घराभोवतीची बाग कशासाठी?

अल्पना विजयकुमार
गुरुवार, 3 जानेवारी 2019

होम गार्डन
झाडांचे सान्निध्य कोणाला नको असते? घराभोवती, टेरेसवर सुंदर बगीचा फुलवावी, असे अनेकांना वाटते. मात्र त्याची शास्त्रशुद्ध माहिती नसल्याने ते बगीचा फुलवण्याचा प्रयत्न करत नाहीत. तसेच घराभोवती बगीचा कशासाठी हवा? असा प्रश्‍नही अनेकांना पडतो. म्हणूनच घराभोवती बगीचा का असावा? तो कसा करावा? तो करताना काय काळजी घ्यावी? याची शास्त्रीय माहिती देणारे नवे सदर...   

शहरी भागामध्ये राहण्याच्या जागेची कमतरता माणसाला बहुमजली इमारती बांधायला उद्दयुक्त करीत आहे, असे असले तरी त्याची मातीची ओढ तशीच राहिली आहे. अगदी उंचावरच्या टॉवर्समध्ये राहातानासुद्धा झाडांचे सान्निध्य त्याला हवेहवेसे वाटते, म्हणूनच घराभोवतीच्या मोकळ्या जागेत किंवा छोट्याशा गॅलरीत आवडीची झाडे लावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे.

अशा या बागकामाची माहिती सर्वांना असतेच असे नाही. यातूनच उत्साहाने महागडी झाडे, औषधे व इतर साहित्य वापरूनसुद्धा आमची झाडे जगत नाहीत. फुले, फळे येत नाहीत म्हणून माती व कुंड्या रचून ठेवल्या जातात. अशावेळी बागकामाचे शास्त्र थोडे समजून घेतले तर मदत होईल. ही माहिती टप्प्याटप्प्याने आपल्याला द्यावी, हा या लेखमालेचा उद्देश आहे. या वर्षाच्या प्रत्येक अंकाद्वारे बागकामाच्या अनेक अंगांची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. या मालिकेच्या आधारे तुम्ही स्वतःची बाग अगदी उत्तम प्रकारे फुलवू शकाल याची खात्री आहे.

फळाफुलांनी बहरलेली बाग किंवा खिडकीत ठेवलेल्या चार कुंड्या आपल्याला निखळ आनंद देतात. याशिवाय घराभोवतीची किंवा गच्चीवरील बाग आपल्याला काय काय देते? असा प्रश्‍न विचाराल तर खूप मोठी यादीच तयार होईल? माणसाला निसर्गाचा सहवास नेहमीच हवाहवासा वाटतो. झाडांवरची विविधरंगी फुले पक्ष्यांची किलबील, मातीचा स्पर्श, पाण्याचे तुषार या सर्वांचे वर्णन करावे तेवढे थोडेच. या गोष्टी रोज अनुभवण्यासाठी घराभोवतीची बाग ही एक सहज सोपी हाताशी असणारी गोष्ट आहे. आपले मानसिक व शारीरिक आरोग्य आणि बागकाम यांचा अगदी जवळचा संबंध आहे. बागेतून फेरफटका मारला तर आपल्याला लगेच उत्साह वाटतो. मानसिक ताण अगदी सहज निघून जातो. आपला मूड लगेच सुधारतो, हे आपण सर्वांनी अनुभवले असेलच. असे का होते? झाडांच्या सान्निध्यात शरीरातील प्राणवायूची पातळी वाढते. आपल्या नकळत होणाऱ्या स्नायूंच्या हालचाली शरीराला हलकासा व्यायाम देतात. फळा-फुलांचे निरीक्षण, मातीचा स्पर्श, नवी फूट, वाळलेली पाने, किडे हे पाहताना तुम्ही निर्विचार अवस्थेमध्ये जाता, दुःख विसरून जाता. संध्याकाळी ऑफिसमधून थकून आल्यावर विसाव्याचे ठिकाण म्हणून बागेतील झोक्‍यावर बसू, हा नुसता विचारसुद्धा आपल्याला शांत करुन जातो. घरातील ज्येष्ठांना विरंगुळा आणि वेळ साधन म्हणून बागकाम अतिशय आवडते. तुम्ही स्वतः सजवलेली बाग, तिची रचना त्यातून मिळालेली फुले, फळे आपल्याला स्वनिर्मितीचा आनंद देतातच. त्या शिवाय नको असलेले सामान ठेवण्याची जागा म्हणजेच गच्ची ही व्याख्या बदलून तिचे रूपांतर सुंदर बागेमध्ये केले जाते, अशी बाग पाहुण्यांना कौतुकाने दाखविली जाते.

आज-काल सेंद्रिय किंवा नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला भाजीपाला सर्वत्र विकत उपलब्ध होतो आहेच. पण स्वतःच्या बागेतून मिळालेल्या भाजीपाल्याचे कौतुक आणि त्याची गोडी काही वेगळीच. हवे त्यावेळेस घरात लागणारा कढीपत्ता, पुदीना, आले, मिरची, लसूण, कांदा, तुळस, गवती चहा यासारख्या रोजच्या वापराच्या गोष्टी पटकन व ताज्या उपलब्ध होतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गेल्या पन्नास - साठ वर्षात रासायनिक खतांच्या वापराने शेतीतील उत्पन्न वाढले. दुष्काळ व भूकेपोटी होणारे मृत्यू टळले. परंतु शेतजमिनी नापीक झाल्या. कालांतराने माणसाच्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रात आलेल्या ‘कोल्हापूर नव्हे तर कॅन्सरपूर!’ ‘पंजाबमधून येणारी कॅन्सर ट्रेन!’ यासारख्या बातम्या तुम्ही वाचल्या असालच. आपल्या आजूबाजूलासुद्धी कॅन्सर, किडनीविकार या प्रकारच्या विकारांचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. रासायनिक खत व किटकनाशकांचा वापर आपल्या बागेमध्ये टाळणे सहज शक्‍य आहे. सेंद्रिय खते व नैसर्गिक कीटकनाशके वापरून दोनशे ते तीनशे चौरस फुटांच्या जागेत आपल्या कुटुंबापुरती भाजीपाला सहज पिकवता येईल. यासाठी..... पर्माकल्चर व व्हर्टीकल रचना इत्यादी तंत्रांचा वापर उपयोगी पडतो.

याशिवाय ओल्या कचऱ्याची गंभीर समस्या सोडविण्यासाठी ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट करणे व त्याचा बागेतील भाजीपाल्यासाठी सेंद्रिय खत म्हणून करणे ही उपाययोजना आज-काल सर्वत्र वापरली जात आहे. कचऱ्याची विल्हेवाट व झाडांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत या दोन्ही गोष्टी यातून साधू शकतात.

सरतेशेवटी शहरी बागेतील वाढलेले हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी काँक्रिटीकरण व वृक्षतोड यामुळे नष्ट झालेली हिरवळ याला पर्याय म्हणून घराभोवतीच्या व गच्चीवरील बागा म्हणजे ऑक्‍सिजन मिळविण्याचे कारखानेच आहेत. चीनमधील काही शहरातील प्रदूषणकमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गच्चीवरील बागा निर्माण करणे, हा प्रमुख उपाय ठरला आहे. अशाच प्रकारचा प्रयोग दिल्लीतील एका व्यावसायिकाने सिद्ध केला आहे. वैश्‍विक तापमान वाढ व हरित वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी घराभोवतीच्या परसबागा गच्चीवरील बागा पुढील काळात मोठीच कामगिरी करतील यात शंका नाही.   

संबंधित बातम्या