रोमांचकारी अनुभवांचे पर्यटन

वर्षा गायकवाड
सोमवार, 24 जून 2019

साहसी पर्यटन
 

जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई, काश्‍मीर ते कन्याकुमारी सायकलस्वारी, मनाली ते लेह बाइक राइड, कोकणकड्यावरून विंग सूट किंवा जग प्रवासाच्या सफरीवर निघालेले जोडपे...असे वृत्तांत ऐकायला, वाचायला मिळाले, की कळत-नकळत आपल्याही मनात असे काहीतरी साहस करण्याचा विचार डोकावून जातो. मग एव्हरेस्ट नाही, तर निदान कळसूबाई ट्रेक तरी करू असा प्लॅन ठरवून आपण मोकळे होतो. 

हल्ली सुट्टी म्हटले, की घरी न बसता मनोरंजन, छंद किंवा हौस म्हणून, दैनंदिन कामातून ब्रेक घेऊन पर्यटन करणे हा सध्याचा ट्रेंड झाला आहे. मग अगदी मित्रपरिवारासोबत केलेला ॲडव्हेंचर प्लॅन असो किंवा कुटुंबासमवेत केलेली ट्रीप. अलीकडे पर्यटनाचे स्वरूप बदलल्यामुळे पर्यटनाचा एक नवीन चेहरा समोर आला आहे, तो म्हणजे ‘साहसी पर्यटन’. साहसी उपक्रमांविषयी उत्सुकता, त्यातील थरार, रोमांच अनुभवण्याची इच्छा तरुण वर्गाला साहसी पर्यटनाकडे जास्त आकर्षित करत आहे. साहसी पर्यटन म्हणजे काय, त्यात कोणकोणते प्रकार येतात, त्यासाठी कोणती साधणे, कौशल्ये गरजेची असतात याची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

हिंडण्या-फिरण्याची मानवी वृत्ती फार प्राचीन आहे. मानवाने विविध ठिकाणी केलेला हेतुपूर्वक प्रवास व वास्तव्य याला सर्वसाधारणपणे पर्यटन असे म्हटले जाते. आदिमकाळापासून मानवाला विविध प्रदेशांबद्दल आकर्षण व जिज्ञासा असल्याने या जिज्ञासेपोटी त्याने प्रवास करायला सुरुवात केली. पर्यावरणातील बदलासाठी इतरत्र जाणे, नवनवीन प्रदेशांचा शोध घेणे, आनंद प्राप्त करणे, तीर्थयात्रेला जाणे असे बदलात्मक स्वरूप होते. पर्यटनामध्ये प्रामुख्याने भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक व धार्मिक स्वरूपाचे पर्यटन अधिक प्रमाणात आढळते किंबहुना पर्यटक याला अधिक पसंती देतात. आधुनिक पर्यटनाचे हे जरी विविध प्रकार असले, तरी सध्याच्या जगातील पर्यटनाचे स्वरूप बदलले आहे. याला उद्योगाचे स्वरूप प्राप्त झाल्यामुळे ते अधिक गतिमान झाले आहे. दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून चार दिवस आरामात घालवण्यासाठी, निव्वळ हौस, आनंद, छंद म्हणून हल्ली पर्यटन करण्याला पसंती दिली जाते. मग ते अगदी देशांतर्गत असो किंवा देशाबाहेर. अलीकडच्या काळात पर्यटनात उदयास आलेला प्रकार म्हणजेच ‘साहसी पर्यटन’. आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून आपल्यातील साहसाचे प्रदर्शन करणे, रोमांच अनुभवणे व त्यातून आनंद मिळवणे याला ‘साहसी पर्यटन’ असे म्हणता येईल. कौशल्यावर आधारित व रोमहर्षक कृतींचा यात समावेश होतो. वैयक्तिक किंवा समूहाच्या जबाबदारीवर असे पर्यटन केले जाते. यात गिर्यारोहण, कातळारोहण, डोंगरयात्रा, कयाकिंग, स्काय डायविंग, पॅराग्लायडिंग, हॉट एअर बलूनिंग, माउंटन बाईकिंग, स्कूबा डायविंग अशा अनेक साहसी उपक्रमांचा समावेश होतो. साहसी पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी अगदी परदेशवारी करणारे हौशी पर्यटकही काही कमी नाहीत. तसेच भारतात येणारे परदेशी पर्यटकही भारतातील साहसी पर्यटनाचा आनंद घेताना दिसतात. 

