जादू नगरीसे आया है कोई जादूगर... 

अंजोर पंचवाडकर 
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

आनंदयात्रा
अनेक जुनी हिंदी चित्रपटगीतं आजही आठवतात आणि आठवते त्यातील काही साम्य, त्यात वापरलेल्या प्रतिमा, त्यांनी समाजावर केलेलं भाष्य...

मला स्वयंपाकघरात काम करताना गाणी ऐकायची सवय आहे. सध्या लॉकडाउन काळात मुलगी, नवरा घरूनच काम करत असतात. त्यामुळे त्यांचा वावर सुरू झाला की मी ब्लू टूथ ईयरफोन्स सुरू करते. परवा ओ. पी. नय्यरची प्लेलिस्ट लावून माझं काम सुरू होतं. नवरा म्हणाला, ‘राहू देत आवाज मोठा, मी पण ऐकतोय!’ मी मनात म्हटलं, ‘क्या बात है, आज चक्क कंपनी आहे आपल्याला गाणी ऐकायला.’ इतक्यात ‘पुकारता चला हूँ मैं..’ लागलं. लेक येऊन टेबलाशी बसली, कॉफीच्या कपावर ताल धरून गुणगुणायला लागली. घरात जणू आनंदाचं झाडच फुललं! आमच्या ‘ओ.पी.’ची गाणी आहेतच अशी, सगळ्यांना जोडणारी, एकत्र धरून ठेवणारी. आजच्या चिंतामय वातावरणात प्रसन्नतेच्या झुळकीचं महत्त्व वेगळं सांगायला नकोय. आज साठ वर्षांनंतरसुद्धा ओपीच्या संगीतातली प्रसन्नता कायम आहे. 

ओंकारप्रसाद नय्यर या अवलिया संगीतकाराबद्दल इतकं काही लिहून आलंय, मुलाखती, पोस्ट्स, ब्लॉग्ज, संगीत अभ्यासकांचे लेख, तरी हा माणूस नक्की कसा होता ते समजत नाही. ओपी नावाच्या अजब रसायनाचं सूत्र उलगडत नाही. पण प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा शौक बाळगलेला भन्नाट कलाकार होता हे मात्र नक्की. लाहोरला उच्चशिक्षित सुखवस्तु कुटुंबात जन्म (१६ जानेवारी १९२६); पण याला मात्र शिक्षणाची आत्यंतिक नावड. नवव्या वर्षी रेडिओवर गायला लागला. ‘दुल्ला भट्टी’ चित्रपटात बारकासा रोल मिळाला, त्याचे त्याकाळी ३० रुपये मिळाले होते. पण खंत ही, की घरच्यांना कौतुक नव्हतं. हुशार भावंडांच्यात कुरूप बदकासारखा एकटा पडत गेला. खरं तर गाण्याचं काही शास्त्रीय शिक्षण नसताना इतक्या लहान वयात बऱ्यापैकी कमाई होत होती. या एकटेपणातून, हाती पैसा आला की छानछोकीत उडवायचा, अशी सवय लागत गेली. गावात येणारा प्रत्येक चित्रपट बघायचाच. ‘न्यू थिएटर्स’च्या बंगाली धाटणीच्या चित्रपटांचं आकर्षण. त्याकाळी एकूणच पंजाबी मुलांना कलकत्त्यातून भारतभर नाव गाजवत असलेल्या कुंदनलाल सैगलचा अभिमान होता. छानछोकी राहणी, श्रीमंती स्टाइलचं वेड मात्र इंग्रजी चित्रपटातून आलेलं. 

