स्मार्ट होम्स: काल, आज आणि उद्या

डॉ. आनंद ज. कुलकर्णी
रविवार, 31 जानेवारी 2021

आर्टिफिशियल इंटेलिजन्स

साधारणपणे मागील दशकापूर्वीपर्यंत मोबाईल फोनवरून घरातील दिवे चालू-बंद करणे, टीव्ही तसेच इतर उपकरणे नियंत्रित करणे वगैरे तसे स्वप्नवतच होते. फक्त तोंडी सूचना देऊन घराचा दरवाजा उघडणे, एसी चालू-बंद करणे, घरातील उपकरणे नियंत्रित करणे वगैरे फक्त अतिश्रीमंत लोकांसाठी भविष्यातील एक चैन असेल असा एक समज होता. परंतु मागील दशकातील मोबाईल तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे स्मार्ट होम ही संकल्पना युरोपातील अनेक देशांत तसेच अमेरिकेत घराघरांमधे पोचू लागली आहे. स्मार्ट घरांमुळे राहणीमानात मोठा बदल होताना दिसतो आहे.  या सर्व बाबींचा हा ऊहापोह...

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील तज्ज्ञांनी २०१७ साल स्मार्ट घरांना समर्पित केले आहे कारण त्या वर्षी या क्षेत्रातील उलाढाल दीडशे अब्ज रुपयांपर्यंत पोचली होती. एका अभ्यासानुसार ही उलाढाल २०२४ पर्यंत काही हजार अब्ज रुपयांपर्यंत पोचण्याचा अंदाज आहे. भारतातही स्मार्ट घरांची संकल्पना आता मूळ धरत आहे. या पार्श्वभूमीवर ‘स्मार्ट’ या संकल्पनेचा आजपर्यंतचा, तसेच भविष्यात अभिप्रेत असलेला अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. थोडक्यात, या संकल्पनेचे आजवरचे संक्रमण समजणे महत्त्वाचे आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे घरांना अधिक किंवा खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ बनवण्याच्या दृष्टीने होणारे योगदान हे संक्रमण समजावून घेतल्यावरच उमगेल. घर म्हटले की त्यामधील स्वयंपाकघर, साफसफाई, सुरक्षा, ऊर्जेचा वापर, मनोरंजन आदी बाबी डोळ्यासमोर येतात. यातील जवळजवळ सर्व गोष्टींमध्ये आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वापरण्याबाबत ‘ॲमेझॉन’, ‘गुगल’, ‘फेसबुक’, ‘मोले’ अशा अनेक कंपन्या पुढे येत आहेत.

घराची साफसफाई करणारा रोबोट आपण प्रत्यक्षात किंवा टीव्ही वर नक्कीच पहिला असेल. अगदी सुरुवातीचा असा रोबोट खोलीमध्ये सर्वत्र फिरून फरशी व्हॅक्यूम क्लीन करू शकत होता. नंतर त्याला स्मार्ट बनवण्यासाठी सेन्सर बसवले गेले. या सेन्सरच्या मदतीने त्याला घरातील फर्निचर, फिरणाऱ्या व्यक्ती असे ‘अडथळे’ समजू लागले. या रोबोटच्या सेन्सर बरोबरच, विविध कॅमेरे आणि त्यातून मिळणाऱ्या सभोवतालच्या माहितीचा योग्य अर्थ लावणे आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे शक्य झाले आणि रोबोट आणखी स्मार्ट झाला. आता हा रोबोट खोली साफ करण्यापूर्वी खोलीचा आकार, कपाटे, जिने, पायऱ्या आदी अडथळे समजून घेऊ शकतो, कोणत्या भागात अधिक स्वच्छतेची गरज आहे, कोणते भाग जास्ती प्रमाणात व लवकर खराब होतात, हे सर्व समजून घेऊन त्याचे काम करतो. यामुळे काम चांगले तर होतेच, पण जेथे गरज असेल तेथेच स्वच्छता केली जात असल्यामुळे पाणी, वीज आदींची मोठी बचत होते. यामध्ये अजून काम होणे नक्कीच गरजेचे आहे, जसे हा रोबोट अजूनही पायऱ्या चढू शकत नाही, त्यामुळे त्याला उचलून न्यावे लागते किंवा एकापेक्षा जास्त रोबोट विकत घ्यावे लागू शकतात.

