बेक़रार दिल तू गायेजा… 

अंजोर पंचवाडकर 
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

आनंदयात्रा
अनेक जुनी हिंदी चित्रपटगीतं आजही आठवतात आणि आठवते त्यातील काही साम्य, त्यात वापरलेल्या प्रतिमा, त्यांनी समाजावर केलेलं भाष्य...

तो अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचा महत्त्वाचा घटक होता. त्याच्याबरोबर नायक किंवा नायिकेनं गायलेली गाणी पब्लिकला फार आवडायची. तो श्रीमंती महालसदृश बंगल्यात राहायचा. अधून मधून क्लबातही दिसायचा. कथानकात प्रेमाचा त्रिकोण असेल, तर याचं भाग्यच उजळायचं. ओळखलंत तो कोण ते? काही ‘अंदाज’? ‘गुमराह’ तर नाही ना झालात? बरोबर... The grand piano! रेट्रो चित्रपटांमधे पियानोवरची गाणी हा एक खासमखास लोकप्रिय प्रकार होता. 

तसं तर गाणी हे आपल्या चित्रपटसृष्टीचं व्यवच्छेदक लक्षण. पूर्वी तर भरपूरच, आठ-दहा तरी गाणी असायची. अनेकदा गाण्यांसाठी मुद्दाम प्रसंग तयार केले जायचे. नायिकेच्या वाढदिवसाची पार्टी, ‘चलो इस मौके पर एक अच्छासा गीत हो जाय’ किंवा ‘हमने सुना है तुम अच्छा गाते हो... हमे भी सुनाओ’ असा नायकाला आग्रह केला जायचा. मग तोही अगदी सराईतपणे पियानोच्या फिरत्या खुर्चीत स्थानापन्न होऊन आपली व्यथा म्हणजे चित्रपटाची कथा गाऊ लागायचा. काही वेळेस सतार, बाजाची पेटी, व्हायोलिन, वीणा, तानपुरा, ड्रमसेट, बासरी, डफली, गिटार अशी वाद्येसुद्धा पडद्यावर दिसतात; पण पियानोचा थाट - डौल काही निराळाच! आणि तोही झड़प उघडायचा मोठा ग्रँड पियानो! 

पियानो म्हटलं की काही विशेष चित्रपट किंवा गाणी डोळ्यासमोर येतात. सगळ्यात आधी आठवतं ते ‘गुमराह’मधलं ‘चलो एक बार फिरसे, अजनबी बन जाए हम दोनों..’ मीना (माला सिन्हा) आणि अशोक (अशोक कुमार) यांच्या वैवाहिक आयुष्यात पत्नीच्या प्रियकराचा, राजेंद्रचा (सुनील दत्त) प्रवेश होतो. राजेंद्र गायक असतो, अशोक त्याला ग्रँड पियानो उघडून देतो, गायची विनंती करतो. पूर्वीचे प्रेम विसरून जाऊया, पूर्णत्वाला जाऊ न शकलेलं प्रेम उगाच उराशी कवटाळून बसण्यात काय अर्थय हे मीनाला सांगताना राजेंद्र म्हणतो, 
‘वो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन
उसे एक खूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा...’ 
काय जबरदस्त गाणं आहे, आणि प्लॉटही जबरदस्त! या गाण्यामुळं मला गुमराह चित्रपट पाहावासा वाटला. 

असंच अजून एक आयकॉनिक गाणं आहे, ‘संगम’मधलं - 
दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा
जिंदगी हमे तेरा ऐतबार ना रहा
राज कपूर पियानोवर आणि त्याच्या दोन बाजूला राजेंद्रकुमार आणि वैजयंतीमाला.
राजच्या चेहऱ्यावर मित्राकडून फसविला गेल्याची खंत, चीड जाणवते आहे.
‘अमानत मैं प्यारकी गया था जिसपे सौप कर
वो मेरे दोस्त तुमही थे, तुम्ही तो थे’
अक्षरशः पूर्ण सिनेमाचा ट्रेलरच आहे हे गाणं.

तसंच ‘ब्रह्मचारी’मधलं, ‘दिलके झरोखेमें तुझको बिठाकर’ हे गाणं. क्लबात न्यू ईयर पार्टीला शम्मी कपूर पियानोवर रफीच्या आवाजात जीव तोडून गातोय, समोर राजश्री आणि प्राण, पूर्ण त्रिकोण. गाणं सुरू झाल्यावर राजश्री इतकी एकटक शम्मीकडे बघत असते ना, की कुणालाही त्या दोघांच्यामधे काहीतरी आहे/होतं याची खात्री पटावी. शिवाय मधे बदामाच्या आकाराचा डान्स फ्लोअर. त्यावर गाण्याला अनुरूप सुष्ट-दुष्ट प्रवृत्तींचं नृत्य.... सगळा कल्ला माहौल नुसता! 

