कृषी पर्यटनाचा विस्तारणारा परीघ

ज्योती बागल
सोमवार, 30 डिसेंबर 2019

कृषी पर्यटन
 

कृषी पर्यटन ही संकल्पना अलीकडच्या काळात नावारूपाला आली असून आता या संकल्पनेनं छान बाळसं धरलं आहे. या माध्यमातून शेती, शेतकरी, गाव, वाडा, वस्त्या आणि ग्रामीण संस्कृती जोपासायला नक्कीच मदत होणार आहे. पण ही ग्रामीण संस्कृती जोपासताना शेतीचा आणि ग्रामीण भागाचा शाश्वत विकास होणेदेखील गरजेचे आहे... आणि त्याचसाठी कृषी पर्यटन क्षेत्राला चालना मिळणे गरजेचे आहे... अशाच काही कृषी पर्यटन केंद्रांविषयी...

पराशर कृषी पर्यटन केंद्र
पराशर कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्राची सुरुवात महाराष्ट्रातील पहिला द्राक्ष महोत्सव सुरू करून २०११ मध्ये झाली. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील राजुरी गावात हे कृषी पर्यटन केंद्र आहे. एक एकर एवढ्या कमी जागेचा पुरेपूर वापर करून मनोज हडवळे यांनी हे केंद्र उभारलं आहे. इथं पर्यटकांना राहण्यासाठी अगदी ग्रामीण पद्धतीच्या, शेणानं सारवलेल्या, कुडाच्या भिंती असलेल्या खोल्या बांधलेल्या आहेत. लाकडी पूल, फळझाडं, फुलझाडं आणि सजावटीसाठी टाकाऊ वस्तू यांचा वापर करून पर्यटन केंद्र आकर्षक केलं आहे. 
जेवणामध्ये साधंसं शाकाहारी जेवण असतं. आलेल्या पर्यटकांना सकाळी सकाळी शेतावर फेरफटका मारायला नेलं जातं. त्यावेळी गायीचा गोठा, शेळीपालन, कुक्कुटपालनाच्या ठिकाणी नेलं जातं. त्यांना तिथं काही वेळ घालवायला मिळतो. संध्याकाळच्या वेळी गावातील शेतकऱ्यांच्या घरी एक फेरी होते. 

महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कृषी पर्यटनस्थळी पंधराशे पुस्तकांचं एक वाचनालय आहे. तसंच ग्रामीण वस्तूंचं संग्रहालयही आहे. भारतातील शेतीचा ३२ हजार वर्षांचा प्रवास याठिकाणी डिस्प्ले केलेला आहे. पर्यटकांसाठी पर्यटन केंद्रावर वारली चित्रकलेची कार्यशाळा घेतली जाते. तसंच इथं एक आर्ट गॅलरी असून तिथं तयार केलेल्या वस्तू विकायला ठेवल्या जातात. आलेले पर्यटक या वस्तू आवर्जून विकत घेतात. पराशर कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्राच्या माध्यमातून शेती पर्यटनाबरोबरच गाव पर्यटन, निसर्ग पर्यटन तसंच जुन्नरमधील विविध पर्यटन स्थळांनाही भेटी दिल्या जातात. इथं येणाऱ्या सहली या कौटुंबिक, शालेय तसंच एखाद्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्यादेखील असतात. इथला निवांतपणा सर्वांना भावतो. लेखकांना तर लिखाण करण्यासाठी हे वातावरण अगदी पोषक वाटतं. त्यामुळं अनेक जण इथं आपलं पुस्तक, सिनेमे, वेबसीरिज लिहिण्यासाठी येत असतात. रात्रीच्या मुक्कामात पर्यटकांना प्रोजेक्टरवर जुन्नरमधील पर्यटनासंदर्भातील माहितीपट दाखवले जातात. तर, दुसऱ्या दिवशी सकाळी 'स्वतःच्या शोधात' हा तासाभराचा एक आगळा वेगळा उपक्रम पर्यटकांसाठी राबवला जातो. इथं साधारण २१ प्रकारच्या प्रजातीचे पक्षी आढळतात. इथली बहुतांश झाडं ही नैसर्गिकरीत्या उगवलेली आहेत. याठिकाणी एक मचाण आहे, जिथून बऱ्यापैकी जुन्नर तालुक्याचा परिसर पाहता येतो.

गेल्या आठ वर्षांत २४ देशांतल्या जवळजवळ दहा हजार पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिली आहे. भारतभरातून तर इथली शेती, संस्कृती अनुभवण्यासाठी कित्येक पाहुणे येतच असतात. इथं खूपसाऱ्या गोष्टी करण्यासाठी आहेत, पण बरेचदा पर्यटक काहीच न करता निवांतपणे राहण्यासाठी, पुस्तक वाचण्यासाठी, एकमेकांशी गप्पा मारण्यासाठी या निसर्गाच्या सान्निध्यात येतात. या कृषी पर्यटन स्थळाविषयीची सविस्तर माहिती www.hachikotourism.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या कृषी पर्यटन केंद्रामुळेदेखील गावातील अनेक लोकांना रोजगार उपलब्ध झाले आहेत.  

