गुन्हेगारी रोखण्यासाठी...

डॉ. आनंद ज. कुलकर्णी
सोमवार, 15 मार्च 2021

आर्टिफिशियल इंटेलिजन्स

भारतासह जगभरात हिंसा, चोऱ्यामाऱ्या, स्त्रिया आणि मुलांच्या संदर्भातले गुन्हे, अलीकडच्या काळातले सायबर फ्रॉड आणि सायबर विश्वातल्या इतर गुन्ह्यांच्या संख्येत वाढच होते आहे, हे अनेक अभ्यासांमधून, अहवालांमधून सातत्याने दिसून आले आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्याविषयी आता जगभरातल्या सुरक्षा यंत्रणांचे सातत्याने  प्रयत्न सुरू आहेत. गुन्हा घडण्याच्या शक्यतांच्या संदर्भाने अलर्ट देण्यात कृत्रिम बुद्धिमत्तेची मोलाची मदत होऊ शकते. 

लक्षणांच्या पुनरावृत्तीच्या ठराविक पद्धतींच्या अभ्यासाने भविष्यात घडू शकणाऱ्या अनेक घटनांचे अंदाज करता येतात. साधारणपणे हवामान बदलातील लक्षणांवरून पावसाची शक्यता व प्रमाण यांचा अंदाज बांधता येतो व योग्य ते उपाय योजता येतात किंवा अपघात घडण्यापूर्वी चालकाच्या वाहन चालविण्याच्या पद्धतीवरून अपघाताची शक्यता वर्तवता येते. मशिन लर्निंगमुळे अशा लक्षणांच्या पद्धती शोधून काढणे, त्यांच्यातील होणारे छोटे- मोठे बदल शोधणे व त्यावरून पुढील अंदाज वर्तविणे आदी शक्य होते आहे. जसे प्रचंड पाऊस, वादळ, अपघात, निवडणुकांचे निकाल आदींविषयी आडाखे बांधायला काही खुणा, घटना, प्रसंगांची मदत होते, तशीच एखादा गुन्हा, अप्रिय घटना घडण्याचीही लक्षणे अनेकदा जाणवत असतात. गुन्ह्यांचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते गुन्हेगार जोपर्यंत एका विशिष्ट पद्धतीने गुन्हे करण्यात यशस्वी होत असतो तोपर्यंत सर्वसाधारणपणे तो गुन्ह्याची पद्धत बदलत नाहीत. म्हणजे गुन्हेगार ठरावीक पद्धतीने, ठरावीक वेळी गुन्हा करण्यात सराईत होतात. गुन्हेगार जसे  शिकतात तसेच मशिन लर्निंग अल्गोरिदमवर आधारित सॉफ्टवेअरसुद्धा झालेल्या गुन्ह्याच्या पद्धती शिकून पुढील गुन्हा होण्याची वेळ, ठिकाण व शक्यता वर्तवू शकतात. त्यामुळे, संबंधित यंत्रणांना सतर्क होण्यास मदत होते. महत्त्वाचे म्हणजे जसे गुन्हे घडत जातात किंवा थोपविले जातात, तसे तसे अल्गोरिदम व त्यावर आधारित सॉफ्टवेअर अजून प्रगल्भ होत जातात. विशेष म्हणजे हे अल्गोरिदम विविध स्रोतांच्या आधारे मिळालेल्या माहितीचा उपयोग कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय करत असतात. त्यामुळे कोणताही पूर्वग्रह असण्याची किंवा चूक होण्याची शक्यता कमी असते.

हे काम होत असताना विभिन्न प्रकारची माहिती वेगवेगळ्या स्रोतांकडून प्रचंड प्रमाणात व वेगाने येत असते. ती माहिती, फोटो, व्हिडिओ, ऑडिओ, ई-मेल, पत्र, वृत्तपत्रातील बातम्या, भाषणे, सोशल मीडियावरील पोस्ट, वेगवेगळ्या गटातटातील सामाजिक संबंध आदींच्या स्वरूपात असते. मिळणाऱ्या माहितीचे जलद विश्लेषण करणे, गणिती रूपांतर करणे, अनुमान लावणे आदी कामे विविध सॉफ्टवेअर व मशिन लर्निंग अल्गोरिदम करत असतात. त्यातून गुन्हे घडण्याच्या शक्यता खूपच कमी वेळेत वर्तविणे शक्य होते. अन्यथा हे जवळजवळ अशक्य आहे.

