कृषी पर्यटनातून ग्रामसमृद्धी

मनोज हाडवळे
सोमवार, 30 डिसेंबर 2019

कृषी पर्यटन
 

यावर्षी आपण महात्मा गांधींची १५० वी जयंती साजरी करत आहोत. महात्मा गांधींनी आपल्याला भविष्यासाठी अनेक गोष्टी दिल्या आणि त्यातील सर्वांत महत्त्वाचा संदेश होता 'खेड्याकडे चला.' हा संदेश भारतीयांनी जरी दुर्लक्षित केला असला, तरी जगाच्या भांडवलशाहीने, भारतीय खेड्यातील बाजारपेठेकडे मात्र अजिबात दुर्लक्ष केलेले नाही. म्हणूनच आज कितीही दुर्गम भागातील खेडेगावात आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ब्रँडच्या वस्तू व सेवा या बाजारपेठेत दिसतील. 

भारतातील लोक मात्र शहरी भागातून ग्रामीण भागाकडे जणू काही हा परदेश आहे अशा दृष्टिकोनातून आतापर्यंत बघत आले आहेत, हे चित्र मागील ३०-४० वर्षांचे असून हे आपल्याला नाकारता येणार नाही. जर हे खरे नसते तर कृषिप्रधान भारतामध्ये कृषी व ग्रामीण पर्यटन या संकल्पनांसारख्या पर्यटन संकल्पना रुजल्याच नसत्या आणि वाढीसही लागल्या नसत्या. पण खरे तर ही खूप चांगली गोष्ट घडली. यानिमित्ताने शहर व गाव यांना जोडले जाऊ लागले. शहरात राहणाऱ्या सर्वच वयोगटातील लोकांना आपल्या अन्नाचा स्रोत कुठला? आपण जे खातो ते नेमके कुठल्या झाडाला येते? कुठल्या मातीत पिकते? या सर्व गोष्टींचे आकलन होण्यास कृषी व ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून मदतच झाली. त्याच वेळेस शहरातील नेहमीच्या वेगवान आणि धकाधकीच्या जगण्यातून काही दिवसांचा निवांतपणा अनुभवण्यासाठी कृषी व ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून एक सशक्त पर्याय उभा राहिला. हे झाले शहरी बाजूने. कृषी व ग्रामीण पर्यटन संकल्पनेने ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांना, बचतगटांना छोट्यामोठ्या लघू व कुटीर उद्योगांना एक चालतीबोलती बाजारपेठ यानिमित्ताने त्यांच्या घरापर्यंत पोचली. शेती करत असताना, अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, अशा परिस्थितीत शेतीपूरक आणि शाश्वत उत्पन्नाचा स्रोत म्हणून कृषी व ग्रामीण पर्यटनाकडे बघता येते. हे झाले अर्थकारणाच्या बाबतीत. एकदा का अर्थकारण साधले की आपण विकास झाला असे ढोबळमानाने म्हणत जरी असलो, तरी हा विकास, ही समृद्धी, ही पूर्णत्वाची नाही. कृषी व ग्रामीण पर्यटनातून ग्रामसमृद्धी या दृष्टिकोनातून जेव्हा आपण पर्यटनाकडे बघतो, त्यावेळेस ग्रामसमृद्धीची नेमकी व्याख्या काय आहे याचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. महात्मा गांधींच्या व्याख्येतील स्वयंपूर्ण खेड्याची संकल्पनाही फक्त अर्थकारणाशी निगडित नव्हती. ग्रामसमृद्धी म्हणजे अर्थकारण हा फारच उथळ अर्थ होऊन जाईल. सर्वांगीण स्वयंपूर्णता या गोष्टीला फार महत्त्व आहे. 

