सिधीसी बात ना मिर्ची मसाला 

अंजोर पंचवाडकर 
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

आनंदयात्रा
अनेक जुनी हिंदी चित्रपटगीतं आजही आठवतात आणि आठवते त्यातील काही साम्य, त्यात वापरलेल्या प्रतिमा, त्यांनी समाजावर केलेलं भाष्य...

आधीच कबूल करून टाकते, की मला गाण्याची आवड निर्माण झाली ती गुणी गायक आणि संगीतकारांमुळं. गाण्यातल्या शब्दांकडं माझं त्या मानानं उशिरा लक्ष गेलं. पण जेव्हा लक्षपूर्वक गाणी ऐकायला सुरुवात केली तेव्हा काही प्रतिभाशाली गीतकारांनी अक्षरशः थक्क केलं. अनेक सृजनशील कवींनी चित्रपटासाठी गीतलेखन करून चित्रपटसृष्टीचा दर्जा निःसंशय उंचावला आहे. त्यापैकी साहीर आणि शैलेंद्र हे माझे अत्यंत लाडके गीतकार. साहीरचा बाज थोडा स्टायलिश तर शैलेंद्र चा एकदम सीधासाधा, काळजाला स्पर्शणारा. 

‘आवारा’ची कथा ऐकायला राज कपूर शैलेंद्र यांना बरोबर घेऊन के. अब्बास यांच्याकडे गेले होते. शैलेंद्र नवोदित होते, अब्बास यांनी सुरुवातीला जरा दुर्लक्षच केलं. ‘आवारा’ची स्टोरी ऐकवून झाली. मग ते शैलेंद्रना म्हणाले, ‘क्या कहते हो कहानी के बारे में?’ शैलेंद्र म्हणाले, ‘गर्दिशमे था, लेकिन आसमान का तारा था..’ अब्बास अवाक झाले, राजला म्हणाले की याने तर सारी कथा दोन ओळीत सांगून टाकली की! एका कार्यक्रमात शैलेंद्र यांच्या मुलाने सांगितले होते, की ‘एसडीं’नासुद्धा शैलेंद्र यांच्या गीतातला हाच आशयघन साधेपणा भावत असे. 

थोडक्या आणि साध्याच शब्दात जबरदस्त आशय व्यक्त करणाऱ्या या काही ओळी पाहा - 
भला कीजै भला होगा 
बुरा कीजै बुरा होगा 
बही लिख लिख के क्या होगा 
यहीं सब कुछ चुकाना है 

कुठं पाप-पुण्याचा जमाखर्च मांडतोस, सगळा हिशोब इथंच चुकता करून जायचंय. 

तूने तो सबको राह बताई 
तू अपनी मंझील क्यूं भुला 
सुलझाके राजा औरोंकी उलझन 
क्यों कच्चे धागे मे झुला 

क्यो नाचे सपेरा? 
दुसऱ्यांना मार्ग दाखवणारा तू, स्वतः मात्र ध्येयापासून भरकटला आहेस. सगळं उलट सुरू आहे तुझं, जसा सापाला नाचविणारा सपेरा स्वतःच नाचतोय. 

जीवनसीमा के आगे भी 
आऊंगी मैं संग तुम्हारे 

किंवा 
मैं न रहूँगी, तुम न रहोगे 
फिर भी रहेंगी निशानियाँ 
ही प्रेमाच्या अमरत्वाची रुपकं पाहा किती प्रभावी! 

‘पान खाए सैंया हमारो’मधे, सैंया काही कामाचा नाही हे किती मजेशीर पद्धतीनं सांगितलं आहे - 
खाके गिलोरी शामसे ऊँघे 
सो जाए जो दिया बातीसे पहले। 

संध्याकाळी गिलोरी पान खाऊन पेंगणारा सैय्या दिवेलागणीच्या आत झोपूनही जातो बघा. 