लाहोरवर ओपीचं निस्सीम प्रेम. फाळणीनंतर सगळं कुटुंब अमृतसरला स्थलांतरित झालं, तरी ओपी परिस्थिती सुधारेल, लाहोर पूर्ववत होईल या आशेवर मागं रेंगाळला. ‘बहारे फिरभी आएगी’ हा आशेचा चिवट तंतुही शेवटी तुटला आणि नोव्हेंबरमध्ये प्रिय लाहोर कायमचं मागं सोडून ओपी अमृतसरला आला. त्याच सुमारास त्यानं संगीतबद्ध केलेलं सी. एच. आत्मा यांचं ‘प्रीतम आन मिलो’ गाजत होतं. कॉलेज सोडून दिलेला, चित्रपटासारखं ‘हलकं’ काम करणारा मुलगा, नय्यर कुटुंबानं झटकूनच टाकला होता. पण लग्नासाठी घरंदाज अरोड़ा कुटुंबातील सरोजची निवड मात्र त्यांना सुखद धक्का देऊन गेली. लग्नाच्या दिवशीच हातात चित्रपटाची ऑफर पडली. दोघं मुंबईला आले. यशापयशाचे खूप चढउतार झेलत वादळी संसार केला दोघांनी. 

लाहोरच्या दलसुख पांचोली यांचा ‘आसमान’ आणि ‘छमछमाछम’ हा अजून एक, असे दोन चित्रपट १९५२ मध्ये ओपीला मिळाले. ५३ मध्ये गुरुदत्तच्या ‘बाज’ला ओपीनं संगीत दिलं. पण हे तिन्ही चित्रपट, गाणी चालली नाहीत. मुंबई सोडून परत अमृतसरला जायच्या विचारात असतानाच ‘बाज’ची त्याची प्रमुख गायिका गीता दत्तनं त्याला थांबवलं. गुरूकडं पुढच्या चित्रपटासाठी ओपीचा आग्रह धरला. तो चित्रपट होता ‘आरपार’! ‘बाज’चं संगीत तर छानच होतं. गीता दत्तची ‘माझी अलबेले’, ‘ऐ दिल ऐ दिवाने’, तलतचं ‘मुझे देखो हसरतोंकी तस्वीर हूँ मैं’ ही अप्रतिम गाणी चालली नाहीत. ‘प्रीतम आन मिलो’पासून ते या सर्व चित्रपटांतील गाण्यांपर्यंत ओपीवर ‘न्यू थिएटर’चा प्रभाव होता. ओपीच्या तोपर्यंत लक्षात आलं असावं, की संगीत नुसतं छान असून उपयोग नाही. एसडी, शंकर जयकिशन, सी. रामचंद्र, नौशाद हे अत्यंत लोकप्रिय गुणी संगीतकार प्रस्थापित होतेच की. या सगळ्या संगीत महासागरात ओपी नावाची नौका चालवायची, तर काही निराळं हवं. त्यात गुरूनं बिंग कॉस्बीच्या तबकड्या आणून टाकल्या, असलं काहीतरी म्युझिक कर म्हणून.. आता ठरलं, आर या पार... संगीत चाललं तर नौका पार नाही तर अमृतसर वापस! 

.. आणि ‘आरपार’ चालला, संगीत तर तुफान चाललं. गीता - रफी हे पब्लिकचे लाडके गायक होतेच, त्यांनी ओपीच्या गाण्यांना चार चांद लावले. ‘सुन सुन बालमा’, ‘मुहोब्बत करलो जी भरलो’, ‘ये लो मैं हारी पिया’, ‘हूँ अभी मैं जवां’, ‘तौबा रे बलम तौबा तौबा’.. सगळ्यात गाजलं ते शमशादचं टायटल सॉंग, ‘कभी आर कभी पार लागा तीरे नजर..’ ‘बाबुजी धीरे चलना’ म्हणत ओपीची घोड़दौड़ जोरात सुरू झाली. १९५५ मध्ये ओपीचे पाच चित्रपट आले. ‘बाप रे बाप’चा (पिया पिया मेरा जिया पुकारे, रात रंगीली चमके तारे) नायक किशोरकुमार होता पण ओपीला आपली नायिका सापडली होती, आशा भोसले. ‘बाप रे बाप’मध्ये ११ पैकी १० गाणी आशाची होती! गुरुदत्तच्या ‘मिस्टर अँड मिसेस 55’चं संगीतसुद्धा जबरदस्त चाललं. ‘नीले आसमानी’ आणि ‘प्रीतम आन मिलो’, दोन्ही भिन्न प्रकारची गाणी गीतानं कमाल गायली. पण यातली गीता-रफीची ड्युएट्स भन्नाट होती - ‘दिल पर हुआ ऐसा जादू’, ‘चल दिये बंदा नवाझ’, ‘जाने कहा मेरा जिगर गया जी’, ‘उधर तुम हँसी हो..’ 
‘उधर तुम हंसी हो’नं त्यावेळच्या तरुणाईच्या नवथर प्रेमाला जणू स्वर दिला. 

