खेळांतील कृत्रिम बुद्धिमत्ता 

डॉ. आनंद ज. कुलकर्णी
सोमवार, 18 जानेवारी 2021

विशेष

सर्वसामान्यपणे कोणताही देश संरक्षण सिद्धता, परराष्ट्र व्यवहारातील मुत्सद्देगिरी आणि खेळ या तीन माध्यमांतून आपली ताकद दाखवत असतो. विविध प्रकारच्या खेळांतून आपल्या देशातील नागरिकांच्या सर्वसाधारण शारीरिक स्वास्थ्याचे, सामर्थ्याचे व चपळाईचे प्रदर्शन घडवता येते. अगदी तालुका व जिल्हा स्तरापासून ते जागतिक स्तरावरील ऑलिंपिक सारख्या अत्युच्च दर्जाच्या स्तरावर क्रीडा स्पर्धा आयोजित होत असतात. सर्वच संघ कसोशीने तयारी करत असतात. प्रत्येक खेळाडू आणि संघ आपापल्या स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत असतो. शारीरिक क्षमता, सराव आणि प्रशिक्षण यांत जो उजवा ठरतो तो जिंकतो. गेल्या काही दशकांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या विविध अवतारांची जोड मिळाल्यामुळे खेळांमधली स्पर्धाही एका बाजूला अतिशय तीव्र झाली आहे. अगदी मिलिसेकंदांमधे हार-जीत ठरत आहे. कामगिरी उंचावण्यासाठी, रणनीती ठरवण्यासाठी व जिंकण्यासाठी आपल्या आणि प्रतिस्पर्धी संघाच्याही विविध पैलूंचा काटेकोर पद्धतीने अभ्यास केला जातो. असा अभ्यास करताना आकडेवारी मांडून विश्लेषण केले जाते व व्यूहरचना ठरवली जाते. इतर अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांप्रमाणे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचे आता क्रीडा क्षेत्रातही आपला जम बसवायला सुरुवात केल्याने आता कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय खेळांच्या विविध पैलूंचे त्वरित विश्लेषण करणे शक्य झाले आहे. प्रामुख्याने टेनिस, फुटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट, जिम्नॅस्टिक आदी क्षेत्रांतील खेळाडू, कोचेस, ट्रेनर्स, जाहिरातदारांना याचा फायदा होतो आहे. खेळाडूंना व कोचेसना व्यायामासंदर्भात सूचना देणे, योग्य संघ निवडणे, डावपेच आखण्यासाठी मदत करणे, सुरक्षेच्या संदर्भात आगाऊ माहिती देणे आदींसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग वाढतो आहे. चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इंग्लंड अशा देशांनी याबाबतीत आघाडी घेतली आहे. 

खेळाडूंची कार्यक्षमता वाढवण्यासाठी व्यायामाच्यावेळी तसेच सरावाच्यावेळी अंगावर ठराविक ठिकाणी सेन्सर्स म्हणजे वेअरेबल्स बसवले जातात. हे वेअरेबल्स हृदयाचे ठोके, रक्तदाब, साखरेचे प्रमाण, शरीराच्या ठराविक हालचाली, शारीरिक व मानसिक ताण आदी बाबी मोजत असतात, त्यांची नोंद ठेवत असतात. ठराविक व्यायामाच्या प्रकारानुसार तसेच कोच किंवा ट्रेनरने ठरवलेल्या उद्दिष्टांनुसार कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारित बनवलेले अल्गोरिथम्स खेळाडूंना थांबण्याची, प्रकार बदलण्याची, तसेच पोषण आहाराची सूचना देतात. यामुळे कोचेस व ट्रेनरना व्यग्र वेळापत्रकामुळे ज्या अत्यंत बारीकसारीक तपशिलांचा अंदाज येणे शक्य नसते,  
त्यांची माहिती मिळवणे व योग्य सूचना देणे, तसेच सूचनांचे पालन झाल्यावर अपेक्षित/अनपेक्षित बदल तपासण्यासारखे तपशील सुद्धा हे अल्गोरिथम्स अत्यंत काटेकोर पद्धतीने वापरतात. त्याचप्रमाणे सूचनांमधे आवश्यक ते बदल देखील करत जातात. यामुळे खेळाडूंची कार्यक्षमता तर वाढतेच पण व्यायामामुळे इजा होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

