कृषी पर्यटनातून प्रगतीची दिशा

संगीता भापकर
सोमवार, 30 डिसेंबर 2019

कृषी पर्यटन
 

प्रतिकूल परिस्थितीत एका अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाने साकारलेले निसर्गाच्या कुशीतील स्वप्न म्हणजे तीर्थक्षेत्र मोरगावजवळ वसलेले निसर्ग संगीत कृषी पर्यटन केंद्र. बारामती तालुक्याच्या जिरायत भागातील नैसर्गिक परिस्थिती, ग्रामीण जीवनशैली, प्रयोगशीलता आणि आत्मविश्‍वास यांचा ताळमेळ घालून कल्पकतेस मेहनतीची जोड देऊन हा प्रकल्प उभा राहिला. पूर्वीपासून जिरायत भागात शेती करताना उत्पन्न कमी आणि उत्पादनखर्च जास्त अशी वास्तव परिस्थिती होती. त्यामुळे शेती संपूर्ण तोट्यात होती. कुटुंबाचा आर्थिक स्तरही अशाश्‍वत होता. शाश्‍वत उत्पन्नाच्या संधी प्रतिकूल परिस्थितीमुळे कमी होत्या किंवा जवळपास नव्हत्याच. पण ग्रामीण मातीशी नाळ जोडलेली असल्यामुळे शेतीशी संबधितच आणि शिवारात राहूनच काहीतरी करायचे असा विचार होता. त्यासाठी अथक परिश्रम आणि येणाऱ्या संकटांवर मात करण्याची तयारीही होती. शेती आणि शेतीपूरक व्यवसायांबरोबर अजून काही तरी करावे या कल्पनेतून ‘निसर्ग संगीत’ सुरू केले. 

पूरक घटक हेरले
बारामतीचा पश्‍चिम भाग जिरायती असला, तरी निसर्गदेवतेच्या कृपेने या ठिकाणी कोणकोणते घटक पूरक आहेत या भौगोलिक वस्तुस्थितीचाही अभ्यास केला. आमची शेती मोरगाव-पुणे रस्त्यावर आहे. त्यामुळे शेतीच्या एका बाजूस बारामती-पुणे मुख्य हमरस्ता व तरडोलीचा मोठा तलाव, दुसऱ्या बाजूस मोरगावचे मयूरेश्वर मंदिर, तिसऱ्या बाजूस वन्यप्राण्यांचे वास्तव्य असलेले वनक्षेत्र, चौथ्या बाजूस कऱ्हा नदी व कोल्हापुरी बंधारे. अशा पूरक परिस्थितीत आपण शेती व शेतीपूरक व्यवसायांबरोबर कृषी पर्यटन सुरू केले, तर खूप चांगला प्रतिसाद मिळेल; अनेकांच्या जीवनात आनंद व समाधान देण्याचे आपण माध्यम होऊ असा विचार मनात आला. माझे पती हनुमंतराव भापकर व इतर कुटुंबीयांनी या विचारास सर्वार्थाने पाठिंबा दिला. शहरात भरमसाठ वाढलेली लोकसंख्या, कामांमुळे प्रत्येकाच्या जीवनातील निवांतपणा, समाधान दुर्मीळ होत चालले आहे आणि ताणतणाव वाढतो आहे. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून आपण ग्रामीण संस्कृती जपण्याबरोबर पर्यटकांसाठी माणुसकी, आपुलकी, समाधान, निवांतपणा, जिव्हाळ्याची दारेही येथे उघडी ठेवू शकतो या विश्‍वासातून कृषी पर्यटन केंद्र जानेवारी २०१८ मध्ये सुरू केले. शासनमान्य कृषी पर्यटन विकास संस्था व सरकारचे महाराष्ट्र कृषी पर्यटन विकास महामंडळ यांना निसर्ग संगीत जोडले आहे. 