‘सुलगती हैं तारों की परछाईयाँ 
बुरी हैं मोहब्बत की तनहाईयाँ 
महकने लगा मेरी ज़ुल्फों में कोई 
 
लगी जागने धड़कनें सोयी सोयी 
मेरी हर नज़र आज दिल की ज़ुबां है’ 
मजरूहचे वजनदार शब्द, ओपीचं थिरकतं संगीत, बाह्या दुमडलेला इनशर्ट, हात पँटच्या खिशात, स्वप्नाळू डोळे, असा गुरु आणि डौलदार अंगडाई देणारी मधाळ मधुबाला, स्वप्नवतच सारं! 

अमृतसरला परत निघालेला ओपी आता चित्रपटसृष्टीत स्थिरावलाच नाही, तर राज्य करू लागला. पुढची काही वर्षं ओपीचं संगीत म्हणजे मिडास टच असं समीकरण बनलं. निर्माते म्हणे आधी ओपीला साइन करायचे मग हिरो-हिरॉइन. त्याकाळी एक लाख रुपये एका चित्रपटासाठी घेणारे फारच थोडे संगीतकार होते, त्यात ओपी एक. पोस्टरवर ठळक नाव ओपीचं असायचं. 
‘नया दौर’साठी (१९५७) फिल्मफेअर मिळालं. काय क्लास गाणी होती ‘नया दौर’ची! ओपीचं संगीत असलेला (की ओपीचं संगीत होतं म्हणून?) ‘नया दौर’ हा बी. आर. फिल्म्सचा आणि ‘सीआयडी’ हा गुरुदत्त फिल्म्सचा बिग्गेस्ट हिट चित्रपट होते. 

पंजाबी ठेक्यातली उडत्या चालीची गाणी पब्लिकनं डोक्यावर घेतली, त्यांनी प्रेमानं ओपीला ‘ऱ्हिदम किंग’ ही उपाधी दिली. निर्माते इतर संगीतकारांना सांगत, की ओपीसारखं संगीत हवं. ओपीला ‘ऱ्हिदम किंग’ म्हणणं हे प्रेम असेल; पण त्याच्या मेलडीवर तो अन्याय नाही का? ‘आँचलमे सजा लेना कलियां’, ‘रातोंको चोरी चोरी’, ‘आपके हसीन रुखपे आज नया नूर है’, ‘मैं शायद तुम्हारे लिए अजनबी हूँ’, ‘तू है मेरा प्रेमदेवता’, ‘पुकारता चला हूँ मैं’, ‘रातभरका है मेहमा अंधेरा’, ‘छोटासा बालमा’, ‘देखो बिजली डोले बिन बादलकी’, ‘दिलकी आवाज भी सुन’, ‘रूप तेरा ऐसा दर्पण में ना समाय’ (किशोर कुमार), ‘प्यार पर बस तो नही मेरा’ (तलत महमूद) अशी अनेक मधुर मेलोडियस गाणी देणारा फक्त ‘ऱ्हिदम किंग’ का म्हणून? ओपीच्या ऱ्हिदममध्ये असं काय वेगळं होतं?संगीत अभ्यासक डॉ. मृदुला दाढे यांनी यावर फार छान लिहिलंय. त्यांच्या मते, लय बाहेरून येणारी नसतेच; प्रत्येकाच्या आत एक लय असते, ती हरवलेली लय आपल्याला ओपीच्या गाण्यात सापडते. धृवपदात आणि अंतऱ्यात ठेका बदलणं ही ओपीची खासियत. 