प्रत्येक संघ व त्यांचे कोचेस सामना झाल्यानंतर त्याचे चित्रण पाहून संघाच्या कामगिरीचा आढावा घेत असतात. मशिन लर्निंग या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्राने विविध संघांच्या कमजोरीच्या तसेच सामर्थ्याच्या छोट्या छोट्या क्लिप्स उपलब्ध केल्या जातात. यामुळे कोचेस ना संघ निवडीसाठी मोठी मदत होते. हे तंत्र फुटबॉल, बेसबॉल आदी खेळांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. सध्या फुटबॉल आणि बास्केट बॉल या खेळांमधे एक प्रयोग यशस्वी होताना दिसतो आहे, तो म्हणजे, मशिन लर्निंगच्या माध्यमातून खेळ चालू असताना प्रत्येक खेळाडूच्या खेळाच्या पद्धतीचे, मैदानावरील जागेचे व कामगिरीवरून त्याच्या जिंकण्यातील संभाव्य योगदानाचे प्रमाण काढले जाते. त्यानुसार रणनीती बदलण्याच्या सूचना सुद्धा दिल्या जातात. हा प्रयोग जितका जास्त होत जाईल तितकी त्याची निर्णय क्षमता आणि अचूकता वाढत जाईल. त्याचा अधिकाधिक फायदा संघांना तर होईलच, पण त्याचबरोबर खेळाडूंना सुद्धा वैयक्तिक कामगिरी सुधारण्याकडे अधिकाधिक लक्ष द्यावे लागेल. 

खेळाचा दर्जा उंचावणे जसे महत्त्वाचे असते तशीच खेळाडूंची सुरक्षा सुद्धा तितकीच महत्त्वाची असते. संभाव्य धोका ओळखून खबरदारी घेणे आता मशिन व्हीजनच्या माध्यमातून शक्य होत आहे. मोटारींच्या शर्यतींमध्ये हे तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. या खेळातील प्रत्येक गाडीची किंमत कित्येक कोटींच्या घरात असते, आणि चालकाचे जीवन तर अनमोल असते. साधारण २००-३०० किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या गाड्यांचे साध्या डोळ्याने किंवा अगदी कॅमेऱ्याच्या साहाय्यानेही बिघाड झाल्याचे ओळखणे जवळजवळ अशक्य असते. मशिन व्हीजन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने धावणाऱ्या मोटारीच्या फोटोंचे अतिशय जलद गतीने आकलन करून टायर तसेच गाडीच्या इतर भागांच्या बिघाडाचा अंदाज बांधला जातो व चालकाला आवश्यक सूचना देऊन होऊ शकणारी मोठी हानी टाळली जाते. त्याचप्रमाणे गाडीच्या इतर भागांत बसवलेले सेन्सर्सही बिघाडाची आगाऊ सूचना देण्याचे काम करतात. 

खेळ हा जसा देशाची शारीरिक तसेच मैदानी ताकद म्हणून दाखवला जातो, तसेच त्यातून प्रचंड उत्पन्न मिळत असते. स्टेडिअम मधील प्रेक्षकांनी खरेदी केलेल्या तिकिटांच्या रकमेपेक्षा अधिक उत्पन्न टेलिव्हिजन तसेच इतर डिजिटल माध्यमातून येत असते. त्यामुळे प्रेक्षकांसाठी खेळाचा अधिकाधिक चांगला व प्रभावी अनुभव घेता यावा यासाठीही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर गेल्या दशकापासून वाढतो आहे. ज्यामधे खेळाडूंची ठराविक दिशेतील हालचाल, प्रेक्षकांच्या भावना व नजरा, गोंगाटाचा स्तर व चढ-उतार, आदींवरून मनोरंजक, चित्तवेधक क्षण शोधून हायलाइट्स बनवणे व लगेचच टीव्ही, मोबाईल तसेच इतर माध्यमातून उपलब्ध करणे आदींचा समावेश होतो. यातील मनोरंजक, चित्तवेधक क्षणांवरून जाहिरातींचे दर ठरवण्यात सुद्धा मदत होते.

सोपे पण प्रगल्भ होत जाणारे अल्गोरिथम्स आजपर्यंत उघड न झालेल्या नवनवीन डावपेचांची उकल करत आहेत जे आता खेळाडूंसाठी आणि संघांसाठी फायदेशीर ठरू लागले आहेत. अल्फा-झिरो सारखे सॉफ्टवेअर कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून बुद्धिबळ शिकत आहे. या सॉफ्टवेअरला एक कृत्रिम खेळाडू म्हणून वापरण्यात येत आहे. विशेष म्हणजे या कृत्रिम खेळाडूला बुद्धिबळाचे कोणतेही ज्ञान वा प्रशिक्षण  देण्यात आलेले नव्हते. परंतु त्याला शिकण्याची क्षमता देण्यात आली होती. त्यामुळे तो स्वतः मानवी खेळाडूंप्रमाणे खेळ शिकत गेला आणि आता तो प्रगल्भ बनून स्वतः डावपेच तर रचतो आहेच, पण विशेष म्हणजे त्यातील कित्येक डावपेचांबद्दल अनुभवी खेळाडू सुद्धा अगदी अनभिज्ञ आहेत, हे आता लक्षात येत आहे. जगज्जेता गॅरी कास्पारोव्हच्या मते या तंत्रज्ञानामुळे हा खेळ आता नवनवीन पद्धतीने समजू लागलेला आहे, ज्याचा फायदा उदयोन्मुख खेळाडू तसेच कोचेसना सुद्धा होतो आहे. 

