कृषी पर्यटनाचे दूरगामी फायदे 

राहुल जगताप
सोमवार, 30 डिसेंबर 2019

कृषी पर्यटन
 

उत्तम शेती, मध्यम व्यापार, दुय्यम नोकरी असं आपल्याकडं पूर्वापार म्हटलं जायचं. गेल्या काही वर्षांत मात्र हे चित्र बदललं आहे. 'अन्न, वस्त्र, निवारा' या जरी मूलभूत गरजा मानल्या जात असल्या तरीही खरं तर कोणासाठीही 'प्रतिष्ठा' ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. दुर्दैवानं बहुतेक ठिकाणी शेती आणि शेतकऱ्याची प्रतिष्ठा कमी होत गेली. 

सध्या भारतातल्या शेतकऱ्याचं सरासरी वय जवळपास ६० च्या आसपास आहे. याचा अर्थ सरळ आहे. युवकांना, नव्या पिढीला शेताकडं वळावसं वाटत नाही. ग्रामीण जीवन, जीवनशैली, शेतातून मिळणारी तुटपुंजी मिळकत ही एक बाजू आहे, तर त्याच वेळी शहरी जीवनमान, सोयीसुविधा, सुखासीन जीवन यांचं आकर्षण नव्या पिढीला असल्याकारणानं ही पिढी शेतीपासून दुरावत चालली आहे. मात्र, असं असलं तरी शेती आणि शेतीपूरक उद्योग, व्यवसाय हीच पुढच्या पिढीच्या मूलभूत गरजा भागवू शकत असल्यानं कृषी आधारित व्यवस्थेला पर्याय नाही. 
केल्याने देशाटन,
पंडित-मैत्री,
सभेत संचार,
मनुजा अंगी चातुर्य,
येतसे फार!

पर्यटनाचं महत्त्व आपल्या पूर्वजांनादेखील चांगलंच ठाऊक होतं. हे वरच्या वचनातून दिसून येतं. 'अतिथी देवो भव' ही आपली संस्कृती. 'अतिथी' हा जणू देव मानून त्याप्रमाणं त्याची सेवा, पाहुणचार केला जावा, असं आपली संस्कृती सांगते. पाहुणा म्हणून आलेल्या व्यक्तीला उचित मानसन्मान देऊन त्याच्याशी असलेलं नातं अधिक दृढ व्हावं, अशी यजमानाची मनोमन अपेक्षा असते. म्हणूनच भारतीय समाज हा मूलतः सात्त्विक, अगत्यशील समजला जातो.

आजचं जग म्हणजे एक 'ग्लोबल व्हिलेज' झालं आहे, असं म्हटलं जातं. केवळ पर्यटनाच्या जोरावर ज्यांनी अगदी कमी वेळात आपली प्रगती साधली, अशी अगदी छोटी गावं जशी आहेत तसेच काही देशही आहेत. थोडक्यात अगदी लोकल ते ग्लोबल अशा सर्व ठिकाणी पर्यटन महत्त्वाची भूमिका निभावत आहे.

पर्यटनाच्या क्षेत्रांत नवनवीन प्रवाह सतत येत असतात. 'कृषी पर्यटन' हा असाच एक नव्यानं विकसित होत असलेला प्रवाह आहे. शेतकऱ्यानं स्वतःच्या फळत्या फुलत्या शेतात शहरी पर्यटकांना ग्रामीण जीवन, शेतकऱ्यांची जीवनशैली याविषयी दिलेलं आनंददायी शिक्षण-म्हणजे 'कृषी पर्यटन' अशी ढोबळ व्याख्या करता येईल.

महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात 'कृषी पर्यटन' या संकल्पनेला मूर्त रूप देण्याचं मोलाचं काम चंद्रशेखर भडसावळे यांनी केलं. सुमारे ३५ वर्षांपासून नेरळ जवळील 'सगुणा बाग' या त्यांच्या कृषी पर्यटन केंद्रात त्यांनी एक आदर्श मॉडेलची उभारणी केली आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आजमितीला सुमारे ७०० हून अधिक कृषी पर्यटन केंद्रं एकट्या महाराष्ट्रात उभारली गेली आहेत. महाराष्ट्रात अनेक कृषी पर्यटन केंद्रांनी आता छान बाळसं धरलं असून भारतभर नवीन कृषी पर्यटन केंद्रांना दिशा देण्याचं काम महाराष्ट्रातील केंद्रं करीत आहेत.

कृषी पर्यटनाच्या माध्यमातून नजीकच्या शहरातील, इतर राज्यातील तसंच परदेशातूनही पर्यटक थेट शेतकऱ्याच्या बांधावर यायला तयार आहेत. आवश्यकता आहे ती त्या पर्यटकाला कृषी जीवनासंबंधी उत्तमोत्तम अनुभव देण्याची.