शैलेंद्र यांचं जन्मनाव शंकरदास. वडील, केसरीलाल मूळचे भोजपुरचे. पैसे कमवायला म्हणून रावळपिंडीला गेले, शैलेंद्र यांचा जन्म तिथलाच (३०/८/१९२३). तिथं श्रीमंतीत बालपण गेलं. पुढं सगळं कुटुंब मथुरेला स्थलांतरीत झालं. मथुरेत आल्याआल्याच आईचं निधन झालं. बालपणीच मातृछत्र हरवलं. रावळपिंडीची श्रीमंतीही ओसरत चालली. या घटनांमुळं आलेलं एकटेपण कवितेमधून बाहेर आलं. मथुरेत एक शिक्षक कविता करायचे त्यांच्यामुळं शैलेंद्रंना कवितेची गोडी लागली. हुशारी मात्र कधीच झाकोळली नाही. इंटरमिजिएट परीक्षेत संपूर्ण राज्यातून तिसरे आले होते शैलेंद्र! या पार्श्वभूमीमुळंच शैलेंद्रंच्या गीतांत, कवितेत दोन गोष्टी प्रामुख्यानं दिसतात; एक म्हणजे सर्वसमावेशकता जी गरीब-श्रीमंत, लहान-थोर, देशी-परदेशी सगळ्यांना सामावून घेते आणि दुसरी म्हणजे बोलीभाषांचा वापर. शैलेंद्रंची गीतं म्हणजे हिंदी, उर्दू भाषा, ब्रज, अवधी, भोजपुरी या बोलीभाषांचं विद्यापीठच जणू! 

‘अबके बरस भेज भैयाको बाबुल’, ‘चलत मुसाफिर मोह लिया रे’, ‘चढ़ गयो पापी बिछुवा’, ‘शिवजी बिहाने चले’, ‘कैसे मनाऊँ पियवा’... कितीतरी गीतं जी मातीशी, बोलीभाषेशी नातं सांगतात. ‘पान खाय सैय्या हमारो’सारखं अजून एक नटखट गाणं आठवलं. ‘जा जा रे जा बालमवा..’ यातला सवतीमत्सर काय बहारदारपणे सांगितलाय - 
ग़ैर के घर करी रात जगाई 
मोसे कहे तेरे बिना नींद न आयी 
कैसो हरजाई दैय्या! 

भाषेवरचं प्रभुत्व म्हणजे फक्त अलंकारिक कलाकुसर केलेली शब्दसंपदा नव्हे. शैलेंद्रंच्या चित्रपट गीतांमधून रोजच्या वापरातले वाक्प्रचारसुद्धा (मुहावरे) इतक्या सहजपणे  
गुंफलेले सापडतात, की कानाला ते जराही खटकत नाहीत. 

 • वो मुस्कुराते रह गए, जहर की जब सुई गड़ी (दोस्त दोस्त ना रहा) 
 • नजरें तो चार कर लूंगा (दम भर जो उधर मुँह फेरो) 
 • कलके अँधेरोसे निकलके, देखा है आंखे मलते मलते (आज फिर जीनेकी तमन्ना है) 
 • टांग अड़ाता है दौलतवाला (दिलका हाल सुने दिलवाला) 
 • आखिर कोई तो आयेगा इन नैनोंके दांव में (छोटासा घर होगा) 
 • जी करता है खुदही घोट दू अपने अरमानोंका गला (लाखो तारे आंसमानमे) 
 • आगमें जलकर निखरे, है वोही सच्चा सोना (मेहताब तेरा चेहरा) 
 • रंग भरे सौ जाल बिछाए (रात ने क्या क्या ख्वाब दिखाए) 
 • ग्यानकी कैसी सीमा ग्यानी, गागरमे सागरका पानी (जाओ रे जोगी तुम) 

भाषाप्रभुत्व म्हणजे याहून वेगळं ते काय? म्हणूनच मला गदिमा आणि शैलेंद्र यांच्यात खूप साम्य वाटतं. शब्दांना आपलंसं करून त्यांना हवं तसं वळविणारे शब्दांचे किमयागार! 

