मुहूर्त...!

ओंकार ओक
सोमवार, 24 जून 2019

ट्रेककथा
 

ट्रिंग ट्रिंग... ट्रिंग ट्रिंग... ट्रिंग ट्रिंग... ट्रिंग ट्रिंग... ज्या व्यक्तीशी आपण संपर्क साधू इच्छिता, ती व्यक्ती आपला कॉल उचलू शकत नाही. कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा...

छातीचे ठोके पुन्हा एकदा पृथ्वीप्रदक्षिणा घालून जागेवर आले आणि पुन्हा एकदा....
ट्रिंग ट्रिंग... ट्रिंग ट्रिंग... ट्रिंग ट्रिंग... ट्रिंग ट्रिंग... ज्या व्यक्तीशी आपण संपर्क साधू इच्छिता, ती व्यक्ती आपला कॉल उचलू शकत नाही. कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा...

जवळपास पंधरा एक वेळा फोन केल्यानंतर पलीकडून आवाज आला आणि पुढचा संवाद घडला...

‘कोन बोलतंय?’
‘अरे रवी, मी ओंकार बोलतोय. काल फोन केला होता ना, की आपल्याला आज तुझी टेम्पो ट्रॅव्हलर घेऊन ताम्हिणी घाटाच्या इथं जायचं आहे. तूच म्हणाला होतास, की घरातून निघताना फोन करा. वीस मिनिटं झाली, तुला फोन करतोय. साडेपाचला सगळे जण बालगंधर्वपाशी जमणार आहेत. आहेस कुठं तू आणि फोन का उचलत नव्हतास’
‘त्यो ड्रायव्हर चेंज झालाय रात्री. मालकाचा फोन नाही आला का तुम्हाला?’
‘नाही.’

‘मंग मला नाय माहीत काही. बघतो माझ्याकडं नंबर आहे का नवीन डायवरचा. झोपू द्या आता मला.’

पुढच्या सेकंदाला मी फोन ठेवल्याची टोन ऐकत होतो!

पहाटे सव्वापाचला आपल्यावर ही वेळ येईल, असं जर आधीच वर्तवता आलं असतं, तर तेव्हाच काहीतरी मार्ग काढता आला असता असा विचार सतत डोक्‍यात घुमत होता. अशक्‍य चिडचिड आणि शंका-कुशंकांचं वादळ उठलं होतं. एखादा माणूस इतका बेजबाबदार कसा असू शकतो? जर गाडी ऐन वेळी बदलली आहे, तर साधा फोन करण्याचं सौजन्य दाखवता येऊ नये वगैरे तिडीक आणणारे विचार आगीत अजूनच तेल ओतत होते. इतक्‍यात फोन खणाणला. पलीकडून आवाज आला, ‘सर, मी अमित बोलतोय...तुमचा बदललेला ड्रायव्हर. मी येऊन थांबलोय बालगंधर्वला. या लवकर!’

पुढच्या पाचव्या मिनिटाला माझ्या गाडीला किक बसली होती.