अॅग्रो टुरिझम विश्व
अॅग्रो टुरिझम विश्वच्या माध्यमातून कृषी पर्यटन केंद्रांना एक नवीन व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न गणेश चप्पलवार गेल्या दोन वर्षांपासून करत आहेत. सध्याची शेतीची अवस्था बघता शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय करणं गरजेचं आहे. ही शेतीपूरक व्यवसायाची गरज पूर्ण होऊ शकते, ती कृषी पर्यटन केंद्रासारख्या आधुनिक व्यवसायातून. शेतीच्या आजूबाजूचा परिसर नेहमीच निसर्गसंपन्न, वैविध्यपूर्ण असतो. परंतु, अनेक शेतकऱ्यांना त्याचा उपयोग कसा करायचा हे कळत नाही... आणि हेच सांगण्याचे काम करत आहे 'अॅग्रो टुरिझम विश्व'. 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कृषी पर्यटन क्षेत्राविषयीची माहिती देणं, त्यासाठी वेगवेगळ्या भागांत कार्यशाळा घेणं, महाराष्ट्रभरातील कृषी पर्यटन केंद्रांना डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून प्रसिद्धी देणं, कृषी पर्यटनस्थळी सहलींचं आयोजन करणं असे विविध उपक्रम अॅग्रो टुरिझम विश्वमार्फत राबवले जातात. तसंच सर्व प्रकारच्या सोशल मीडियाचा वापर करून कृषी पर्यटन केंद्रांचा प्रचार आणि प्रसार केला जातो. शेतकरी आणि पर्यटकांना कृषी पर्यटनाचं महत्त्व पटवून देणं हे अॅग्रो टुरिझम विश्वचं मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळं एखादं कृषी पर्यटन केंद्र कसं सुरू करावं इथपासून आपल्या कृषी पर्यटन स्थळांची जाहिरात कशी करावी याविषयीची सविस्तर माहिती दिली जाते. त्यासाठी पुढील https://agrotourismvishwa.com/ संकेतस्थळाला तुम्ही व्हिजिट देऊ शकता. 

प्रत्येक कृषी पर्यटन स्थळाचं स्वरूप नक्कीच वेगळं आहे, मात्र या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होऊन ग्रामीण संस्कृती जपली जात आहे. कृषी पर्यटन केंद्रांची ही झाली प्रातिनिधिक उदाहरणं, अशी अनेक कृषी पर्यटन केंद्रं आहेत, जी आपापल्या परीनं कृषी पर्यटन क्षेत्राचा परिघ विस्तारत आहेत.  

निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले अंजनवेल 
हे कृषी पर्यटन केंद्र शहरी पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. पुणे जिल्ह्यातील पवना डॅमच्या उत्तर पूर्व भागातील डोंगराळ भागात शिळीम हे गाव वसलं आहे. इथे अंजनवेल कृषी पर्यटन केंद्र असून ते २०१५ मध्ये सुरू झालं. यापूर्वी इथं फक्त शेती होती, परंतु खडकाळ जमीन असल्यानं शेतीसाठी या जमिनीचा तेवढा उपयोग होत नव्हता. याच समस्येचं संधीत रूपांतर करत रमेश जगताप यांनी कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. एकूण दहा एकरमध्ये हे पर्यटन केंद्र उभारलं आहे. याच्या एका बाजूला सुंदर असा नैसर्गिक ओढा आहे. ज्यामुळं पर्यटन केंद्राच्या सौंदर्यात आणखी भर पडते. पक्षी निरीक्षणासाठी अंजनवेल हे उत्तम ठिकाण आहे. इथं अनेक प्रकारची देशी झाडं लावलेली आहेत. त्यामुळं इथलं वातावरण नेहमी प्रसन्न असतं. येणाऱ्या शहरी पर्यटकांना ग्रामीण जीवनाची ओळख करून दिली जाते, त्यासाठी शेतीतून फेरफटका मारला जातो. इथं नैसर्गिक रांजण खळगे आहेत, ते दाखवले जातात. ज्यांना हौस असेल अशा पर्यटकांना शेतात काम करण्याचा अनुभव घेता येतो. जंगलात भटकंती करायची असेल, तर त्याची सोय केली जाते. दगड, माती आणि कुडाच्या साहाय्यानं इको हाउस बांधलं आहे. या घरासाठी फक्त सौरऊर्जेचा वापर केला असून पर्यटक हे पाहू शकतात आणि इथली नैसर्गिक जीवनपद्धती समजून घेऊ शकतात. पर्यटकांना राहण्यासाठी मोठ्या खोल्या आणि दोन हॉल आहेत. पर्यटकांना जेवणामध्ये घरगुती पद्धतीचं शाकाहारी आणि मांसाहारी असं दोन्ही पद्धतीचं जेवण दिलं जातं. इथं टाकाऊ टायरपासून पर्यटकांसाठी बैठका तयार केल्या आहेत.

