पावसातले भटकणे... 

आनंद केंजळे
सोमवार, 24 जून 2019

पावसाळा ट्रेक
 

पावसाळा म्हणजे आमच्यासारख्या भटक्‍यांना वरदानच! निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेल्या अशा काही ठिकाणी जायलाच हवे. 

कळसूबाई-भंडारदरा 
कळसूबाई हे नगर जिल्ह्यात वसलेले महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर आहे. दुर्गप्रेमी वर्षभर या ठिकाणी जातच असतात, पण पावसाळ्यात या कळसूबाईचे रौद्र तसेच मनमोहक रूप पाहायला मिळते. ढगातून चालणे काय असते, याचा प्रत्यक्ष अनुभव येथे आल्यावरच मिळतो. कळसूबाई भंडारदऱ्याजवळ आहे. येथील ब्रिटिशकालीन विल्सन डॅम हायड्रो इलेक्‍ट्रिक प्रोजेक्‍ट, अंब्रेला फॉल, रतनवाडीतील अमृतेश्‍वराचे मंदिर, घाटघर येथील कोकणकडा तसेच रंधा धबधबा, ही ठिकाणेसुद्धा पाहता येतात. पुण्याहून संगमनेर मार्गे साधारणतः दोनशे किलोमीटर. 

ड्युक्‍स नोज-नागफणी 
पुण्याहून सकाळी सुटणारी सिंहगड एक्‍स्प्रेस पकडावी, खंडाळ्याला उतरावे आणि जुन्या रेल्वे रुळांवरून चालायला सुरुवात करावी. थोडा चढ चढून गेल्यावर एक सुंदर धबधबा पार करून पुढील वाटेने वर जाता येते. ‘ड्युक्‍स नोज’ वर गेल्यावर जमिनीवर अलगद अवतरणारे चंचल ढग, साथीला बेभान वारा व अचानक पावसाचे बरसणे... हे सर्व येथे अनुभवता येते. या ट्रेकचे वैशिष्ट्य म्हणजे उतरताना आपण कुरवंडे या गावी फक्‍त ४५ मिनिटात उतरून ४ किलोमीटर चालत लोणावळा गाठतो. 

कात्रज-सिंहगड 
पौर्णिमेच्या रात्री पी.एम.पी.एम.एल.ने कात्रजच्या बोगद्यापुढे उतरावे व त्यावरून चालत चौदा टेकड्यांची शृंखला पार पाडून सिंहगडावर जावे. यथेच्छ भोजन करावे. फेसाळलेला चहा मारावा व गड उतरून मार्गस्थ व्हावे जसा पौर्णिमेच्या रात्री तसाच पावसाळ्यातही हा ट्रेक चांगलाच स्मरणात राहतो. 

माळशेज घाट-लेण्याद्री-ओझर 
मुसळधार पाऊस, हलकेच उतरलेले चंचल ढग, हळूच संधी साधून डोकावणारा सूर्य, मधूनच क्षणाचीही पूर्वसूचना न देता पावसाचे बरसणे आणि वाट्टेल तेव्हा शांत होणे. त्याचा झटका असा, की चार-पाच सरीतच सर्व वातावरण बदलते. हीच आहे घाटातल्या पावसाची खरी धम्माल! 
माळशेज घाटात उंचावरून कोसळणारे धबधबे आहेत, तसेच बोगदेश्‍वराचे छोटेखानी मंदिरसुद्धा आहे. घाटात जाण्याच्या आधी एक बोगदा लागतो व त्या बोगद्याच्या उजव्या हाताला एक पायवाट आपल्या छोट्याशा सुळक्‍याजवळ घेऊन जाते. धुके सरल्यावर तेथून अतिशय खोल दरी, तसेच लांबवरचे विहंगम दृश्‍य दिसते. पुण्याहून निघताना माळशेज घाटाबरोबरच लेण्याद्री व ओझर ही अष्टविनायकांतील दोन पवित्र देवस्थाने उरकून दिवसाची छान सुरुवात करता येते. 

घाट वरंधाचा-घळ शिवथरची 
पुण्याहून भोरमार्गे शिवथरघळ एका दिवसात सहजपणे बघता येते. वरंधा घाटात तिथल्या वाघजाई मंदिरापासून समोर दिसणारी दरी आणि छोटे-मोठे धबधबे मन मोहवून टाकतात. चहूबाजूंनी डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या डोंगराच्या पोटात शिवथरघळ आहे. या घळीला समर्थ रामदास ‘सुंदरमठ’ म्हणत हा सुंदरमठ पवित्र दासबोधाचे जन्मस्थान होय. 

ताम्हिणी-डोंगरवाडी 
कमी कालावधीत जास्त नावारूपाला आलेले हे एक ठिकाण होय. आजूबाजूच्या डोंगरांवरून असंख्य जलधारा फेसाळत खाली कोसळत असतात. गेल्या चार वर्षांत धबधब्यात तोल जाऊन अनेक दुर्घटना घडल्या आहेत, तेव्हा जरा दोन पावले लांब ठेवूनच आनंद घ्यावा.  