एखाद्या भूभागाचा विकास होणे म्हणजे सर्वांगीण विकास होय. मग त्यात अर्थकारण, समाजकारण, शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षा, प्रदूषणमुक्तता, सांस्कृतिक जाण, सामाजिक भान अशा अनेक अंगाने पूरक अशी समृद्धी जर होत असेल, तर त्याला आपण शाश्वत ग्रामसमृद्धी म्हणू शकतो. मग आपल्या गावात, आपल्या परिसरात कृषी व ग्रामीण पर्यटन संकल्पना वाढीस लागत असताना किंवा कृषी व ग्रामीण पर्यटन विकसित होत असताना, खऱ्या अर्थाने ग्रामसमृद्धी साधली जात आहे का? याचा विचार होणे गरजेचे आहे. हा विचार आपल्या कृषी व ग्रामीण पर्यटन उभारणीत आणि ते पर्यटन चालवण्यात असेल, तर त्याला जबाबदार पर्यटन म्हणता येईल. ही जबाबदारी फक्त पर्यटन व्यवसाय चालविण्याची नाही, तर त्या अनुषंगाने आपल्या पर्यटन केंद्रावर येणाऱ्या पाहुण्यांना शेती, शेतकरी, गाव, गावातील संरचना या सर्व गोष्टींचे योग्य आकलन व्हायला हवे. पाहुण्यांना ग्रामीण संस्कृती अनुभवता यायला हवी. त्यांना ग्रामीण भारत समजायला हवा. इथल्या अडचणी, इथली सद्यःस्थिती, इथल्या संधी त्यांना कळायला हव्या. शहरी ग्रामीण हे एकमेकांच्या विरुद्ध नसून, एकमेकांना पूरक आहेत ही भावना वाढीस लागायला हवी. आपल्या कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्रावर येणारे पाहुणे हे शेती व गाव याविषयी जर अनभिज्ञ असतील, तर एक कृषी व ग्रामीण पर्यटन संकल्पना चालक म्हणून आपली जबाबदारी खूप महत्त्वाची ठरते. अशावेळी फक्त विका हुरडा, बसवा बैलगाडीत, द्या चुलीवरचे चिकन मटण, नाचवा त्यांना रेन डान्समध्ये एवढ्याच संकुचित गोष्टीत कृषी व ग्रामीण पर्यटन अडकवता कामा नये. कृषी व ग्रामीण पर्यटन संकल्पनेला ग्रामीण भागाचा आरसा म्हणून पाहिले पाहिजे. खेड्यांचा भारत हा बदलत चालला आहे. हा बदलता भारत आपण कृषी व ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून, आलेल्या पाहुण्यांना अनुभवण्यास द्यायला हवा. असे करायचे असेल तर पहिल्यांदा स्थानिक मातीशी, संस्कृतीशी, लोककला, खाद्यसंस्कृतीची नाळ जोडलेले आणि नाते सांगणारे कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्र उभारावे लागेल.            

 तुम्हाला कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्र उभारताना, शहरी लोकांच्या मनातील संकल्पना न उभारता, फक्त व्यावसायिक बाजारपेठेचा विचार न करता अस्सल कृषी पर्यटन संकल्पना उभारावी लागेल. मग त्यासाठी अभ्यास करावा लागेल. इतर कृषी पर्यटन केंद्रांना भेटी द्याव्या लागतील. स्थानिक संस्कृतीचा अभ्यास करावा लागेल. तसे बघायला गेले तर लोकांना कुठल्याच सवयी नसतात, त्यांना सवयी लावाव्या लागतात. मग लोकांना अमुक हवे आहे, म्हणून आम्ही तमुक उभारले आहे, याला काही अर्थ नसतो. तुमच्या अभ्यासातून आलेली पर्यटन संकल्पना उभारा, त्याचे महत्त्व लोकांना पटवून द्या, त्याची सवय लावा, लोक तुमच्याकडे यायला सुरुवात करतील. एकदा का या भावनेतून कृषी व ग्रामीण पर्यटन संकल्पना उभी राहायला लागली, या भावनेने कृषी पर्यटन चालवले जाऊ लागले, तर एक दिवस नक्कीच शहर व गाव ही दरी कमी होऊन, दोन्ही बाजूच्या चांगल्या गोष्टी हातात हात घालून चालतील. कृषी व ग्रामीण पर्यटन संकल्पना ही आनंद देणारी आहेच, त्यात शेतावरची मजा लुटायची संधी आहे. त्याचबरोबर मातीशी नाळ जोडण्याचे माध्यम आहे. हे ध्यानात घ्यायला हवे.

 कृषी व ग्रामीण पर्यटनातून नेमकी कशा प्रकारची ग्रामसमृद्धी साधली जाते याची अनेक उदाहरणे देता येतील जसे, की कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्र उभारणीसाठी स्थानिक कारागीर त्यांचे कौशल्य वापरतात. कृषी पर्यटन केंद्र उभे राहिल्यानंतर त्याचे व्यवस्थापन, स्वयंपाक, झाडलोट, स्वच्छता यासाठी लागणारे मनुष्यबळ स्थानिक गावातूनच उपलब्ध होते आणि पर्यायाने रोजगारनिर्मिती होते. आलेल्या शहरी पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी गावातील लोककला जागरण, गोंधळ, पोवाडा, भारूड यांसारख्या कला सादर करणाऱ्या लोककलाकारांना एक प्रकारचे व्यासपीठ मिळते, मानधनाबरोबर, कलेला सन्मानही मिळतो. त्यांच्या पुढच्या पिढ्या हा कलेचा वारसा आवर्जून जोपासतात. आलेल्या पर्यटकांच्या माध्यमातून, कृषी पर्यटन केंद्राच्या शेतीवर किंवा आजूबाजूच्या शेतावर पिकणारा शेतमाल, विकत घेण्यासाठी चालतीबोलती थेट बाजारपेठ मिळते. एवढेच नाही तर प्रक्रिया केलेला शेतमाल विक्रीसाठीची साखळी या निमित्ताने उभी राहू शकते. ज्या गावात कृषी पर्यटन आहे, त्या गावातील महिला बचत गटांच्या चळवळीतून तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी व्यासपीठ तयार होते. 

