आनंदयात्रेचे बदलते साथीदार

अंजोर पंचवाडकर
सोमवार, 28 डिसेंबर 2020

आनंदयात्रा
अनेक जुनी हिंदी चित्रपटगीतं आजही आठवतात आणि आठवते त्यातील काही साम्य, त्यात वापरलेल्या प्रतिमा, त्यांनी समाजावर केलेलं भाष्य...
अंजोर पंचवाडकर

गाणी ऐकण्याची माझी सगळ्यात जुनी आठवण म्हणजे आकाशवाणीच्या मुंबई ‘ब’ स्टेशनवर लागणारा ‘आपली आवड’ हा कार्यक्रम. मी अगदी लहान होते तेव्हा आमच्याकडे फिलिप्सचा मोठा रेडिओ होता. त्याच्या एका बाजूला छोटा उभा हिरवा दिवा लागायचा. मला त्याचे फार आकर्षण होते. कांद्याच्या सालासारखी दिसणारी पातळ लांब एरिअल बाल्कनीत आडवी टांगलेली होती. त्या रेडिओवर खरखर टाळून बरोब्बर स्टेशन लावायचे कठीण काम दादाला जमायचे. आई-बाबा आणि आम्ही सगळी भावंडे आपली आवड न चुकता ऐकत असू. माझ्या आठवणीनुसार ‘उगवला चंद्र पुनवेचा’, ‘श्रावणात घननीळा’, ‘थकले रे डोळे माझे’, ‘विठ्ठला तू वेडा कुंभार’ या लोकप्रिय गाण्यांना नेहमी फर्माईश येत असत. कधीतरी वेगळ्या गाण्याची ओळख होई. ‘काळ देहासी आला खाऊ’ हा अभंग प्रथम आपली आवड मधेच ऐकल्याचे मला नीट आठवतंय. (तिथे ऐकलेलं उषा मंगेशकरांचे ‘पिकी ग माझी सुमनी’ हे अंधूक आठवणारं गाणं मला नंतर कुठे ऐकायला मिळालं नाही.) मग तो रेडिओ बिघडल्यावर छोटा ट्रांझिस्टर आणला गेला. त्याकाळी रेडिओ, ट्रांझिस्टर घरी बाळगायचे तर परवाना काढावा लागे. ट्रांझिस्टर आला आणि आमच्या घरात विविध भारतीवरच्या हिंदी गाण्यांचा अक्षरशः रतीब सुरू झाला. आकाशवाणीवरचे सकाळचे मंगल प्रभात, (सुधा नरवणे यांच्या) प्रादेशिक बातम्या वगैरे कार्यक्रम आटोपले की रेडिओ ताईच्या आणि माझ्या ताब्यात यायचा. रेडिओ सिलोन आणि विविधभारती ही आमच्या दिवसाच्या गाड्याची दोन चाकेच जणू! ‘ये श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन का विदेश विभाग है’ आणि ‘ये विविधभारती मुंबई की विज्ञापन प्रसारण सेवा है’ या घोषणा अजून कानात रुंजी घालतात. साडेनऊ ते अकरा या वेळात विविधभारती बंद असे, अंघोळ, राहिलेले होमवर्क उरकून पुन्हा अकरा वाजता मधुमालती साठी तयार! तयार अशासाठी की आवडीचे गाणे रेडिओवर लागले की अवर्णनीय आनंद व्हायचा. अनाउन्समेंट वरून अंदाज यायचा गाण्याचा, की मग ‘गाण्याची डायरी’ आणि पेन सरसावून ते गाणे लिहायला बसायचे. कधी पाठ असलेलेच रुळलेले गाणे लागे, मग थोडासा हिरमोड होई. म्हणजे ‘‘अब सुनिए मोहम्मद रफीका गाया हुवा प्यासा फ़िल्म का एक नगमा. इस गानेके बोल लिखे है, साहीर लुधयानवीने और संगीतसे संवारा है एसडी बर्मनने’’ असं ऐकल्यावर ‘जिन्हें नाज है हिंद पर’ किंवा निदान ‘ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है’ लागेल अशी आशा असायची पण लागायचं, ‘सर जो तेरा चकराए’...! आता तेही आवडीचेच, पण त्यातल्या रफीच्या जागा न् जागा पाठ असायच्या. जेव्हा केव्हा एखादे बहुप्रतिक्षित गाणे लागे, तेव्हा भाग्य उजळल्यासारखं वाटायचं. दुपारची शाळा असायची त्यामुळे ‘मधुमालती’ अर्धवट सोडून शाळेत जावं लागायचं. ‘बिनाका गीतमाला’, ‘भूले बिसरे गीत’, ‘संगीतसरीता’, ‘मधुमालती’, ‘जयमाला’, ‘छायागीत’ आणि ‘बेलाक़े फूल’ हे विशेष आवडते कार्यक्रम.