‘जानके जान गवाई रसिया’, ‘मेरे दुखते दिलसे पूछो’, ‘संग ना सहेली पायके अकेली’, ‘सुनी मेरी बीना संगीत बिना’, ‘तू बतला तुझको है पता’, ‘ऐसे तो ना आजमाओ’, ‘ये ख्वाब देखती हूँ मै के जग पडी हूँ ख्वाब से’, ‘संग सहेली पी घर गेली’, ‘जैसे अल्हड़ चले पी से मिलकर’, ‘याद आयी आधी रातको किस बातकी तौबा’... शब्दांवर प्रेमळ हुकूमत गाजवूनच ही मौज साधते बरं. 

चित्रपटांतील प्रसंग आणि संगीतकाराचे मीटर कळले की उत्स्फूर्त एकटाकी गीतलेखन करण्याची शैलेंद्रंची हातोटीपण आपल्या गदिमांसारखी. चाल तयार तरी अजून गाणं दिलं नाही म्हणून एसडी यांनी आरडीला, ‘गाणं हातात पडल्याशिवाय तिथून हलू नकोस’ म्हणून शैलेंद्रंच्या घरी पाठवलं. आरडी-शैलेंद्र जुहू चौपाटीवर फिरायला बाहेर पडले, आरडीनं सिगारेट बॉक्सवर ताल धरून चाल सांगितली आणि शैलेंद्र ओळी रचत गेले... ‘खोया खोया चाँद’ या अफलातून गाण्याची ही जन्मकथा. ‘जाओ रे जोगी तुम जाओ रे’ हेही असंच एकटाकी लिहिलेलं गाणं. शैलेंद्रंच्या मुलानं एका मुलाखतीत सांगितलं, की शंकर-जयकिशन यांच्याशी एकदा शैलेंद्र यांचं काही कारणानं बिनसलं. शैलेंद्रंबरोबर पुन्हा काम करायचं नाही असा जणू निश्चयच शंकर जयकिशन यांनी केला होता. शैलेंद्र त्यांच्या स्टुडिओत चिठ्ठी ठेवून गेले, ‘छोटीसी ये दुनियां, पेहचाने रास्ते है, कभी तो मिलोगे, कहीं तो मिलोगे तो पूछेंगे हाल..’ या निरोपाचं गाणं झालं आणि जोडी शैलेंद्रंच्या अखेरपर्यंत अभेद्य राहिली. (शैलेंद्र यांनी साधारण नव्वद एक चित्रपट एसजेंबरोबर केलेत!) 

इंटरनेटवर अशा खूप रंगतदार गोष्टी सापडतील. मला त्यातलं कवी-संगीतकार यांचं नातं फार आवडतं. सलील चौधरी आणि शैलेंद्र यांना एकमेकांविषयी आदरयुक्त जिव्हाळा होता. सलिलदा स्वतः चांगले लेखक होते त्यामुळं शैलेंद्रंना ते जवळचे वाटत.  प्रसिद्ध ‘ओ सजना बरखा बहार आयी’ हे गाणं ज्यात आहे त्या ‘परख’ चित्रपटाचं लेखन दोघांनी मिळून केलं. पटकथा सलिलदांची, संवाद शैलेंद्र यांचे. एखादं गाणे करायचं असेल, तर दोघं लॉंग ड्राइव्हवर जात, भरपूर गप्पा मारत आणि बरेचदा त्यातूनच गाण्याचे बोल सुचत. ‘मधुमती’, ‘परख’, ‘दो बीघा जमीन’, ‘उसने कहा था’, ‘एक गावकी कहानी’, ‘नौकरी’, ‘हाफ टिकिट’, ‘जागते रहो’ या चित्रपटांतील एकसोएक कमाल गाणी अशीच जन्माला आली असतील? 

