छोटीशी इच्छा!

डॉ. मृण्मयी भजक
गुरुवार, 25 जानेवारी 2018

अमेरिका : खट्टी-मीठी 

लेकी, सुनांच्या बाळंतपणासाठी किंवा मुलांकडे फिरायला बऱ्याच आया अमेरिकेला जातात. तिथे त्यांना येणारे अनुभव त्यांचं जग विस्तारणारे असतात. नवी अनुभूती देणारे असतात आणि आयुष्यभरातील काही छोट्या छोट्या इच्छापूर्तीचेही.
 

आम्ही काही भारतीय बायका अमेरिकेतल्या आमच्या सोसायटीमध्ये खाली उभ्या होतो. ’एफ’ अपार्टमेंट मधून एक भारतीय बाई पॅन्ट शर्ट घालून जाताना दिसल्या. मी त्यांच्याकडे बघू लागले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने, बऱ्याच जणांचे पालक अमेरिकावारी करण्यासाठी आले होते आणि सोसायटीमधील भारतीय कुटुंबं, त्यांच्याकडे येणारे पाहुणे रावळे या सगळ्याची माहिती आम्हाला असणे अनिवार्य आहे असा आमचा समज होता. 

‘या कोण?‘ मी विचारलं.

‘मी पण परवा ओळखलंच नाही त्यांना. आता इथे जवळ आल्या की बघ हं‘
त्या जवळ आल्या. बाप रे या तर गुप्ता आण्टी, सुलूच्या सासूबाई.  एक सैलसर पॅन्ट आणि टॉप त्यांनी चढवलं होतं. त्यात त्यांचं सुटलेलं पोट दिसत होतं. गळ्यात मंगळसूत्र होतं, भांगात ठसठशीत सिंदूर भरलं होतं. नेहमी असणारी कापळवळची टिकली त्यांनी काढली होती, पण वर्षानुवर्षे टिकली लावल्याने कपाळावर आलेला गोल टिकलीचा आकार स्पष्ट दिसत होता. एकूण त्यांचा हा नवीन पेहराव म्हणावा की अवतार हे कळत नव्हतं 

आम्ही त्यांच्या नवीन पेहरावाविषयी काही बोलावं अशी त्यांची अपेक्षा असावी .पण एकूणच त्यांची ही नवीन वेशभूषा कुणालाच स्वागतार्ह वाटत नव्हती. तरीही स्वप्ना म्हणाली, ‘आंटी, छान दिसतंय हे‘

‘थॅंक यू बेटा‘ एवढाच म्हणून त्या निघून गेल्या. 

खरंतर गुप्ता आंटी आणि अंकल मागच्या वर्षी अमेरिकेला येऊन गेले होते सुलुकडे. पण मागच्या वर्षी त्या पूर्णपणे साडीतच होत्या. यावर्षी त्या एकट्याच आल्या होत्या. त्यांच्यामध्ये झालेला हा बदल मात्र फार आश्‍चर्यकारक होता.  

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मयुरीच्या घरी पार्टी होती. सगळे जण आले होते. गुप्ता आंटी पण आल्या. जीन्स, टॉप आणि जाकीट असा त्यांचा पेहराव होता. पण कालपेक्षा आता त्या जरा बऱ्याच चांगल्या  दिसत होत्या. 

जेवणाची धामधूम संपली, लवकर जाणारी मंडळी निघून गेली. आम्ही आठ दहा जणी उरलो होतो. कुणीतरी विचारलं, ‘आंटी, एक विचारू? तुमच्या कपड्यांमध्ये एवढा बदल कसा काय झाला बरं?‘

‘हं ,जरा सविस्तर सांगते. मी खूप लहान असताना वडील पाचगणीला स्थायिक झाले. पाचगणी टूरिस्ट प्लेस असल्याने लहानपणापासून वेगवेगळ्या कपड्यातले टूरिस्ट, मुली, बायका यांना पाहिलं होतं. मोठमोठ्या बायका पण जीन्स, मिडी असे कपडे घालायच्या.  आपण कधीतरी असे कपडे घालू शकू का? असा विचार लहानपणापासून सारखा मनात येत असे. आईला विचारलं तर ती म्हणायची,‘ बाबांना विचार‘ वडील अगदी कडक, त्यांच्यासमोर काहीही बोलण्याची हिम्मत नव्हती. 

आई म्हणायची, ‘लग्न झालं की नवऱ्याच्या परवानगीने घाल काय हवं ते‘ लग्न गावातच झालं, तेही एकत्र कुटुंबात. लग्न झाल्यापासून साडी एके साडी असंच चालू झालं. मोठ्यांसमोर साडीबरोबर घुंगटही ओढावा लागे. गावात सगळेच ओळखीचे, त्यामुळे हा विचार बोलून दाखवणं पण कठीण. पुढे कामानिमित्त आम्ही मुंबईत आलो. पुढे काही वर्षांनी पंजाबी ड्रेस घालू लागले, ते पण फक्त मुंबईत. पाहुणे आले, गावाला जायचं असलं की साडी सक्तीचीच होती. मग मुलं मोठी झाली, आपापल्या कामाला लागली. राजीव आणि सुलु अमेरिकेला आले. मागच्या वर्षी आम्ही आलो, तेव्हा माझी कॉलेजची मैत्रीण म्हणाली, ‘तिकडे जाते आहेस तर जीन्स घालून घे, तुझी कॉलेजातली इच्छा पूर्ण करून घे.  इथे काही जमणार नाही परत घालायला. म्हणून मागच्या वर्षी मीच तो विषय काढला. एक ठराविक वयानंतर ती इच्छा संपली असं वाटत होतं खरं , पण पुन्हा ती इच्छा जागी झाली. यांना बोलून दाखवली, पण त्यांनी नापसंती दाखवली. सुलूने मागच्या वर्षी हे सगळं पाहिलं होतं, त्यामुळे यावर्षी तिने मला एक पॅन्ट  आणि टॉप आग्रहाने घालायला दिलं. मला माहितीये , हे मला फार चांगलं दिसतंय अशातला भाग नाही, पण माझ्या सुनेने मला यामध्ये खूप पाठिंबा दिला. आपल्याला वाटत असतं की किती छोटी गोष्ट आहे ही! 

वय झालंय, मला बरं दिसणार नाही. लोक काय म्हणतील ? अशा बऱ्याच सबबी आपण स्वतःला देत असतो आणि छोट्या छोट्या इच्छा मारून टाकत असतो. 

असं म्हणतात, की कपड्यांमध्ये काय असतं? पण खरं सांगू का, मला ना जीन्स घातल्यावर खूप आत्मविश्वास वाटला. साडीचा पदर आणि ओढणी  यांच्यापासून मोकळं झाल्यासारखं वाटलं. यावेळची माझी ट्रीप छानच झाली, पण जीन्स घालून एकदम तरुण झाल्यासारखं वाटलं बघ.‘

खरंच, काकू खूप मनापासून बोलत होत्या. लेकी, सुनांच्या बाळंतपणासाठी किंवा मुलांकडे फिरायला बऱ्याच आया अमेरिकेला जातात. तिथे त्यांना येणारे असे अनुभव त्यांचं जग विस्तारणारे असतात. नवी अनुभूती देणारे असतात आणि आयुष्यभरातील काही छोट्या छोट्या इच्छापूर्तीचेही.

संबंधित बातम्या