भारतातील सरकारी व काही खासगी विद्यापीठांनी खेळ तसेच त्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान यांचा मेळ घालण्याच्या दृष्टीने काम सुरु केले आहे. पण सर्वसामान्य खेळाडूंपर्यंत पोचण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरची कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली सॉफ्टवेअर व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठावयाचा आहे. 

आधी सांगितल्याप्रमाणे, अगदी काही मिलीसेकंद व मिलिमीटर्सच्या फरकाने कित्येक खेळांतील हार-जीत ठरत आहे. त्यामुळे, कित्येक वर्षे जीव ओतून संघ घडवणाऱ्या कोचेसना आणि ट्रेनर्सनासुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत आता घ्यावी लागत आहे. त्यामुळे सर्वच प्रकारच्या खेळांमधे मानवी हस्तक्षेप कमी होतो आहे. उदाहरणार्थ, कार रेसिंगमधे गाडीच्या चालकाचे कौशल्य, अद्ययावत तंत्रज्ञान व मदत करणारी इंजिनिअर्सची टीम यांचे एकत्रित प्रयत्न जिंकण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. अँड्र्यू बेल यांनी इंग्लंड मधील शेफील्ड विद्यापीठात कार रेसिंगच्या विषयात मोलाचे संशोधन केले आहे. त्यांनी १९५० पासून २०१४ पर्यंत झालेल्या महत्त्वाच्या कार रेसिंग स्पर्धांच्या विविध आकडेवारीचा अभ्यास केला. या अभ्यासाचा भाग म्हणून त्यांनी स्पर्धा जिंकण्यातला चालकचा व कारच्या तंत्रज्ञानाचा तसेच इंजिनिअर्सचा जो वाटा असतो त्याचं विश्लेषण केले आहे. त्यांच्या अभ्यासानुसार ८० च्या दशकात स्पर्धा जिंकण्यात चालकाचे योगदान जवळपास ३० टक्के होते. ते आता जवळपास १४ टक्क्यांपर्यंत आले आहे. त्याचबरोबर तंत्रज्ञानाचे तसेच इंजिनिअर्सचे योगदान ८६ टक्क्यांवर पोचले आहे. त्यामुळे कोणत्याही कारसाठी एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणार वेळ सुद्धा पाच सेकंदांपेक्षा कमी झाला आहे. त्यांच्या मते हा खूप मोठा, महत्त्वाचा बदल आहे. या खेळामधे साधारणपणे चालकाचे आणि कारचे किंवा तंत्रज्ञानाचे असे दोन प्रकारचे चाहते असतात. दुसऱ्या प्रकारचे चाहते वाढत असल्यामुळे फोर्ड सारख्या मोठ्या कंपन्या चालकरहित रेसिंग कार बनवत आहेत. यामुळे या खेळाचा चेहरामोहराच बदलत चालला आहे. 

पण यामुळे काही प्रश्नही निर्माण होत आहेत. तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा हस्तक्षेप खेळांत वाढत जाईल तसा कोचेस, ट्रेनर्स आणि अगदी खेळाडूंचे व त्यांच्या उपजत गुणांचे महत्त्व व मूल्य कमी होऊ लागेल का किंवा त्यांना भूमिका बदलावी लागेल का? नवीन तंत्रज्ञानामुळे सर्वच संघ खूपच चांगले खेळल्यामुळे त्यातील रंगत निघून जाईल का? विशिष्ट खेळासाठी नवनवीन कृत्रिम बुद्धिमत्तेचे सुसज्ज तंत्रज्ञान बनवणे ही एक नवीन स्पर्धा सुरु होईल का? जगभरातील देशांची  सरकारे खेळांविषयक कोणती धोरणे आखतात यावरून या साऱ्या प्रश्नांची सर्वसाधारण उत्तरे मिळू शकतील

संबंधित बातम्या