घराच्या सुरक्षेसाठी कॅमेरे बसवणे आता नवीन नाही. काही स्मार्ट प्रकारच्या कॅमेऱ्यांमधे सेन्सर असतो, जेव्हा हालचाल जाणवते तेव्हाच तो सुरू होतो आणि व्हिडिओ रेकॉर्ड होतो. यामुळे, वीज, हार्ड डिस्कमधील स्पेस आदी वाचते. याही पुढे जात जर्मनीमधील एका कंपनीने नवीन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कॅमेरा सिस्टिम बनवलेली आहे. या सिस्टिमला घरातील प्रत्येक माणसाचा चेहरा, साधारण शारीरिक ठेवण आदी माहिती दिलेली असते. घरात येणाऱ्या नेहमीच्या लोकांना तसेच फेसबुकसारख्या सोशल माध्यमातूनदेखील आपल्या मित्रमंडळींना ही सिस्टिम समजून घेते, त्यांच्या साधारणपणे नेहमी येण्याच्या वेळाही समजून घेत असते. याव्यतिरिक्त घरामध्ये किंवा घराच्या आवारात कोणी आले असेल तर मालकाला किंवा पोलिसांना ताबडतोब सूचना दिली जाते. आजकाल दोन्ही पालक कामाला बाहेर जात असल्यामुळे, मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा उपाय फारच उपयोगी ठरत आहे. 

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आधारित ‘ॲमेझॉन एको’, ‘गुगल होम’ आदींनी आधीच लाखो घरांमध्ये शिरकाव केलेला आहे. ह्या सिस्टिम आपल्याशी बोलतात, आपल्या आवडीनिवडी समजून घेतात, आपल्या सवयींवर लक्ष ठेवतात. यामुळे घरातील उपकरणे एकमेकांशी जोडून तसेच तोंडी सूचनांवरून नियंत्रित करणे आता शक्य होते आहे. स्वयंपाकघरात किंवा किचनमधे स्मार्ट उपकरणे आता वापरली जाऊ लागली आहेत. जसे कॉफी मशिनला तोंडी दिलेल्या सूचना समजतात, त्याप्रमाणे, कॉफी बनवली जाते. ओव्हनसुद्धा असाच स्मार्ट बनतो आहे. आता मात्र आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे ही यंत्रे आपल्या खाण्यापिण्याच्या ठराविक वेळा समजून घेऊ लागल्या आहेत; त्याप्रमाणे, ठराविक प्रकारची कॉफी वगैरे सुचवतही आहेत. लवकरच स्मार्ट फ्रिज येत आहेत. एखादा अन्नपदार्थ खराब झाला असेल तर हे फ्रिज लगेच आपल्याला त्याची माहिती देतील. स्वयंपाक घरात वापरली जाणारी काही उपकरणे तयार करणाऱ्या युरोपातील कंपन्यांनी घरात असलेल्या भाज्या तसेच इतर पदार्थांवरून कोणते खाद्यपदार्थ बनवता येतील ते सुचविणारे अल्गोरिदम बनवलेले आहेत. हे अल्गोरिदम आपल्या नेहमीच्या खाण्यापिण्याच्या वेळा, ऋतू आदींच्या आधारे योग्य खाद्यपदार्थ सुचवतात. अमेरिकेतील एमआयटी विद्यापीठात खाद्यपदार्थांच्या फोटोच्या आधारे त्यातील घटकपदार्थ सुचविणारे, तसेच त्याची कृती सांगणारे अल्गोरिदम बनवण्यात आले आले आहे. इंग्लंडमधील मोले नावाच्या कंपनीने ‘शेफ रोबोट’ बनवला आहे. हा रोबोट आपल्या आवडीनिवडीनुसार, तसेच सवयींनुसार खाद्यपदार्थ बनवतो. आपल्या बदलणाऱ्या सवयींनुसार तोसुद्धा शिकत जातो हे विशेष. याचप्रमाणे टीव्हीसुद्धा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वापरून आपल्या वेळा, तसेच आवडींनुसार आणि सवयींनुसार चॅनेल्स दाखवू लागले आहेत. हे पाहता टीव्हीवर कार्यक्रमांच्यामध्ये आपल्याला आपल्या जीवनशैलीला अनुसरून त्या त्या उत्पादनांच्या, सेवांच्या जाहिरातीसुद्धा दिसणे आता दूर नाही.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) मुळे स्मार्ट होम संदर्भातील संशोधनाची व्याप्ती आता विस्तारत आहे. कित्येक कंपन्या आता या क्षेत्रातील संशोधनात आघाडी घेत आहेत. येत्या काही वर्षांत स्मार्ट घरांचे स्वरूप संपूर्णपणे बदललेले दिसेल यात शंका नाही. उदाहरणार्थ, अगदी नजीकच्या भविष्यात जेव्हा आपण ऑफिसमधून  घरी यायला निघू तेव्हा आपल्या  नेहमीच्या सवयी, ऋतू, आजूबाजूचे हवामान आदी बाबी लक्षात घेऊन घरातील एसी सुरू होईल, घराच्या जवळ आल्यावर गॅरेज तसेच घराचे दार उघडले जाईल, घरातील ठराविक दिवे चालू किंवा बंद केले जातील, आवडणाऱ्या प्रकारातील तसेच आपल्या मूडप्रमाणे संगीत सुरू केले जाईल, चहा-कॉफी बनवली जाईल, खास आपल्यासाठी निवडलेले टीव्ही चॅनेल सुरू केले जातील. दक्षिण कोरियासारख्या देशात नदीवरील पुलांच्या देखरेखीसाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वापरून नजीकच्या भविष्यात उद्‌भवणाऱ्या संभाव्य दोषाचे व बिघाडाचे आगाऊ अंदाज घेऊन दुरुस्ती केली जाते. याच धर्तीवर घरांमध्येसुद्धा अशा प्रणाली बसवण्यावर संशोधन चालू आहे. या प्रणाली घरातील विविध उपकरणांमधील बिघाडाचे आगाऊ निदान करतील व त्याप्रमाणे योग्य त्या सूचना दुरुस्ती करणाऱ्याला दिल्या जातील. अशा प्रणालींना एक्स्पर्ट सिस्टिम्स असेही म्हणतात. विविध देशांतील पाणी वितरणाच्या, तसेच ऑइल रिफायनरीमध्ये अशा प्रणालींचा वापर होतो. 