‘कोर्टिका’ या इस्राईलमधील एका स्मार्ट सिटी संबंधातील कंपनीने सीसीटीव्हीच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या माहितीचे विश्लेषण करणारे सॉफ्टवेअर बनवले आहे. हे सॉफ्टवेअर मशिन लर्निंग अल्गोरिदमचा वापर करून गर्दीतील लोकांचे चेहरे ओळखते; गर्दीच्या किंवा जमलेल्या जमावाच्या हालचाली, वागणूक आदी ओळखून एखाद्या अनुचित घटनेची शक्यता, स्वरूप, आदींचा अंदाज बांधून संबंधित विभागाला अलर्ट करते. विशेष म्हणजे या इंटेलिजन्ट अल्गोरिदममुळे कित्येक टेराबाईट्सच्या व्हिडिओ चित्रणाचे विश्लेषण कमीतकमी वेळेत करून योग्य अनुमान काढणे शक्य होत आहे. अमेरिकेच्या कायदा विभागासाठी इंग्लंडमधील कार्डिफ विद्यापीठाने बनवलेले इंटेलिजन्ट सॉफ्टवेअर फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, आदींवरील पोस्टचे वर्गीकरण करते. या सॉफ्टवेअरमधील अल्गोरिदम त्या वर्गीकरणावरून ठराविक व्यक्तींच्याबाबतीत त्यांच्या पूर्वीच्या सोशल मीडियामधील पोस्टवरून तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीवरून संभाव्य गुन्ह्याचे स्वरूप, वेळ, ठिकाण आदींचा अंदाज वर्तविते. हे सॉफ्टवेअर काढलेल्या अनुमानाची कारणमीमांसासुद्धा देते. इंग्लंडमध्ये २०१० साली ‘प्रेडपोल’ नावाचे इंटेलिजन्ट सॉफ्टवेअर बनवण्यात आले. ते सुरुवातीला किरकोळ स्वरूपातील गुन्हे रोखण्यासाठी व तपासासाठी वापरात होते. नंतरच्या काळात उपलब्ध असलेल्या गुन्हेगारी विषयक माहितीच्या आधारे या सॉफ्टवेअरचा उपयोग करून लॉस एंजलिस शहराचे अगदी छोट्या-छोट्या विभागांत वर्गीकरण केले. त्यामुळे पोलिसांना आता ठरावीक भागांवर लक्ष केंद्रित करणे शक्य झाले आहे आणि त्याचा परिणाम म्हणून चोऱ्यांचे प्रमाण ३० टक्क्याहून कमी झाले आहे, तसेच हिंसक गुन्हेगारीही २१ टक्क्यांनी खाली आली आहे.

खटला सुरू असताना आरोपींना जामिनावर सोडण्याचा किंवा शिक्षा झालेल्या कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय त्या त्या आरोपीचे वर्तन, सोडल्यानंतरचा तक्रारदाराला असणारा संभाव्य धोका आदी मुद्दे लक्षात घेतले जात असतात. काहीवेळा हे निर्णय घेण्यासाठी प्रत्येक केसमागे काही मिनिटांचाच वेळ मिळत असतो. त्यामुळे निर्णयामध्ये होणारी थोडीशी गफलतसुद्धा खूप महागात पडू शकते. इंग्लंडमधील डरहम शहरातील न्यायालयात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून बनवलेले ‘हार्ट’ नावाचे सॉफ्टवेअर २०१३ पासून वापरात आहे. गुन्हेगाराचा इतिहास, गुन्ह्याचे स्वरूप, समान प्रकारातील गुन्ह्याचे परिणाम, सामाजिक दबाव, गुन्हेगार पुन्हा गुन्हा करण्याचा धोका आदी लक्षात घेऊन न्यायाधीशाला जामीन किंवा पॅरोल संदर्भात निर्णय घेण्यात मदत केली जाते. याच धर्तीवर बनवलेले ‘कॉम्पास’ नावाचे सॉफ्टवेअर अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यातील न्यायालयात वापरण्यात येते आहे. या सॉफ्टवेअरची विश्वासार्हता दिवसागणिक वाढते आहे.

