रोजच्या वापरातील एआय

डॉ. आनंद ज. कुलकर्णी
सोमवार, 20 डिसेंबर 2021

आर्टिफिशियल इंटेलिजन्स

आपल्या रोजच्या जगण्यातील कित्येक बाबींमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा, कृत्रिम बुद्धिमत्तेचा, उपयोग अगदी प्रत्येक क्षणाला होत आहे.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर वेगवेगळ्या क्षेत्रांत होत असल्याच्या बातम्या आज आपण हरघडी वाचतो वा ऐकतो. कित्येक जण अजूनही भविष्यातील किंवा नजीकच्या काळात उपयोगी ठरणारे एक तंत्रज्ञान म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेकडे पाहतात. इंटेलिजन्ट स्वयंचलित वाहने, स्मार्ट वाहतूक प्रणाली, स्मार्ट होम्स आदींच्या बाबतीत आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहज वापरासाठी अजूनही काही काळ जाणे अपेक्षित असले, तरी आपल्या रोजच्या जगण्यातील कित्येक बाबींमध्ये त्याचा उपयोग अगदी प्रत्येक क्षणाला होत आहे. त्यापासून आपण अनभिज्ञ असू नये, म्हणून हा लेखनप्रपंच.

स्मार्ट वाहतूक प्रणालीचे प्राथमिक स्वरूप म्हणून आपण ‘गूगल मॅप’ वापरतो. हे इंटेलिजन्ट अॅप आपल्याला जिथे पोचायचे आहे त्या ठिकाणापर्यंतचे विविध मार्ग दाखवते. त्या मार्गांवरील त्यावेळची गर्दी पाहता तिथे पोचायला किती वेळ लागू शकतो, कोणता मार्ग घेणे सोईस्कर ठरेल वगैरे माहितीदेखील या अॅपवरून मिळते. त्याचप्रमाणे आतापर्यंतच्या साधारण विविध वेळी असणाऱ्या वाहतुकीच्या प्रमाणानुसार कोणत्यावेळी कोणता मार्ग स्वीकारल्यास फायदेशीर ठरेल तेसुद्धा मशिन लर्निंगच्या आधारे आपल्याला समजते. अशा वेगवेगळ्या अॅपचा वापर आपण सर्वच करत असतो, त्याचबरोबर ‘ओला’, ‘उबेर’सारख्या टॅक्सी कंपन्यासुद्धा करत असतात. वाहतुकीच्या मार्गानुसार व गर्दीनुसार लागणाऱ्या वेळेच्या प्रमाणात बिलाची बिलाची संभाव्य रक्कम ग्राहकाला कळवण्यात येते. या कंपन्या शेअरिंगचा पर्याय उपलब्ध करून देतात. त्या आधारे, एकाच मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांना कमी खर्चात त्यांना हव्या त्या ठिकाणी पोचता येते.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्समधील मशिन लर्निंग तंत्राचा ‘फेसबुक’, ‘ट्विटर’, ‘इन्स्टाग्राम’ आदींमधे होणारा वापर अजिबातच नवीन नाही. आपल्या शेअर तसेच लाइक केलेल्या पोस्ट्सवरून आपला स्वभाव तसेच कल शोधला जातो, त्यानुसार काही उत्पादनांच्या जाहिराती 'पुश' केल्या जातात. त्याचप्रमाणे, साधारण एका प्रकारच्या स्वभावाच्या, तसेच विचारांच्या लोकांना एकमेकांचे 'फ्रेंड' होण्यासाठी सुचवले जाते. यातून विविध कंपन्यांना आपले उत्पादन जगभरात पोचवण्यात मदत होते. ‘अॅमेझॉन’ किंवा ‘फ्लिपकार्ट’सारख्या कंपन्यासुद्धा असेच इंटेलिजन्ट अल्गोरिदम वापरतात. त्यानुसार एखादी वस्तू विकत घेतल्यास ग्राहकाला त्याच्या आधीच्या खरेदीशी संलग्न उत्पादने विकत  घेण्याविषयी सुचविले जाते. उदाहरणार्थ, अॅक्वेरियम किंवा माशांसाठीची काचेची पेटी विकत घेतल्यास, त्याच्याशी संलग्न वाळू, फिल्टर आदींचे विविध पर्याय अगदी विकत घेतलेल्या अॅक्वेरियमच्या किमती, तसेच आकारानुसार सुचविल्या जातात. आपण गूगलवर जे काही शोधतो, पाहतो, किती वेळ पाहतो, शोधण्यासाठी कोणते शब्द टाइप करतो, काय डाऊनलोड करतो, अगदी कोणत्या देशात, किंवा भागात असतो आदी सर्वांचे मशिन लर्निंगच्या विविध तंत्राचा वापर करून आपला एक साधारण स्वभाव गूगलला माहीत असतो. त्यानुसार आपल्या गूगलवर दिसणारे पर्यायसुद्धा बदलत राहतात. त्यामुळे आपण वापरलेल्या शब्दांच्या आधारे शोधलेल्या माहिती देण्यासाठी गूगलवर दिसणारे पर्याय आणि भिन्न स्वभावाच्या आपल्या मित्राने वापरलेल्या शब्दांच्या आधारे गूगलवर दिसणारे पर्याय वेगळे असू शकतात. हे सर्व ‘यूट्युब’सारख्या वेबसाइट्ससाठीसुद्धा वापरण्यात येते. आपण सबस्क्राईब केलेल्या चॅनेल्सशी संबंधित असलेले इतर विविध व्हिडिओ व चॅनेल्स आपल्याला दाखवण्यात येतात. यातून खरेतर आपले मन अधिकाधिक वाचणे, समजून घेणे व त्यानुसार कंपन्यांना आपल्याला विविध उत्पादने विकत घेण्याबद्दल सुचविणे  शक्य होते. अगदी शाळा, कॉलेजांच्या जाहिरातीसुद्धा याच मार्गाने आपल्या पर्यंत पोचतात. याचे फायदेसुद्धा आहेत. म्हणजे, साधारण आवड किंवा कल असलेल्या व्यक्तीकडेच त्यासंबंधित उत्पादनांच्या जाहिराती पोचवल्या जातात. उत्पादन कंपन्या तसेच काही प्रमाणात ग्राहकाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे. ‘लिंक्ड-इन’ सारख्या सोशल वेबसाइट मशिन लर्निंग सॉफ्टवेअरचा वापर करून प्रत्येक युझरचे प्रोफाइल एका ठरावीक प्रकारात वर्गीकृत करतात. एखाद्या युझरच्या किंवा उमेदवाराच्या बायोडेटाशी मिळत्याजुळत्या कंपन्यांबरोबर त्याला जोडून दिले जाते. कंपन्यांच्या नवीन भरतीसाठी एखादा बायोडेटा संबंधित असल्याचे दिसत असेल तर त्या युझरला किंवा उमेदवाराला त्याप्रमाणे अलर्टसुद्धा केले जाते. 