आजचं पर्यटन केवळ स्थळदर्शनाइतकंच मर्यादित राहिलं नसून विविध अनुभव घेण्यासाठी पर्यटक उत्सुक असतात. 'शेतात प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव' हा तर कृषी पर्यटन संकल्पनेचा गाभाच आहे. भात लावणी करताना गुडघाभर चिखलात पावसात भिजत भात लावण्याचा अनुभव किंवा शेणा-मातीचा गिलावा करून हातानं भुई सारवण्याचा अनुभव असो. आपली जमीन, संस्कृती आणि निसर्गाशी पुन्हा एकदा जोडण्याचा स्तुत्य प्रयत्न कृषी पर्यटन केंद्रांच्या माध्यमातून घडत आहे.

भारत हा विविध भाषा, खानपान, भौगोलिक-ऐतिहासिक-सांस्कृतिकदृष्ट्या प्रचंड वैविध्य असलेला एक अद्‌भुत देश आहे. इथं वाळवंट आहेत, हिमाच्छादित शिखरं आहेत, निळाशार समुद्र आहे, प्राचीन मंदिरं आहेत, अरण्य अभयारण्य आहेत, पावलापावलावर निरनिराळ्या दिवसांत भरपूर काही इथं घडत असतं. भारतासह जगभरातल्या पर्यटकांना अनुभवायला, पाहायला, शिकायला, समृद्ध करायला अनेक उत्तम पर्याय इथं नेहमीच उपलब्ध असतात. प्रत्येक ठिकाणचा शेतकरी आपापल्या परिस्थितीनुसार शेतीपूरक उद्योग करत असतो.

आपली शेती सांभाळत शेतकऱ्यानं त्याच्या शेतावर पर्यटकांना साजेशी व्यवस्था निर्माण केल्यास पर्यटकांना ती एक पर्वणीच ठरेल. सफरचंद किंवा केशर पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतात स्वतःच्या हातांनी काढणीला हातभार लावता आला तर! मसाल्याचे पदार्थ आपण सगळेच जेवणात वापरतो, पण मसाल्याची पिकं प्रत्यक्ष डोळ्यांनी बघणं नक्कीच लक्षात राहील ना! शिंदीच्या झाडापासून काढलेली ताजी निरा थेट झाडाखालीच चाखता आली तर! थंडीच्या दिवसांत हुरडा पार्टी, कोकण पट्ट्यात बांधावर पावट्याला शेंगा लागल्यावर जमणारी पोपटी किंवा मोंगा पार्टी, रात्री शेतावर शेकोटीच्या उबेवर रंगणाऱ्या गप्पा, विविध ग्रामीण/पारंपरिक खेळ, गणपती उत्सवात कोकणातली धमाल, नंदुरबार सातपुडा पर्वतरांगांत आदिवासींनी फुलवलेली शेती, त्यांचे आदिवासी पाडे, वळचणीला माशांचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला होणारा प्रवास, पावसानंतर पठारावरून फुलणाऱ्या असंख्य रानफुलांचा गालिचा अशा अक्षरशः असंख्य घटना पर्यटकांना अविस्मरणीय अनुभव देऊन, त्या त्या क्षणाचं सोनं करतात. त्याचंच जर नियोजनबद्ध सादरीकरण झालं, उत्तम मार्केटिंग झालं, तर त्या त्या भागातील स्थानिकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. 

आजकाल इंटरनेटमुळं एका क्लिकवर जगभरातल्या कोणत्याही भागातील एखादी वस्तू, उपकरण, पदार्थ अगदी सहज घरी मागवता येतो. परंतु, तरीही स्थानिकांनी आपापल्या भागात उपलब्ध असलेल्या संसाधनांचा वापर करून निर्मिलेल्या वस्तू, पदार्थ, यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्पादन आणि विक्रीच्या चक्रातील वाहतूक, हाताळणी, दलाली या सर्व साखळीला तोडून जेव्हा शेतकऱ्यांचा शेतमाल, त्यापासून तयार केलेले काही पदार्थ, गावातील कारागिरांनी घडवलेल्या वस्तूंना जेव्हा स्थानिक पातळीवर थेट ग्राहक मिळतो, तेव्हा ती घटना, ग्राहक आणि स्थानिक विक्रेता/शेतकरी/कारागिर यांच्या दृष्टीनं अतिशय मोलाची ठरते. पर्यावरणीय दृष्ट्यादेखील अशा पद्धतीनं होणारी शेतमाल, स्थानिक वस्तू इत्यादींची देवघेव ही पर्यावरणाची जपणूक करणारी आहे आणि म्हणूनच ती महत्त्वाची ठरते.

पूर्वी आपल्याकडं बारा बलुतेदारी चालायची. संपूर्ण गाव हे गावकऱ्यांच्या प्रत्येक गरजेसाठी सज्ज असायचं. शेतकऱ्याला त्याचं शेत पिकवण्यासाठी किंवा दैनंदिन गरजांसाठी लागणारी अवजारं, साधनं, वस्तू, सेवा पुरवण्यासाठी लोहार, सुतार, कुंभार, परीट, कोळी, न्हावी असायचे आणि या सर्व मंडळींची अन्नाची गरज त्यांच्या वस्तू किंवा सेवेच्या बदल्यात शेतकरी भागवायचा.