वानगीदाखल ही काही गाणी पाहा - ‘दिलपे हुआ ऐसा जादू’, ‘चल दिये बंदा नवाझ’, ‘नीले आसमानी’, ‘जाता कहां है दिवाने...’
खरोखर, ओपी लयीवर राज्य करतो. ओपीची ‘ये चाँदसा रोशन चेहरा’ किंवा ‘उडे जब जब जुल्फे तेरी’ ही ठेक्यावर डोलायला लावणारी गाणी तुम्ही सकाळी ऐका; रात्रीपर्यंत हलत नाहीत डोक्यातून. दिवसभर तुमच्या नकळत या तालावर तुम्ही वावरता. 

ओपीच्या गाण्यात वाद्यं अक्षरशः बोलतात. ‘बलमा खुली हवामें’मध्ये ओळीच्या शेवटी येणारी सारंगी किंवा ‘हमने दिल तो आपके कदमोंपे’मधलं व्हायोलिन, गायकांबरोबर गातायत असं वाटतं. संतूर, सतार, सारंगी, बासरी, सगळीच वाद्यं ओपीच्या गाण्यात बहार आणायची. पाश्चात्त्य ट्यूनवर देशी ढोलक किंवा देशी धूनवर परदेशी वाद्यं, यांचं असं काही फ्यूजन करायचा ना ओपी. कॅस्टानट हे स्पॅनिश वाद्य, साधारण आपल्या चिपळी किंवा लाकडी झांजेसारखं. ओपीनं, ‘ये चाँदसा रोशन चेहरा’ (काश्मीर की कली), ‘उधर तुम हंसी हो’ (मिस्टर अँड मिसेस 55), ‘पूछो ना हमे हम उनके लिए’ (मिट्टीमे सोना), ‘मुझे मेरा प्यार दे’ (हमसाया), ‘आइए मेहरबां’ (हावड़ा ब्रिज) अशा बऱ्याच गाण्यात वापरलय. ‘एक परदेसी मेरा दिल ले गया’ (फागुन) मधली बीन ही अशीच बहारदार आहे आणि ‘ये क्या कर डाला तूने’ मधली शीळसुद्धा! आणि बरं का, पडद्यावर अशोक कुमारच्या बरोबरीनं मधुबाला वाजवते आहे शीळ. मधुबाला ओपीची जबरदस्त चाहती होती. असं म्हणतात की ओपीचं संगीत असेल तर ती निर्मात्याला तिच्या मानधनात डिस्काउंट द्यायची. 

तडजोड कायम नाकारणारा, स्वभावानं उर्मट पण प्रचंड लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार ओपीचा ६१ मध्ये एकही चित्रपट आला नाही. निर्माते, सहकलाकार त्याच्या स्वभावाला वैतागत असावेत. पुढं वर्षाला २-३ चित्रपट करत लोकप्रियता टिकवून होता. ‘एक मुसाफिर एक हसीना’, ‘काश्मीर की कली’, ‘मेरे सनम’, ‘किस्मत’, ‘हमसाया’, ‘सावनकी घटा’... गाणी गाजत होती. पण आता ओपीची प्रतिभा उतरणीला लागली. चालीत तोचतोचपणा जाणवू लागला. शम्मी कपूरनं शंकर-जयकिशनची साथ धरली, गुरु तर जगच सोडून गेला. साहीरसारख्या प्रतिभावान कवीला यानं दूर ठेवलं, का तर एकदा साहीर त्याला म्हणाला की एसडीला मी घडवलं... न जाणो उद्या आणि कुणाला सांगायचा की ओपीला मी घडवलं... नकोच ती भानगड! एस. एच. बिहारी आणि मजरूहबरोबर मात्र चांगली जोडी जमली ओपीची. रफीसारख्या सालस माणसाशीसुद्धा ओपीचं वाजलं, तेव्हा हट्टानं महेंद्र कपूरला घेऊन गाणी बनवत राहिला. सुस्वभावी रफीनं स्वतःच ते भांडण शेवटी मिटवलं. पण आता तर आशाशी तुटलं. त्यासाठी ओपीकडं Back-up plan नव्हता. आशा तर ओपीच्या संगीताचा प्राण होती. केवळ आशाच नाही, तर ओपीचे सगळेच खास गायक त्याच्या संगीताची जान होते. 

