काग़ज़ी है पैरहन 

नंदिनी आत्मसिद्ध
गुरुवार, 23 जानेवारी 2020

अन्दाज़-ए-बयाँ
 

दिल्लीतले सुरुवातीचे दिवस ग़ालिबसाठी सुखाचे होते. प्रारंभीच्या दहा वर्षांत, म्हणजे वयाच्या पंचविशीपर्यंत त्याला आर्थिक ददातही नव्हती. अलवर संस्थानच्या गावांचं उत्पन्न, काकांच्या पश्चात मिळणारं पेन्शन; तसंच लौहारूला त्याच्या बीवीचे काका दिवाण होते, तेही सढळ हातानं पुतणीला काही ना काही देत असत. विवंचना नसल्यानं ग़ालिब सुखासीन आणि नवाबी आयुष्य जगत होता. त्याकाळच्या दिल्ली शहराची तबियतच तशी ऐशारामी, कलाजगतात रममाण होण्याची आणि थाटात राहण्याची बनली होती. तरुण वयातल्या ग़ालिबला शराब, शबाब आणि श्रीमंती थाटाची विलासी राहणी हवीहवीशी न वाटली, तरच नवल होतं. त्याकाळी नाचगाणं करणाऱ्या कलावंत स्त्रियांकडं जाणं हा दिल्लीतल्या नवाबी जीवनशैलीचा भागच होता. ग़ालिब याला अपवाद नव्हता. यावरून त्याच्याबद्दल लोक टीकेच्या सुरात बोलतही. पण दुसरीकडं त्याच्या शायरीचा प्रभाव लोकांवर पडला होता, त्यामुळं त्याचे चाहतेही खूप होते. तारुण्याच्या वाटेवर वाहून जाण्याची अशी शक्यता असताना, किंबहुना त्या सीमेवर असतानाच त्याला दिल्लीत वेगवेगळ्या क्षेत्रांतील विद्वान, कवी आणि धार्मिक तत्त्वचिंतकांचाही सहवास लाभला. पतनाच्या मार्गावरून मागं वळण्याची संधी मिळाली आणि विशाल-विस्तृत जगाचं दर्शन घडलं. दिल्लीला आल्यामुळंच हे घडून आलं. तो जर आग्र्यालाच राहिला असता, तर काहीसं वेगळंच चित्र असतं... 

दिल्ली तेव्हा सांस्कृतिकदृष्ट्या उच्च शिखरावर होती. धार्मिक चर्चांच्या आघाडीवरही ती वादविवादाचं केंद्र झाली होती. धर्मातले नवे प्रवाह आणि जुनी पठडी यांच्यात वाद होत. दोन गटच पडले होते. ग़ालिब स्वतः नवीन वाटेकडं कल असणारा. मुळात धर्माचं अवडंबर, कर्मकांडं न मानणारा. पण पुढं एक कालखंड असाही आला, जेव्हा त्याच्यावर फ़ज़ले हक़ ख़ैराबादी या मौलवींचा प्रभाव पडला. हे दोघंही वास्तवात समवयस्कच होते, पण ख़ैराबादींची विद्वत्ता आणि साहित्यावरचा त्यांचा अधिकार यांना ग़ालिब मानत असे. ख़ैराबादी यांच्या मैत्रीपूर्ण आग्रहामुळंच ग़ालिबनं सनातनी इस्लामी पंथीयांच्या बाजूनं भूमिका मांडणारी रचना फ़ारसी भाषेत केली होती. ख़ैराबादींशी असलेले त्याचे घनिष्ठ संबंध याला कारणीभूत ठरले. ख़ैराबादी हे स्वतःही फ़ारसीचे जाणकार होते. तसंच ते देशप्रेमी होते आणि इंग्रजी राजवटीविरोधात झालेल्या १८५७ च्या उठावात त्यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी ब्रिटिश साम्राज्याशी लढण्याचा, जिहाद करण्याचा फतवा काढला होता. यामुळं त्यांना अटक झाली व अंदमानच्या तुरुंगात ठेवण्यात आलं. १८६१ मध्ये तिथंच त्यांचा मृत्यू झाला. नामवंत शायर जाँ निसार अख़्तर हे ख़ैराबादी यांचे खापर पणतू, तर जावेद अख़्तर हे त्यांचे खापर खापर पणतू होत. 

