ग्रहमान ः १९ ते २५ मे २०१८

अनिता केळकर
शुक्रवार, 18 मे 2018

ग्रहमान
 

मेष : व्यवसायात उतावळेपणा करू नये. घाईने निर्णय न घेता वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. आर्थिक व्यवहारात सतर्क राहावे. नोकरदार व्यक्तींना सहकारी व वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल ही अपेक्षा करू नये. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. महिलांना कामाचा ताण पडेल. तरी चिडचिड करू नये. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. 

वृषभ : ग्रहांची साथ आहे, त्यामुळे नवीन कामांना गती येईल. व्यवसायात कामात उलाढाल वाढेल. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत कौतुकास्पद कार्य घडेल. बढती मिळण्याची शक्‍यता आहे. आर्थिक लाभ होतील. शुभवार्ता कळतील. महिलांना घरासाठी नवीन खरेदीचे योग येतील. प्रकृतीची मात्र कुरबूर राहील तरी काळजी घ्यावी. कलाकार, खेळाडूंना मानसन्मान मिळतील. 

मिथुन : "आपले काम बरे नी आपण बरे' हे धोरण लाभदायी ठरेल. व्यवसायात अनपेक्षित खर्च वाढतील. पैशाची तजवीज करावी लागले. नोकरीत जिभेवर साखर पेरून बोलावे. फुकटचे सल्ले देऊ नयेत. सहकारी कामात मदत करतील. महिलांना खर्चाची हातमिळवणी करताना नाकीनऊ येतील. बोलण्याने गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. 

कर्क : अशक्‍यप्राय कामे शक्‍य करून यश संपादन कराल. धंदा व्यवसायात कामांना झालेला विलंब आर्थिक फटका देईल. कामाच्या कार्यपद्धतीत बदल करून नुकसान भरपाई करण्याचा इरादा राहील. नोकरीत कामाची जबाबदारी वाढेल. सहकाऱ्यांकडून खुबीने कामे करून घ्यावीत. महिलांना चिंता निरसन झाल्याचे मानसिक समाधान मिळेल. आप्तेष्ट व नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील. 

सिंह : व्यवसायात लवचिक धोरण लाभदायी ठरेल. कामाचा झपाटा वाखाणण्याजोगा राहील. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. आर्थिक बाबतीत चोखंदळ राहावे. नोकरीत केलेल्या कामाचे यश मिळेल. कामानिमित्ताने प्रवास घडेल. नवीन ओळखी होतील. अधिकार मिळतील. महिलांना कामाचा आनंद मिळेल. प्रकृतीस्वास्थ्याबाबत थोडी कुरबूर राहील. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. 

कन्या : बौद्धिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळेल. व्यवसाय वृद्धिंगत होईल. कामाच्या पद्धतीत बदल करून प्रगती कराल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. प्रवास घडेल. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमचे महत्त्व कळेल. केलेल्या कामाचे श्रेय देतील. महिलांना कौटुंबिक सुख व आर्थिक ऊब मिळेल. मन प्रसन्न राहील. 

तूळ : व्यवसायात कामाचा उरक पाडाल. पैशाची वसुली करण्यावर लक्ष केंद्रित कराल. नोकरीत कामात चालढकल करू नये. सहकाऱ्यांवर बरीचशी मदार राहील. गैरसमजुतीने वादविवाद होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. महिलांना घरात मनाविरुद्ध वागावे लागेल तरी चिडू नये. आवडत्या छंदात मन रमवावे. 

वृश्‍चिक : सर्व महत्त्वाचे ग्रह अनुकूल नाहीत, तरी धाडस करू नये. व्यवसायात प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकावे. स्वतःची कुवत ओळखून कामे स्वीकारावीत. नोकरीत वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन करणे हिताचे ठरेल. गोड बोलून खुबीने सहकाऱ्यांकडून कामे करून घ्यावीत. बेरोजगार व्यक्तींना नवीन कामाची संधी दृष्टिक्षेपात येईल. घरात महिलांना प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. विश्रांती घ्यावी. 
धनू : 'रात्र थोडी सोंगे फार' अशी स्थिती सध्या तुमची असेल. कामाचे योग्य नियोजन भविष्यात लाभदायी ठरेल. व्यवसायात प्रगती होईल. कामे मार्गी लागतील. उत्साही राहाल. नोकरीत केलेल्या कष्टाचे चीज होईल. वरिष्ठ व सहकारी यांना तुमचे महत्त्व कळेल. नवीन हितसंबंध जोडले जातील. महिलांना आनंदाची बातमी मन प्रफुल्लित करेल. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. नवीन खरेदीच बेत ठरतील. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. खेळाडूंना प्रसिद्धी मिळेल.

मकर : सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कृती करावी. यश मिळेल. व्यवसायात नवीन पद्धतीचा अवलंब फायदे मिळवून देईल. पैशाची स्थिती समाधानकारक असल्याने मनाप्रमाणे खर्च करू शकाल. नोकरीत वरिष्ठांच्या विरोधात उभे राहाल. त्याचा भविष्यात फायदाच होईल. कामात मात्र यश मिळवाल. मानसिक समाधान मिळेल. घरात महिलांना दगदग धावपळ वाढेल. नको त्या कामात बराच वेळ जाईल. तरुणांना नवीन सहवासाचे आकर्षण वाटेल. 

कुंभ : हाती घ्याल ते तडीस न्याल. व्यवसायात कामात विशेष चमक दाखवाल. जुनी येणी वसूल होतील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत किचकट कामे हातील घ्याल. वरिष्ठ व सहकाऱ्यांच्या विश्‍वासास पात्र ठराल. जोडधंद्यातून विशेष लाभ मिळू शकेल. महिलांना कामात वेळ जाईल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. कलावंत, खेळाडूंना नैपुण्य मिळेल. 

मीन : आनंदी वातावरण मन प्रसन्न राखेल. व्यवसायात कामांना गती येईल. पैशाची चिंता मिटेल. नवीन कामेही मिळतील. नोकरीत कामात जोश येईल. नवीन संधी मिळेल. पूर्वी केलेल्या कामाचे कौतुक होईल. महिलांना मुलांकडून सुवार्ता कळेल. प्रकृतीमान सुधारेल. प्रियजनांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. स्वप्ने साकार होतील. 

संबंधित बातम्या