आजपासून साधारण सहा-सात वर्षांपूर्वीची ही कथा. ताम्हिणी घाटातल्या तेव्हा नुकत्याच प्रकाशझोतात आलेल्या अंधारबन ट्रेकसाठी आम्ही १२-१४ जण निघालो होतो. त्यावेळी अंधारबन हे नाव फारसं परिचित नसलं, तरी काही अट्टल भटके जात असल्यानं आणि आनंद पाळंदे सरांनी त्यांच्या ‘चढाई-उतराई’ या घाटवाटांना वाहिलेल्या पुस्तकात त्याचं वर्णन केल्यानं फारसं नवीन पण नव्हतं. एप्रिल महिन्याची सुरू झालेली काहिली सहन करून निवांत ट्रेक करायला ‘अंधारबन’ सर्वोत्तम पर्याय होता. सकाळी सकाळी हा पहिला धक्का पचवून मी निघालो. बालगंधर्वपाशी आणि जायच्या वाटेवर बाकीची टाळकी उचलून गाडीनं ताम्हिणीची वाट धरली. आमचा नेहमीचा ट्रॅव्हल एजंट काही कामानिमित्त परदेशात गेल्यानं मला फक्त या एका ट्रेकसाठी एका संपूर्ण अनोळखी एजंटची कास धरावी लागली आणि त्यानं आमच्या व्यावसायिक नातेसंबंधांची सुरुवातच या धक्‍क्‍यानं केली होती. त्यात गाडीचा बदलेला ड्रायव्हर अमित हा फक्त १९ वर्षांचं पोर असल्यानं त्याच्या सारथ्यकौशल्याबाबतीतही तसा आनंदीआनंदच होता. का कुणास ठाऊक पण ट्रेकची सुरुवातच थोड्या कुरबुरीनं झाल्यामुळं माझ्या मनात सारखी शंकेची पाल चुकचुकत होती. सकाळची कोवळी उन्हं आणि ऐन रंगात आलेल्या भटक्‍यांच्या गप्पा यांचं मस्त समीकरण जुळलं होतं. जुन्या ट्रेकच्या आठवणी, किस्से, कथा इत्यादींना ऊत आला होता. गाडीला बसणाऱ्या खड्ड्यांच्या अतोनात हादऱ्यांकडं दुर्लक्ष करून प्रवास सुरू असतानाच गाडीला करकचून ब्रेक लागला. काय झालं कोणालाही कळेना. आम्ही काही बोलायच्या आतच गाडीच्या ड्रायव्हरनं पटकन खाली उडी मारली आणि गाडीच्या मागच्या उजवीकडच्या चाकाकडं बघून त्यानं डोक्‍यावरच हात मारला. गाडीत बसलेल्या आमच्यापैकी एकालाही काय झालं ते सुधरेना. पण अमितच्या चेहेऱ्यावरचे हावभाव सगळं काही बोलून गेल्यानं पूर्ण गाडी काही सेकंदांत रिकामी झाली. खाली उतरून आम्ही त्या मागच्या चाकापाशी आलो आणि आम्हाला घेरीच यायची पाळी आली! त्या गाडीचा मागच्या टायरमधून भसाभस धूर येत होता आणि त्याचं कारण तिथं उपस्थित असलेल्या आम्हा विद्वानांपैकी एकालाही कळत नव्हतं. टायर व्यवस्थित जळाला होता. फक्त नशीब इतकं चांगलं, की आम्हाला यमराजाचं सप्रेम निमंत्रण येण्याआधी हा प्रॉब्लेम अमितच्या लक्षात आला. क्षणाचाही वेळ न घालवता शेजारच्या एका हॉटेलमधून पाण्याची बादली आणून त्या टायरचा राग शांत केला आणि तोच राग अमितवर निघाला! गाडी ऐन वेळी बदलल्यामुळं बसलेला हा दुसरा धक्का. बदललेली गाडी नीट तपासून पाठवलेली नसावी आणि त्या टायरच्या जीर्णावस्थेला ताम्हिणीच्या रस्त्यांनी जळायला भाग पाडलं होतं. अमितनं मुकाट्यानं गाडीचा मागचा दरवाजा उघडून स्टेपनी बाहेर काढली आणि ती लावणार तेवढ्यात त्यानं सूचक नजरेनं माझ्याकडं पाहिलं...

‘काय झालं?’ मी विचारलं
‘सर स्टेपनी पंक्‍चर आहे!’