अतिथी देवो भव
येथे येणारे पर्यटक येताना अतिथी म्हणून येतात, पण दिवसभरात येथे मिळत असलेल्या वातावरणामुळे निसर्ग संगीत परिवाराचा सदस्य होतात. अतिथी देवो भव ही संस्कृती मनापासून जपत येथे येणाऱ्या सर्व पर्यटकांचे मोठ्या प्रेमाने, आपुलकीने आणि जिव्हाळ्याने स्वागत आणि संपूर्ण दिवसभर आदरातिथ्य केले जाते. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना येथे ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडते आणि जाताना ते खऱ्या अर्थाने समाधानी आणि तृप्त होऊन जातात. येथे कोणताही व्यावसायिकपणा न दिसता सेवाभावीपणा असल्यामुळे हे जास्त पर्यटकांना भावते. शिवाय या ठिकाणी अतिशय कमी पैशांमध्ये नाश्‍ता, जेवण अनलिमिटेड मिळते. त्यामुळे पर्यटकांचा चांगला प्रतिसाद आहे. गेली दोन वर्षे हे पर्यटनस्थळ चालविताना येथे येणाऱ्या पुरुष पर्यटकांना आपण आपल्या घरच्या शेतावर आलो आहोत, तर महिलांना माहेरी आलो आहोत असे मनापासून वाटत असल्याच्या भरभरून प्रतिक्रिया जाताना पर्यटक देतात. येथे जे लोक काम करतात, ते कुटुंबातील असो वा बाहेरील, त्यात कोणी मालक नाही आणि कोणी नोकर नाही. सर्वजण सेवेकरी म्हणून पर्यटकांशी वागतात. हे येथील वेगळेपण आहे. त्यामुळे येथे ग्रामीण संस्कृतीचे दर्शन पर्यटकांना मिळते.  

चुलीवरील महाराष्ट्रीय सेंद्रिय जेवण
निसर्ग संगीतमध्ये येणाऱ्या पर्यटकांना सेंद्रिय भाजीपाल्यापासून तयार केलेले चुलीवरील अस्सल महाराष्ट्रीय शुद्ध शाकाहारी जेवण व नाश्‍ता दिला जातो. नाश्‍त्यामध्ये हुरड्याच्या पिठाचे थालीपीठ ‘स्पेशल’ म्हणून ओळखले जाते. मात्र, लहान मुले असतील तर त्यांच्यासाठी लगेचच गरमागरम पोह्यांची फर्माईश पूर्ण केली जाते. जेवणात चुलीवरील भाकरी, चपाती, मसाला वांगे, पिठले, मिरचीचा ठेचा, वरण, भात, मसाले भात, शिरा, शेवईची खीर असा मेनू असतो. अनेक वेळा पर्यटकांच्या आवडीप्रमाणे मेनूमध्ये बदलही केला जातो. याशिवाय जैन पर्यटकांसाठी त्यांच्या मागणीप्रमाणे ‘जैन फूड’ दिले जाते. पर्यटक आल्यानंतर ते आपले पाहुणेच आहेत अशी त्यांची काळजी घेऊन त्यांच्याबरोबर समन्वय व संवाद ठेवला जातो. त्यामुळे येथे पर्यटकांना उपजत आपलेपणा दिसतो. कोठेही फक्त पॅकेज घेण्यापुरता व्यावसायिकपणा दिसत नाही. पर्यटकांचे समाधान हीच आपल्या कामाची आणि प्रकल्पाच्या यशाची पावती, असे समजून या ठिकाणी सर्वजण काम करतात.

असे असते दिवसभराचे नियोजन
निसर्ग संगीतमध्ये निसर्गरम्य ठिकाणी कुटुंबासहित सुरक्षितपणे राहण्याची सोय आहे. इथे येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत प्रथम भारतीय संस्कृतीप्रमाणे औक्षण करून केले जाते. त्यानंतर त्यांना येथील उपक्रमाची माहिती देऊन त्यांच्याकडे असणारा वेळ व येथील उपक्रम यांचे दिवसभराचे नियोजन करून दिले जाते. निसर्ग संगीतमध्ये पर्यटकांना आनंद देणारे तलावात बोटिंग, रेनडान्स, घोडागाडी सफर, बैलगाडी सफर, ट्रॅक्टर सफर, घोडा सफर, प्राणी-पक्षीदर्शन, झुलत्या पुलावरून सफर, ठिकठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात फोटोसेशन, झाडावरील पारंपरिक झोके, तलावात मनसोक्त जलविहार, सेंद्रिय गांडूळखत व व्हर्मीवॉश प्रकल्प भेट, सेंद्रिय शेतीची शिवारफेरी, झोपाळे, घसरगुंडी, सि-सॉ, डबलबार असे विविध उपक्रम आहेत. दिवसभर पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्याचा मनमुराद आनंद घेता येतो. शिवाय येथे राहण्यासाठी येणारे पर्यटक हिवाळ्यात कँप फायर तसेच हुर्डा पार्टीचाही आनंद घेतात. यावेळी त्यांना हुरड्याबरोबर बोरे, चिंचा, मक्याचे कणीस, उसाचा रस असा गावरान मेवाही दिला जातो. नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान हुर्डा पार्टीची व्यवस्था असते. इथे स्वतःच्या आवडीचे शेतातील कोणतेही काम करण्याचा आनंद घेता येतो. उदा. भाजीपाला तोडणे, चारा-पीक कापणे व मुक्या प्राण्यांना खाऊ घालणे इ. स्वतः चुलीवर भाकरी करण्याचा आनंद येथे पर्यटकांना मिळतो. बारा महिन्यांतील सर्व भारतीय सणांचे कार्यक्रम येथे घेतले जातात. विश्रांतीसाठी पारंपरिक पद्धतीची खेळत्या हवेची ठिकठिकाणी छप्पर व्यवस्था केलेली आहे.  