एक दिवस बाबा फिलिप्स-टेलीरॅड कंपनीचा स्टीरियो घेऊन आले. लाल रंगाचे गोल स्पीकर असलेला देखणा स्टीरियो होता तो. आता आमचा ‘रेकॉर्ड्स’ चा सिलसिला सुरू झाला. बाबा त्यांच्या आवडीच्या मराठी रेकॉर्ड्स आणत, मी आणि ताई हिंदी. अर्थात गाण्यांची आवड आमची सगळ्यांची सारखीच होती, त्यामुळे कुणीही आणली तरी ‘आवडती’ रेकॉर्ड यायची घरात. मला आठवतंय, पंधरा रुपयाला ईपी(छोटी, ४ गाणीवाली) आणि एकोणपन्नास रुपयाला एलपी (मोठी, १२ गाणी वाली) रेकॉर्ड मिळायची. दादाने जुन्या बाजारातून फोनोच्या काही सुट्ट्या तबकडया आणल्या होत्या; सैगल, पंकज मलिक वगैरेंच्या. त्या तीन-चार रुपयांना मिळत. बरेचदा सगळ्यात छान आणि लोकप्रिय गाणे ईपी मधे नसायचे, मग जड मनाने एलपी घ्यावी लागे. जड मनाने अशासाठी, की बाबांकड़ून ५० रुपये हातात पडले की त्यात तीन सिनेमांच्या ईपी येतील असे बेत केलेले असायचे. पण ‘सुहानी रात ढल चुकी’ साठी ‘दुलारी’ची किंवा ‘पिया तोसे नैना’ साठी ‘गाइड’ची एलपीच घ्यावी लागे आणि आमचे लहानसे बजेट कोलमडे. आज या गंमती मी मुलीला सांगते तेव्हा जाम हसायला येतं. आता असा गाण्याचा अभाव फार म्हणजे फार दुर्मिळ.

रेकॉर्ड्सच्या कव्हरांचा अदलाबदल करून ठेवणे हा आमच्या खोड़यांचा एक प्रकार होता. कुणी पाव्हणे आले, आणि ते म्हणाले की ‘अंदाज’ची रेकॉर्ड लावा. आईने लावून दिली की त्यातून ‘अमरप्रेम’ची गाणी वाजत. मग ‘अंदाज’ची शोधाशोध सुरु होई. पाव्हणे गेले की आमचा कान कडक पिळला जाई मात्र! स्पीड बदलून रेकॉर्ड वाजवणे ही अजून एक खास गंमत. विशेषतः ‘ना जिया लागे ना’ हे गाणे बदललेल्या स्पीडवर ऐकायला मला जाम मजा येई. जणू आमची मांजर गाते आहे असा फील यायचा. एखाद्या रेकॉर्डला चरा पडलेला असेल तर तिथे पिन अडकून बसे. मग कुणाला तरी उठून ती पुढे ढकलावी लागे. ‘देख ली तेरी खुदाई’ मधल्या ‘मेरे मालिक क्या कहूँ तेरी दुवाओंका फरेब’ मधल्या ‘तेरी’ वर पिन अडकायची. अजूनही कुठेही हे गाणं लागलं, तरी या ‘तेरी’ मुळे माझे मन भूतकाळात जाते.