पियानोबद्दल बोलतोय तर ‘अंदाज’बद्दल बोलायलाच हवं. राज, दलीप, नीना (नर्गिस) असा जबरदस्त प्रेमत्रिकोण. मात्र यातली मुकेशची चारही अप्रतिम गाणी दिलीपकुमारच्या तोंडी आहेत. पहिल्यांदाच नीनाच्या घरी आल्यावर समोर पियानो दिसतो, तर दलीप लगेच सांगून मोकळा, 
‘हम आज कहीं दिल खो बैठे
यूं समझो किसीके हो बैठे’ 
पुढं तिच्या वाढदिवसाला 
‘तू कहे अगर जीवन भर
मैं गीत सुनाता जाऊँ’ इतकं स्पष्ट सांगतोय, तरी नीना त्याच्या प्रेमाच्याबाबतीत अनभिज्ञ! मग राजची एंट्री, की दिलीप लगेच ‘टूटेना दिल टूटेना’ म्हणणार. तर नीना त्याला सांगते की मी तुला फक्त एक मित्र म्हणून बघितलं, राजवर माझं पूर्वीपासून प्रेम आहे, की दिलीप पियानोवर आळवणार- ‘आज किसीकी हार हुई है आज किसीकी जीत..’ या चित्रपटात लता, शमशादचं एक मस्त डुएट आहे, ‘डरना मुहोब्बत करले..’ तेही पियानोवर. ‘अंदाज’चं कथानक काळाच्या थोडं पुढचं होतंच, पण ‘अंदाज’ची ही सगळी पियानो सॉंग्ससुद्धा कालातीत आहेत. 

राज कपूरच्या बऱ्याच सिनेमांत पियानो दिसतो. रईसी खानदानीपणाचं प्रतीकच ते! ‘आह’मधे बाकीच्या श्रीमंती फर्निचरसारखा तो पियानो दिसत असतो. राजला बघितल्यावर इतके दिवस त्याला टाळणारी चंद्रा आनंदानं पियानोच्या अवतीभवती नाचत गातेय -
‘सुनते थे नाम हम जिनका बहारसे
देखा तो जिया डोला झुमझुमके’ 
अखेर, शेवटच्या कडव्यात राज एकदाचा वाजवतो तो पियानो. ‘आवारा’मधे तर, नर्गिसच्या आलिशान घरात प्रवेश मिळविण्यासाठी ‘पियानो दुरुस्त करणारा’ अशी थाप तो मारतो. अर्थात यात पियानो नुसता शोभेला नाही बरं, ‘जबसे बलम घर आये’ आणि ‘आजाओ तड़पते है अरमाँ’ ही दोन गाणी पियानोवर म्हणते नर्गिस. तर ‘अनाड़ी’मधलं नूतनचं ‘तेरा जाना दिलके अरमानोंका लुट जाना’सुद्धा पियानोच्याच साथीनं!

‘वक़्त’ चित्रपटातील साधनाची दोन्ही पियानोगीतं मला प्रचंड आवडतात. 
‘कौन आया के निगाहोंमे चमक जाग उठी’ 
आणि 
‘चेहरेपे खुशी छा जाती है आंखोमें सुरूर आ जाता है’ 
दोन्ही गाणी म्हटली आहेत देखण्या सुनील दत्तला उद्देशून. पण ‘कौन आया’ राजकुमारला वाटतं की आपल्यालाच म्हणते आहे. ‘चेहरेपे खुशी’पर्यंत हा गैरसमज दूर होऊन, मधे हेवा आणि पुढं लहानपणी दुरावलेल्या भावाबद्दल जिव्हाळा. गाणी कशी कथानकाला पुढं नेतात यांचं छान उदाहरण आहेत ही गाणी. 

