशा केसमध्ये ही छोटी सुरी असते. याचा वापर तुम्ही हायकिंग करताना, जंगलात फिरताना सगळीकडेच करू शकता. एखादे फळ कापण्यापासून ते दोरी तोडण्यापर्यंत याचा उपयोग होतो. याला स्टेनलेस स्टीलचे १.७५ इंचाचे ब्लेड असते.

वरील सर्व ॲक्‍सेसरीज तुम्ही इतर महत्त्वाच्या वस्तूंबरोबर ठेवू शकता. कारण साहसी पर्यटन म्हणजे प्रत्येकवेळी नवी आव्हाने, नव्या दिशा आणि कदाचित तुमची ॲक्‍सेसरीजची गरजदेखील बदलू शकते. त्यामुळे पर्यटनाला जाण्यापूर्वी एक चेक लिस्ट करून त्याप्रमाणे साहित्य न्यावे आणि सुखरूप परत यावे.

संबंधित बातम्या