बाबा दुबईला गेले होते तिथून त्यांनी मेहदी हसन, मुन्नी बेगम अशांच्या काही कॅसेट्स आणल्या होत्या. मग त्या ऐकण्यासाठी कॅसेट प्लेयर आणला गेला. कॅसेट या प्रकाराने संगीतविश्वात अक्षरशः क्रांती झाली. कारण कोऱ्या कॅसेट वर ‘गाणी भरणे’ हा अफलातून प्रकार सुरू झाला. आता आवडीच्या गाण्यांच्या कॉम्बिनेशन्ससाठी रेकॉर्ड कंपन्यांवर अवलंबून राहणे थांबले. काही दुकाने अशा कॅसेट्स भरून देत किंवा घरीच दोन कॅसेट्सवाला प्लेयर असेल तर अशी गाणी ट्रान्सफर करता येत. इतकं कशाला, टू-इन-वन मुळे रेडिओ वरची गाणीही टेप करता येऊ लागली. मला आठवतंय, पं. शिवकुमार शर्मा यांनी सादर केलेली ‘संगीत सरिता’ मी अशी कॅसेट वर उतरवून घेतली होती. गाणी रेकॉर्ड करणे, तुटलेल्या टेपा स्टिकफास्टने जोडणे, स्पिरिटने प्लेयर ची हेड्स साफ करणे असे उद्योग करताना आपण जणू एचएमव्ही मधले रेकार्डिस्टच आहोत असं वाटायचं. रेकॉर्ड्स पेक्षा कॅसेट्स स्वस्तही खूप आणि कुठेही मिळायच्या. रेकॉर्ड्स साठी आमच्या गावात एकच दुकान होतं, तिथे किंवा मग फोर्टमधे ह्रिदम हाऊस. कॅसेट्स गिफ्ट शॉप, स्टेशनरी शॉप मधे सुद्धा मिळायच्या. स्टेशन बाहेरच्या टपऱ्यांमधेही कॅसेट्स मिळू लागल्या.

मग आल्या सीडीज. भारतात साधारण ८६-८७ मधे सीडीज मिळायला सुरवात झाली. मला आठवतंय व्हीटी स्टेशनच्या (आता, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) बाहेर फूटपाथवर जागोजागी सीडी विक्रेते मोठ्याने गाणी लावून बसलेले असायचे. ‘दिल दिवाना बिन सजनाके मानेना’ आणि ‘मेरे हाथोंमें नौ नौ चूड़ियां है’ ही गाणी मी तिथेच प्रथम ऐकली. या सीडीज कॉम्प्युटरवर ऐकता/बघता यायच्या. दोन हजार सालाच्या आगेमागे आपल्याकडे मॉल कल्चर सुरी झाले. प्रत्येक मॉल मधे प्लॅनेट एमचे आउटलेट असे. माझे जसे ह्रिदम हाऊस, तसे माझ्या मुलीचे प्लॅनेट एम आवडते दुकान होते. माझे आईबाबा सांगत की पूर्वी काही घरोघरी ग्रामोफोन नसायचे. काही रेस्तराँ मधे ज्यूक बॉक्स असत. म्हणजे गल्ल्यावर लोकप्रिय रेकॉर्ड्स ठेवलेल्या असायच्या. एक आणा देऊन तुम्ही तुमच्या आवडीची रेकॉर्ड फोनोवर वाजवायला सांगायची. अलीकडे काही वर्षांपूर्वी अगदी असेच, सीसीडी किंवा कॅफ़े टून्स मधे पाच रुपये देऊन माझी मुलगी ज्युकबॉक्सवर  गाणी लावायची. गाणी ऐकण्याचे वेड पिढीजात आणि कालातीत आहे!