साहित्यावरचा ख़ैराबादींचा अधिकार ग़ालिबला मान्य असल्यानं, त्यांच्या सांगण्यानुसार त्यानं आपल्या काव्यात बदल केले किंवा जेव्हा ‘दीवान’ (काव्यसंग्रह) छापला गेला, तेव्हा ख़ैराबादींनी त्याचं संपादन करावं, असा आग्रह ग़ालिबनं धरला. त्यापूर्वी त्यानं स्वतः सुधारून तयार केलेला काव्यसंग्रह ‘नुस्ख़ा हमीदिया’ प्रकाशित झाला होता. त्यानंतर ख़ैराबादींनी संपादन केलेल्या ‘दीवान’मध्ये, त्यांनी चूक काढलेल्या आपल्या सदोष कविता ग़ालिबनं प्रसिद्ध होऊ दिल्या नाहीत. यात ग़ालिबचे १०९५ शेर प्रकाशित झाले. अर्थात हे करताना ग़ालिबचे अनेक शेर गाळले गेले. पण काव्यात अचूकपणा राहावा, त्याची गुणवत्ता टिकून राहावी यासाठी हे आवश्यक असल्याचं ख़ैराबादींचं म्हणणं होतं आणि ते ग़ालिबनं मान्यही केलं. ‘दीवान’मध्ये नसलेले काही शेर नंतर उपलब्धही झाले, म्हणून त्यांचा आस्वाद तरी घेता येतो. या प्रक्रियेत गाळल्या गेलेल्या काही शेरपैकी एका शेरचा उल्लेख अभ्यासक आवर्जून करतात. हा शेर अतिशय आशयघन आहे. यात तो म्हणतो, ‘आकांक्षांचं दुसरं पाऊल ठेवू तरी कुठं? मी तर पहिल्या पदक्षेपातच जीवनातल्या सगळ्या शक्यतांना व्यापून टाकलं.’ 
है कहाँ तमन्ना का दूसरा क़दम या रब 
हमने तो दश्त-ए-इमकाँ को एक नक़्श-ए-पा पाया 

या विश्वात ज्या म्हणून काही इच्छा-आकांक्षा आहेत, त्यांना मी माझ्या पहिल्या पावलातच जाणलं आणि व्यापून टाकलं, मग आता दुसरं पाऊल ठेवूच कुठं? असा प्रश्न ग़ालिब विचारतो. तात्त्विक उंची गाठणारा हा शेर. पण त्यातली ‘नक़्श-ए-पा पाया’ ही रचना सदोष ठरते. कारण ‘प’ अक्षरापुढे पुन्हा ‘प’ आल्यामुळं उच्चारायला अडचण येते. 

  
शायर म्हणून दुनियेवर राज्य करण्याची क्षमता असलेला ग़ालिब वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच नकारांना सामोरं जावं लागल्यानं दुःख आणि निराशेचाही अनुभव घेत होता. त्याला सात अपत्यं झाली, पण त्यातलं एकही वाचलं नाही. जन्मल्यानंतर वर्ष-सव्वा वर्षातच ती सारी दगावली. ग़ालिबची पत्नी उमराव बेगम. त्याची ही अर्धांगिनी त्याच्या आयुष्यात आली, तेव्हा तो तेरा वर्षांचा होता. त्याचं वैवाहिक जीवन ५७-५८ वर्षांचं होतं. १८६९ मध्ये ग़ालिबच्या मृत्यूनंतरच हा सहवास संपला. उमराव बेगम ही तशी पारंपरिक पद्धतीची धर्मपरायण स्त्री होती. तर ग़ालिबची अगदी निराळी तऱ्हा. तो काहीच कर्मकांडं मानायचा नाही, पाळायचा तर नाहीच. त्याचं सुखासीन जगणं, जुगार खेळणं अशा गोष्टी तिनं सांभाळून घेतल्या. कारण आपला नवरा मनानं चांगला आहे, मोठा कवी आहे, हे ती ओळखून होती. आर्थिक नडीच्या काळातही तिनं घरसंसार चालवला. ग़ालिबच्या कर्जदात्यांना तोंड देण्याचं कामही तिलाच करावं लागे. 