यवतेश्‍वर-कास-ठोसेघर-सज्जनगड 
पुणे-सातारा महामार्गाने साताऱ्यातील बोगद्यापर्यंत यावे. तेथून एक रस्ता यवतेश्‍वर - कासकडे जातो. दुसरा ठोसेघर - सज्जनगडाकडे. यवतेश्‍वर पठारावर अतिशय सुंदर रानफुले ऑगस्ट-सप्टेंबरच्या काळात पाहायला मिळतात. ती बघून सज्जनगडाकडे कूच करावी. गडावर राहण्याची सोय होते. तसेच अन्नछत्रही चालवले जाते. समर्थांचे दर्शन घेऊन ठोसेघरच्या अजस्र धबधब्याकडे मोर्चा वळवावा. 

लोहगड-भाजे लेणी 
पुण्याहून पहाटे लोकल पकडून मळवली स्टेशनला उतरावे. चालत भाजे गावापर्यंत जावे. भाजे लेणीवरून कोसळणारा धबधबा आपले स्वागतच करत असतो. हौशी भटक्‍यांनी लोहगडची सैर करायला विसरू नये. लोहगडावर ‘विंचूकाटा’ला जाताना धुक्‍यामुळे अंदाज येत नाही. तेथे काळजी घ्यावी. 

राजमाची 
राजमाची म्हणजे ट्रेकर्सची पंढरीच. वर्षभर दुर्गप्रेमी राजमाचीला जातच असतात. पण पावसाळ्यामध्ये मस्त ओढे-नाले-धबधबे बघत, काही ठिकाणी मस्त चिखल तुडवत केलेली पायपीट चांगलीच स्मरणात राहते. काही वर्षांपासून बऱ्याच अवघड ठिकाणी रस्ता झाल्यामुळे ‘ग्राउंड क्‍लिअरन्स’ असलेली गाडी निम्म्या अंतरापर्यंत जाते. तिथून फक्‍त २ तासात आपण पायथ्याच्या गावात जाऊन पोचतो. गावात गेल्यावर तिथून फक्‍त १ तासाचा ट्रेक करून श्रीवर्धन-मनोरंजन ही दुर्गजोडी पाहता येते. गडावरून ‘कातळधार’ धबधबा व आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्‍य डोळ्याचे पारणे फेडते. गावात राहण्याची व जेवणाची सोय उत्तम उपलब्ध आहे. 

देवकुंड धबधबा 
पुण्यापासून १०० किलोमीटर वरती असलेल्या ‘भिरा’ गावातून या ट्रेकची सुरुवात होते. सुमारे २ तास जंगलातून काही ठिकाणी ओढे ओलांडून देवकुंडापाशी पोचतो. देवकुंड कितीही सुरेख असला तरी भलते धाडस करून जुलै-ऑगस्टमध्ये जाण्याचा मोह टाळावा. गेल्या २ वर्षांत पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे किंवा फाजील आत्मविश्‍वासामुळे बऱ्याच लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. गावात गाईडची सुविधा उपलब्ध असून प्रत्येक पर्यटकास गाईड घेणे बंधनकारक आहे. तरीपण लोकल गाईडवर विसंबून राहून जीव धोक्‍यात घालू नये. कुंडात कोणीही पोहण्यास उतरू नये, तसेच मुख्य धबधब्याच्या जवळ जाऊ नये. 

अंधारबन (डार्क फॉरेस्ट) 
देवकुंड ट्रेक इतकाच झपाट्याने प्रसिद्धीस आलेला हा जंगल ट्रेक खूपच आनंददायी आहे. पण हा आनंद मिळवण्यासाठी किमान ७ ते ८ तास चालण्याची व पावसात चिंब भिजण्याची मानसिक व सर्वात महत्त्वाची शारीरिक तयारी हवी. ताम्हिणी घाटातील पिंपरी या गावातून ट्रेकची सुरुवात होते व तब्बल ८ तासांच्या पायपिटीनंतर भिरा या गावात सांगता होते. या ट्रेकसाठी उत्तम काळ म्हणजे जून ते ऑक्‍टोबर. पण भर पावसात काही ठिकाणी दोराचा वापर करूनच ओढा ओलांडावा लागतो. ओढ्याला खूप फोर्स असल्यास ओलांडायचा प्रयत्न करू नये. पाण्याचा प्रवाह कमी होईपर्यंत थांबलेले उत्तम. 

कातळधार धबधबा 
कातळ म्हणजे दगड, उभा कडा व धार म्हणजे धबधबा. लोणावळ्यातून राजमाचीकडे जाताना एक वाट खोल दरीत उतरते. अतिशय दाट जंगल, फसव्या वाटा यामुळे हा ट्रेक माहीतगार व अनुभवी गाईडबरोबर करणे इष्ट. सुमारे ३५० फुटांचा हा धबधबा पाहून मन थक्‍क होते. मुख्य धबधब्याजवळ जाण्याचा व कुंडात उडी मारण्याचा प्रयत्नही करू नये. जूनअखेर किंवा सप्टेंबर हा उत्तम व सुरक्षित काळ आहे. जुलै-ऑगस्टमध्ये जाण्याचे टाळावे. यासाठी लोणावळा ते लोणावळा सुमारे ७ ते ८ तासांचा जंबो ट्रेक करण्याची तयारी हवी. 

