ट्रेकला जाताय? बी सेफ!

स्वप्नील खोत
सोमवार, 24 जून 2019

सजग भटकंती
 

उन्हाळ्याच्या तडाख्यात दोन-तीन महिने घालवल्यावर जेव्हा पावसाळी ढग आकाशात फेर धरू लागतात, तेव्हा समस्त डोंगर भटक्‍यांच्या उत्साहाला पारावार राहात नाही. सह्याद्री आपल्या तांबूस रंगांची कात टाकून हिरवा शालू नेसून टवटवीत तयार होते. त्या नववधूच्या सौंदर्याचे लेणे काही औरच. ती हिरवळ, दुधाळ धबधबे, अगणित पुष्प, कापसाळ धुके आणि पावसाच्या सहस्रधारा, सगळी सृष्टीच जणू आनंदात मश्‍गूल झालेली असते. मग आबालवृद्ध पर्जन्यसहली, डोंगर भ्रमंती आखू लागतात. सर्वांनाच इथले गडकोट, पुष्पांनी सजलेली पठारे, धुंद वाहणारे झरे, मोहक धबधबे खुणावू लागतात. सह्यसख्यांना फोन जातात, आखणी होते आणि वेध लागतात ते सह्याद्रीच्या कुशीत मुक्त बागडण्याचे. कधी सवंगड्यांसोबत, तर कधी व्यावसायिक भ्रमंतीसोबत. पण सर्वांचा उद्देश एकच, या वरुणराजाच्या सान्निध्यात लाखमोलाचे क्षण घालवणे. नेहमीच्या रटाळ रहाटगाडग्यातून वेळ काढून काही क्षण निसर्गाच्या सान्निध्यात घालवावेसे वाटतात. गरमागरम भजी, मक्‍याची कणसे खुणावू लागतात. मात्र, गेल्या काही वर्षांत अपघातांचे वाढलेले प्रमाण या आनंदाला काळा डाग लावत आहेत. सजगता बाळगून ही भटकंती करणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच या पावसात भटकंती करताना घ्यावयाच्या खबरदारीचा हा लेखाजोखा...

ट्रेकला जाण्यापूर्वी घ्यायची खबरदारी :

 • पावसाळ्यात शेवाळलेल्या दगडांवरून घसरण्याची शक्‍यता वाढते, त्यामुळे उत्तम प्रकारचे स्पोर्ट्‌स किंवा ट्रेकचे शूज अत्यंत महत्त्वाचे असतात. चांगली पकड असलेले, रबर बेस असलेले शूज आपला आत्मविश्वास वाढवतात. त्यासाठी फार महागडे शूज घेण्याची गरज नाही. ॲक्‍शन ट्रेकिंग हा एक खूप चांगला पर्याय आहे. याव्यतिरिक्त पण सध्या बाजारात उत्तम प्रतीचे शूज मिळतात.
 • अगदी नवीन बूट वापरणे टाळावे. त्याकरिता नवीन घेतलेले बूट काही दिवस वापरणे इष्टच. ट्रेकनंतर ते वाळवणेही महत्त्वाचे.
 • चप्पल, सॅंडल या भटकंतीत टाळावेत. पावसाळ्यात जळू, निसरडे दगड पायाच्या उघड्या बोटांना हानिकारक ठरतात.
 • रेनकोटऐवजी सुटसुटीत जर्कीन वापरणे कधीही चांगले. अत्यंत पायघोळ रेनकोटमुळे तोल जाण्याची शक्‍यता वाढते. ट्रेकवर जाणार असाल, तर छत्रीचा वापर करू नये. आपले दोन्ही हात मोकळे असणे महत्त्वाचे असते.
 • शक्‍यतो लवकर वाळणारे (Quick Dry) कपडे पावसाळी भ्रमंती सुखकर करतात.
 • सामान ठेवण्यासाठी उत्तम बॅग असावी. त्यात पाणी झिरपू नये म्हणून चांगले कव्हर असावे. तसेच आतील साहित्य हे चांगल्या दर्जाच्या प्लास्टिकमध्ये व्यवस्थित गुंडाळून ठेवावे.
 • एक जोडी कोरडे कपडे नेहमी सोबत बाळगावेत. शक्‍यतो निवासाच्या ठिकाणी किंवा ट्रेक संपल्यावर कोरडे कपडे परिधान करावेत.
 • प्रथमोपचार पेटी ही फार महत्त्वाची आहे. आपल्याला लागणारी औषधे नेहमी सोबत बाळगावीत. त्याचबरोबर प्रथमोपचार पेटीत बॅंडेड, डेटॉल, कापूस, अँटिफंगल पावडर, क्रेप बॅंडेज, वॉलिनी सारखे स्प्रे यांचा नक्की समावेश असावा.
 • एक ओळखपत्र सोबत बाळगावे.
 • एक विजेरी, पॉवर बॅंक, चार्जर, नेहमी सोबत असावेत. गरजेच्या वेळी फार कामी येणाऱ्या या गोष्टी आहेत.
 • सुका खाऊ व्यवस्थित बांधून सोबत बाळगावा. तेलकट पदार्थ टाळावेत. त्याऐवजी सुकामेवा, पौष्टिक लाडू यांचा समावेश करावा.
 • धूम्रपान, मद्यपान कटाक्षाने टाळावे.
 • अत्तर, डिओड्रंट याचा वापर ट्रेकला सुरुवात करण्यापूर्वी करू नये. 