परस्परांना पूरक अशी ही आदर्श व्यवस्था हजारो वर्षं आपल्याकडं सुरू होती... आणि त्यामुळंच कदाचित गावं समृद्ध होती. शेतकरी हा खऱ्या अर्थानं पोशिंदा होता, राजा होता. बदलत्या रचनेत बलुतेदारी व्यवस्था मोडकळीस आली आणि त्याबरोबरच गावाचं गावपण हरवून गेलं.

कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शहरी मंडळींना पुन्हा एकदा ग्रामीण जीवन, संस्कृती, शेतीशी आणि निसर्गाबरोबर जोडण्याची संधी सर्वच शेतकऱ्यांना मिळाली आहे. शेतकरी त्याच्या शेतावर अन्न, धान्य, फळं भाजीपाला पिकवतोय. त्या प्रक्रियेत शहरी पर्यटक सहभागी होतोय. अन्ननिर्मिती समजून घेतोय. ताज्या स्वच्छ अन्नासाठी थेट शेतावरच बाजारपेठ उपलब्ध होतेय.

पर्यटकांना निवासासाठी स्वच्छ, पर्यावरणपूरक निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था शेतकरी कुटुंबाकडून केली जाते. यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळतो. शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी हा उत्तम मार्ग ठरत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्याच्या शेतीखेरीज परिसरात भटकंतीसाठी वाटाड्या, बैलगाडीची सफर घडवून आणणारा, ट्रॅक्टरवर गावाची रपेट करणारा एखादा शेतकरी, कुंभारकाम शिकवणारा कुंभार, ग्रामीण संस्कृती/संगीताची ओळख करून देणारे गोंधळी, वासुदेव, वाघ्या मुरळी, परिसरातील आदिवासी, त्यांची कला-संगीत-नृत्य, बांबूपासून आकर्षक वस्तू तयार करणारे, बुरूड काम करणारे कारागीर, महिला बचत गट आणि इतर माध्यमातून विविध खाद्यपदार्थ/शेतात पिकणाऱ्या अन्नधान्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादनं विकून संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेला उत्तम गती 'कृषी पर्यटन केंद्रा'च्या माध्यमातून मिळणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला आकार आणि दिशा देण्याचं काम भविष्यात कृषी पर्यटन केंद्रांच्या माध्यमातून होणार आहे. त्यासाठी कृषी पर्यटन केंद्रं चालवणाऱ्या शेतकऱ्यांची भूमिका मध्यवर्ती असणार आहे.

छोटा असो वा मोठा, प्रत्येक शेतकरी हा कृषी पर्यटन केंद्र चालक असू शकतो. त्याचं स्वतःचं शेत, घर आणि त्याची हुशारी हेच त्याचं भांडवल असून त्या बळावर नक्कीच तो स्वतःला आर्थिकदृष्ट्या मजबूत करू शकतो. जर व्यापक स्वरूपात अशी केंद्रं उभी राहिली, तर स्वाभाविकच संपूर्ण गाव हे 'इको टुरिजम' तसंच ‘ग्रामीण पर्यटनाचं' अनोखं केंद्र होऊ शकेल.

दिवसेंदिवस पिकाखालील क्षेत्र कमी होत जातं असताना शेत राखणाऱ्या, वाढवणाऱ्या आणि बांधावर, पडीक जागेवर मोठ्या प्रमाणावर वृक्षराजी फुलविणाऱ्या कृषी पर्यटन केंद्रांची भविष्यात मागणी वाढत जाणार आहे. आजमितीला दिल्लीसारख्या शहरात 'ऑक्सिजन पार्क'ची उभारणी झाली असताना गावागावांतून, शेताशेतातून नैसर्गिकरीत्या 'ऑक्सिजन'चा समृद्ध पुरवठा करणाऱ्या कृषी पर्यटन केंद्रांचं भविष्यात वाढत जाणारं महत्त्व वेगळं सांगायला नको.

ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देण्यात कृषी पर्यटन केंद्रांनी जबाबदारीनं भूमिका निभावल्यास आपोआपच गावातून संधीच्या शोधात शहराकडं वळणारी भावी पिढी स्थानिक पातळीवरच आपापल्या क्षेत्रांत उत्तम योगदान देऊ शकेल.

अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्राचं योगदान गेल्या काही वर्षांत सातत्यानं वाढतं आहे आणि ही वाढ अशीच सुरू राहण्याची शक्यता आहे.

'जीडीपी'मधील पर्यटनाचा वाटा सुमारे १० टक्क्यांच्या आसपास आहे, तर कृषी क्षेत्राचं योगदान सुमारे १५.४ टक्के इतकं आहे. कृषी आणि पर्यटन या दोन्ही क्षेत्रांत नवीन प्रयोग करायला अनंत संधी उपलब्ध आहेत. या दोन्हींच्या मिलापातून गांधीजींना अभिप्रेत 'खेड्याकडे चला' या संदेशाप्रमाणं प्रत्यक्षात शहरातून खेड्याकडं, पर्यायानं शाश्वत जीवनाकडं होणारा प्रवास आता दूर नाही.

संबंधित बातम्या