बँकिंग क्षेत्राने आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच नवनवीन योजना पोचवण्यासाठी खूप आधीच सुरू केला आहे. त्यामधे एखाद्या ग्राहकाच्या पैसे खर्च करण्याच्या, गुंतवणुकीच्या पद्धतीनुसार, तसेच मिळणाऱ्या पगारानुसार विविध योजनांची माहिती देणे आदींचा समावेश आहे. इंटरनेट किंवा मोबाईलचा वापर करून बँकिंगचे व्यवहार करणारा ग्राहक वापरत असलेल्या कॉम्प्युटरची तसेच मोबाईलची साधारणतः माहिती बँकेकडे असते. त्यात काही विशिष्ट बदल दिसल्यास ग्राहकाची सत्यता तपासली जाते. उदाहरणार्थ, ठरावीक पद्धतीपेक्षा वेगळा व्यवहार केल्यास, किंवा नेहमीच्या खरेदीच्या जागांपासून खूप दूर व्यवहार केल्यास, ग्राहकाला काही ठरावीक प्रश्न विचारले जातात. मिळणाऱ्या उत्तरांवरूनच पुढील परवानगी दिली जाते. यातून बँकेची इंटेलिजन्ट सिस्टिम अधिकाधिक प्रगल्भ बनत जाते व संभाव्य फसवणूक आणि त्यातून होणारा मनस्ताप तर टळतोच, पण बँकेची विश्वासार्हतासुद्धा वाढीस लागते.

