एआयः समज, जोखीम आणि सकारात्मकता

डॉ. आनंद ज. कुलकर्णी
सोमवार, 13 सप्टेंबर 2021

आर्टिफिशियल इंटेलिजन्स

विश्वातील कोणतेही तंत्रज्ञान तटस्थच असते. त्याच्या वापराच्या उद्देशांवरून त्याचा उपयोग आणि परिणाम ठरत असतात. तंत्रज्ञानाला मित्र समजून त्याचा उपयोग आपले काम सोपे करण्यासाठी, आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी केल्यास चांगले परिणाम दिसू शकतात.

आण्विक तंत्रज्ञानाचा वापर संहारक अणुबॉम्ब बनवण्यासाठी होतो, तसाच त्याचा वापर वीज बनवण्यासाठी, कीटकनाशकांच्या वापरामध्ये, गुन्हेगारी तपासासाठी, वैद्यकीय उपचारांसाठीही होतो. असेच इंटरनेटच्या बाबतीतही आहे. त्याचा उपयोग प्रामुख्याने माहितीची देवाणघेवाण, उपलब्धता, शिक्षणादी क्षेत्रांतली सहजता वाढवण्यासाठी होतो. परंतु काही घटक याच तंत्रज्ञानाचा उपयोग माहिती चोरण्यासाठी, अफवा पसरवण्यासाठी आणि इतरांना लुटण्यासाठीही करतात. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर शेती, विमान व रस्ते वाहतूक, आरोग्य, शिक्षण, दळणवळण अशा क्षेत्रांत दिवसागणिक वाढतो आहे, त्याचे सकारात्मक परिणामसुद्धा दिसत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला, काही नामांकित शास्त्रज्ञांनी व विचारवंतांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या जवळजवळ प्रत्येक क्षेत्रातील वाढत्या प्रभावाच्या परिणामांबद्दल चिंतासुद्धा व्यक्त केलेली आहे.

जगप्रसिद्ध भौतिक तसेच खगोल शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी २०१७मध्ये पोर्तुगालमधील लिस्बन येथे भरलेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रगल्भतेबद्दल व वापराबद्दल भीती व्यक्त केली होती. येत्या काही दशकांत कृत्रिम बुद्धिमत्ता मानवापेक्षाही बुद्धिमान व हुशार होऊ शकते आणि ती प्रगल्भ होण्याचा वेग मानवाच्या तुलनेत बराच जास्त राहील आणि त्याचमुळे मानव या तंत्रज्ञानाशी स्पर्धा करू शकणार नाही व संपूर्ण मानवजातीला आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आपल्या जाळ्यात ओढून वेठीस धरू शकेल, अशी शक्यता त्यांनी त्यावेळी बोलून दाखवली होती. कॉम्प्युटर व्हायरस जसे बनवले जातात, तसेच इंटेलिजन्ट सॉफ्टवेअर स्वतःपासून दुसरा अधिक इंटेलिजन्ट सॉफ्टवेअर जन्माला घालतील. हवामानातील बदल, वाढते तापमान, वाढती लोकसंख्या आदींशी आपण लढत आहोतच, पण आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ही एक नवीन समस्या होऊ घातली आहे, असेही त्यांचे म्हणणे होते. स्टीफन हॉकिंग यांच्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वरदान ठरले होते. मज्जासंस्थेशी संबंधित एका दुर्धर आजारामुळे १९८५पासून ते बोलू शकत नसत, तसेच पुढे त्यांचे लिखाण व संपूर्ण शरीराची हालचाल थांबली. परंतु मेंदू मात्र तेवढाच तल्लख होता. केवळ त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर व आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे त्यांना आपले संशोधन व लिखाण पुढे चालू ठेवता आले. त्यासाठी अमेरिकेतील इंटेल कंपनीने बनवलेले इंटेलिजन्ट सेन्सर्स त्यांच्या गालातील एका स्नायूच्या हालचालींवरून, तसेच त्यांनी आतापर्यंत लिहिलेल्या लेखांतील तसेच पुस्तकांतील माहितीच्या आधारे त्यांना काय म्हणायचे आहे त्याचा अंदाज घेणारे मशिन लर्निंग सॉफ्टवेअर ते वापरत असत. त्या आधारे, ते लिहीत आणि बोलत असत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा आवाका आणि त्याचे उपयोग यांची पूर्ण कल्पना असतानाही त्यांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सबद्दल इशारा दिला होता, याचे भान आपल्याला ठेवावे लागेल.