मला आता हसावं का रडावं तेच कळेना. एप्रिलचं कोवळं ऊन आता कडाक्‍यात बदलायला हळूहळू सुरुवात झाली. ट्रेकच्या वेळापत्रकाचा बोऱ्या वाजणार यावर ब्रह्मदेवालाही शंका नसावी. आम्ही जिथं थांबलो होतो, ती जागा काय झपाटलेली होती काय माहीत, पण एकही गाडी हात दाखवूनसुद्धा थांबत नव्हती. शेवटी महत्प्रयासाने तिथं असलेला एक ‘छोटा हत्ती’ प्रकारातला टेम्पोवाला आम्हाला माले या गावापर्यंत सोडायला तयार झाला. अमितला मी गाडी दुरुस्त करून थेट अंधारबन ट्रेकचा शेवट असलेल्या भिरा गावच्या उन्नई धरणावर बोलावलं आणि आम्ही त्या टेम्पोमध्ये स्वार झालो! माले फाट्यावरच्या प्रसिद्ध ‘रिव्हर पॅलेस’मध्ये नाश्‍ता उरकताना झालेल्या प्रकारावर इतके विनोद करून झाले होते, की त्या तुफान हास्यकल्लोळामध्ये काही वेळापूर्वीचा सगळा ताण-तणाव आणि सगळी गंभीरता कुठल्या कुठं विरून गेली होती. हॉटेलच्या मालकानं पिंपरी फाट्यापर्यंत पोचायला पुढची एसटी अजून अर्ध्या-पाऊण तासानं आहे असं सांगितलं आणि घडाळ्याचे काटे पुन्हा एकदा वाकुल्या दाखवून गेले. झाल्या प्रकारामुळं आम्ही आमच्या ठरवलेल्या वेळापत्रकापेक्षा जवळपास दीड तास मागं होतो. आधीच अर्ध्याच्या वर तुडुंब भरलेल्या एसटीमध्ये आम्ही गावरान शिव्या खातच चढलो आणि पिंपरी फाट्याला उतरलो. तेव्हा पिंपरी फाटा ते पिंपरी हा डांबरी रस्ता जीव काढणार यावर शिक्कामोर्तब झालं. ऊन भयंकर तापायला सुरुवात झाली होती. पिंपरी फाटा ते पिंपरी या चालीनं अजून एक तास खाल्ला आणि आमची ‘टॅन’ झालेली तोंडं घेऊन आम्ही एकदाचे अंधारबनात शिरलो. वाटेतलं सिनेर खिंडीतलं वीर नावजी बलकवडे यांचं स्मारक आणि तिथला गधेगाळ तर प्रत्येक भटक्‍यानं न चुकता बघावा आणि त्यांच्या सिंहगडावरील असीम पराक्रमाच्या गाथा पुन्हा एकदा स्मराव्यात!

पिंपरी गाव ते अंधारबन संपून घाटमाथ्यावर लागणारं हिरडी हे त्यावेळी अतिशय दुर्गम असणारं गाव. अगदी अलीकडं तिथं जायचा कच्चा रस्ता झाल्यानं अगदी चारचाकी गाड्यासुद्धा हिरडीपर्यंत सहज पोचतात. पण आम्ही ज्यावेळी हा ट्रेक केला, त्यावेळी अंधारबन पुणे जिल्ह्यातल्या अति दुर्गम गावांपैकी एक मानलं जात असे. अवघी वीस-तीसच्या आसपास घरं असलेली ही छोटेखानी वस्ती त्यावेळी अनेक अडचणींचा सामना करत होती. अगदी धान्य किंवा औषधं आणण्यासाठी इथल्या ग्रामस्थांना दोन तास घाट उतरून भिरा गावातून सगळा माल आणावा लागत असे. त्यात एखादी व्यक्ती आजारानं किंवा दुखापतीनं ग्रस्त असेल, तर विचारूच नका इतकं सोयीसुविधांचं दुर्भिक्ष हे गाव त्यावेळी सहन करत होतं. पण आता काळानुरूप तिथं बदल घडत आहेत. गावात वीज पोचवण्याचे प्रयत्न होत आहेत. ग्रामस्थांना आज काही मूलभूत सुविधा मिळत आहेत. काही स्थानिकांनी पुढाकार घेऊन अंधारबनला येणाऱ्या ट्रेकर्ससाठी हॉटेल्स पण सुरू केली आहेत. थोडक्‍यात स्थानिक रोजगाराच्या संधी वाढल्या, पण आम्ही पाहिलेलं गावाचं दुर्गम सौंदर्य आज विरत चाललं आहे, हे शल्य मात्र कायम राहील!

