अक्काच्या हसऱ्या चेहऱ्याचं गुपित

विभावरी देशपांडे
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

ऐलोमा पैलोमा
 

अक्काचा हसरा चेहरा पाहून कावेरी जराशी थबकली. तिला वाटलं खूप दमलोय आपण. दोन दिवसांपूर्वी जेएफकेवरून निघाली होती. इतका मोठा प्रवास केला होता तिनं. १२ तासांहून जास्त. इतक्या वर्षांत हा प्रवास अंगवळणी पडला होता. पण यावेळचा परतीचा प्रवास खूप थकवणारा होता. तिकडचं सगळं मुळापासून उखडून ती आली होती. डोळे मिटत होते पण मन भिरभिरत होतं. ‘सगळं मागं टाकलंय ना आता? उलटा विचार नको,’ असं म्हणून तिनं परत डोळे मिटले. पण मिटता मिटता तिला पुन्हा अक्काचा चेहरा हसरा दिसला. तिनं डोळे उघडून अक्काच्या फोटोकडं रोखून पाहिलं. 

‘कावेरी’.. तिच्या कानात आवाज घुमला. आता मात्र ती हबकली. तिला दरदरून घाम फुटला. 

‘कोण आहे?’ तिनं घाबरत विचारलं. पण एक ना दोन. तिनं चाचपडत दिवा लावला. खोली उजळली. अक्काचा चेहरा पुन्हा पूर्वीसारखा. ‘भास झाला’ असं म्हणून ती झोपायला जाणार इतक्यात तिला पुन्हा 
तीच हाक ऐकू आली. का कोण जाणे पण यावेळी ती घाबरली नाही. आवाजाच्या रोखानं जाऊ लागली. तिला असं वाटलं 
की हा आवाज ओळखीचा आहे. त्याचा 
पोत तिच्या आवाजासारखा होता. ती अक्काच्या फोटोकडं खेचली गेली. जसजशी जवळ गेली तसतसा अक्काचा चेहरा हसरा झाला. कावेरी डोळे विस्फारून पहात राहिली. 

‘घाबरू नकोस बाळा, इकडं बघ’ मागून कुणीतरी म्हणालं. कावेरी झर्रकन उलटी वळली आणि जागच्या जागी थिजली. त्या मच्छरदाणीवाल्या जुन्या पलंगावर अक्का ऐसपैस पाय पसरून बसली होती. कावेरीला काहीच सुधरेना. जन्माला आल्यापासून तिनं अक्काबद्दल फक्त ऐकलं होतं सगळ्यांकडून. अक्का हुशार होती, स्ट्राँग होती, फटकळ होती. तिला हवं तेच करायची. एकदा ठरवलं की झपाटल्यासारखी तेच करायची, हेडस्ट्राँग होती वगैरे वगैरे. बाबा चिडून म्हणायचे पण कधीकधी, ‘अक्कावर गेली आहेस अगदी!’ अक्काच्या बहिणी, आजोबांच्या बहिणी यांचं बोलणं ऐकलं होतं तिनं लहानपणी. 

अक्का अचानक गेली हे कावेरीला माहीत होतं. पण तिच्याविषयी एक काहीतरी गूढ होतं. ती नक्की कशी गेली. तिला काय झालं, गेली तेव्हा ती कुठं होती याविषयी कुणीच काहीच बोलायचं नाही. आई बाबांचं लग्न झालं तेव्हा अक्का नव्हतीच, त्यामुळं आईला काहीच अनुभव नव्हता. बाबा तसंही फार काही शेयरिंग बियरिंग करणाऱ्यातले नव्हते. आत्या मात्र अक्काबद्दल बोलताना हळवी व्हायची. पण कावेरीनं कधीच जाणीवपूर्वक या कशाचा विचार केला नव्हता. अक्का तिच्यासाठी एक काल्पनिक पात्रच होती. म्हटलं तर अक्का अनोळखी होती, परकी होती, काल्पनिक होती. पण म्हटलं तर तिच्या असण्याशी अक्काचं काहीतरी नातं होतंच! 

पलंगावर बसलेल्या अक्काला पाहून कावेरीचा थरकाप झाला. हातपाय थंडगार पडले. पण हिंमत करून तिनं अक्काच्या नजरेला नजर दिली. क्षणभर आपणच आरशात पहात असल्यासारखं वाटलं तिला. ती एक एक पाऊल टाकत पलंगापाशी गेली. अक्कानं तिला हाताला धरून बसवलं. कावेरीनं अक्काच्या डोळ्यात पाहिलं. पिंगट, करारी डोळे. आत्मविश्वास आणि निर्धार असलेले. असेच डोळे होते कावेरीचे. पण तेच डोळे आता निवले होते. हरले होते. अक्काचे डोळे पाहून तिला काही वर्षांपूर्वीची ती स्वतः आठवली. ठाम, करारी, कॉन्फिडन्ट पण स्वप्नाळू. तिच्या डोळ्यात पाणी आलं. नकळत मान खाली गेली. अक्कानं तिची हनुवटी धरून चेहरा उचलला. 