साहसी पर्यटनाचे प्रकार 
 अलीकडच्या काळात जगातील, भारतातील अनेक प्रेक्षणीय स्थळांच्या ठिकाणी साहसी पर्यटन झपाट्याने वाढताना दिसत आहे. अनेक नवीन आकर्षणे खास अशा पर्यटनासाठी लोकप्रिय होत आहे. त्याला उद्योगाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परंतु, साहसी पर्यटन हा प्रकार आणि त्याचा उद्देश विशिष्ट पर्यटकांच्यापुरताच मर्यादित असतो. याचे वर्गीकरण साधारण दोन प्रकारे करता येईल. एक म्हणजे अति साहसी पर्यटन व दुसरे म्हणजे कमी साहसी पर्यटन. 

अतिसाहसी पर्यटन  
 या प्रकारात अशा उपक्रमांचा समावेश होतो, जे अतिशय रोमांचकारी असतात. यात धोके तर अधिक असतातच; शिवाय कमिटमेंट महत्त्वाची असते. अति साहसी उपक्रमांसाठी विशेष प्रकारचे कौशल्य, तंत्र अवगत असावे लागते. यात गिर्यारोहण, कातळारोहण, बर्फारोहण, केविंग, स्किईंग, स्नो बोर्डिंग, स्काय डायविंग, बेस जंपिंग, हायलाईन असे अनेक उपक्रम येतात. हे उपक्रम करण्यासाठी व्यावसायिक मार्गदर्शक, आधुनिक कौशल्ये, तंत्र माहीत असावी लागतात. व्यक्ती स्वतःच्या निर्णयावर, धोका पत्करून अशा प्रकारच्या साहसांचा अनुभव घेतात. गिर्यारोहणातील अनेक साहसी मोहिमांमध्ये गिर्यारोहकांचे मृत्यू झाल्याचे वृत्तदेखील आपल्या वाचनात, पाहण्यात आले आहे. याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे मे २०१९ मधील जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट मोहिमेत भारत व जगातील अनेक गिर्यारोहकांना असुविधेमुळे आणि स्वास्थ बिघडल्यामुळे आपला जीव गमवावा लागला. यापूर्वीही हिमालयातील अनेक मोठ्या मोहिमांमध्ये अशा घटना घडल्या आहेत.

कमी साहसी पर्यटन
या प्रकारामध्ये घेतले जाणारे उपक्रम कमी धोक्‍याचे असतात. यात कमिटमेंटला फार महत्त्व दिले जात नाही. या प्रकाराच्या उपक्रमांसाठी विशेष प्रशिक्षण व कौशल्यांची गरज नसते. अगदी बेसिक कौशल्य असले, तरी हे उपक्रम केले जाऊ शकतात. यातले उपक्रम अनुभवी मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली केले जातात. त्यामुळे तुलनेने यात धोका कमी असतो किंवा घटना घडण्याचे प्रमाण कमी असते. यात कयाकिंग, राफ्टिंग, हायकिंग, स्कूबा डायविंग यासारखे उपक्रम येतात.

साहसी पर्यटनातील उपक्रमांची वैशिष्ट्ये 
 साहसी पर्यटनातील वर दिलेल्या प्रत्येक उपक्रमांची वैशिष्ट्ये व ती करण्यासाठीची लागणारी कौशल्ये, त्यातून येणारा अनुभव हा वेगवेगळा आहे. हे उपक्रम करण्यासाठी लागणारी क्षमता, मानसिक व शारीरिक तयारी, तांत्रिक साहाय्य, साधनसामग्री, प्रशिक्षण, मार्गदर्शन, सुरक्षितता या बाबी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. 