या दांपत्याला अपत्यवियोगाचं दुःख नेहमीच सतावत राहिलं. आपले नातेवाईक आणि मित्रांच्या मुलांवर त्यांनी मनापासून प्रेम केलं. त्याच्या मेहुणीचा मुलगा आरिफ़ हा तर या दांपत्याला मुलासारखाच होता. त्यालाही शायरीची आवड होती आणि ग़ालिब त्याला मार्गदर्शनही करत असे. स्वतः आरिफ़ हाही अलेक्झांडर हीथर्ली ऊर्फ ‘आज़ाद’ या फिरंगी उर्दू कवीला शायर म्हणून सल्ला देत असे. या कवीचा ‘दीवान’ही पुढं प्रकाशित झाला होता. पण हा आरिफ़ही अल्पायुषी ठरला. तरुण वयातच त्याचा अंत झाला. त्याच्या दोन मुलांचा ग़ालिबनं आपल्या नातवांप्रमाणं सांभाळ केला. त्यांनी संसार थाटलेलेही पाहिले. पण ही खूप नंतरची गोष्ट. आरिफ़ अकाली गेला, तेव्हा अर्थातच ग़ालिब फारच शोकाकुल झाला. आरिफ़च्या निधनानंतर त्यानं केलेलं काव्य त्याला वाटणाऱ्या दुःखाची कल्पना देऊन जातं - 
जाते हुए कहते हो क़यामत को मिलेंगे 
क्या ख़ूब, क़यामत का गोया दिन है कोई और
 

सांसारिक दुःखं आणि विवंचनांमुळं गांजलेला ग़ालिब एका पत्रात म्हणूनच आपल्या लग्नाचं वर्णन ‘दुसरा तुरुंगवास’ असा करतो. त्याच्या मते, मुळात जीवन हाच ‘पहिला तुरुंगवास’ होय. या अटकेतून सुटणं हाच दुःख संपण्यावरचा उपाय. माणसाचं दुःख हे त्याच्या मृत्यूनंतरच संपतं, असं तो म्हणे. दुःख आणि जीवन यांची सांगड अतूट आहे आणि मृत्यू हाच यातून सुटण्याचा उपाय आहे, ही कल्पना म्हणूनच ग़ालिबच्या काव्यात वारंवार येत राहते. दुःख अटळ आहे, मरण आल्याशिवाय माणसाची दुःखांमधून सुटका व्हावीच कशी, असं सांगताना एकदा तो म्हणतो - 
क़ैद-ए-हयात व बन्दा-ए-ग़म अस्ल में दोनों एक हैं
मौत से पहले आदमी ग़म से निजात पाए क्यूँ 

ग़ालिबचा पहिला ‘दीवान’ १८४१ मध्ये प्रकाशित झाला. त्यापूर्वी त्याचे काव्यसंग्रह आले होते. पण ‘दीवान’ ही संकल्पना निराळी आहे. ‘दीवान’ म्हणजे केवळ काव्यसंग्रह नव्हे. त्यात पहिली कविता वा ग़ज़ल ही हम्द, म्हणजे ईश्वरप्रशंसापर काव्य असतं. असाही मूळ संकेत आहे, की वर्णमालेतील प्रत्येक अक्षरानं सुरू होणाऱ्या रचना त्यात असणं अपेक्षित असतं. अशा अटी पाळल्या गेल्या, तर तो खरा ‘दीवान.’ ग़ालिबचा तर फ़ारसी भाषेतील ‘दीवान’ही प्रकाशित झाला होता. त्याच्या कवित्वाची झेप यावरून कळून येते. 

त्याच्या उर्दू ‘दीवान’ची पहिली रचना ग़ज़लच्या स्वरूपातली हम्द आहे. 
नक़्श फ़रियादी है किसकी शौख़ी-ए-तहरीर का? 
काग़ज़ी है पैराहन हर पैकर-ए-तसवीर का! 