लहान मुलांची व स्त्रियांची सुरक्षा हा भारतातील तसेच जगातील जवळजवळ सर्वच देशांसाठी आजही महत्त्वाचा मुद्दा आहे. मशिन लर्निंग आधारित ‘सेफ्टीपिन’, ‘सावधान’ सारखी काही मोबाईल ॲप सध्या बाजारात उपलब्ध आहेत. लोकांच्या अभिप्रायांवरून, शहराच्या एखाद्या भागातील बऱ्या-वाईट अनुभवांवरून, गर्दीच्या वेळांवरून ही ॲप स्त्रियांसाठी प्रवासाचे वेगवेगळे सुरक्षित मार्ग सुचवतात, शहरातील एखादे विशिष्ट ठिकाण, वेळ आदी टाळण्याचा सल्ला देऊ करतात. काही अप्रिय घटना घडण्याचे संकेत मिळताच मोबाईलवरील ॲप एका क्लिकवर ॲक्टिव्हेट करता येते. लगेचच ते आजूबाजूचे आवाज, ठिकाण, आदींचे रेकॉर्डिंग सुरू करते. हे सर्व रेकॉर्डिंग पालकांना किंवा जवळच्या व्यक्तींपर्यंत पोचवते, त्यांना कॉलसुद्धा करते. ‘इमोटीव्ह’ सारख्या मेंदूच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या सिस्टिमचा यासाठी उपयोग होऊ शकतो. भीती, काळजी, आनंद अशा भावनांचे वर्गीकरण करता येते. त्याचा वापर योग्यवेळी अलर्ट देण्यात नक्कीच होऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे, या ॲपचा उपयोग सुरक्षा यंत्रणांसाठी शहरातील असुरक्षित, कमी सुरक्षित आदी ठिकाणांचा आढावा घेण्यासाठी होऊ शकतो. अत्याचाराची घटना घडल्यास मिळणाऱ्या डीएनएच्या गुणधर्मांवरून, संरचनेवरून अपराधी व्यक्तीच्या पार्श्वभूमीविषयी काही महत्त्वाची माहिती देऊ शकणारे इंटेलिजन्ट सॉफ्टवेअर आता अमेरिकेतील सुरक्षा विभाग वापरते आहे. हे अमेरिकेसारख्या बहुवंशीय देशात अत्यंत उपयोगी ठरत आहे. यामुळे अनेक गंभीर व क्लिष्ट गुन्ह्यांचा वेळेत छडा लावून, निवाडा करणे शक्य होत आहे. अर्थात, अशा सॉफ्टवेअरचा योग्य कारणासाठीच वापर अपेक्षित आहे.

मुख्य म्हणजे अशी इंटेलिजन्ट सॉफ्टवेअर तज्ज्ञांचे अनुभव, पूर्वीची प्रकरणे, वस्तुस्थिती आदींचा उपयोग करून सल्ला किंवा अनुमान देते. त्यामुळे, अननुभवी अधिकाऱ्यांसाठी ही सॉफ्टवेअर म्हणजे एक मोलाचा सल्लागार ठरू शकतात. 

गुन्हे रोखल्यामुळे, लवकर छडा लावल्यामुळे, निर्णय प्रक्रियेत मदत झाल्यामुळे न्यायालयाचा बहुमोल वेळही वाचू शकतो. गुजरातमधील फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीच्या धर्तीवर आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा उपयोग करून गुन्हेगारी रोखण्यासंबंधातील संस्थासुद्धा उभारणे शक्य आहे. राष्ट्र उभारणीसाठी अशा संस्थांची गरज नेहमीच राहणार आहे. यामध्ये संशोधनाच्या अनंत संधी उपलब्ध होत आहेत. आपल्याकडील अनुभवी तसेच तरुण संशोधक त्यामध्ये मोलाचे योगदान देऊ शकतात. तंत्रज्ञान कोणतेही असो ते स्वतः तटस्थच असते. त्याचा वापर योग्य हातांमधे असणे गरजेचे असते. त्यामुळे स्मार्ट सिटीसारख्या सर्वांगीण विकास साधणाऱ्या संकल्पनेमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा उपयोग करून गुन्हेगारी रोखणे हा एक महत्त्वाचा भाग असू शकतो

संबंधित बातम्या