आज ईमेल मधून व्हायरस येण्याचे प्रमाण जवळजवळ ९९.९ टक्क्यांनी कमी झाले आहे. कारण आपल्याला येणारा प्रत्येक ईमेल तपासला जातो. प्रत्येक ईमेल अॅड्रेसचे मशिन लर्निंग आधारे वर्गीकरण केलेले असते. ही प्रक्रिया सतत सुरू असते. त्यामुळे सुरक्षितता अधिक मिळते. ईमेलमधील लिहिलेल्या मजकुराच्या आधारे त्याचे वर्गीकरण ‘प्रायमरी’, ‘जाहिरात’, ‘स्पॅम’ किंवा ‘धोकादायक’, ‘सोशल’ असे केले जाते. त्यावरून, इनबॉक्स मधील विविध फोल्डर्समधे ईमेल जाऊन पडतात. सतत धोकादायक ठरणारे ईमेल्स कायमचे ब्लॉक होतात. नव्याने उपलब्ध झालेल्या फीचरनुसार ईमेलमधील लिहिलेल्या मजकुराच्या आधारे स्मार्ट रिप्लायचे पर्यायसुद्धा उपलब्ध झालेले आहेत. म्हणजे, आपल्याला आलेल्या ईमेलमध्ये एखादे काम पूर्ण झाल्याबद्दलची विचारणा असल्यास, त्यानुसार ‘काम झाले आहे’, किंवा, ‘होतच आले आहे’ वगैरे स्मार्ट रिप्लायचे पर्याय उपलब्ध होतात. ‘पिंटरेस्ट वेबसाइट लेन्स’ नावाचे मशिन लर्निंग सॉफ्टवेअर फोटोंमधील विविध वस्तू शोधण्यासाठी करते. एखाद्या वस्तूचा फोटो ‘पिंटरेस्ट’वर अपलोड केल्यास ती वस्तू कोठे कोठे विक्रीस उपलब्ध आहे त्याची यादीच युझरला उपलब्ध करून दिली जाते. तसेच ‘पिंटरेस्ट’वर एखादी वस्तू आपण पाहत असल्यास त्यानुसार विक्रीची ठिकाणे सांगते.

कित्येक उदाहरणांपैकी ही काही ठरावीकच प्रातिनिधिक उदाहरणे आहेत, ज्यांचा सर्वसामान्य माणसांशी जवळजवळ रोजच संबंध येत असतो. यावरून आपल्या हे लक्षात येईल की आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आपण रोजच कित्येक वेळा वापरात असतो. त्याचे चांगले परिणामही दिसत आहेत. त्यातून आपल्या कित्येक दैनंदिन गोष्टी अधिक सुरळीत व सुरक्षित तसेच स्वस्त व सहज होत आहेत. जसजसे आपल्या दैनंदिन कामात कॉम्प्युटर, इंटरनेट, तसेच डिजिटल तंत्रांचा वापर वाढत जाईल, तसतसे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापरही वाढतच जाईल. जगाच्या बरोबर राहण्यासाठी नव्हे, तर चार पावले पुढे जाण्यासाठीदेखील त्याचा वापर अपरिहार्य असल्याने या तंत्राला नाक मुरडण्यापेक्षा सुरक्षाविषयक सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांचे भान ठेवून हे तंत्रज्ञान आत्मसात करणे, हेच खरे प्रगतीच्या दिशेने पडणारे पाऊल आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अपरिहार्य होत असताना या नाण्याची दुसरी बाजूही कायम लक्षात ठेवणे तेवढेच गरजेचे आहे. तंत्रज्ञान हे साधन असते आणि प्रत्येकच साधनाप्रमाणे तंत्रज्ञानाच्याही नैतिक आणि अनैतिक अशा दोन बाजू असतात. अगदी दररोजच्या वापरात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर होत असताना त्याच्या बऱ्या-वाईट बाजू आणि उपयोगांबद्दल सतत जागरूकता निर्माण करत राहणे, कायदे निर्माण करणे, त्यात सुधारणा करत राहणे आणि त्यानुसार सकारात्मक उपाय योजना आखत राहणेही क्रमप्राप्त आहे.

(या लेखाबरोबर ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ हे सदर समाप्त होत आहे.)
 

 

संबंधित बातम्या