दागिने उद्योगासाठी...

डॉ. आनंद ज. कुलकर्णी
सोमवार, 11 ऑक्टोबर 2021

आर्टिफिशियल इंटेलिजन्स

अन्न, दळणवळण व वाहतूक, मिलिटरी, आरोग्य या व अशा अनेक क्षेत्रांबरोबरच आता दागिने उद्योगातही आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे मोठे परिवर्तन होऊ घातले आहे, हे नक्की. यामुळे नवीन प्रकारच्या नोकऱ्या व नवनवीन उद्योग सुरू करण्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत. स्टार्टअपना तर ही एक उत्तम संधी आहे.

दागिने तयार करण्यात, वापरण्यात आणि निर्यात करणाऱ्या देशांत भारताचा नंबर खूप वरचा लागतो. यामध्ये, साधारणपणे जगातील ३० टक्के भागीदारी भारताची आहे. विविध रत्ने व दागिन्यांच्या व्यापाराचा भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा साधारणपणे १५ टक्क्यांपर्यंत जातो. भारतात तयार होणाऱ्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारात वितरण व विक्रीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या भारत सरकारच्या ‘इंडिया ब्रँड इक्विटी फाऊंडेशन’ या संस्थेच्या अहवालानुसार, २०१९ सालातील जगातील सोन्याची मागणी ७०० टनांच्या आसपास होती. २०२० साली भारतातून साधारणपणे २२ हजार कोटी रुपयांच्या दागिने व विविध रत्नांची निर्यात झाली आहे. त्याचबरोबर, १४ हजार कोटी रुपयांचे हिरे निर्यात केले गेले आहेत. 

जगभरातील दागिने खरेदी करण्याची पद्धत आणि उद्देश झपाट्याने बदलत आहेत. आता दागिने उद्योग अशा स्तरावर किंवा उंचीवर पोचला आहे, की पुढील प्रगतीसाठी मोठी उलथापालथ होण्याची गरज निर्माण झाली आहे. पूर्वी अडीनडीला उपयोगी पडतील म्हणून दागिन्यांचा पिढ्यानपिढ्या संचय करणे, श्रीमंतीचे प्रदर्शन करणे हा मूळ उद्देश होता. आता मात्र त्याकडे एक फॅशन म्हणून अधिक बघितले जात आहे. त्यामुळे, विकत घेतलेले दागिने बदलून घेणे, हलक्या वजनाचे, नाजूक, विविध डिझाईन्सचे दागिने वापरणे, बदलत राहणे, या गोष्टींकडे जगाबरोबरच भारताचा कलदेखील वाढतो आहे. नवनवीन कंपन्या विविध संकल्पना घेऊन बाजारात उतरत आहेत. त्यामुळे 3D प्रिंटिंग व कॉम्प्युटरचा वापर करून डिझाईन्स तयार करणे शक्य असल्यामुळे बाजारात टिकून राहणे शक्य होत असतानाच, आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापरही होऊ लागला आहे. आता ही जरी सुरुवात असली तरी लवकरच त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर आणि गरजेचा होणार आहे. 

