निरोप...

मृण्मयी भजक
गुरुवार, 22 मार्च 2018

अमेरिका खट्टी मीठी

निरोप घ्यायची घटिका आताशा फक्त जाहीर झाली होती, तरी अजून महिनाभर अवकाश होता, पण तरीही विश्वासच बसत नव्हता की आपण अमेरिका सोडून जाणार. हे गाव, इथे जमविलेला गोतावळा, हे टुमदार घर, मुलाची शाळा सगळं सोडून जाणार या विचारांनी मन अस्वस्थ्य झालं होतं.

वर्षभरापूर्वीचीच गोष्ट, आम्ही अमेरिकेला येऊन फक्त काही महिने झाले होते आणि भारतीय लोकांच्या ग्रुप मध्ये मी गेले होते. सगळ्या लोकांना कायमचंच अमेरिकेत स्थायिक व्हायचं होतं. त्या सगळ्यांमध्ये मी एकटीच वेगळ्या विचारांची होते, मला माझ्या देशात परत जायचं होतं. इथे फार काळ राहायचं नव्हतं. जरी अमेरिका आणि गाव मला खूप आवडलं असलं तरी मोठा काळ इथे वास्तव्य करण्याची माझ्या मनाची तयारी अजिबात नव्हती. पण आता परत जायचं या विचारांनी मात्र मी पुरती हादरून गेले होते. गावाशी, तिथल्या रस्त्यांशी जणू ऋणानुबंध जुळले होते. मैत्रिणींचा गोतावळा जमला होता. हे सगळं सोडून कायमचं भारतात परतणे हे फारच दुःखदायक वाटत होतं.

घरातल्या सामानाची आवराआवर चालू होती. एक एक जमवलेल्या वस्तू, छोट्या मोठ्या, इथलं सगळंच भारतात परत घेऊन जावंसं वाटत होतं. आठवणींखेरीज फार काही बरोबर घेऊन जाता येणार नव्हतं.

मुलाच्या शाळेचा शेवटचा दिवस होता. मी त्याला घेऊन जाण्यासाठी शाळेत आले होते. त्याच्या टीचरने सगळ्या मुलांना सांगितलं की आज ऋतुजचा शाळेतला शेवटचा दिवस आहे. तो भारतात, त्याच्या मायदेशी परत जाणार आहे. तिथे असलेल्या पृथ्वीच्या गोलावर त्यांनी सगळ्या मुलांना दाखवलं, की आता आपण इथे आहोत आणि ऋतुज इथे जाणार आहे. सगळ्या मुलांनी ’अहा किती लांब ’ अशा प्रतिक्रिया दिल्या. सगळ्या मुलांना टीचरने ऋतुजला बाय करा असं सांगितलं. 

माझा मुलगा ऋतुज टीचर शेजारी उभा होता. सगळा वर्ग समोर उभा होता. शाळा सुटून काही मिनिटं होऊन गेली होती, पण आज कुणालाही घरी पळण्याची घाई नव्हती. एक एक मूल येऊन ऋतुजला मिठी मारत होतं. हातात हात घेऊन काहीतरी सांगत होतं. मुलगा शांतपणे सगळ्यांकडून अभिवादन स्वीकारत होता. पण हे दृश्‍य पाहून मला गदगद भरून येत होतं. तो कार्यक्रम संपला आणि आम्ही जाईपर्यंत त्याचे मित्र मैत्रिणी त्याला  हात हलवून ,काहीतरी बोलून, डोळ्यातून निरोप देत होते. मी सुन्न झाले होते. 

निरोप एवढा अवघड असेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. पण तो होता. 

भारतात परतल्यावर शाळा, डागडुजी अशा अनेक उरकण्याच्या कामांमध्ये मी गढून गेले. 

एके दिवशी सगळ्या कामांमध्ये असूनही का कुणास ठाऊक पण सेंट जोसेफची फार आठवण येत होती. संध्याकाळची वेळ होती. मी घरी आले होते. किल्ली, नाणी अशा बऱ्याच वस्तू मी त्या दिवशी जीन्सच्या खिशात ठेवल्या होत्या. त्या काढून जागेवर ठेवण्यासाठी मी खिशात घातला तर, वस्तूंबरोबर माझ्या हाताला काहीतरी वाळूसारखं लागलं. खिशात वाळू कशी जाईल, असा विचार करत मी खिसा उलटा केला, तर खिशाला चिकटलेली पांढरी वाळू दिसली.  खिशात वाळू कशी आली याचा  मी विचार करत असताना लक्षात आलं, अमेरिकेहून निघायच्या आधी शेवटचं म्हणून अमेरिकेतील बीच वर गेलो होतो. खरंतर मला पाण्यात आत जायचं नव्हतंच, मी किनाऱ्यावरच बसणार होते. पण मुलगा पाण्यात गेला आणि मी पण थोडं थोडं म्हणत पाण्याच्या आत गेले आणि मग बरीच आत गेले. माझ्या आवडत्या लेक मिशिगनच्या किनाऱ्यावरची वाळू होती ती. त्यावेळी जीन्सच्या खिशात पहुडलेली वाळू वॉशिंग मशिनच्या अनेक चक्रांमधून अनेक वेळा जाऊन देखील आज जवळजवळ दीड महिना तशीच लपून बसली होती.

तिथून निघताना माझ्या घरातील फुलझाडे मी लेकच्या किनाऱ्यावर असणाऱ्या फुलझाडांमध्ये लावून आले होते, लावताना मनात लेक कडे बघून म्हटलं होतं, ‘ही माझी आठवण’
आज त्या वाळूकडे पाहताना वाटलं, लेकनेही माझ्या खिशात त्याची वाळू हळूच सरकवून दिली होती  त्याची आठवण म्हणून...
(समाप्त)

संबंधित बातम्या