चित्रपटाच्या मोहमयी दुनियेत शैलेंद्र मनाविरुद्धच आले. मुंबईत रेल्वेमध्ये नोकरी करतानाच कवितालेखन सुरू होतं. भारतात स्वातंत्र्याची पहाट झाली होती. एकीकडं फाळणीचा सल तर एकीकडं नव्या भारताबद्दल आशादायी स्वप्नं. साम्यवादी विचारसरणीच्या कलाकारांचा गट कलेच्या माध्यमातून आपल्या भावना मांडत होता. अशाच एका कार्यक्रमात ‘जलता है पंजाब’ वाचणारा कवी शैलेंद्र, राज कपूरनं हेरला. चित्रपटासाठी गीतलेखन करण्याबाबत विचारलं असता शैलेंद्रंनी प्रथमतः नकार दिला, पण पुढं पत्नीला बाळंतपणासाठी माहेरी पाठवताना तिच्याबरोबर देण्यासाठी म्हणून राज कपूरकडून पाचशे रुपये उधार घेतले. काही दिवसांनी पैसे परत करण्यासाठी गेले असता राज कपूरनं ‘बरसात’ची २ गाणी लिहायचा आग्रह धरला. ‘बरसातमें’ आणि ‘पतली कमर है’, ही ती गाणी. कुठं ‘जलता है पंजाब’ आणि कुठं हे ‘आजा मेरे मनचाहे बालम आजा तेरा आखोमे घर है...हय्य’चा धुमाकूळ! वर्ष होतं १९४९. पुढं शैलेंद्रंच्या मृत्यूपर्यंत (१४/१२/१९६६) हा बहारदार सिलसिला शंकर-जयकिशन-हसरत जयपुरी यांच्या साथीनं सुरू होता. १९७० मध्ये आलेल्या ‘मेरा नाम जोकर’मधले ‘जीना यहां मरना यहाँ’ हे गाणं अर्धवट लिहून शैलेंद्र गेले, जे त्यांचा मुलगा शैली शैलेंद्रनं पूर्ण केलं. राज कपूरच्या अभिनयाबाबत, दिग्दर्शनाबाबत मतभिन्नता असेल पण त्याच्या गुणग्राहकतेला सलाम! विचार करा, ‘हा किरकोळ व्यक्तिमत्वाचा मुलगा माझ्या विनंतीला नकार देतो, समजतो कोण स्वतःला’ असं म्हणून राजनं शैलेंद्रकडं दुर्लक्ष केलं असतं तर? पण उगाच नाही तो यशस्वी निर्माता, Biggest Showman झाला. खरा जोहरी. 

संवेदनशील कवीचा गीतकार होतो, तेव्हा त्यांना त्यांच्या सृजनशीलतेशी काही तड़जोडी कराव्या लागत असतील. पण शैलेंद्र फिल्मी दुनियेत रमले. सर्व तऱ्हेची गाणी लिहीत गेले. ज्या लेखणीतून ‘अजब तोरी दुनिया’ उमटलं त्याच लेखणीतून ‘मोरे अंग लग जा बालमा’सुद्धा उमटलं. 

‘दिन ढल जाए’सारखं विरहगीत असो नाही तर ‘घड़ी घड़ी मोरा दिल धड़के’ सारखं ‘मिलन-गीत’, ‘नानी तेरी मोरनी को मोर ले गए’ सारखं बालगीत असो, की ‘आजा री आजा निंदिया तू आ’सारखं अंगाईगीत. ‘अपनी तो हर आह एक तूफान है, ऊपरवाला जानकर अंजान है’ हे गंमतशीर द्व्यर्थी गीतसुद्धा! 
शैलेंद्रंच्या लेखणीला सीमाच नव्हती. 

पण शैलेंद्रंनी गीतलेखन करताना मीटरमध्ये शब्द कोंबलेत असं कधी वाटलं नाही. प्रतिभावान कवी, संगीतकारांच्या तयार चालीवर शब्द अशा सामर्थ्यानं तोलतात, की ते गीत प्रवाही आणि अर्थवाही होऊन जातं. शैलेंद्रंच्या गाण्यातला हा प्रवाहीपणा, फ्लो मला प्रचंड आवडतो. ही काही गाणी पाहा - 

 • रहे जाती है क्यो होटों तक आके दिलकी बात. 
 • ऐ दिल ना मुझसे छुपा सच बता क्या हुआ. 
 • बढ़ते जाए हम सैलानी जैसे एक दरिया तूफानी. 
 • बरसातमे हमसे मिले तुम सजन तुमसे मिले हम. 
 • बीते हुए दिन वो हाये प्यारे पलछिन. 
 • हरियाला सावन ढोल बजाता आया, धिन तक तक मनके मोर नचाता आया... 