‘टेस्ला’ व ‘स्पेस-एक्स’ या अंतराळाशी संबंधित कंपनींचे संस्थापक व उद्योजक एलॉन मस्क यांनीही अमेरिकेतील टेक्सास येथे २०१८मध्ये भरलेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत आर्टिफिशिअल इंटेलिजन्सबद्दल भीती व्यक्त केली होती. त्यांच्या मते नजीकच्या भविष्यात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे अणुबॉम्बपेक्षाही संहारक ठरू शकते. त्यांनी त्यासंदर्भात दिलेले चिनी रणनीती व डावपेचांवर आधारित खेळातील इंटेलिजन्ट खेळाडूचे उदाहरण महत्त्वाचे आहे. लंडनस्थित डीप-माईंड कंपनीने बनवलेला ‘अल्फागो-झिरो’ नावाचा हा खेळाडू स्वतःशीच खेळून स्वतःला उत्तमोत्तम बनवत गेला. विशेष म्हणजे, त्यासाठी त्याला मानवाकडून कोणत्याही माहितीची त्याला गरज नव्हती. याबद्दलचे संशोधन २०१७ साली ‘नेचर’ या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. मस्क यांच्या मते, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्रातील शास्त्रज्ञांनी व तज्ज्ञांनी त्यांच्या संशोधन व वापराच्या सध्याच्या संकल्पनेपेक्षाही पुढचा विचार केला पाहिजे. त्यांच्या मते, असे इंटेलिजन्ट सॉफ्टवेअर्स नियंत्रणाबाहेर गेले किंवा नेण्यात आले तर त्याच्या परिणामांची कल्पनासुद्धा करता येणार नाही. त्या अनुषंगाने, लवकरात लवकर देशांच्या तसेच जागतिक पातळीवर काही नियम, कायदे आदी ठरवण्यावर ते भर देत आहेत. युरोपियन युनियनमधील कायदे तज्ज्ञ, संसदेतील सभासदही २०१७ सालापासून या विषयावर खल करत आहेत. लवकरच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या नैतिक-अनैतिक वापराबद्दल मार्गदर्शक तत्त्वे समोर येणे अपेक्षित आहे. एलॉन मस्क यांनी ही भीती व्यक्त केली असली तरी त्यांचीच ‘न्यूरालिंक’ ही आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्रातील कंपनी एका विशिष्ट प्रकारचे लवचिक धागे बनवत आहे. हे धागे मेंदूमध्ये बसवून मशिन इंटेलिजन्सच्या मध्यांतून कॉम्प्युटर तसेच मोबाईल फोन्स वापरणे शक्य होईल असा कंपनीचा दावा आहे. त्याचबरोबर टेस्लाची पूर्णपणे स्वयंचलित इंटेलिजन्ट कारसुद्धा आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची अत्यंत प्रगत आवृत्ती म्हणता येईल.

या तज्ज्ञ मंडळींच्या दृष्टिकोनातून तसेच सामान्य माणसांच्या मनातही आर्टिफिशिअल इंटेलिजन्सबद्दल काही साधक-बाधक विचार, काहीशी भीती आणि अनिश्चितता आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्याच्याबद्दलची असलेली तोकडी किंवा निराधार माहिती. अगदी सर्वसामान्यांच्या दृष्टीने कळीचा विषय म्हणजे, नोकऱ्या. काहींच्या मते आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर गदा येऊ शकते. एके काळी विविध कार्यालयांत संगणक येऊ घातले होते, विविध कारखान्यांत रोबोट आणले गेले. या तंत्रज्ञानामुळे निश्चितच काही लोकांच्या नोकऱ्यांचे स्वरूप बदलले, काहींच्या नोकऱ्या गेल्या, पण संगणकांनी किंवा रोबोटनी लोकांची तीच तीच कंटाळवाणी असणारी किंवा आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आणि क्लिष्ट असणारी कामे घेतली. दुसऱ्या बाजूला उत्तम प्रतीच्या मानवी मेंदूला आणि हाताला चालना देणाऱ्या विविध नोकऱ्या, कारखाने उभे राहिले. त्यामुळे नोकऱ्यांचे प्रमाण कितीतरी प्रमाणात वाढले. आजही आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे केवळ भारतातच नाही तर जगभरात विविध नोकऱ्या व स्टार्टअप्सचे पर्याय उभे राहिले आहेत, हे विशेष.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या काही साधक उपयोगांवरही यानिमित्ताने एक नजर टाकू. वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वेगाने वाढतो आहे. रुग्णाची वैद्यकीय पार्श्वभूमी, चाचण्यांचे निकाल, खाण्यापिण्याच्या सवयी आणि इतर बाबींवरून भविष्यातील धोक्याच्या सूचना देणाऱ्या एक्स्पर्ट सिस्टिम बनवण्यात आल्या आहेत. ‘मायसिन’ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. हॉस्पिटलसाठी आठवड्याच्या किंवा महिन्याच्या शस्त्रक्रियांचे वेळापत्रक बनवणे हे एक किचकट काम असते. शस्त्रक्रियांसाठी योग्य दिवस व वेळ आखून देण्यासाठी आता इंटेलिजन्ट अल्गोरिदम वापरले जातात. त्यामुळे, डॉक्टरांचा अमूल्य वेळ तर वाचतोच, तसेच हॉस्पिटल्सची जागा, बेड्स, मदतनीस, औषधे आदी संसाधनांचे आगाऊ नियोजन करणे व योग्य प्रमाणात वापरणे शक्य होत आहे. 