या पर्यटन स्थळी 'मावळ दर्शना'साठी बेस कॅंप तयार केला आहे. या परिसराजवळ तुंग, तिकोणा, कोरीगड, मोरगिरी, हडशी अशी मंदिरं व ऐतिहासिक किल्ले आहेत, त्यामुळं पर्यटक ट्रेकिंगचाही आनंद घेतात. पावसाच्या सुरुवातीला इथं काजव्यांचा सहवास अनुभवायला मिळतो. पावसाळ्यात पर्यटकांसाठी भातलावणीचं खास आयोजन केलं जातं. इकोफ्रेंडली गणेशमूर्ती करण्याची कार्यशाळा घेतली जाते. या गावात सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती करण्यावर शेतकरी भर देत असल्यानं विषमुक्त अन्न मिळत आहे. तसंच गेल्या वर्षीपासून रानभाज्या महोत्सवदेखील आयोजित केला जात आहे. आलेल्या पर्यटकांना जीवामृत, कचऱ्यापासून खतनिर्मिती, रोपवाटिका, टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती करणं, यांची प्रात्यक्षिकं दाखवली जातात. अंजनवेल कृषी पर्यटनाच्या माध्यमातून सध्या किमान २० पेक्षा जास्त लोकांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होत आहे. तसंच शेतकरी गट, बचत गट तयार झाले असून यांच्या माध्यमातून अंजनवेल कृषी क्षेत्रात प्रगती करण्यासाठी नियोजनही करत आहेत. http://www.anjanvel.com/about.php या संकेतस्थळावरून सविस्तर माहिती घेता येईल.

मोराची चिंचोलीतील सुटीचा आनंद देणारं कृषी पर्यटन केंद्र
जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र सुरू होऊन साधारण १३ वर्षं झाली आहेत. पुण्यापासून ५५ किलोमीटर अंतरावरील मोराची चिंचोली या गावी हे केंद्र आहे. या ठिकाणी जवळच्या तसंच लांबच्या भागातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. जवळच्या परिसरातील पर्यटक एका दिवसासाठी येतात, तर लांबच्या ठिकाणचे पर्यटक मुक्कामी येतात. त्यानुसार त्यांची सोय केली जाते. या कृषी पर्यटन केंद्राचं किंबहुना चिंचोली गावाचं वैशिष्ट्यं असं की हे गाव मोरांसाठी प्रसिद्ध असून इथं मोर मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. त्यामुळं खास मोर पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. याच गोष्टीचा फायदा करून घेत बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच कृषी पर्यटन केंद्रं सुरू केली आहेत. या एकाच गावात १५ च्या आसपास कृषी पर्यटन केंद्रं आहेत. या केंद्रांमध्ये शक्यतो शनिवार, रविवार जास्त गर्दी असते आणि तेच पर्यटन केंद्र चालकांनादेखील सोयीचं पडतं. कारण आठवड्यातील इतर दिवस त्यांना शेतातील इतर कामं करावी लागतात. मोरांना पाहण्याची वेळ सकाळी सहा ते नऊ असते, तर संध्याकाळी साडेचार ते साडेसहा असते. पर्यटकांना मोर पाहता यावेत यासाठी एका कट्ट्यावर मोरांसाठी धान्यं टाकलं जातं व प्यायला पाणी ठेवलं जातं. धान्यं खाण्यासाठी मोर येतात. सकाळी पर्यटकांच्या नाश्त्याची हीच वेळ असते. त्यामुळं नाश्ता करत करत त्यांना मोर बघण्याचा आनंदही घेता येतो. सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत मोर नसताना पर्यटकांना निखळ आनंद देणारे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये लहान मुलांसाठी स्विमिंगपुल आहे. शिवाय पपेट शो, मॅजिक शो दाखवला जातो. याचबरोबर घोडागाडी, बैलगाडीतून सफर, झुलता पूल, बलून मिकी माऊस इत्यादी खेळांची सोय केली जाते. अशा प्रकारचे २०-२५ उपक्रम आणि खेळ घेतले जातात. ज्यामध्ये मुलं मस्त रमतात व सुटीचा पुरेपूर आनंद घेतात. सीझननुसार पर्यटकांसाठी विविध पार्ट्यांचं आयोजनही केलं जातं. सध्या थंडी सुरू असल्यानं हुर्डा पार्टीचं आयोजन केलं जातं आहे. दुपारच्या जेवणामध्ये चुलीवर केलेली पुरणपोळी, मासालावडी आणि गावरान तुपातली लापशी असते. अस्सल गावरान जेवणाचा शहरी पर्यटक मनमुराद आनंद लुटतात, अशी भावना महेश गोर्डे यांनी व्यक्त केली. http://www.morachichincholi.com/ या संकेतस्थळावर या कृषी पर्यटन स्थळाची सविस्तर माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या