ट्रेकला जाताना :

 • ट्रेकपूर्वी नियोजन ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. अनियोजित ट्रेक आपल्या आनंदावर विरजण घालू शकतात.
 • एकटे-दुकटे जाणे टाळावे. आपले चांगले मित्र सोबत असणे गरजेचे ठरते.
 • एखाद्या नवीन ठिकाणी जाताना चांगल्या ट्रेक संस्थेसोबत अथवा एखाद्या माहीतगार व्यक्तीसोबत जाणे चांगले. धुक्‍यामुळे डोंगरवाटा सहज गवसत नाहीत. आपल्या समोरची व्यक्ती आणि आपण यात हाकेचे अंतर असावे. शक्‍यतो एक शिटी सोबत घ्यावी. वेळ पडल्यास शिटीचा वापर करून आपल्या सहकाऱ्यांना सूचीत करावे.
 • ट्रेक सुरू करण्यापूर्वी पायथ्याशी असलेल्या गावातील दुकानदार, पोलिस पाटील यांना आपला तसेच आपत्कालीन संपर्क क्रमांक द्यावा. रेस्क्‍युअर्सचे क्रमांक सोबत असतील तर खूपच चांगले.
 • जर आपण व्यावसायिक संस्थेसोबत जाणार असू, तर त्यांचा या क्षेत्रात किती अनुभव आहे. सोबत त्यांनी पूर्ण साहित्य घेतले आहे का, प्रथमोपचार पेटी आणि त्याबद्दलची त्यांना माहिती आहे का, त्यांनी आधी तो ट्रेक केला आहे का, लागणारे सर्व परवाने त्यांच्याकडे आहेत का, त्यांच्याकडे असलेले तांत्रिक साहित्य पुरेपूर आणि सर्टिफाईड आहे का, याची खातरजमा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे जर काही वाईटप्रसंग ओढवल्यास ते कितपत योग्य आहेत याची माहिती मिळते. अर्थात संस्था कोणती निवडावी हा वैयक्तिक प्रश्न आहे.
 • ट्रेक लीडरच्या सूचनांचे योग्य पालन करावे. 
 • ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्याची पूर्ण माहिती घ्यावी. पायथ्याचे गाव, चढाईसाठी लागणारा वेळ, गावकऱ्यांचे फोन नंबर, जवळच्या दवाखान्याची माहिती सोबत असावी.
 • स्थानिकांच्या सूचना नीट लक्ष देऊन ऐकाव्या आणि त्याचे पालन करावे.
 • आपण जात असलेल्या ठिकाणाची माहिती घरी किंवा मित्रांना देणे कधीही चांगले.
 • जिथे तांत्रिक चढाई म्हणजे प्रस्तरारोहण करावे लागते, अशा जागा टाळाव्यात. पावसामुळे चढाईसाठी लागणारी पकड मिळत नाही.
 • धोकादायक ठिकाणी सेल्फी अथवा छायाचित्रे घेणे टाळावे. लक्षात राहू द्या ‘सिर सलामत तो पगडी पचास.’ छायाचित्र घेण्यापूर्वी आपण जिथे उभे आहोत ती जागा सुरक्षित आहे ना याची खात्री करावी.
 • पावसाळ्यात ओढ्यातून जाताना विशेष काळजी घ्यावी. पाण्याचा प्रवाह जोरदार असेल, तर ओढा ओलांडणे धोक्‍याचे ठरू शकते.
 • धबधब्याच्या ठिकाणी पाण्यात उतरणे हानिकारक ठरू शकते. या प्रवाहासोबत बरेच छोटे-मोठे दगड वाहून येतात त्यामुळे सुरक्षित ठिकाणी पाण्यात उतरणे इष्ट.
 • नेहमी सावध राहावे, विनाकारण गोंधळ, अतिरिक्त साहस करू नये.
 • मुक्कामी जायचे असल्यास मंदिर, ग्रामस्थांची घरे यांचा आश्रय घ्यावा. उघड्यावर झोपणे टाळावे.
 • आपली शारीरिक क्षमता ओळखून साहस भ्रमंतीमध्ये सहभागी व्हावे. फक्त आपले मित्र करत आहेत म्हणून ट्रेक करणे टाळावे. 
 • आपण सावध असणे फार गरजेचे आहे. पावसाळ्यात वाढलेले गवत, धुके यामुळे वाट चुकण्याची शक्‍यता असते. 
 • जर शारीरिक दुखापत असेल, तर ट्रेकला जाण्याचा मोह टाळावा.
 • आजकाल ट्रेकचे प्रस्थ खूपच वाढले आहे, तेव्हा गर्दीची ठिकाणे टाळावीत. खूप गर्दी असेल, तर त्या जागेची मजा अनुभवायला मिळत नाही. तसेच वेळही वाया जातो.
 • वन्यप्राण्यांना खायला देणे टाळावे. त्यांना निसर्ग नियमांनुसार जगू द्यावे.
 • एखाद्या किल्ल्यावर जाणार असाल, तर त्याची ऐतिहासिक तसेच भौगोलिक माहिती घ्यावी. त्यामुळे भटकंती फक्त विरंगुळा म्हणून नव्हे, तर माहीतगार होते. अशी भटकंती नेहमी खूप काही शिकवून जाते.
 • ऐतिहासिक वास्तू या आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला अनमोल ठेवा आहे. त्यांचे पावित्र्य अबाधित ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. गडावरील पाण्याच्या टाकीत कचरा करू नये. कोणत्याही वास्तूवर कसलाही मजकूर लिहू नये.
 • कचरा आपल्या सोबत परत आणावा आणि घरच्या कचरापेटीत टाकावा. शक्‍य असल्यास जैव विघटन होणारा कचराही निसर्गात टाकू नये.
 • सोबत थोडे मीठ असावे. जळू चिकटल्यास ते काढण्यासाठी मदत होते.
 • वनखाते आणि पुरातत्त्व खात्याने आखून दिलेले नियम पाळणे हे आपले कर्तव्य आहे.