काही एक्स्पर्ट सिस्टिम घरातील किंवा सोसायट्यांमधील पाणी तसेच वीज वापराचे योग्य नियमन करून कमीतकमी वापर करण्यावर भर देतात. त्याचबरोबर शहरांमधील पाणी वितरणातील संभाव्य बिघाडाची आगाऊ सूचना देऊ करणाऱ्या  एक्स्पर्ट सिस्टिमसुद्धा वापरण्यात येतात. ‘विन-नाऊ’ नावाच्या दुबईस्थित कंपनीने बनवलेले इंटेलिजन्ट सेन्सर मशिन लर्निंगच्या माध्यमातून रेस्टॉरंटमधील वाया जाणाऱ्या अन्नाच्या घटकांचे वर्गीकरण करून त्याची किंमत, वेळ आदींचे विश्लेषण करतात. त्यावरून रेस्टॉरंट पुढील बचतीचे धोरण ठरवते. आपत्ती व दुर्घटनेच्या स्थितीत तर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स एक भरवशाचा मित्र असू शकतो. उदाहरणार्थ, २०११ साली जपानच्या फुकुशिमा आण्विक ऊर्जा केंद्राचा महत्त्वाचा भाग भूकंपामुळे उद्‌ध्वस्त झाला, तसाच १९८६ साली युक्रेनमधील चेर्नोबिल येथे स्फोट झाला होता. तेथे किरणोत्सर्ग सुरू झाला. अशा ठिकाणी मानवाने जाऊन पाहणी करणे अत्यंत धोकादायक असते. इंटेलिजन्ट रोबोट्स यासाठी अत्यंत उपयोगाचे ठरतात.  धोकादायक भागात एखाद्या थव्यासारखे जाऊन पाहणी करून, फोटो, माहिती घेऊन एकत्रितपणे बाहेर येणारे इंटेलिजन्ट सॉफ्ट रोबोंवर मी स्वतः काम केले आहे.

कित्येक देशांच्या संरक्षण प्रयोगशाळा इंटेलिजन्ट ड्रोनचा वापर करण्याकडे भर देत आहेत. जगात ज्या भागांत ६५ टक्क्यांहून अधिक जनता शेतीवर अवलंबून आहे, त्यांच्यासाठी संसाधनांचा योग्य वापर, कमीतकमी खत व पाण्यात जास्तीतजास्त वापर करण्यासाठी इंटेलिजन्ट रोबोट, परागीकरणासाठी छोट्या उडणाऱ्या रोबोटिक मधमाश्यांचा उपयोग आता अनिवार्य होत आहे. त्याचबरोबर झाडांच्या पानांच्या तसेच बी-बियाणांच्या फोटोंचे विश्लेषण करून रोगाचे निदान मशिन लर्निंगमुळे शक्य होत आहे. गाड्यांमुळे व कारखान्यांतील धुराच्या प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक मोजमाप अधिक अचूकतेने व शहरातील जास्तीतजास्त भागात होण्यासाठी इंटेलिजन्ट सेन्सरचा वापर चीन, इंग्लंड, युगांडासारखे देश करत आहेत. त्यातून प्रदूषणासारख्या गंभीर समस्येवर तोडगा निघण्यास मदत होणार आहे. कचरा वर्गीकरण करण्यासाठी मशिन लर्निंग तंत्रांचा वापर आता नवीन नाही, पण त्याचबरोबर ‘नमामि गंगे’ सारख्या प्रकल्पात नदीतील कचरा शोधणे व उचलणे याकडेही आता शास्त्रज्ञांनी झेप घेतली आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी अमेरिकेसारख्या बहुवंशीय समाजात मशिन लर्निंगमुळे गुन्हेगारांना शोध घेण्यात मोठी मदत होत आहे. 

सामान्य जनतेच्या दृष्टीने असे अत्यंत महत्त्वाचे उपयोग पाहिल्यास आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या स्वीकृतीकडे सर्वच देशांचा व कंपन्यांचा कल वाढणे स्वाभाविक आहे. भविष्यातील उपयोगांबद्दलचे अंदाज पाहता आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची प्रगती अजूनही प्राथमिक स्वरूपाचीच आहे. परंतु आतापर्यंतचे सर्व उपयोग हे सर्वंकष आणि समाजोपयोगी किंवा लोकोपयोगी उद्देश समोर ठेवूनच झालेले दिसतात. विशेष म्हणजे पुढील प्रगतीसाठी मनुष्यबळाची नितांत गरज आपल्या देशाला अगदी नजीकच्या काळात लागणार आहे. त्यासाठी विद्यापीठांनी, सरकारांनी व कंपन्यांनी एकत्र आले पाहिजे व थेट उपयोगी ठरणारे मनुष्यबळ विकसित केले पाहिजे. त्यामध्ये तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता तर असलीच पाहिजे, पण जाणीवपूर्वक नैतिकतेचे पालन करण्याचे संस्कारसुद्धा असले पाहिजेत. तरच खऱ्या अर्थाने आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आधुनिक जगासाठी तसेच आपल्या पुढील अनेक पिढ्यांसाठी वरदान ठरेल.

संबंधित बातम्या