दीवान-ए-ग़ालिबमधला हा पहिल्या हम्दचा पहिला शेर. अतिशय सूचक भाषेत ग़ालिबला अभिप्रेत सखोल असा आशय आहे. ही संपूर्ण ग़ज़लच विलक्षण आहे. फ़ारसी शब्दकळेचा आणि प्रचलित संकेतांचा प्रभाव असलेली. नक़्श म्हणजे चित्र. इथं अवघी मानवजात, असं अभिप्रेत आहे आणि तहरीर (लिखावट) शब्द निर्देश करतो तो या चित्राच्या रेखाटनकाराकडं-निर्मात्याकडं. मानव हा या तहरीरचाच हिस्सा. आपल्या निर्मात्याला मानव तक्रारवजा प्रश्न करत आहे, की ‘चित्र किंवा शब्द कुणाच्या खोडीबद्दल तक्रार करणार?’ म्हणजेच कवीला म्हणायचं आहे, की ‘तू मला निर्माण करून हा कसला गमतीचा खेळ खेळत आहेस?’ पुढच्याच ओळीत तो म्हणतो, ‘प्रत्येक चित्रातल्या व्यक्तीचा वेश हा कागदाचा आहे.’ इथं संदर्भ येतो तो इराणमधील एका प्राचीन पद्धतीचा. खुद्द ग़ालिबनं याबद्दल एका मित्राला लिहिलेल्या पत्रात याची माहिती दिली आहे. एखाद्यावर काही आरोप ठेवण्यात आले, तर इराणमध्ये त्याकाळी बादशाहकडे जाताना त्या व्यक्तीला अंगावर कागदी वेष परिधान करावा लागे आणि त्या वस्त्रावर गुन्ह्यांची लेखी नोंद केलेली असे. (इस्मत चुग़ताईनं आपल्या आत्मकथनाचं ‘काग़ज़ी है पैरहन’ हे शीर्षक यावरूनच घेतलंय.) ग़ालिबला म्हणायचं आहे, की मानवी अस्तित्व हीच एक तक्रार आहे, एक आक्रोश आहे... ग़ालिब नेहमीच आपल्या काव्यात जास्त करून रूपकं आणि प्रतीकांचा वापर करत असे. त्यांच्या मुळांचा शोध घेणं आणि काव्याचा आनुषंगिक अर्थ लावणं व कवीच्या मनाचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करणं हे अखेर आस्वादकाच्या हाती आहे. मानवाच्या भाळी ईश्वरानं लिहिलेलं त्याला भोगावंच लागतं. त्याविषयी तक्रार ती कशी करणार? त्यातून मृत्यूशिवाय सुटका नाही, हा आपला मुद्दा ग़ालिब या शेरमध्ये निराळ्या पद्धतीनं अधोरेखित करतो. जीवनातल्या निराशा व दुःखांविषयी तोही शायरीतून लिहीतच होता.  

या ग़ज़लच्या अन्य एका शेरमध्ये शीरीन-फ़रहादच्या प्रसिद्ध इराणी प्रेमकथेचा संदर्भ येतो. फ़िरदौसीनं लिहिलेल्या ‘शाहनामा’ काव्यात ही कथा येते. फ़रहाद शीरीनच्या प्रेमात पडला, तेव्हा त्याला शीरीनच्या राजवाड्यापर्यंत कोह-ए-सुतून या पर्वतास खोदून दुधाचा प्रवाह आणण्याची अट घालण्यात आली, याचा संदर्भ घेऊन ग़ालिब लिहितो - 
काव काव-ए सख़्त-जानीहा-ए-तनहाई न पूछ 
सुबह करना शाम का, लाना है जू-ए-शीर का 

‘मला विचारू नका, रात्रीच्या एकाकीपणाची कष्टप्रदता. संध्याकाळचं रूपांतर  प्रभातकाळात करणं, म्हणजे (पर्वतातून) दुधाचा प्रवाह खणून आणण्यासारखंच आहे.’ रात्रीनंतर दिवस येतो, पण प्रेमात असताना विरहाच्या रात्रीचं रूपांतर सकाळमध्ये करणं, हे महाकठीण, अशक्यप्राय आणि वेदनादायक काम. ते मी करतो, असं ग़ालिब म्हणतो. म्हणूनच शीरीन-फ़रहादच्या जगप्रसिद्ध प्रेमिकांच्या कथेचा संदर्भ तो देतो. दिवसासाठी शुभ्र दुधाचा प्रतीकात्मक वापर यात तो करतो. या ग़ज़लच्या शब्दकळेत फ़ारसीप्रचुरता बरीच आहे. ग़ालिबचं काव्य लोकांना समजत नाही, अशी टीका त्याच्या काळात होत असे, तसंच त्याच्या बुद्धिमत्तेमुळं आणि चिंतनामुळं त्याच्या काव्यात येणारी अर्थगूढताही अनेकांना समजत नसे. बादशाहच्या दरबारातही तशी चर्चा असे. पण ग़ालिब अशा टीकेकडं दुर्लक्ष करे. कारण आपल्या काव्याच्या गुणवत्तेची त्याला पूर्ण खात्री होती. ‘मला ना प्रशंसेची अपेक्षा आहे, ना पुरस्काराची पर्वा. माझे शेर निरर्थक आहेत, असं वाटलं तर वाटू दे’, असं एका शेरमध्ये तो स्वतःच म्हणतो - 
न सताइश की तमन्ना न सिले की पर्वा 
गर नहीं हैं मिरे अशआ’र में मा’नी न सही 

आणि गेली दोनशे वर्षं ग़ालिबच्या एका एका शेरमधल्या बहुविध अर्थांचा शोध घेतला जातो आहे...

संबंधित बातम्या