शब्द-क्रम-रचना अशी की जणू वाहत्या नदीत सोडलेली नाव! 

चाँद, सितारे, आसमान, सूरज ही इतर गीतकारांप्रमाणं शैलेंद्रंचीसुद्धा आवडती रुपकं. पण ‘सूरज तू जरा पास आ, सपनोंकी रोटी पकाएंगे हम। गरमा गरम रोटी कितना बड़ा ख्वाब है’ किंवा ‘दुनियां में चाँद सूरज है जितने हसीन सुन मेरे भैया, उतनाही दिलको लुभाए रुपय्या’ हे जळजळीत वास्तवही त्याच प्रतीकांतून शैलेंद्रंनी दाखवलं. कधीकधी एकदम वेगळीच, Out of the box ओळ साध्याशा गाण्याला उंची देऊन जाते - तू आके चली छमसे, ज्यूँ धूपके दिन पानी (रुक जा ओ जानेवाली रुक जा)! 

शैलेंद्रंची अजून एक खासियत म्हणजे टायटल सॉंग्ज. पहिल्याच चित्रपटात लिहिलेलं ‘बरसातमें हमसे मिले’ हे शीर्षक गीत गाजलं. त्यानंतर ‘आवारा हूँ’, ‘जंगली’, ‘संगम’, ‘छोटी बहन’, ‘आयी मिलनकी बेला’, ‘हरियाली और रास्ता’, ‘अनाड़ी’, ‘जिस देशमे गंगा बेहती है’, ‘राजकुमार’, ‘दिल अपना और प्रीत पराई’... शीर्षक गीतांचा बादशहाच जणू. 

शैलेंद्रंबद्दल जेव्हा काही लिहून येतं, बोललं जातं, तेव्हा शेवट, त्याचा महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘तिसरी क़सम’, त्यानं पाहिलेलं व्यावसायिक अपयश, सुहृदांनी दाखवलेला कोरडेपणा, त्या दरम्यान खालावलेली तब्येत, अंततः आलेला मृत्यू आणि शैलेंद्रंच्या मृत्यूनंतर झालेलं चित्रपटाचं अमाप कौतुक... असा रुखरुख लावणारा का असावा? शैलेंद्र यांची कन्या अमला शैलेंद्र म्हणतात, ‘बाबांचं ‘तिसरी क़सम’चं दुःख आर्थिक नव्हतंच. ते त्याकाळच्या Highest paid गीतकारांपैकी एक होते. आईनं पैशांचा सांभाळ निगुतीनं केला होता.’ घरानं मानसन्मानातही साधेपणा जपला होता. ‘आवारा हूँ’ आणि ‘मेरा जूता है जापानी’मुळं विदेशातली लोकप्रियताही अनुभवली होती... शैलेंद्रंची माणसांची पारख चुकल्याचं दु:ख, माणुसकीनं मारलेला फटका जीवघेणे ठरले. 

पण मग माझ्या मनात विचार येतो, की केवळ चित्रपटात गीतलेखन करून या माणसानं केलेली कमाई किती जबरदस्त असेल! अवघं ४३ वर्षांचं आयुष्य, गीतलेखनाची कारकीर्द पूर्ण २ दशकंही नाही, त्यावर सात माणसांचा उदरनिर्वाह, मुंबईत घर, मानसन्मान, अमाप लोकप्रियता आणि चित्रपटनिर्मितीच्या आर्थिक नुकसानाची भरपाईसुद्धा... या मायावी नगरीत शैलेंद्रंचा चित्रपट नाही चालला... पण गीतकार शैलेंद्र हे नाणं तर खणखणीत वाजलंच की! 

‘दिलका हाल सुने दिलवाला’ म्हणणाऱ्या राज कपूरच्या रूपात मला चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी डफलीवर ताल धरून कविता म्हणणारा शैलेंद्र दिसतो. 
सिधीसी बात ना मिर्ची मसाला 
केहके रहेगा केहने वाला...

संबंधित बातम्या