‘उधर तुम हँसी हो’मधे, गीता ओळीच्या सुरुवातीला ‘आऽऽ’ अशी छोटीशी लकेर घेते ती किंवा ‘जाईये आप कहाँ जाएंगे’मधला आशाचा आलाप, ओपीनं त्या त्या आवाजासाठीच योजलेत. ‘जाइये’चा आलाप तर इतका थ्रेशहोल्डवर बेतलाय की बास! ‘ऐ दिल है मुश्किल है जीना यहाँ’मध्ये (सीआयडी) ‘हाहा होहो हीहा हाहा’ असले विचित्र बोल केवळ रफीमुळं हास्यास्पद वाटत नाहीत. ‘फिर वोही दिल लाया हूँ’मधली ‘हूँ’ची जागा अशीच धोक्याची, रफीशिवाय कुणाला न शोभणारी. ‘दिलकी आवाज भी सुन’मध्ये प्रत्येक ‘सुन’वर रफी थांबतो तेव्हा एक हलकासा रेझोनान्स ऐकू येतो.. आणि गीताची ‘दिलको यहां मत ‘फेकिये’ची फेक!  शमशादचा ‘बड़े बड़ों की मैंने कर दी है ऐसी तैसी, तू है किस डाली का’मधला ठसका ओपीच्या ठेक्यात इतका चपखल येतो ना, की बस! गायकातलं सर्वोत्तम बाहेर काढणं हे ओपीचं कसब निर्विवाद, पण हे सगळे गायकही उंचीचे होते हेही महत्त्वाचे! 

आशाला ओपीनं आत्मविश्वास दिला, पण आशाला ओपीनं घडवलं म्हणणे थोडं अतिशयोक्त होईल. त्याचबरोबर आशाच्या आवाजाची जवारीदार क्वालिटी, खनक, फिरत याचा ओपीइतका चपखल वापर दुसऱ्या कुणी केला नाही असंही वाटतं. 

‘चैनसे हमको कभी आपने जीने ना दिया’ म्हणत १९७३ मध्ये दोघं वेगळे झाले. ओपीनं वाणी जयराम, पुष्पा पागधरे, दिलराज कौर, कविता कृष्णमूर्ती यांना घेऊन डाव मांडायचा अयशस्वी प्रयत्न केला. घरचे, चित्रपटसृष्टीतले सगळ्यांशीच याचं बिनसलं. शेवटची काही वर्षं ठाण्याला नाखवा कुटुंबाच्या लहानशा घरात पेइंग गेस्ट म्हणून राहात होता. रॉयल्टीचे उत्पन्न होते, त्यात भागत होते. गजेंद्र सिंग या दोस्तामुळं ‘सारेगामा’मध्ये ओपी दिसायचा पाहुणा परीक्षक म्हणून. थाट तोच, शुभ्र पांढरा सूट, फेल्ट हॅट आणि चेहऱ्यावर जग जिंकून आल्यासारखं स्मित. 

लाहोरच्या जादुनगरीतून पंजाबी ठेका घेऊन आलेला हा जादुगर, २८ जानेवारी २००७ ला या जगातूनच गायब झाला. 

अगदी खरं सांगू का, माझ्यासारख्या असंख्य लताभक्तांना ओपीसुद्धा प्रचंड आवडतो, आपला वाटतो यातच त्याच्या प्रतिभेचं सार सामावलं आहे. लताचा, ‘आम्हाला वगळा गतप्रभ झणी होतील तारांगणे’ असा देदीप्यमान स्वर नाकारूनही हा माणूस टेचात लोकप्रिय झाला, काय तो उत्तुंग आत्मविश्वास! सलाम त्या अवलिया कलाकाराला.

संबंधित बातम्या