बागेची आखणी 

अल्पना विजयकुमार
मंगळवार, 29 जानेवारी 2019

होम गार्डन
 

घराभोवतीची बाग किंवा गॅलरी, छतावरील बाग यांची आखणी करताना काही तांत्रिकबाबींची माहिती असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे काही तांत्रिकबाबी आपण समजून घेऊ, यामध्ये आपण ऊन व वाऱ्याची दिशा, पाण्याची उपलब्धता, बागेला पाणी देण्याच्या पद्धती हरितगृह/ शेडनेट रचना या विषय जाणून घेऊ.

झाडाच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश अत्यावश्‍यक असतो. प्रकाश संश्‍लेषणविषयी आपण शालेय जीवनापासून शिकत आहोत. तरीही काही झाडांना प्रखर सूर्यप्रकाश तर काहींना कमी प्रमाणात, तर काही झाडे अगदी सावलीतच (indoor) वाढतात. बागेची आखणी करताना प्रखर सूर्यप्रकाश, थोडावेळ ऊन व सावली कुठे कुठे येते याचा विचार करावा. घराचे प्रवेशद्वार, मोकळी जागा कोणत्या दिशेला आहे, यावर सुद्धा सूर्यप्रकाशाची उपलब्धता अवलंबून आहे. पेपरवर घराच्या जागेचा/ गच्चीचा नकाशा बनवावा.  पूर्व-पश्‍चिम, उत्तर-दक्षिण दिशा दाखवून, उत्तरायण-दक्षिणायन या कालावधीमध्ये सूर्याच्या बदलणाऱ्या जागा दर्शवाव्यात. यानंतर कायम सूर्यप्रकाशाची जागा, सकाळ किंवा संध्याकाळी पडणाऱ्या उन्हाची जागा व पूर्णवेळ सावलीची जागा नकाशावर दर्शवावी. एकदा का अशी आखणी झाली, की बागेतील झाडांची रचना, त्याप्रमाणे करणे शास्त्रशुद्ध होईल. दृष्टिक्षेपामध्ये बाग कशी दिसते, याचाही विचार अवश्‍य करावा.

फुलझाडे, फळझाडे, भाजीपाला यांना पाच-सहा तास प्रत्यक्ष (direct) ऊन लागते. जिथे प्रत्यक्ष सूर्यप्रकाश येत नाही, अशा ठिकाणी फळे व फळभाज्या लावल्या तर उत्पन्न मिळणार नाही. विविधरंगी पाने असणारी झाडे म्हणजे क्रोटॉनना. यांना मध्यम ऊन सावली चालेल. अशाच प्रकारे पालेभाज्यांना कमी ऊन किंवा सावली चालेल. म्हणूनच जिथे प्रत्यक्ष ऊन येत नाही. फक्त उजेड येतो; उदा. घराच्या उत्तरेचा भाग, अशा ठिकाणी पालेभाज्या, शोभेच्या पानांची झाडे लावावीत. तर नारळ, पाम, सुपारी या झाडांची सावली विरळ असते. अशा झाडांखाली भाजी/ फुलांच्या कुंड्यांची रचना करता येईल.

उपलब्ध सूर्यप्रकाशाचा चांगला वापर करण्यासाठी रेझबेड (Raizebeds) तंत्रज्ञान; व्हर्टिकल रचना (Vertical Planters) किंवा वर्तुळाकार रचना (Herble spiral) अत्यंत उपयुक्त! 

आयताकार रेझ बेडस (फोटो क्र. १ पहा) - गौरी गणपतीच्या वेळी पूर्वी वापरात येणारे पायऱ्यांचे स्टॅंड यासाठी वापरता येतील. आयातकार कुंड्या,  ज्युटच्या पिशव्या; लाकडी प्लॅंटर्स वापरून उभ्या पायऱ्यांच्या ही स्टॅंडवर ही रचना करतात, यामुळे कमी जागेमध्ये जास्त झाडे लावता येतात व सर्वांना भरपूर सूर्यप्रकाश मिळतो. (फोटो क्र. २ पहा).
वर्तुळाकार रेझ बेडस्‌-(Herbal spiral) 
अत्यंत आकर्षक दिसणाऱ्या या रचना (फोटो क्र. ३ पहा) विटा/ दगड यांच्या साहाय्याने करता येतात. वर्तुळाचा बाहेरील भाग कमी उंचीचा व मध्यभागी उंची वाढत जाणारी पिरॅमिड सारखी रचना यामध्ये करतात. मध्यभागी कमी पाणी लागणारी छोटी झाडे व बाहेरील भागात जास्त पाणी लागणारी झाडे लावतात. विशेषतः भाजीपाला किंवा फुलांच्या छोट्या झाडांसाठी उपयुक्त.
व्हर्टिकल रचना-(Vertical Planters)
 घराभोवतालच्या बागेची सीमा भिंत 
किंवा गच्चीची पॅरापीट वॉल यांच्या आधाराने उभ्या रचना करता येतात. आयताकृती कुंड्या किंवा लाकडी खोके, पीव्हीसी पाइप्स यामधून अशा रचना करता येतील. बाजारामध्ये ग्रीनवॉल तयार करण्यासाठी प्लॅस्टिकचे सुबक प्लॅंटर्स मिळतात. यांना मागील बाजूने ठिबकसिंचनाची सोय असते. (फोटो क्र. ४ पहा)
जमिनीवरील किंवा गच्चीवरील बागेमध्ये लॉन लावण्याचा विचार करत असाल तर मात्र भरपूर प्रकाशाची जागा निवडावी लागेल. कारण सावली असलेल्या ठिकाणी लॉन जगणार नाही, तसेच आजूबाजूला मोठी झाडे असतील तर त्यांच्या सावलीमध्ये सुद्धा लॉन लावण्यासाठी विशिष्ट जातीचे लॉन निवडावे लागेल. 

संबंधित बातम्या