कृषी पर्यटन केंद्रावर काम करणाऱ्या लोकांना शहरी पाहुण्यांचा सहवास लाभतो. त्यातून संवाद कौशल्य, आत्मविश्वास, जगाचे आकलन, व्यक्तिमत्त्व विकास अशा सकारात्मक गोष्टी वाढीस लागतात. आपले जुने लोक जग फिरून शहाणपण मिळवायला सांगायचे, कृषी व ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून, दर सुटीला जगाच्या कानाकोपऱ्यातून, लोक तुमच्या पर्यटन केंद्रावर येत असतात. तुम्हाला घर बसल्या, पैशांबरोबर जगात काय चालले आहे याचे आकलन होत असते. आपली शेती बघायला कोणीतरी लांबून येते, तर चांगली शेती फुलवू असा आत्मविश्वास शेतकऱ्यांमध्ये वाढीस लागतो. शहरातून आलेले पाहुणे, शेतकऱ्यांची मेहनत समजून घेतात, त्यांचे कौतुक करतात, थोडक्यात काय तर कामाची दखल घेतात. पर्यटकांशी गप्पा मारताना, लांबून चकाकणारे शहर किती धावपळीचे आहे, तिथले काम कसे होते हे कळले की आपण आहोत तिथे किती सुखी आहोत याची कल्पना येते. एका अर्थाने आपल्याच जगण्याकडे आपण सकारात्मक भावनेने बघू लागतो. आपल्याही जगण्यातील संधी आपल्याला दिसू लागतात. त्यासाठी गाव सोडून शहराकडे जायची गरज नाही हे पटू लागते. माझ्या पर्यटन केंद्रावर येणाऱ्या पाहुण्यांना मी परतीची भेट म्हणून मातीचे बैल देतो. हे बैल मी जवळील गावातल्या कुंभाराकडून करून घेतो. एकदा सिंगापुरचे पाहुणे आले होते, कुंभारदादा बैल घेऊन आले. मी त्यांच्याच हाताने, त्या पाहुण्यांना बैल दिले, त्यांचे फोटो काढले, तो फोटो आज कुंभार दादांच्या घरात मोठा करून लावलेला आहे. त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांना ते अभिमानाने दाखवतात. जागरण गोंधळ लोककला सादर करणारे गोंधळीबुवा, त्यांच्या कलेच्या आविष्काराने पाहुण्यांना मंत्रमुग्ध करून टाकतात. ताल धरायला लावतात. त्यांना जय मल्हार मालिकेत तसेच चित्रपटात काम करायची संधी मिळाली आहे. गावातील पेढ्यावाल्याविषयीचा अभिप्राय हा ट्रिप अॅडवायजरवर आला आहे. 

आठवडी बाजारात आपला शेतमाल घेऊन येणारे शेतकरी पाहुण्यांना भाजीपाला विकत आहेत. गावातील प्रसिद्ध मिसळ खायला पर्यटक पुन्हा पुन्हा येत आहेत. आलेले पाहुणे इथल्या शाळांना भेटी देऊन, विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. त्यांना वेगवेगळ्या मार्गाने मदत करू पाहत आहेत. पर्यटक ज्या क्षेत्रांत काम करत आहेत त्यात सध्या कशा संधी आहेत याविषयी स्थानिक तरुण तरुणींना मार्गदर्शन करत आहेत. अशा कितीतरी गोष्टींची यादी करता येईल, ज्या कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्र उभारल्याने घडल्या आहेत, घडत आहेत. मला माहिती आहे, सामाजिक बांधीलकी जपत आणि जबाबदारीने चालवलेल्या कोणत्याही कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्राच्या माध्यमातून, स्वतः त्या शेतकऱ्याचा आर्थिक फायदा होत असेलच, पण त्याचबरोबर त्याच्या एकंदरच सर्वांगीण विकासाची वाटही सुकर झाली असेल आणि हीच भावना आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीची असेल. परदेशात २-३ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. तिथला शहरी वर्ग मोठा आहे. त्यांच्याकडे कृषी पर्यटन संकल्पना ही सामाजिक गरज आहे. आपल्याकडे ५० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत आणि ७० टक्के लोक गावात राहत असले, तरी सर्वच भारतीयांसाठी कृषी व ग्रामीण पर्यटन ही सामाजिक आणि आर्थिक गरज झाली आहे. बेरोजगारीचे संकट गडद होत असताना, वेगाने रोजगार निर्मितीची क्षमता असलेले क्षेत्र म्हणून कृषी व ग्रामीण पर्यटनाकडे बघता येईल. 

पर्यटनातून समाजविकास साधायचा मार्ग याच संकल्पनेतून जातो. ग्रामीण भारत स्वयंपूर्ण करायचा असेल, समृद्ध करायचा असेल, तर कृषी व ग्रामीण पर्यटन संकल्पनेला सर्वच स्तरांतून पाठबळ मिळायला हवे.

संबंधित बातम्या