हे सगळं काहीतरी अजब सुरू आहे ही जाणीव निघूनच गेली एका क्षणात. कधीच न भेटलेल्या आपल्या आजीला आपण फायनली भेटतोय असं वाटलं तिला. अक्कानं तिच्या गालावर एक हलकी चापट मारली आणि म्हणाली, 

‘रडायला काय झालं? शेवटचा मुलगा होता का तो भूतलावरचा? कशाला टिपं गाळतेस?’ 

कावेरीनं चमकून वर पाहिलं. हिला कसं कळलं अँडीबद्दल? अर्थात एकूण या क्षणी जे काही घडत होतं ते बघता यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नव्हतं. 

‘त्याला जे नातं नकोच होतं ते टिकवण्याचा हट्ट कशाला केलास?’ अक्कानं थेटच विचारलं. आत्तापर्यंत कुणीच असं विचारलं नव्हतं. जे नातं त्याला नकोच आहे ते टिकवायचं कशाला हा प्रश्न पन्नास वर्षांपूर्वी मेलेल्या अक्काशिवाय कुणालाच पडला नव्हता. तिला एकदम गलबलून आलं. ती संध्याकाळ आठवली. 

ऑफिसमधून ती घरी परतली होती. तिचं आणि अँडीचं न्यू जर्सीतलं घर. दोघांनी थाटलेलं. लग्न केलं नसलं तरी दहा वर्षांचं एकत्र आयुष्य. लग्नापेक्षा फार काहीच वेगळं नव्हतं. तीच स्वप्नं, तेच प्लॅनिंग, तीच 
बिलं, तेच टॅक्सेस, तेच प्रेम, तीच भाडणं. सगळं सुरळीत सुरू आहे असं वाटेस्तोवर त्या संध्याकाळी अँडीनं सांगून टाकलं. 
‘I am out of love! प्रेम नाही वाटत आता मला तुझ्याबद्दल. आपण आपलं 
नातं आता ताणायला नको. लेट्स गो अवर वेज.’ तिला काही समजलंच नव्हतं. आधी तर वाटलं हा मस्करीचं करतो आहे. ती हसतच सुटली. पण तो शांत होता. तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, ‘मी खरंच सांगतो आहे. एक पार्टनर म्हणून तुला देण्यासारखं काहीच नाहीये माझ्याकडं आता.’ 

त्यानंतर कितीतरी दिवस ती त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत राहिली. तिला कशाचा काही ताळमेळच लागेना. अँडीनं घर आणि त्यातल्या सगळ्या वस्तू तिच्यासाठी ठेवल्या आणि तो एक वर्षासाठी प्रवासाला निघून गेला. स्वतःला शोधायला. तिला रागच आला त्याचा. नातं टिकवता येत नाही आणि चालला आत्मशोधनाला! तिनंही तिरीमिरीत आपला गाशा गुंडाळला आणि पुण्याला परत आली. 

‘जिथं आपण स्वतःकडं अभिमानानं आणि सन्मानानं पाहू शकत नाही तिकडं क्षणभरही थांबायचं नाही कावेरी! ती जागा आपली नाही,’ अक्का म्हणाली. ‘तो नालायक निघाला. Coward, looser!’ तिचा राग बाहेर पडला. 

‘किंवा खरा निघाला! निर्भय निघाला! ज्या नात्यात त्याच्यासाठी काही उरलं नाही ते वाईटपणा घेऊन तोडायला हिंमत लागते. त्याच्याकडं ती आहे. आपल्यातलं नवीन काहीतरी सापडेल त्याला आणि तू शोधलंस तर तुलाही!’ अक्का म्हणाली. कावेरीला आणखी एक धक्का बसला! हेच म्हणाला होता अँडी! 

‘आपल्या इन्स्टिंक्टवर जगायला हिंमत लागते, खूप काही गमावण्याची तयारी लागते. या नात्यातून बाहेर पडलीस तर तुला पण खूप काहीतरी नवीन सापडेल.’ 

कावेरीला हे सगळं अजबच वाटत होतं. ती एकदम बोलून गेली, 
‘तूही तेच केलंस का अक्का?’ 