पर्यटकांसाठी शेतीतील उत्पादने 
शेतातील ताजा भाजीपाला, अन्नधान्य, सेंद्रिय गांडूळखत, व्हर्मीवॉश या गोष्टी पर्यटकांना त्यांच्या मागणीनुसार उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही निसर्ग संगीतमध्ये शेतकरी ते थेट ग्राहक ही संकल्पना राबविण्यासाठी पाठबळ मिळते. बारामतीच्या जिरायत भागातील अनेक शेतकरी या निमित्ताने निसर्ग संगीतशी जोडले गेले असून त्यांनाही शेतमाल स्वतः विकण्याचे हक्काचे व विश्‍वासाचे व्यासपीठ मिळाले आहे. 

कसे जाल निसर्ग संगीतमध्ये 
पुणे-मोरगावमार्गे बारामती रस्त्यावर हे कृषी पर्यटनस्थळ आहे. पुण्यापासून ६० किलोमीटर, तर बारामतीपासून ३३ किलोमीटरवर तीर्थक्षेत्र मोरगावपासून पूर्वेला दीड किलोमीटरवर हे निसर्ग संगीत कृषी पर्यटनस्थळ आहे. पुण्यातून स्वारगेटवरून मोरगावमार्गे येणाऱ्या बस किंवा स्वारगेट ते जेजुरी आणि जेजुरीवरून मोरगावमार्गे बारामती शटलसेवा निसर्ग संगीत कृषी पर्यटनस्थळापर्यंत पर्यटकांना सोयीच्या आहेत. याशिवाय गुगल मॅपवर निसर्ग संगीत कृषी पर्यटनस्थळाचे लोकेशन उपलब्ध आहे. त्यामुळे त्याच्या मदतीने कोठूनही पर्यटकांना स्वतःच्या वाहनाने येथे येण्यासाठी अचूक दिशा सहज मिळते. 

सजीवसृष्टीसाठी शेती
पृथ्वीतलावर सजीवसृष्टीचे चक्र सुरू राहण्यासाठी महत्त्वाचा घटक अन्न आहे आणि या अन्नाची निर्मिती शेतकरी करतो. त्यामुळे शेतकरी सर्वांत महत्त्वाचा घटक असल्याचे या ठिकाणी शैक्षणिक सहलीसाठी येणाऱ्या मुलांना, युवकांना पटवून दिले जाते. याशिवाय कल्पकतेने शेती केल्यास शेतकऱ्यांची मुलेही नोकरीच्या मागे न धावता कशाप्रकारे उद्योजक होऊ शकतात, याचे सकारात्मक स्पष्टीकरण आणि जिवंत उदाहरण दिले जाते.

महिलांची विशेष पसंती
गेली दोन वर्षे कृषी पर्यटनस्थळावर असंख्य पर्यटक येऊन गेले. यामध्ये सर्वांत जास्त संख्या महिलांची आहे. शैक्षणिक सहलीनंतर सर्वांत जास्त मनसोक्त, मनमुराद आणि सुरक्षित मौज, मस्ती, धम्माल करण्याचे ठिकाण म्हणून निसर्ग संगीतला पर्यटकांची पसंती आहे... आणि खूप कष्टातून प्रतिकूल परिस्थितीत उभारलेल्या या प्रकल्पाचे हे यश आहे.