 • गिर्यारोहण अर्थात माउंटेनिअरिंग हा फार पूर्वापार चालत आलेला आणि धाडसी, उत्साही गिरीप्रेमींनी जोपासलेला छंद आहे. या प्रकारात शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा कस लागतो. गिर्यारोहण ही समूहाने करण्याची गोष्ट आहे. गिर्यारोहण करताना निसर्गाशी, तिथल्या वातावरणाशी, परिस्थितीशी गिर्यारोहकाला जुळवून घ्यावे लागते. सरळसोट डोंगर, पर्वतांची चढाई करण्यासाठी प्रशिक्षण, योग्य मार्गदर्शन, कौशल्य, तांत्रिक साहाय्य, सराव खूप महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर प्रचंड धैर्य, संयम, सतर्कता, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, उत्तम शारीरिक व मानसिक आरोग्य हेदेखील तितकेच महत्त्वाचे ठरते. 
 • कातळारोहण (रॉक क्‍लाइंबिंग) करताना कातळांची उभी चढाई, सुळके, डोंगरदऱ्यांमधल्या घळी, संपूर्ण शरीर सामावून घेणाऱ्या लहान भेगा ज्याला चिमनी क्‍लाइंब असे म्हणतात. अशा कठीण क्‍लाइंबरचा कस लागतो. सुरक्षित क्‍लाइंबिंगसाठी अनेक तांत्रिक साधने जसे रोप, क्‍लाइंबिंग शूज, हार्नेस, हेल्मेट, डिसेंडर, क्विक ड्रॉ, बोल्ट, कॅरॅबिनर अशा अनेक साधनांचा वापर करावा लागतो. तसेच बर्फारोहण (आईस क्‍लाइंबिंग) करतानाही बर्फाच्या, हिमाच्या प्रकारानुसारच काळजीपूर्वक चढाई करावी लागते. बर्फारोहण करताना आईस एक्‍स, रोप, आईस पिटन, हातातील ग्लोव्ह्ज, शूज, क्रॅम्पॉन अशी अनेक साधने अत्यावश्‍यक असतात. 
 • अनेक प्रेक्षणीय ठिकाणी हॉट एअर बलून राइड, पॅराग्लायडिंग प्रसिद्ध आहे. हवेत गेल्यानंतर खाली दिसणारी छोटी छोटी गावे, वास्तू, प्रेक्षणीय आकर्षणे, जमिनीवरील लहान दिसणारी माणसे, प्राणी, निसर्ग नक्कीच रोमांच व नीरव शांततेचा अनुभव देतात. व्यावसायिक मार्गदर्शकांसोबत अशी सफर करणे केव्हाही सुरक्षित ठरते. स्काय डायविंग, बंजी जंपिंग, झिप लाइन, फ्लाइंग फॉक्‍स हे हवेतील उपक्रम अतिशय चित्तथरारक अनुभव देणारे असतात. यात मानसिक तयारी, स्थैर्य, धैर्यता, साहसी वृत्ती अंगी असावी लागते. 
 • स्कूबा डायविंग, स्नॉर्केलिंग, कयाकिंग, कनोइंग, रिव्हर राफ्टिंग असे साहसी उपक्रम तुलनेने सुरक्षित असतात. प्रशिक्षित मार्गदर्शकांसोबत या उपक्रमांची मजा अनुभवता येते. कयाकिंग, कनोइंग हे क्रीडाप्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. जगभर त्यांच्या स्पर्धादेखील होतात. अर्थात त्यासाठी त्याचे प्रशिक्षण गरजेचे असते. 
 • साहसी पर्यटनामुळे देश-परदेशातील ठिकाणांची सांस्कृतिक देवाणघेवाण, नवीन भूप्रदेश, तिथली स्थानिक लोक, त्यांचे राहणीमान यांच्याशी जवळून संबंध येतो. त्यामुळे आपापसांतील हितसंबंध जोपासले जातात. यातून मिळणाऱ्या अनुभवामुळे जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध होते. 
 • जंगल, झाडे, प्राणी, पक्षी यांच्या सान्निध्यात आल्यामुळे निसर्गाशी जवळिकता वाढते. अनेक साहसी उपक्रमांमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्ती किंवा समूहाला वेगळी ओळख मिळते. साहसी पर्यटनाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने उपक्रमांमध्ये नावीन्य आणणे, नवनवीन स्थळांचा शोध घेणे, विविध सेवा देणे यावर भर दिला जात आहे. त्यामुळे हौशी पर्यटकांना अनेक नवीन गोष्टी एक्‍स्प्लोर करण्याच्या संधी मिळत आहे. 