सहसा स्त्रीच्या तोंडची पियानोगीतं आनंदी, खेळकर मूडची असतात. ही ‘वक़्त’मधली वर सांगितलेली दोन आहेतच, शिवाय अजून काही आठवताहेत. ‘मुकद्दर का सिकंदर’मधे राखी पियानोवर असंच एक छान गीत गाते -
‘दिल तो है दिल दिलका ऐतबार क्या कीजे
आ गया जो किसीसे प्यार, क्या कीजे’ राखी फार गोड दिसली आहे या गाण्यात.
(यातलं आशाचं ‘ओ साथी रे’सुद्धा पियानोवरच, फ्लॅशबॅकमधे).
‘लाजवंती’मधे नर्गिसचं ‘कोई आया धड़कन कहती है’ हे प्रसन्न आनंदी गाणं आहे. ‘मुझे तुम मिल गए हमदम सहारा हो तो ऐसा हो’ (लव्ह इन टोकियो), ‘बचपन के दिन भी क्या दिन थे’ (सुजाता), ‘धीरे धीरे मचल ऐ दिले बेक़रार’ (अनुपमा), ‘मिलतेही आंखे दिल हुआ दीवाना किसीका’ (बाबुल - शमशाद, तलत मेहमूद), ‘मेरी निंदोमे तुम मेरी ख़्वाबोमे तुम’ (नया अंदाज - शमशाद, किशोरकुमार), भोली सूरत दिलके खोटे (अलबेला - लता-चितलकर), जवां है मुहोब्बत (अनमोल घड़ी - नूरजहां), ये कौन आया रोशन हो गयी (साथी - लता) ही बहारदार रोमँटिक गाणी जी पडद्यावर पियानोच्या साथीनं गायलीत. स्त्रीच्या आवाजातलं ‘तुम अपना रंज-ओ-गम’ हे एक वेगळं गीत आहे. स्त्री, तिच्या नायकाला आधाराचा दिलासा देतेय - 
‘मैं देखू तो तुम्हे दुनिया कैसे सताती है
कोई दिनके लिए इसकी निगहबानी मुझे देदो’ (जगजित कौर - शगुन - खय्याम - साहीर). तसंच ‘जेलर’ चित्रपटातील ‘हम प्यारमे जलने वालोंको’ हे एक वेगळं आणि सुंदर पियानोगीत. (गीता बाली - लता - मदनमोहन). 

ही झाली प्रेमगीतं. चित्रपटात काहीवेळा कुटुंबाची ओळख सांगणारी गाणी, कथानकाला एका धाग्यानं जोडण्यासाठी पियानोचा प्रासंगिक वापर केलेला दिसतो. उदाहरण द्यायचं झालं, तर ‘मेरी जंग’मधलं ‘जिंदगी हर कदम एक नई जंग है’ किंवा ‘मधुबन खुशबू देता है’ (साजन बिना सुहागन). यात पियानोचा वापर कथानकाची गरज म्हणून झालेला दिसतो. वर सांगितलं ते ‘ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना’ काहीसं याच प्रकाराचं. 

अगर सुनले तो एक नगमा (किशोर - एक राज), प्यार दीवाना होता है (किशोर - कटी पतंग), बेक़रार दिल तू गायेजा (किशोर - दूर का राही), कोई सोनेके दिलवाला (रफी - माया), आपके हसीन रुखपे आज नया नूर है (रफी - बहारे फिरभी आएगी), आजकी रात मेरे दिलकी सलामी लेले (रफी - राम और शाम), किसी पत्थरकी मूरतको (महेंद्र कपूर - हमराज), मैं दिल हूँ एक अरमाँ भरा (तलत महमूद - अनहोनी); ही काही पुरुषगायकांची पियानो गीतं. गंमत म्हणजे रफी-किशोरपेक्षा मुकेशची पियानो-गाणी जास्त आहेत असं वाटतं खरं. वर सांगितलेली ‘अंदाज’ची आणि ‘संगम’ची गाणी आहेतच, शिवाय ही काही अजून आठवताहेत - चाँदीकी दीवार ना तोड़ी (विश्वास), आया है मुझे फिर याद वो जालिम (देवर), अपनी नजरसे उनकी नजरतक (हमलोग), जिन्हें हम भूलना चाहे (आबरू), मैं खुशनसीब हूँ(टॉवर हाउस). नायकाची दर्दभरी व्यथा व्यक्त करायला चपखल आवाज!

हा पियानो जुन्या सिनेमातच का बरं जास्त दिसतो? अलीकडच्या ‘येस बॉस’मधे शाहरुखचं ‘चाँद तारे तोड़ लाऊं’ आणि माधुरीचं ‘साजन’मधलं ‘बहोत प्यार करते है तुमको सनम’ (इथंही प्रेमाचा त्रिकोण!!) ही दोन पियानोवरची गाणी येताहेत डोळ्यासमोर. ‘ओम शांति ओम’मध्ये शाहरुख (ओम) दीपिकाला (शांतीला) इम्प्रेस करण्यासाठी सेटवर असते तशी, रेट्रो वातावरण निर्मिती करतो, त्यावेळी सुरवातीला पियानोचा वापर केलाय (तुमको पाया है तो जैसे खोया हूँ). ही नवीन पियानोवरची गाणीसुद्धा छानच आहेत की! 

खरं म्हणजे आपल्या आजच्या आनंदयात्रेचे खरे नायक आहेत रॉबर्ट कोरिया, सेबेस्टियन डिसुझा, सी एम लोबो, केर्सी लॉर्ड हे आणि यांच्यासारखे अनेक पडद्यामागचे कलाकार, ज्यांनी वर उल्लेख केलेल्या गाण्यातील खराखुरा पियानो वाजवलाय. त्यांना मनःपूर्वक अभिवादन करायला हवं!

संबंधित बातम्या