हिरडीच्या अतिशय सुंदर अशा शिवमंदिरात दुपारचं जेवण उरकून आणि पुणेकरांच्या तत्त्वाला जागून मिळणारी हक्काची वामकुक्षी उरकून आम्ही आता अंधारबनाचा घाट उतरून भिरा गावाकडं निघालो आणि ट्रेकच्या धक्कासत्राचा पुढचा अंक सुरू झाला. तसंही आम्ही ट्रेकच्या वेळापत्रकाच्या दोन तास मागंच होतो. त्यामुळं आता घाई, गडबड, वेळमर्यादा या सगळ्या गौण गोष्टी ‘जाऊदे तसाही उशीर झालाय आता, उरलेल्या ट्रेकचा मस्त आनंद घेऊ’ या सुखासीन विहिरीत ढकलून दिल्या आणि मोकळ्या मनानं पावलं रायगड जिल्ह्यात पडली. पाच-दहा मिनिटं पुढं गेलो असू, तेवढ्यात आमच्यातल्या एका महापुरुषाला त्याचा तीन हजारांचा इम्पोर्टेड गॉगल अंधारबनाच्या दाट जंगलातच कुठंतरी विसरल्याचा साक्षात्कार झाला आणि एकच हलकल्लोळ उडाला! त्याचं त्या गॉगलपेक्षा त्याच्या किमतीवरच जास्त प्रेम होतं हे उघडच होतं. आता अंधारबनचा घाट उतरायचा सोडून दुपारी चारच्या उन्हात पुन्हा अंधारबनात उलटं कोण कडमडायला जाणार आणि गेलो, तरी नक्की तो गॉगल कुठं शोधायचा वगैरे भानगडी होत्याच. अखेर त्याची महत्प्रयासाने समजूत काढून आम्ही पुढची पाऊलवाट तुडवायला लागलो. बिचारा पुण्यात येईपर्यंत एक शब्दही बोलला नाही हा भाग वेगळाच!

उन्नई धरणाचा काठ जसाजसा जवळ येऊ लागला, तसं एकेकाच्या मोबाईलला रेंज येऊ लागल्यानं गाडीचं स्टेटस बघू म्हणून मी मालकाला फोन लावला. 

‘हा सर, मी पुण्यातून दुसरी एक टेम्पो ट्रॅव्हलर घेऊन आले. वाटेत अमितला नवीन कोरा टायर दिला आणि आम्ही एकत्रच पुण्याला परत आलो. आता ती दुसरी एकदम नवीन गाडी आणि तिचा नवीन ड्रायव्हर भिरा गावात पाठवलाय बघा.’ एवढं बोलून त्यानं फोन ठेवला. मला झाल्या प्रकरणाची टोटल लागेपर्यंत त्यानं त्या नव्या ड्रायव्हरचा नंबर मला पाठवला आणि सगळ्या समस्या एकत्रच सुटल्याच्या आनंदात अख्ख्या ग्रुपनं धरणाच्या थंडगार पाण्यात मनसोक्त डुबक्‍या घेतल्या. उन्नई धरणाच्या गेटपाशी एक बस उभी असलेली लांबून दिसली आणि मी सुटकेचा निःश्‍वास सोडला. पण त्या नव्या ड्रायव्हरकडं बघताचक्षणी पुन्हा माझा भ्रमनिरास झाला. या बस मालकानं कॉलेजच्या पोरांची अख्खी बॅचच कामावर ठेवली होती का काय माहीत. कारण हा ड्रायव्हर पण अवघा वीस वर्षांचा निघाला. आम्हाला बघताचक्षणी त्यानं पच्चकन पिचकारी मारून खालच्या डांबराचा रंग बदलला. एकूणच प्रकरण भयानक दिसत होतं. भिरा गावात चहा आणि वडापाव मनसोक्त हादडून गाडी आता ताम्हिणी घाट चढू लागली. सर्वांना आता घराचे वेध लागले होते. पुण्यात पोचायला उशीर होणार हे नक्की होतं. पण सगळा प्रसंग आमच्या कंट्रोलबाहेरचा असल्यानं उगाच दोषारोपांच्या फैरी झाडतील ते अट्टल भटके कसले! पण शेवटचा धक्का बसायला अजून दहा मिनिटं बाकी होती.

बाहेर टिपूर चांदणं पडायला सुरुवात झाली होती. घाटातलं वारं सुखावून जात होतं. पण मला काही केल्या या नव्या ड्रायव्हरवर विश्वासच बसत नव्हता. कारण प्रत्येक वळणावर तो समोरून गाडी आली, की लहान मुलासारखा बिचकत होता आणि गाडीचा स्पीड काही केल्या वाढत नव्हता. शेवटी न राहवून मी त्याला विचारलं, ‘काय झालंय? झोप बीप झाली नाहीये का तुझी? अस्वस्थ वाटतोयस. काही प्रॉब्लेम आहे का?’

‘नाय सर, प्रॉब्लेम काही नाही. पण मी आयुष्यात पहिल्यांदाच बस चालवतोय आणि घाट सेक्‍शनमध्ये गाडी घालण्याची माझी पहिलीच वेळ आहे!’
आमचा मुहूर्तच चुकला होता!!!

संबंधित बातम्या