ट्रेकनंतर घ्यायची काळजी :

 • ओले कपडे बदलून कोरडे कपडे परिधान करावे.
 • सोबत चप्पल बाळगावी. ट्रेकनंतरच्या प्रवासात ओले बूट काढून पाय कोरडे करून कॅंडिड सारखी अँटिफंगल पावडर वापरून चप्पल वापरता येऊ शकते.
 • ट्रेकनंतर स्ट्रेचिंग केल्याने स्नायूंवरचा ताण कमी होण्यास मदत होते.
 • जर अंग दुखत असेल, तर शक्‍य असल्यास नेहमी पेनकिलर घेणे टाळावे.
 • गरम पाण्यात थोडे मीठ टाकून पायांना शेक द्यावा. 

निसर्ग सढळ हाताने त्याचे लेणे देत असतो, फक्त ते स्वीकारताना आपण काळजी घेतल्यास तो अनुभव नक्कीच दीर्घकाळ लक्षात राहातो. पावसाळी भटकंती ही आपल्याला बरेच काही शिकवून जाते. 
नेहमीच्या दगदगीच्या आयुष्यातून वेळ काढून, थोडीशी काळजी घेऊन भटकंती कराच. 
सह्याद्रीच्या उदरातील हा खजिना मुक्त हस्ते अनुभवा. तर मग तयार आहात ना मंडळी वरुणराजाच्या स्वागताला.

संबंधित बातम्या