साहसी पर्यटनातील धोके 
 पर्यटनाचे स्वरूप बदलल्यामुळे साहसी पर्यटनाचा विस्तार जगभर मोठ्या प्रमाणावर होत असला, यातील उपक्रम कितीही आकर्षक, रोमांचक, चित्तथरारक वाटत असले, तरी त्यातील धोकेदेखील तेवढेच मोठे आहेत. गिर्यारोहण, सायकलिंग, ट्रेकिंग, बाइकिंग करताना घडलेल्या अनेक घटना आपल्यापर्यंत येतात. अनेक प्रसंग पर्यटकांच्या जिवावरदेखील बेततात. कोणताही साहसी उपक्रम करताना त्यात आव्हानांची, धोक्‍यांची, समस्यांची तयारी ठेवूनच त्याचा अनुभव घ्यावा लागतो. योग्य मार्गदर्शन, रीतसर प्रशिक्षण, सुरक्षितता, तांत्रिक साहाय्य व सराव याशिवाय साहसी उपक्रमांमध्ये नैपुण्य मिळवणे अशक्‍य असते.

साहसी पर्यटनातील उपक्रम
 साहसी पर्यटनातील उपक्रमांचे स्वरूप हे वेगवेगळे असते. यातील काही उपक्रम हे जमिनीवर (यात पर्वत, डोंगर, कातळ, सुळके यांचा समावेश करून), हवेत तसेच पाण्यावर अथवा पाण्याखाली विशिष्ट खोलीवर केले जातात. खालीलप्रमाणे आपण या उपक्रमांचे वर्गीकरण करू शकतो. 
जमिनीवर केले जाणारे उपक्रम 

 • गिर्यारोहण  
 • डोंगरयात्रा आणि गिरीभ्रमण 
 • कातळारोहण (रॉक क्‍लाइंबिंग) 
 • बर्फारोहण (आईस क्‍लाइंबिंग) 
 • केविंग 
 • बॅकपॅकिंग 
 • कॅम्पिंग 
 • जंगल सफारी 
 • सँडबोर्डिंग 
 • माउंटन बाइकिंग आणि सायकलिंग 
 • स्किइंग आणि स्नो बोर्डिंग 
 • घोडे सवारी (हॉर्स रायडिंग)

हवेत केले जाणारे साहसी उपक्रम 

 • पॅराग्लायडिंग 
 • स्काय डायविंग
 • हॉट एअर बलूनिंग
 • बेस जंपिंग
 • झिप लाईनिंग
 • बंजी जंपिंग
 • हायलाईन

पाण्यावर किंवा पाण्याखाली केले जाणारे साहसी उपक्रम 

 • सर्फिंग
 • स्कूबा डायविंग आणि डीप सी डायविंग
 • व्हाइट वॉटर कयाकिंग 
 • कनोईंग
 • स्नॉर्केलिंग
 • रिव्हर राफ्टिंग

संबंधित बातम्या