अक्का हसली आणि म्हणाली, ‘सोळाव्या वर्षी लग्न झालं माझं. अठराव्या वर्षी तुझी आत्या झाली आणि बाविसाव्या वर्षी तुझे बाबा. मग तुझा काका. तुझ्या आजोबांसाठी मी एक स्त्री होते फक्त. जेवायला घालणारी, सेवा करणारी आणि त्यांच्या सगळ्या गरजा भागवणारी. पण एक दिवस असं काहीतरी घडलं की माझे डोळे खाडकन उघडले. तुझ्या आजोबांचे एक मित्र आले घरी. बाबा आमट्यांच्याबरोबर काम करायला लागला होता तो. आजोबांनी त्याला घरी बोलावलं. ‘चहा!’ असा एक आवाज आला. मी चहा घेऊन आले. यांनी ट्रे माझ्या हातातून काढून घेतला. मी घुटमळले. ते मित्र खूप काही सांगत होते आमट्यांच्या आश्रमाबद्दल. मला ऐकायचं होतं ते सगळं. पण तुझे आजोबा म्हणाले, ‘स्वयंपाक करायला घे.’ मी 
आत निघून गेले. स्वयंपाक करता करता कानावर खूप काही पडत होतं. मी भारावून गेले. मित्र म्हणाले, ‘वहिनी, अन्नपूर्णेचा 
हात आहे तुमचा. तुमच्यासारख्यांची गरज आहे आश्रमाला.’ मला माझे सगळे प्रश्न आणि त्यांची सगळी उत्तरं त्या क्षणी सापडली!’ 

‘तू निघून गेलीस? आनंदवनात? सरळ?’ कावेरीचा विश्वासच बसेना. तिच्या आवाजात आश्चर्य होतं, काहीशी नापसंती होती आणि खूप अभिमानही होता. 

‘हो.. कारण जिथं माझ्यासाठी जागा नाही तिकडं मला राहायचं नव्हतं. जिकडं माझ्या असण्याची गरज होती तिकडं जगायचं होतं मला. खूप गमावलं मी यात. माझी मुलं, माझं कुटुंब, सगळंच! ‘बायको’, ‘आई’, ‘मावशी’, ‘काकू’, सगळी नाती गमावली. पण मी स्वतःला मिळवलं. अर्थातच माझं नाव टाकलं आजोबांनी. त्यांनी टाकलं तसं  इतरांनीही टाकलं. हा फोटोही आजोबा गेल्यावर लावला तुझ्या आईनं. तुला तुझी आजी कोण होती ते कळावं म्हणून. पण तुझी आजीशी ओळखही त्यांच्या चौकटीत बसणारीच होती. ‘बिचारी अकाली गेली,’ अशी. पण तुझी माझी ओळख नव्यानं व्हायची होती. खरीखुरी ओळख. म्हणूनच तर सगळं जग फिरून परत इकडं आलीस तू. कावेरी.. तू तुझी जागा शोध.. जगाच्या पाठीवर कुठंही. जिथं तुझी गरज आहे ती तुझी जमीन.’ 

कावेरी अक्काकडं बघतच राहिली. नकळत तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. अक्कानं तिच्या चेहऱ्यावरून हळुवार हात फिरवला. अगदी आजी फिरवते तसा. गेले काही दिवस गटांगळ्या खाणाऱ्या तिच्या जिवाला एकदम जमीन गवसली. सगळे प्रश्न सुटल्यासारखे वाटायला लागले. अक्काचा हात धरून रडतारडता तिला हसू यायला लागलं. 

‘किटू!.. अगं काय झालं बाळा? रडते आहेस का हसते आहेस? चहा आणला आहे बघ. आणि तांदळाची उकड! तुला आवडायची ना तशी!’ 

कावेरीनं डोळे किलकिले करून पाहिलं तर खरेकाकू! त्यांचा हात धरून बसली होती ती. तिला काही सुधरेना. ती ताडकन उठली. लख्ख ऊन पडलं होतं. खरेकाकू काहीतरी बोलतच होत्या. तिला कळेना या आत आल्या कशा! पण विचारलं तर परत खूप काहीतरी ऐकायला लागेल म्हणून तिनं नाही विचारलं. 

‘स्वप्न पडलं का तुला?’ त्यांनी विचारलं. 
‘हं .. बहुतेक’ ती हसून म्हणाली. 

‘ऐक.. ते गोखले बिल्डर येणार आहेत. रिडेव्हल्पमेंटची चर्चा सुरू आहे ना. होईल ते असं दिसतं आहे. आई, बाबा आणि दादापण येतील. काय ते होऊन जाऊ दे बाई! खूप जुना झाला वाडा.’ खरेकाकू म्हणाल्या, 

‘पाडणार हा वाडा?’ तिच्या आवाजात किंचित दुःख होतं. 
‘हो ना! माझं सगळं आयुष्य गेलं इकडं. पण जुनं मोडल्याशिवाय नवीन काही सुरूही होत नाही ना?’ काकू एक फिलॉसॉफिकल वाक्य टाकून निघून गेल्या. कावेरीला हसू आलं. तिला पडलेलं स्वप्न झरझर तिच्या डोळ्यासमोरून गेलं. तिनं फोनवर अँडीला ‘थँक यू अँड गुड लक’ असा मेसेज केला. पटकन आवरून घ्यावं म्हणून ती खोलीतून बाहेर पडली. बाहेर जाताजाता सहजच तिचं लक्ष अक्काच्या फोटोकडे गेलं. अक्काच्या हसऱ्या चेहऱ्याचं गुपित तिला आता कळलं होतं.  
(समाप्त)

संबंधित बातम्या