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आधारित मशीन लर्निंग सॉफ्टवेअरचा उपयोग विविध रत्नांचे फोटो घेऊन त्यांच्या आकाराचे मोजमाप घेण्यासाठी होत आहे. असे सॉफ्टवेअर रत्नांचे काठ व कड ओळखतात व त्यावरून त्यांचे विविध आकारात वर्गीकरण करतात. त्याचप्रमाणे मशीन लर्निंग सॉफ्टवेअर रंग, त्यातील छटा ओळखून त्यांच्या दर्जाचेसुद्धा वर्गीकरण करतात. त्यामुळे या कामातील वेळ तर वाचतोच पण कामातील संभाव्य चूक टाळून दर्जा राखण्यास मोठी मदत होते. महत्त्वाचे म्हणजे, आता बनावट रत्ने ओळखण्यासाठीही मशीन लर्निंग अल्गोरिदम वापरण्यात येत आहेत. ग्राहकांसाठी तसेच सराफांसाठीदेखील हे एक विश्वासार्ह साधन ठरत आहे. यातून मानवी चूक पूर्णपणे टाळली जाऊन विश्वासार्हता वाढीस लागण्यास मदत होत आहे. २०२० सालापासून कोविडच्या संकटाने जगातील जवळजवळ सर्व क्षेत्रांना प्रभावित केले आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्याही गेलेल्या आहेत. पण याच संकटातून नवीन संधीसुद्धा उपलब्ध होत आहेत. दागिन्यांच्या व रत्नांच्या व्यापारात हे अधिक उठून दिसत आहे. दागिने खरेदी करताना त्यांना हात लावणे आणि ते घालून पाहणे हे काही नवीन नाही. परंतु कोविडमुळे सराफ व्यापारी तसेच ग्राहक हे टाळत आहेत. ग्राहकांचे दुकानात जाणेही कमी झाले आहे. त्यातूनच दागिने व रत्ने जवळून पाहण्यासाठी ‘व्हर्चुअल रिॲलिटी’चा उपयोग होत आहे. ग्राहक घरबसल्या फक्त व्हर्चुअल रिॲलिटीयुक्त हेड सेट लावून प्रत्येक दागिना व डिझाईन्स अगदी जवळून पाहू शकतात. दुकानात कोठेही फिरू शकतात, प्रश्न विचारून सर्व माहिती करून घेऊ शकतात. तसेच व्हर्च्युअली दागिने अंगावर घालूनसुद्धा पाहू शकतात. 

‘जेम्स अॅण्ड ज्वेलरी स्कील काउन्सिल ऑफ इंडिया’, पर्सिस्टन्ट सिस्टिम्स आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई यांनी एकत्रितपणे दागिने उद्योग क्षेत्रातील विविध आव्हाने पेलण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आधारित तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने आघाडी घेतली आहे. याचे सकारात्मक परिणाम नजीकच्या भविष्यात दिसू लागणे अपेक्षित आहे. कोईम्बतूरस्थित ‘एमराल्ड’ या विविध प्रकारचे दागिने तयार करणाऱ्या कंपनीने ‘आयबीएम’ या इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीमधील आघाडीच्या कंपनीच्या साहाय्याने आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आधारित काम करणारे ‘तेज’ नावाचे मोबाईल ॲप तयार केले आहे. त्यामुळे देशातील २००पेक्षा अधिक सराफांना गिऱ्हाइकाच्या गरजेनुसार पाच लाखांहून अधिक डिझाईन्स असलेल्या यादीमधून निवडक डिझाईन्स उपलब्ध करून दिले जातात. यामुळे बहुमोल वेळ वाचतो. 

स्पर्धेत टिकण्यासाठी नवनवीन डिझाईन्स तयार करणे आवश्यक असते. दागिने तयार करणारे कारागीर वेगवेगळ्या पद्धतीने विविध आकाराची व रंगाची बहुमोल रत्ने, हिरे, खडे हाताने एकमेकांच्या जवळ जोडून एका ठरावीक छोट्या भागात विविध प्रकारचे आकर्षक व सुंदर नमुने तयार करत असतात. हे सर्व अत्यंत नाजूक, कठीण, वेळ घेणारे, तसेच दक्षतेचे काम असते. हे काम जलद गतीने करणारे अनेक कॉम्प्युटर प्रोग्रॅम आजपर्यंत तयार झालेले आहेत. परंतु, विविध आकाराची व रंगांची बहुमोल रत्ने, हिरे, खडे फक्त जास्तीत जास्त प्रमाणात एका छोट्या जागेत बसवून सुंदर व आकर्षक नमुने तयार होतीलच असे नाही. त्यातच त्यांच्या एका सेटमधून लाखो प्रकारचे नमुने तयार होऊ शकतात. त्यातून निवडक योग्य नमुने शोधणे अत्यंत जिकरीचे व वेळकाढूपणाचे असते. मायक्रोसॉफ्ट कंपनीतील संशोधकांनी असे नमुने तयार करणारे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आधारित मशीन लर्निंग अल्गोरिदम तयार केलेले आहे. या संशोधकांनी या बहुमोल रत्ने, हिरे, खडे इत्यादींना छोट्या जागेत बसवण्याच्या प्रश्नाला किंवा अडचणीला एका पॅकिंग प्रॉब्लेमचे स्वरूप दिले आहे. त्यासाठी त्यांनी फोटो स्वरूपात १०५ विविध प्रकारची रत्ने घेतली. त्यांचे आकार वेगवेगळ्या २० प्रकारांत विभागले होते. लटकन किंवा पेंडंटच्या छोट्या जागेत १०५ रत्नांतून ठरावीक रत्ने निवडणे व पॅक करणे, जेणेकरून मोकळी जागा राहणार नाही, याचबरोबर मशीन लर्निंग अल्गोरिदम रत्नांचा सुंदर मिलाफ, प्रमाण, एकसंधपणा, समतोलपणा इत्यादींचादेखील विचार करते. 