या स्मार्ट घरांमुळे ऊर्जेची मात्र प्रचंड बचत नक्कीच होणार आहे. ही आजची गरज तर आहेच पण पुढच्या पिढ्यांसाठी पृथ्वीवरील संसाधनांच्या बचतीचीसुद्धा गरज आहे. आपण कोणतेही उपकरण घेताना त्याला किती वीज लागू शकते याचाही विचार करत असतो. पण गरज नसताना अशा उपकरणांचा कमीत कमी उपयोग करणे आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे शक्य होताना दिसत आहे. त्याचबरोबर, मोबाईलचा वापर स्मार्ट घरांसाठी आता कमी होत जाईल कारण घरातील सर्व उपकरणे, एकमेकांशी तसेच इंटरनेटशी जोडलेली असतील. ती उपकरणे मिळवलेल्या तसेच माहितीच्या आधारे स्वतःहूनच मालकासाठी आवश्यक ती कामे करू शकतील. कालांतराने, घरे एकमेकांशी जोडली जातील व आतील सिस्टिम्स एकमेकांपासून शिकून अजून स्मार्ट बनतील. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे घरासाठी अगणित उपयोग होतील असे एकूण चित्र आहे. आत्ताच यातील कित्येक गोष्टी शक्य होताना दिसत आहेत. उदाहरणार्थ, ई-टोनोमी नावाची फ्रान्समधील एक संस्था घरातील वृद्ध तसेच दिव्यांग लोकांसाठी स्मार्ट होम बनवण्यात आघाडी घेत आहे. ही घरे ज्यांच्यासाठी बांधली जातील त्यांचे व्यायाम, खाण्यापिण्याची पथ्ये आदी बाबींवर सध्या काम चालू आहे. ऊर्जेची बचत, सुलभता, सुरक्षा अशा कारणांमुळे स्मार्ट होमची लोकप्रियता वाढते आहे. पण त्यासाठी मोजावी लागणारी प्रारंभीची किंमत अजूनही सामान्य माणसाच्या आवाक्यात नाही. 

स्मार्ट घरांमुळे काही दुष्परिणामही संभवतात. या सिस्टिममधून माहिती चोरली जाऊ शकते, घरामध्ये कोण येते-जाते याची माहिती बाहेर जाऊ शकते, आपल्या घरातील सवयींची माहितीसुद्धा बाहेर जाहिरात कंपन्यांना विकली जाऊ शकते. या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेसंदर्भात काही कंपन्यांमध्ये तसेच विद्यापीठांमध्ये संशोधन चालू आहे. भारतातील तरुण संशोधकांसाठी यामध्ये प्रचंड संधी उपलब्ध आहेत. अगदी साधे सोपे उपाय शोधण्याकडे लक्ष केंद्रित करून मानवी जीवन खूप सुखकर करण्यात मोठे योगदान आपण नक्कीच देऊ शकतो.

संबंधित बातम्या