वॉटरफॉल रॅपलिंग 
‘रॅपलिंग’ हा शब्द भटक्‍यांमध्ये अगदी परवलीचा झाला आहे. रॅपलिंग म्हणजे तांत्रिक साहित्यांच्या मदतीने जसे की रोप, हारनेस, टेपस्लिंग, कॅराबिनर, डिसेंडर, हेल्मेट, मिटन्स याचा वापर करून साधारणतः ७५ ते ९० अंशाचा कडा उतरणे. गेल्या काही वर्षात हेच रॅपलिंग धबधब्यात अनेक संस्थांनी चालू केले आहे. सर्टिफाईड व अनुभवी संस्थेसोबत हा ‘थ्रीलिंग’ अनुभव प्रत्येकाने घ्यावा. यासाठी साहसी मन व थोडी मेहनत घेण्याची तयारी हवी. संस्था निवडताना अनुभव लक्षात घेऊन निवडावी म्हणजे अपघातास निमंत्रण नको. 

मढेघाट ते शिवथरघळ 
पुण्यापासून १०० किमी अंतरावर असणारा हा ऐतिहासिक मढेघाट व तेथील धबधबा अंगावर रोमांच उभे करतो. मढेघाटातून उपांडे या पुणे जिल्हयातील शेवटच्या गावातूनच खाली उतरत आपण रायगड जिल्ह्यात प्रवेश करतो. अतिशय सोपा व निसर्गरम्य असा हा ट्रेक घाटातील रस्त्याला जाऊन मिळतो. तिथून रिक्षा करून शिवथरघळला जावे. 

भोरगिरी ते भीमाशंकर ट्रेक 
एका वेगळ्या व फार गर्दी नसलेल्या वाटेने भीमाशंकरचे अनोखे जंगल बघायचे असल्यास हा ट्रेक सर्वोत्तम. भीमाशंकरच्या अलीकडे एक फाटा मंदोशीमार्गे भोरगिरीला जातो. चहूकडून धुक्‍यात बुडालेले डोंगर व घनगर्द वनराईत वसलेले भोरगिरी हे गाव. गावातच भोरगिरी किल्ला आहे. किल्ल्यावर गुहा सोडल्यास विशेष काही नाही. सर्वत्र झाडांचे साम्राज्य आहे. गावातूनच एक वाट सुमारे दोन ते अडीच तासात भीमाशंकरला घेऊन जाते. वाटेमध्ये गुप्त भीमाशंकरच्या परिसरात आपल्याला शेकरू म्हणजेच जंगली खार दर्शन देते. तेथेच गुप्त भीमाशंकरचा रमणीय धबधबा कोसळत असतो. याच धबधब्याच्या खाली गुप्त भीमाशंकरची आखीव रेखीव पिंड आहे. 

पुणे- कर्जत- खांडस- भीमाशंकर शिडीच्या घाटाने 
भटक्‍या लोकांना ट्रेकचे आकर्षण नेहमीच असते. प्रत्येक ट्रेक साहसी असतोच. पण ज्यांना खास साहसाची व जंगल भ्रमंतीची आवड आहे अशा भटक्‍यांसाठी पावसाळ्यातील खांडस भीमाशंकर हा ट्रेक म्हणजे एक पर्वणीच आहे. मस्तपैकी पहाटे पदभ्रमणाला सुरुवात करून व मध्ये येणारे ओढे पार करत आपण डोंगर चढतो. पहिल्याच डोंगरावर एक छोटीशी पण अतिशय थरारक अनुभव देणारी शिडी चढून त्याहून थरारक अशा रॉक पॅच वर आपण येऊन थांबतो व परत दुसरी शिडी चढून परत रॉक पॅच व परत तिसरी शिडी अशी मार्गक्रमणा करत आपण पदरपाडी या छोट्याशा वस्तीपाशी पोचतो. तेथून परत साधी पण अतिशय दमछाक करायला लावणारी चढण चढून आपण भीमाशंकर मंदिराच्या पायऱ्यांपाशी पोचतो. अशा प्रकारे एक साहसी ट्रेक व बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक भीमाशंकर हे पवित्रा देवस्थान अशी दोनही ठिकाणे आपल्या खात्यावर जमा होतात. 

रिव्हर राफ्टिंग 
ऋषिकेशमधील गंगा रिव्हर राफ्टिंग सर्वांना परिचित आहेच पण प्रवासात प्रत्येकाला जास्त दिवस काढणे शक्‍य नाही. प्रवासात जास्त दिवस जात असल्यामुळे सर्वांना ते सहज शक्‍य होत नाही. अशांसाठी आपल्या महाराष्ट्रातील कुंडलिका नदीवर वर्षभर राफ्टिंग आयोजित केले जाते. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुटीच्या दिवशी राफ्टिंगचे दर थोडे महाग असून सोमवार ते शुक्रवारमध्ये खूप कमी दरामध्ये आयोजित केले जाते.

संबंधित बातम्या