त्यासाठी, पहिले रत्न किंवा खडा पॅकिंग कंटेनरमध्ये ठेवल्यानंतर साधारणपणे त्याच आकाराचा दुसरा खडा अल्गोरिदम निवडते. असेच पुढे कंटेनरमधील खड्यांची संख्या वाढत गेल्यावर त्यांच्या साधारण सरासरी इतक्या आकाराचा पुढील खडा निवडते. त्याचबरोबर, कोणत्या दिशेतील खड्यासमोर किंवा विरुद्ध दिशेला कोणत्या प्रकारचा खडा कोणत्या दिशेला बसवायचा जेणेकरून रंग व आकाराचा समतोल साधला जाईल, याचासुद्धा विचार अल्गोरिदम करते. यातून मशीन लर्निंग अल्गोरिदम एका पॅकिंग कंटेनरसाठी हजारो डिझाईन्स केवळ काही सेकंदात तयार करून देते. त्यातील प्रमाणबद्ध असलेली किंवा एकसंधपणा आणि समतोल साधलेली डिझाईन्सच पुढे आणली जातात. मायक्रोसॉफ्टच्या प्राथमिक प्रयोगांच्या आधारे साधारणपणे ६० टक्के डिझाईन्स बाजारात आणली जाण्याच्या योग्यतेची आहेत. या तंत्रज्ञानामध्ये अजून संशोधन चालू आहे. परंतु या घडीला त्याचा उपयोग जयपूर मधील कित्येक कारागीर करत आहेत. त्यामुळे त्यांचा डिझाईन्स तयार करण्यातील बहुमोल वेळ वाचत आहे, तसेच नवनवीन डिझाईन्सही बाजारात आणली जात आहेत. याचा सकारात्मक परिणाम थेट विक्रीचे प्रमाण वाढण्यावर होत आहे.

अन्न, दळणवळण व वाहतूक, मिलिटरी, आरोग्य या व अशा अनेक क्षेत्रांबरोबरच आता दागिने उद्योगातही आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे मोठे परिवर्तन होऊ घातले आहे, हे नक्की. यामुळे नवीन प्रकारच्या नोकऱ्या व नवनवीन उद्योग सुरू करण्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत. स्टार्टअपना तर ही एक उत्तम संधी आहे. मुख्य म्हणजे, अशा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आधारित प्रोजेक्टना किंवा उद्योगांना खूपच कमी भांडवल लागते. 

इच्छाशक्ती व नवनवीन काही ना काही करत राहण्याची धडपड हेच खरे या क्षेत्रातील भांडवल व इंधन आहे. तरुण व होतकरू इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी तज्ज्ञांनी भरलेल्या आपल्या देशात याची अजिबात कमी नाही. त्यांना दिशा देण्यासाठी सरकार व विद्यापीठांनी योग्य पावले उचलणे क्रमप्राप्त आहे.

संबंधित बातम्या