कँप फायर आणि हुर्डा पार्टी
येथे हिवाळ्यात निसर्गाच्या सान्निध्यात कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्याबरोबर शेतावर राहण्यासाठी येऊन येथील स्वच्छ, सुंदर वातावरणाबरोबर कँप फायर आणि हुर्डा पार्टीसाठी पर्यटकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. निसर्ग संगीत सुरू केल्यापासून पर्यटकांनी दिलेल्या सूचनांचा आदर करून त्यात लगेच सुधारणा करणे ही निसर्ग संगीतची संस्कृती आहे. पर्यटकांनी सुरुवातीपासून दिलेल्या प्रतिसादामुळे निसर्ग संगीत आज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. 

सुरक्षा व आरोग्याचीही काळजी 
येथे पर्यटकांच्या प्रत्येक गोष्टीकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते व त्यांची काळजी घेतली जाते. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आमचे कुटुंब याच ठिकाणी राहते. संपूर्ण फार्मला चारही बाजूंनी सुरक्षिततेसाठी सुरक्षा कंपाउंड आहे. याशिवाय गरजेनुसार ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसविले आहेत. येणाऱ्या पर्यटकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी संपूर्ण फार्मची स्वच्छता आरोग्याच्या दृष्टिकोनातून राखली जाते. याशिवाय पिण्यासाठी फिल्टरचे पाणी वापरले जाते. चुकून खेळताना कोणाला इजा झाल्यास केंद्रावर प्रथमोपचार पेटी उपलब्ध आहे. वापराच्या पाण्यासंदर्भातही या ठिकाणी कोरडा दिवस पाळला जातो. स्वयंपाकघरातही स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते. मुलांना बोटिंग करताना लाइफ जॅकेट दिले जाते. फार्मवर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आलेल्या पर्यटकांशी सेवाभावी वृत्तीने वागण्याची शिकवण आहे. त्यामुळे ज्या ज्या परिसरात पर्यटक असतात, त्या ठिकाणी त्यांची कोणती गैरसोय होऊ नये यासाठी कर्मचारी सेवेला हजर असतात. निसर्ग संगीतच्या व्यवस्थापनाकडून पर्यटकांच्या सुरक्षा व आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते.

असंख्य सुखद अनुभव 
प्रकल्प सुरू केल्यापासून आत्तापर्यंत नर्सरी ते महाविद्यालयीन युवक यांचा येथील प्रकल्पभेटीला अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला. येथे येणाऱ्या शैक्षणिक सहलींत विद्यार्थ्यांना आनंद देणाऱ्या उपक्रमाबरोबर ज्ञानात भर पडेल अशी माहितीही मिळत असल्याने शैक्षणिक सहलींचे ठिकाण म्हणून शाळा आणि कॉलेज यांनी निसर्ग संगीतला पसंती दिली. येथील सेंद्रिय खतनिर्मितीचा गांडूळखत आणि व्हर्मीवॉशचा प्रकल्प विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे. याशिवाय येथे पुणे शहरासह बारामती, पुरंदर, दौंड, इंदापूर, फलटण, माळशिरस, नातेपुते, सांगली, सातारा भागातून महिलांचे व पर्यटकांचे ग्रुप येत असतात. त्यांनाही येथील आदरातिथ्य, स्वच्छ, सुंदर परिसर आणि घरगुती चवदार जेवण यांमुळे घरच्या शेतावर अगदी माहेरी आल्यासारखे वाटते. त्यामुळे पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेतलेला सेंद्रिय खत निर्मितीचा प्रकल्प, कृषी पर्यटन केंद्र आणि सेंद्रीय शेती यामुळे आमचे स्वप्न असलेला प्रकल्प आज जीवनात खूप समाधान, सामाजिक प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थैर्य देण्याचा माध्यम ठरला आहे. सामाजिक बांधीलकी जपत सेवाभावी भावनेने केलेला प्रकल्प आज आमच्या कुटुंबाला प्रगतीच्या दिशेने घेऊन चालला आहे. या प्रकल्पामुळे माणसाला माणूस जोडत जे माणुसकीचे सुंदर जाळे आम्ही विणत आहोत, त्यातून जीवन जगण्यासाठी प्रत्येक क्षणाला सकारात्मक ऊर्जा मिळत आहे हा आमचा अनुभव आहे.

संबंधित बातम्या