पण काळ झपाट्याने बदलत होता. डिजिटल क्रांती मुळे रोज नवनवीन तंत्रज्ञान बाजारात येऊ लागले. एमपी थ्री डाउनलोड्स, आयपॉड, मेमरी स्टीक, यूट्यूब अशा पायऱ्या वेगाने पार झाल्या. ह्रिदम हाऊस बंद झाले, प्लॅनेट एम लुप्त झाले. अनेक नवनवीन म्युझिक पोर्टल्स निघाले. त्यावर तुमच्या पसंतीच्या प्लेलिस्ट तयार करता येऊ लागल्या. रफी/लताचे वगैरे एखादे गाणे सर्च मधे टाकले की इतर वेगवेगळ्या गायकांनी गायलेले तेच गाणेही आपल्या समोर विनासायास येऊ लागले. त्याची अवांतर माहिती क्षणात मिळू लागली. दिग्गजांच्या मुलाखती हव्या तेव्हा घर बसल्या ऐकता येऊ लागल्या. संगीत करणारे आणि ऐकणारे यातली वेळेची दरी मिटली. तात्काळता आली. संगीत निर्मितीचे तंत्रज्ञान तर अफाट बदलले. पूर्वी गायकांना एकच गाणे रेकॉर्डसाठी आणि चित्रफिती (फिल्म) साठी वेगवेगळं दोनदा रेकॉर्ड करावे लागे. आता एकाच गाण्यावर काम करणारे कलाकारही एकत्र एकेठिकाणी नसतात. वेगाने पसरलेले आंतरजाल आणि डिजिटलायझेशन यामुळे काल आलेल्या सीडीजही ‘फिजिकल म्युझिक म्हणून कालबाह्य झाल्या. स्मार्ट फोन, स्मार्ट टीव्ही यांच्यामुळे गाणी अक्षरशः बोटांच्या टोकावर उपलब्ध झाली. घरातल्या वेगवेगळ्या उपकरणांना जोडलेले आणि आपल्या तोंडी फर्माईश पूर्ण करणारे ॲलेक्सा सारखे तंत्रज्ञान रूढ झाले. आजही रेकॉर्ड्स निघतात. अमेरिकन पद्धतीनुसार त्यांना व्हायनल्स म्हणतात. (pvc-पॉली व्हिनाईल क्लोराईड हा त्याचा घटकपदार्थ म्हणून व्हायनल) अल्बम/आर्टिस्ट्स नुसार त्यांची किंमत तीन -चार हजार किंवा त्याहून जास्तही असते. अजूनही चोखंदळ कानसेन आवडीने या रेकॉर्ड्स ऐकतात, संग्रह करतात. रेडिओ सुद्धा अजूनही गाणी ऐकवतोय. एफएम बँड वर अनेक नविन स्टेशन्स सुरू झालीत. रेडिओ गार्डन सारखे ॲप्सही निघालेत. 

हा लेख लिहिताना मला आज, एका दुकानापाशी थांबून, रेडिओ वर लागलेलं ‘फिर वोही शाम’ ऐकणारा भाऊ डोळ्यासमोर दिसतोय. कामावरून येतायेता गीत रामायणाची लेटेस्ट एलपी काखेत अडकवून आणणारे बाबा दिसताहेत. शेजारचे काका बरसातची एलपी आणली आहे, ती ऐकायला या म्हणून बोलावताना दिसताहेत. ह्रिदम हाउसमधला, जिथे आरामात बसून रेकॉर्ड ऐकून टेस्ट करता येत असे, तो सोफा दिसतोय. ग्रन्डीगच्या स्पूल वर आपला आवाज उमटवून बघणारे बाबा आणि जादू पाहिल्यासारखे विस्फारलेले माझे डोळे आठवताहेत. माझी मुलगी म्हणते, की गाणी ऐकणे या बाबतीत तुमची पिढी प्रचंड लकी आहे. खरंच आहे ते. स्पूल, ग्रामोफोन, कॅसेट प्लेयर, सीडीज, आयपॉड्स, यूट्यूब, ऑनलाइन म्यूझिक स्टोअर्स, आम्ही सगळं पाहिलं, उपभोगलं. गाण्यातला एखादा शब्द/ओळ न आठवणे, एखाद्या गाण्याचा गीतकार/संगीतकार माहीत होईपर्यंत लागलेली चुटपुट, घरी जाईपर्यंत संपेल म्हणून रस्त्यात थांबून कुणाच्या तरी रेडिओ वर लागलेलं गाणं ऐकणे या गोष्टी कालबाह्य झाल्या. आता हेडफोन्स लावून चालता चालता गाणी ऐकण्याची पद्धत रूढ झाली. आज गाण्याचे अचूक शब्द सांगणाऱ्या, माहिती पुरविणाऱ्या वेबसाइट्स आहेत. माझी आई सराईतपणे यूट्यूब वर कुमार गंधर्व ऐकते. भावंडे, मित्र-मैत्रिणी कधी एकत्र जमले की केव्हाही आवडत्या गाण्यांची मैफील जमवू शकतात. 

Change is the only constant या उक्तीनुसार बदल होत राहणं अनिवार्य आहे. प्रत्येकच क्षेत्रात बदल होत असतात, सुधारणा होत असतात. संगीत क्षेत्रातील या बदलत्या तंत्रज्ञानाने, निःसंशय माझ्या संगीतयात्रेची आनंदयात्रा केली आहे.
(समाप्त

संबंधित बातम्या