गराज सेल

डॉ. मृण्मयी भजक 
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

बऱ्याच दिवसांपासून  ’गराज सेल’ बघायचा होता. माझ्या घराच्या जवळच लागलेल्या या सेलमध्ये माझी अमेरिकन शेजारीणबरोबर मी आले होते. तिची भरपूर खरेदी झाल्यावर आम्ही बाहेर पडलो.

‘‘घ्या  ना , फक्त एक डॉलरला आहे. जांभळा ड्रेस घातलेली ती अमेरिकन बाई म्हणाली. 

हातातला तो सुंदर पोर्सलीन कप मी लगेच खाली ठेवला .
‘‘तुम्हाला संपूर्ण सहा कपचा सेट हवा असेल तर फक्त चार डॉलरला देईन मी तुम्हाला’’.
‘‘नाही, नको. म्हणजे मी फक्त पाहायला आले आहे’’. मी म्हणाले. 

बऱ्याच दिवसांपासून  ’गराज सेल’ बघायचा होता. माझ्या घराच्या जवळच लागलेल्या या सेलमध्ये माझी अमेरिकन शेजारीणबरोबर मी आले होते. तिची भरपूर खरेदी झाल्यावर आम्ही बाहेर पडलो.  

दुसऱ्या दिवशी  नम्रताकडे आमची भारतीय गॅंग जमली आणि गराज सेलचा विषय सुरू झाला. 

’‘कुणीतरी वापरलेल्या वस्तू घ्यायला नको वाटतं नं?’‘ सीमा म्हणाली .  
‘‘हो, मलाही सुरवातीला संकोच वाटायचा, पण आता मला हव्या असलेल्या काही वस्तू मी घेते गराज सेल मधून. आमच्या बागेत ठेवलेल्या खुर्च्या एका सेल मधूनच आणल्या आहेत. आणि ते बघ ते शो पीसपण’’, नम्रता म्हणाली . 

मुक्ता अमेरिकेत चांगलीच मुरलेली भारतीय होती. ‘‘काही नाही, एवढं काय वाटून घ्यायचं त्यात? त्यांना नको असतात त्यामुळे हे लोक वस्तू स्वस्त दरात विकतात. काही वस्तू इतक्‍या चांगल्या असतात की  कुणी सांगितलं नाही तर त्या वापरलेल्या आहेत असं वाटणारही नाही. चाळीस  डॉलरचा कपचा सेट जर मला चार डॉलरला मिळत असेल तर का नाही घ्यायचा मी? आपण भारतीय लोक, नको तिथे उगीच भावना आणि स्वाभिमांन मध्ये आणतो. ते गोरे बघा, कसे पटापट वस्तू उचलून नेतात.’’ मुक्ता तावातावाने तिचा मुद्दा मांडू लागली . 

‘‘मलाही पटत मुक्ताचं, मलाही वाटतं की कपडे सोडून काही वस्तू गराज सेलमधून घ्यायला काहीच हरकत नाही, पण माझ्या नवऱ्यासमोर गराज सेलचं नाव काढलेलं ही नाही चालत. जुना बाजार म्हणतो तो त्याला. आपल्यावर काय एवढी वाईट परिस्थिती आली आहे का ? असं विचारतो. आमच्यामध्ये या वरून वादही झालेत, पण त्याला ही कल्पनाच झेपत नाही’’. सिंधू म्हणाली.

‘‘हो, मग तो जुना बाजाराचं असतो’’ सीमा .  
‘‘मला सांग ,तू कधी जुनं म्हणजे वापरलेले पुस्तक विकत घेतलं आहेस का ?’’ चारूने विचारलं 
‘‘हो,अनेकदा’’.
‘‘जर पुस्तकं चालतात तर मग इतर वस्तू का नाही चालत ?’’. 
‘‘अरे, पुस्तकांची गोष्ट वेगळी,  पुस्तकं म्हणजे विद्या .....’’ 
‘‘हो नं, मग ते ठेवण्यासाठीच रॅक म्हणजे विद्येचे घर नाही का ? आपण आपल्या सोयीप्रमाणे नियम बनवतो. घर, कार, पुस्तकं अशा वस्तू आपल्याला सेकंड हॅन्ड चालतात,  पण घरात नि कारमध्ये ठेवायच्या वस्तू नाही चालत’’ मुक्ता परत आवेशात म्हणाली .

‘‘सेकंड हॅन्ड नको म्हणू गं, प्रीयूज्ड म्हण हवं तर’’ सीमा. 
‘‘त्याने काय फरक पडणार आहे ? प्रश्न दृष्टिकोनाचा आहे. तू विचार कर ना, तो गराज सेल लावून काय मिळतं त्या अमेरिकन लोकांना? किती कमी किमतीत ते वस्तू विकतात. पण त्यांना त्या किमतीचेही मोल असतं. ज्या वस्तू त्यांना आता उपयोगी नाहीत, त्या दुसऱ्या कोणाला तरी उपयोगी पडाव्यात ही गोष्ट किती चांगली आहे’’ .

चर्चा तापत असतानाच  दिव्या आली. एक आठवड्यानंतर ती डेट्रॉईटला शिफ्ट होणार होती.
‘‘ हे पॅकिंग काही संपतच नाहीये. काय बोलता गं. गराज सेलबद्दल ?मला आज कळतंय की गेल्या पाच वर्षात मी गराज सेलमधून किती वस्तू जमा केल्या आहेत. वस्तू स्वस्त मिळतात म्हणून उगीच न लागणाऱ्या वस्तू पण घेतल्या जातात आणि तशाच पडून राहतात. त्यांचं काय करू कळत नाहीये.’’

‘‘चला तर मग, येत्या वीकएंडला दिव्याच्या घराखाली गराज सेल लावूया’’ मुक्ता उत्साहाने म्हणाली तसा हशा पिकला . 
‘‘शेवटी गराज सेलमधून वस्तू घ्यायच्या का नाही ? का स्वतःवर त्याच वस्तूंचा सेल लावायची पाळी आणायची हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. चला आता हा विषय संपवूया, चहा तयार आहे’’

गरमागरम चहाचा ट्रे आणत नम्रता म्हणाली. 
‘‘हे नमू , हा ट्रे तोच ना गं., आपण मागच्या महिन्यातल्या गराज सेलमधून आणलेला? 

‘‘किती भव्य सेल होता म्हणून सांगू...’’ मुक्ताने पुन्हा सुरवात केलीच.

संबंधित बातम्या